करारावरील भाजीपाला शेतीतून कोळी यांनी बसवला जम

करारावरील भाजीपाला शेतीतून कोळी यांनी बसवला जम
करारावरील भाजीपाला शेतीतून कोळी यांनी बसवला जम

कोळदा (ता. जि. नंदुरबार) येथे सुकदेव कोळी हे भूमिहिन असून, करारावर शेती घेत आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवतात. गेल्या पाच वर्षांपासून करारावरील शेतीमध्ये कोरडवाहू पद्धतीने गिलके व दोडक्‍यांची शेती यशस्वी केली आहे. किमान खर्च, संपूर्ण कुटुंबाच्या कष्टाने या शेतीमध्ये त्यांनी जम बसवला असून, त्यांच्या भाज्यांना धुळे, नंदुरबार, शिरपूर येथील बाजारात चांगली ओळख मिळवली आहे. नंदुरबार शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर कोळदा हे आहे. जमीन काळी कसदार, मध्यम प्रकारची असून, बहुतांश शेती कोरडवाहू आहे. अगदी पावसाळ्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने बागायती शेती फारशी नाही. ज्यांच्याकडे थोडबहुत पाणी आहे, असे शेतकरी कापसाचे किंवा ठिबकवर मिरचीचे पीक घेतात. या गावात सन १९९९ मध्ये सुकदेव कोळी आपल्या कुटुंबीयांसोबत आले. हे त्यांचे आजोळ (मामाचे गाव). आजोळच्या नातेवाइकांचा आधार असला तरी शेती नसल्याने भूमिहीन आहेत. शेती हाच पिंड असलेल्या या कुटुंबाला मजुरीशिवाय पर्याय नव्हता. त्यांच्या मूळ गावी (जापी, ता. जि. धुळे) येथे वडिलोपार्जित थोडी शेती आहे. सुकदेव यांचे वडील छन्नू कोळी हे पांझरा नदीत ठिकठिकाणी खरबुजाचे पीक घेत. या पिकात छन्नू यांची हातोटी बसलेली. पूर्णतः नदीमधील पाण्याच्या ओलाव्यावर केल्या जाणाऱ्या या शेतीचा वडिलांसोबत सुकदेव यांनाही अनुभव आहे. मात्र, दुष्काळी स्थिती व अन्य कारणांमुळे स्थलांतर करावे लागले. शेतीमध्ये श्रम केले तर कधीही तोटा येत नाही, असे सुकदेव मानतात. त्यामुळे हळूहळू त्यांनी करारावर शेती घेऊन ती कसायला चालू केली. पाच एकरपासून सुरवात करून आता १३ एकरपर्यंत शेती कराराने घेत आहे. कोरडवाहू पद्धतीने कापूस, कडधान्याचे उत्पादन घेत. खर्च वगळता अत्यल्प नफा राहायचा. दैनंदिन खर्चाची अडचणी होत. मात्र, त्यांना पाच वर्षांपूर्वी भाजीपाला शेती करण्याची कल्पना सुचली. कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून, त्यांनी गिलके (घोसावळे) आणि दोडके शेतीला सुरवात केली. अशी आहे त्यांची भाजीपाला शेती कोणतीही शेती पावसाच्या आधारावर करताना उत्पादनाशी खात्री देता येत नाही. अशावेळी कमीत कमी पाण्यावर, ओलाव्यावर येणाऱ्या गिलके व दोडके या वेलवर्गीय भाज्यांना सुकदेव यांनी प्राधान्य दिले आहे. त्यासाठी हलक्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची ते निवड करतात. पिकाची दरवर्षी जूनमध्ये पहिल्या पावसाच्या ओलीवर केली जाते. त्यांच्याकडे दोन एकर गिलके व दोन एकर क्षेत्रावर दोडके हे पीक असते. बियाणांसाठी सुमारे १० हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. पिकांच्या व्यवस्थापनातील अडचणींसाठी सुकदेव हे कोळदे (ता. जि. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांच्या संपर्कात असतात. फक्त एकदाच रासायनिक खतांचा बेसल डोस दिला जातो. रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करतात. लागवडीनंतर गिलके व दोडक्‍यांचे उत्पादन ४२ दिवसांनी सुरू होते. एक दिवसाआड तोडणी केली जाते. वाहतूक समस्या सोडवली... पाच एकरांतून दोन दिवसाआड किमान गिलके व दोडके यांचे चार क्विंटल उत्पादन मिळते. ते बाजारापर्यंत नेण्यासाठी वाहतूक भाडे अधिक लागायचे. शिवाय लांब अंतरावरील बाजारात भाज्या पोचवणे शक्य होत नसे. यावर उपाय म्हणून एक दोन टन क्षमतेची मालवाहू गाडी विकत घेतली आहे. आता शिरपूर (जि. धुळे), नंदुरबार, धुळे व गुजरातमधील सुरत येथपर्यंत गिलके व दोडके विक्रीसाठी नेता येऊ लागल्या. दरांचा अंदाज घेऊन करतात विक्री

  • गेल्या दोन वर्षांमध्ये गिलक्‍याला २० ते ३५ रुपये प्रतिकिलो आणि दोडक्‍याला १५ ते २५ रुपये प्रतिकिलोचा असा दर मिळत आहे. सुरत येथे दोडक्‍यांला चांगली मागणी असून, दरही अनेक वेळा ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळत असल्याचे ते सांगतात.
  • दरवर्षी सातत्यपूर्ण उत्पादनामुळे नंदुरबार, धुळ्यातील बाजारपेठेत सुकदेव यांचे गिलके व दोडके प्रसिद्ध आहेत.
  • शिरपूर, धुळे, नंदूरबार, सुरत या सर्व बाजारांमधील व्यापाऱ्यांशी गेल्या चार वर्षांत चांगले संबंध तयार झाले आहेत. त्यांच्या संपर्कात राहून, बाजारातील दरांचा नेहमी अंदाज घेतात. त्यानुसार कोणत्या बाजारात माल न्यायचा हे ठरवले जाते. त्यातून थोडा अधिक नफा पदरी पडत असल्याचे सुकदेव सांगतात.
  • संपूर्ण कुटुंबाचे कष्ट यंदा १३ एकर शेती केली आहे. त्यात पाच एकरांत गिलके व दोडके आणि उर्वरित क्षेत्रात कापसाचे पीक आहे. सुकदेव यांची पत्नी जिजाबाई, मुले विजय व रामकृष्ण आणि सुना यांची शेतात गिलके व दोडके तोडणीसाठी मदत मिळते. तेदेखील पूर्ण वेळ शेतीच करतात. शेतीच्या करारापोटी एकरी काही रक्कम शेतमालकांना जाते. मात्र, नियमितपणामुळे त्यांच्याशी उत्तम संबंध निर्माण झाले आहेत. सर्व कुटुंब शेतीमध्ये राबत असल्याने भाज्यांच्या उत्पादनातून चार एकरांतून दोन लाख रुपये मिळाले. या शेतीतून सर्व खर्च वजा जाता कष्टाला उत्तम फळ मिळत असल्याचे सुकदेव सांगतात. ओलाव्यावरच ठरतो फायदा गिलके व दोडक्‍याचे तोडे दोन महिने सुरू असतात. परतीचा पाऊस चांगला झाला तर तोडे डिसेंबरमध्येही सुरू असतात. पिकाच्या वेली जमिनीवरच वाढू दिल्या जातात. त्याचे आच्छादन होत असल्याने वाफसा कायम टिकून राहतो. पावसाचा खंड २०-२२ दिवसांपर्यंत राहीला तरी पीक तग धरते, फारसे नुकसान होत नसल्याचे सुकदेव यांचे निरीक्षण आहे. पीक अंतिम टप्प्यात आल्यानंतर ते काढून शेत भुसभुशीत केले जाते. वाफसा चांगला असला तर हरभऱ्याचे कोरडवाहू पीकही घेतले जाते. सुकदेव कोळी, ९६०४८३६८२५, अशोक कोळी, ८८८८१८६८३७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com