संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा उपाययोजना

संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा उपाययोजना
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा उपाययोजना

विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा संपताना संत्रा झाडे वाळण्याची समस्या आढळते. मोठ्या मेहनतीने तयार केलेली संत्र्याची झाडे एकाएकी वाळल्याने कष्ट आणि पैसाही वाया जातो. ते टाळण्यासाठी झाडे वाळण्याचे नेमके कारण जाणून, योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत. अनेक शेतकऱ्यांना संत्रा झाडे वाळण्याचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांतील हवामानाचा आढावा घेऊन, अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केली असता झाडे वाळण्याची काही प्रमुख कारणे निदर्शनास आली. संत्रा झाडे वाळण्याची कारणे संत्रा बागेला ओलीत करण्यास पाण्याची कमतरता : दिवसेंदिवस उन्हाळ्याचा कालावधी वाढत आहे. दर वर्षी सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी होत असल्याने भूजल पातळी खोलवर जात आहे. ओलिताकरिता पाण्याचा साठा कमी पडत आहे. याचा फटका उन्हाळ्यात संत्रा झाडांना सिंचनाकरिता पुरेसे पाणी न उपलब्द होण्यामध्ये झाला आहे. उन्हाळ्यातील वाढलेले अधिक तापमान : जागतिक पातळीवरील तापमानात वाढ होत आहे. आपल्याकडेही अनेक ठिकाणी उन्हाळ्यातील विशेषतः एप्रिल-मे महिन्यातील तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अधिक तापमान व जमिनीत ओलावा नसल्याची स्थिती यामुळे संत्रा झाडे वाळण्याचे प्रमाण अधिक दिसत आहे. संत्रा झाडावर अधिक फळधारणा : संत्रा झाडावर प्रमाणापेक्षा जास्त फळे (प्रतिझाड २५०० ते ३००० फळे) घेणे, जास्त फळधारणा झाल्यानंतर विरळणी न करणे, यामुळे संत्रा झाडांचे प्रकृतिमान खालावते. परिणामी झाडे वाळतात. अतिवृष्टीमुळे बागेत साचलेले पाणी : हवामानातील बदलामुळे पाऊस समप्रमाणात न होता काही काळातच भरपूर पडतो. कधी कधी पावसाची झड सारखी ३-४ दिवस राहते, त्यामुळे बागेत पावसाचे पाणी साचून राहते. या पाण्यात झाडांची तंतुमय मुळे सडतात. बुरशीजन्य (फायटोप्थोरा) रोगाचा प्रादुर्भाव : पावसामुळे संत्रा बागेतील जमिनीमध्ये फायटोप्थोरा या बुरशीला पोषक हवामान उपलब्ध होते. संत्रा झाडाच्या मुळांवर फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होतो. मुळ्या सडून अन्नद्रव्य घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद पडते. झाडे वाळतात. संत्रा बागेत मशागतीचा अभाव : संत्रा बागेतील मशागतीच्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, संत्रा झाडांना हानी पोचते. हे टाळण्यासाठी खतपुरवठा, ओलीत व्यवस्थापन, सल काढणे आणि आंतरमशागत इत्यादी कामे वेळच्या वेळी करणे आवश्‍यक आहे. संत्रा झाडे न वाळण्याकरिता उपाययोजना

  • उन्हाळ्यातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊनच योग्य संख्येत झाडाची लागवड करावी. त्यामुळे झाडे योग्य प्रकारे ओलीत करणे व पोसणे शक्‍य होईल.
  • जमिनीत ओलावा टिकून राहण्याकरिता उन्हाळ्यात संत्रा झाडांचा वाफा गवताने आच्छादित करावा.
  • उष्ण वाऱ्यापासून संरक्षण करण्याकरिता बागेसभोवती शेवरीसारखे सजीव कुंपण लावावे.
  • संत्रा झाडावर जास्त झालेल्या फळांची विरळणी करावी. प्रतिझाड ८०० ते १००० फळे ठेवावीत.
  • पावसाचे पाणी बागेत साचणार नाही याकरिता पावसाळा सुरू होताच ओलिताकरिता केलेले वाफे मोडून टाकावेत. दोन झाडांच्या मधोमध एक चर (२ फूट रुंद, १ फूट खोल लांबीच्या दिशेने) खोदावा. या चरामधून साचलेले पाणी बागेबाहेर काढून द्यावे.
  • संत्रा बागेतील महत्त्वाची उदा. खतपुरवठा, ओलीत व्यवस्थापन, सल काढणे इत्यादी कामे वेळेवर करावीत.
  • प्रा. रवींद्र जाधव, ९८२३८२८६४५ (सहायक प्राध्यापक, सौ. के. एस. के.(काकू) कृषी महाविद्यालय, बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com