ऊर्जा बचतीचे महत्त्वाचे उपाय...

अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वीजनिर्मितीसाठी उपयोग केल्याने खनिज इंधनाची बचत होऊन हरितगृह वायूचे उर्त्सजन कमी होण्यास मोठी मदत होते. आर्थिक विकासासाठी कार्यक्षम ऊर्जा वापर अत्यंत आवश्यक आहे.
ऊर्जा बचतीचे महत्त्वाचे उपाय...
ऊर्जा बचतीचे महत्त्वाचे उपाय...

ऊर्जा वापरणाऱ्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे २० ते ३० टक्के कमी ऊर्जेचा वापर करतात. ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ झाल्यास हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होईल. ऊर्जेचा वापर अधिक कार्यक्षमतेने करणे हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या वीज पारेषण आणि वितरण प्रणालीमध्ये सुमारे २५ ते ३० टक्के ऊर्जेचा अपव्यय होतो. प्रत्यक्षात ऊर्जेचा वापर हा फक्त ७० ते ७५ टक्के आहे. तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार उद्योगामध्ये २५ टक्के, घरगुती स्तरावर २० टक्के, वाणिज्यक स्तरावर ३० टक्के आणि कृषी क्षेत्रामध्ये ३० टक्के ऊर्जा संवर्धनास वाव आहे. ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणात केलेल्या वापरामुळे खनिज इंधनांचे साठे झपाट्याने कमी होत आहेत. खनिज तेलाच्या आयातीसाठी विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणावर गरज लागते. ऊर्जा बचतीमुळे उत्पादनाची किंमत कमी होऊन जास्तीत जास्त नफा मिळविता येतो. आर्थिक विकासासाठी कार्यक्षम ऊर्जा वापर अत्यंत आवश्यक आहे. भारत सरकारने ‘ऊर्जा संवर्धन कायदा - २००१’ मंजूर करून ऊर्जा संवर्धनाच्या कार्यक्रमाला चालना दिली. हा कायदा अमलात आणण्यासाठी भारत सरकारने ‘ब्युरो ऑफ एनर्जी इफिसिएन्सी’ची स्थापना केली. ही संस्था केंद्रीय स्तरावर कार्यरत असून, ऊर्जा संवर्धन कायदा - २००१ शी निगडित नियम व मानदंड ठरविते. या कायद्यातील तरतुदी प्रत्येक राज्यात अंमलात आणण्यासाठी राज्य सरकारकडून एक पदनिर्देशित संस्थेची नेमणूक करण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्रासाठी महाऊर्जाची नेमणूक करण्यात आली आहे. ऊर्जा संवर्धन कार्यक्रमात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वाढता वापर करणे गरजेचे आहे. सौरऊर्जेचा वापर करून पाणी गरम केल्यामुळे ऊर्जेची मोठ्या प्रमाणावर बचत होते. बायोगॅस, बायोमास, सौरऊर्जा आणि इतर अनेक अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वीजनिर्मितीसाठी उपयोग केल्याने खनिज इंधनाची बचत होऊन हरितगृह वायूचे उर्त्सजन कमी होण्यास मोठी मदत होते. ऊर्जा परीक्षण हे ऊर्जा बचतीसाठी पहिले पाऊल आहे. ऊर्जा बचतीचे मार्ग  कृषिपंपाचा वापर 

  •  कमी अवरोधाच्या फूट व्हॉल्व्हमुळे ५ ते १० टक्के वीज बचत होते.
  • विद्युत पंप व मोटार समपातळीवर बसविल्यास विजेची बचत होते.
  • पाणी बाहेर फेकणारा पाइप शक्य तितका जमिनीच्या जवळ असावा.
  • पाणी खेचण्यासाठी जाडसर पी.व्ही.सी. पाइप वापरल्यास १५ टक्के वीज बचत होते.
  • व्होल्टेज स्थिर राखणे आणि मोटारमध्ये बिघाड होऊ नये म्हणून शंट कपॅसिटर बसवावा.
  •  बी.ई.ई. स्टार लेबल असलेला पंप वापरल्यास २५ टक्क्यांपर्यंत वीज बचत होऊ शकते.
  • घरामधील ऊर्जा बचत 

  • गरज नसेल तेव्हा विद्युत उपकरणे, दिवे त्वरित बंद करावीत.
  • दिवे आणि ट्यूबलाइटवर धूळ साचू देऊ नये.
  • घराच्या भिंती व छताला फिकट रंग द्यावा.
  • प्रमाणित विद्युत उपकरणे व वीजजोडणी साहित्य वापरावे.
  • विजेच्या वहनातील हानी कमी करण्यासाठी योग्य आकाराची वीज तार वापरावी.
  • आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार फ्रिजचा आकार ठरवावा. उदा. कुटुंबातील एका व्यक्तीस साधारणत: ३० लिटर क्षमता असे प्रमाण असते. आपले घर जास्त काळ बंद राहणार असल्यास फ्रिज बंद ठेवावा.
  • शक्य असेल तेथे कमी क्षमतेचे दिवे वापरावेत.
  • पाणी तापवण्याच्या गिझर्सना जास्त वीज लागते, म्हणून गिझर ऐवजी सौरऊर्जेवर चालणाऱ्या बंबाचा उपयोग करावा.
  • वातानुकूलित यंत्राला विद्युत पंख्यापेक्षा ६ पट जास्त वीज लागते. तेव्हा शक्यतो पंख्याचा वापर करावा.
  • उद्योजक, व्यवस्थापकांनी करावयाच्या उपाययोजना 

  •  कारखान्यांमध्ये ऊर्जा परीक्षण दर २ ते ३ वर्षांनी करावे.
  • आस्थापनाच्या इमारतीत कोणीही नसेल तेव्हा सुरक्षेसाठी आवश्यक असणारी प्रकाशयोजना वगळता इतर सर्व दिवे बंद ठेवावेत.
  • बल्बपेक्षा ट्यूबलाइट अधिक प्रकाश देते.
  • सूर्य प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा.
  • सजावटीसाठी विजेच्या दिव्यांचा वापर शक्यतो टाळावा.
  • शक्य होईल तेथे मधल्या भिंतीची उंची कमी ठेवावी.
  • कामकाज संपल्यानंतर वॉटर कूलर बंद करावा. जेवढ्या तापमानाला पाणी थंड हवे असेल तेवढ्याच तापमानाला पाणी थंड करावे.
  • घर्षण कमी करण्यासाठी मोटर आणि तिची कार्यक्षमता वाढविण्यासाठी योग्य शक्तीचा मोटर वापरावी.
  • जादा शक्तीची मोटर वापरल्यास जादा वीज लागते. मोटर नेहमी चांगल्या कार्यक्षमतेची वापरावी.
  • मोटरला कपॅसिटर लावावा. त्यामुळे के.व्ही.ए. चार्जेस कमी होतील. मोटारीचे नुकसान टाळता येईल.
  •  मोटारीचे पट्टे व चकत्या नेहमी घट्ट कराव्यात. त्यामुळे पट्टा घसरून वीज वाया जाण्याचे प्रकार कमी होतील.
  • खराब झालेले बेअरिंग्ज त्वरित बदलाव्यात. त्याची वेळेवर देखभाल होईल याची काळजी घ्यावी.
  • संपर्क ः डॉ. एस. आर. काळबांडे, ९३२२०३८१४० (विभाग प्रमुख, अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com