गढूळ पाण्याच्या प्रवाहावर प्रक्रियेसाठी खनिजमिश्रित वाळूची यंत्रणा

गढूळ पाण्याच्या प्रवाहावर प्रक्रियेसाठी खनिजमिश्रित वाळूची यंत्रणा
गढूळ पाण्याच्या प्रवाहावर प्रक्रियेसाठी खनिजमिश्रित वाळूची यंत्रणा

पूर किंवा वादळी स्थितीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याचे शुद्धीकरण करण्याची नवी पद्धती बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केली आहे. वाळूंच्या कणांवर खनिजांचे आवरण केल्यामुळे त्यांची गाळण क्षमता वाढते. परिणामी अवर्षणाच्या किंवा पाण्याच्या ताण स्थितीमध्ये अशा पाण्याचा पिण्यासाठी वापर करणे शक्य होते. डोंगर दऱ्यामध्ये पावसाचे पाणी कोणालाही आकर्षित करते. मात्र, शहरामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये अनेक विषारी किंवा प्रदूषणकारक घटक मिसळले जातात. त्याचा रंग बदलतो. असे पाणी त्वरित नद्या किंवा पाण्याच्या जवळच्या प्रवाहामध्ये सोडण्याची किंवा निचरा करण्याची व्यवस्था केलेली असते. कॅलिफोर्निया -बर्केले विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी जोसेफ चार्बोन्नेट व त्यांच्या गटाने अशा वाहत्या पाण्याचा प्रवाह भूजलामध्ये मिसळण्याआधी खनिज आवरण असलेल्या वाळूतून पुढे पाठवण्याची व्यवस्था केला. या साठवलेल्या पाण्याचा वापर कोरड्या आणि ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो, अशा लॉस एंजेलिससारख्या ठिकाणी होऊ शकतो. भूजल स्तरामध्ये (अॅक्वीफर) त्यांचा साठा करणे शक्य आहे. - पाण्याच्या प्रवाह हा खनिज आवरण असलेल्या वाळूतून पुढे पाठवला जातो. वाळू नैसर्गिकपणे मोठ्या प्रदूषण कणांना वेगळे करण्याचे काम करते. त्यावर खास विकसित केले आवरण सेंद्रिय प्रदूषक घटकांशी प्रक्रिया करून ते नष्ट करतात. भूमिगत जल साठ्यामध्ये पाण्याचा निचरा होताना तो सुरक्षित व शुद्ध असावा, यासाठी वाळूचा वापर केला जातो. पिण्यासाठी सुरक्षित पाणी साठे करण्यासाठी या तत्त्वाचा उपयोग होऊ शकतो. या विषयी माहिती देताना जोसेफ चार्बोन्नेट यांनी सांगितले, की पूर किंवा वादळी पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती उपलब्ध नसल्याने या पाण्याकडे जलस्रोतांचे प्रदूषण या नजरेने पाहिले जाते. या पाण्यातील प्रदूषणकारी घटक वेगळे करण्यासाठी आम्ही नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यासाठी वापरली जाणारी खनिजो ही कमी किमतींची, पर्यावरणपूरक असून, नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारी आहेत.

  • काही शहरामध्ये पावसाच्या पाण्यावरील प्रक्रिया आणि साठवणीच्या सुविधा कमी अधिक प्रमाणात केल्या आहेत. त्यामध्ये बायोस्वाल आणि पावसाळी बागांची निर्मिती करण्याकडे अधिक कल आहे. चार्बोन्नेट हे सध्या लॉस एंजेलिस येथील एका स्थानिक समुदायासोबत काम करत आहेत. त्यामध्ये ४६ एकर खडीचा भाग हा पाणी प्रक्रियेसाठी खास रूपांतरित करण्यात येत आहे.
  • वरील प्रकल्पामध्ये मार्गदर्शन करणारे व कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. डेव्हीड सेडलॅक यांनी सांगितले, की शहरामध्ये इमारती, रस्ते आणि पार्किग लॉट उभारणी होण्यापूर्वी पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरून भूजल स्तरामध्ये मिसळत असे. पाण्याच्या ताणाची स्थिती असलेल्या प्रदेशामध्ये या पाण्याचा वापर करणे शक्य असे. मात्र, पाण्याचा दर्जा ही मुख्य समस्या राहत असते. पाण्याचा दर्जा उत्तम राहण्यासाठी आवरण असलेली वाळू हा चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे अनेक प्रदषूणकारी घटक वेगळे करणे शक्य होते.
  • प्रदूषक घटक केले जातात कमी ः चार्बोन्नेट व त्यांच्या गटाने साध्या वाळूमध्ये दोन प्रकारातील मॅंगेनीज मिसळले. त्यांच्या प्रक्रियेतून मॅंगेनीज ऑक्साईड तयार होते. हे खनिज सेंद्रिय रसायनांना बांधून ठेवते. त्याचे लहान मूलद्रव्यांमध्ये तुकडे करते. परिणामी त्यांचे विषारीपण कमी होते. त्यांचे विघटन होण्यास मदत होते.

  • मॅंगेनीज ऑक्साईडच्या आवरणामुळे वाळूचा रंग फिक्कट तपकिरी होतो. हे मूलद्रव्य संपूर्ण सुरक्षित असून, पर्यावरणाला कोणतीही हानी पोचत नाही.
  • या वाळूच्या थरामध्ये पाण्यातील संपूर्ण प्रदूषण दूर होत नसले तरी अन्य शुद्धीकरण प्रक्रियांचा वापर पुढील टप्प्यात करावा लागत असल्याचे सेडलॅक यांनी सांगितले.
  • बीपीए (बायस्फिनॉल ए आणि अन्य सेंद्रिय संयुगे) यांचे प्रमाण कमी असलेले लोंढ्याचे पाणी वाळूंच्या उभ्या थरातून सोडण्यात आले. तेव्हा हे जवळपास सर्व घटक वेगळे करत असल्याचे दिसून आले. मात्र, अधिक काळ वापरताना या थरांची कार्यक्षमता कमी होते. यावर मात करण्यासाठी दर एक किंवा दोन वर्षानंतर खड्ड्यामधून वाळू काढून दुसरी भरणे यासाठी मजूर अधिक प्रमाणात लागतात. ही मर्यादा दूर करण्यासाठी वाळूमध्ये तीव्रता कमी केलेले क्लोरीन द्रावण (२५ पीपीएम) मिसळले. त्यामुळे पाणी शुद्धीकरण करण्याची वाळूंची पूर्वीची क्षमता प्राप्त होत असल्याचे दिसून आले. क्लोरीन द्रावणाच्या साह्याने वाळूचे (१.६ फूट थर) पुनर्भरण करण्यासाठी साधारणपणे दोन दिवस लागतात.
  • पुढील टप्प्यामध्ये सोनोमा कौंटी येथील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.
  • हे संशोधन ‘जर्नल एन्व्हायर्नमेंटल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com