agricultural stories in Marathi, seed treatment before sowing | Agrowon

जरूर करा पेरणीपूर्व बीजप्रक्रिया

विवेक सवडे, डॉ. धीरज कदम, रजनीकांत जाधव
शनिवार, 13 जुलै 2019

बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला असून, शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य त्या कीटकनाशक, बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास सुरवातीच्या दिवसामध्ये पिकाचे रोगकिडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. रासायनिक बीजप्रक्रियेनंतर जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. यामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धता वाढून पिकांच्या वाढीला फायदा होतो.

बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला असून, शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य त्या कीटकनाशक, बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास सुरवातीच्या दिवसामध्ये पिकाचे रोगकिडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. रासायनिक बीजप्रक्रियेनंतर जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. यामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धता वाढून पिकांच्या वाढीला फायदा होतो.

पिकांमध्ये रोगाची निर्मिती सर्वसाधारणपणे बीजांमार्फत, जमिनीमार्फत व हवेमार्फत होते. यामध्ये वेगवेगळे घटक कार्यान्वित असतात. जमीन व बीजांमार्फत होणाऱ्या रोगप्रसार टाळण्यासाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते.
सर्वसाधारणतः बियाण्याच्या मार्फत पिकांवर ३ प्रकारे रोग येतात.
१) बियाण्याच्या बाह्य पृष्ठभागावरील रोगकारक सूक्ष्मजीव.
२) बियाण्यांच्या अंतर्गत भागातील रोगकारक सूक्ष्मजीव.
३) रोगकारक बिया चांगल्या बियांमध्ये अनवधानाने मिसळणे.

बीजप्रक्रिया म्हणजे काय?
जमिनीतून किंवा बियाण्यांतून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसेच बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी बियाण्यांवर जमिनीत पेरणीपूर्वी रासायनिक व जैविक घटकांची प्रक्रिया करणे होय.

फायदे
१) जमिनीतून व बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
२) बियाण्यांची उगवण क्षमता वाढते.
३) रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
४) उत्पादनात वाढ होते.
५) कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय शक्य.

रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया ः

१) बुरशीनाशकाच्या द्रावणात बी भिजवणे : प्रथम १०० किलो बियाण्यांमध्ये साधारण १ लिटर पाणी टाकून बियाणे एक मिनिट घोळून ओलसर करावे. नंतर शिफारशीत प्रमाणात बुरशीनाशक टाकून पुन्हा हे बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत ही घोळत राहावे. अधिक प्रमाणात बियाणांवर प्रक्रिया करावयाची असल्याचे पाण्याचे प्रमाण थोडे वाढवावे. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
२) बियाण्यास बुरशीनाशकाची भुकटी/ पावडर चोळणे ः बियाणे किंचित ओलसर केल्यानंतर शिफारशींनुसार प्रतिकिलो बियाण्यासाठी योग्य प्रमाणात बुरशीनाशक टाकून बियाण्यास चोळावे.

प्रक्रिया करताना

१. हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. तोंडावर मास्क लावावा.
२. अधिक प्रमाणात बियाण्यांवर प्रक्रिया करावयाची असल्यास त्यासाठी यंत्र उपलब्ध आहेत. त्यात १०० किलो बियाण्यांमध्ये सुमारे १ लिटर पाणी टाकून ते ओलसर बियाणे बीजप्रक्रिया ड्रममध्ये घ्यावेत. त्यात शिफारशीत प्रमाणात बुरशीनाशक मिसळून ३० ते ४० वेळा फिरवावे. बियाणे मिश्रण कोरडे होइपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
३) बियाणे प्रक्रियेसाठी मातीचे किंवा प्लॅस्टिक भांड्यांच्या वापर करावा. त्याचे तोंड लगेच उघडू नये.
४) बीज प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नयेत.
५) बीज प्रक्रिया करताना तंबाखू खाणे, पाणी पिणे, सिगारेट ओढणे टाळावे.

कीटकनाशकांची प्रक्रिया ः

विकत आणलेल्या बियाण्यांवर शक्यतो कंपनीद्वारे प्रक्रिया केलेली असते. त्यासाठी बियाण्यांचे लेबल व्यवस्थित वाचून कोणत्या बीजप्रक्रिया केल्या आहेत, ते जाणून घ्यावे. प्रक्रिया केलेली नसल्यास बीजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकांची प्रक्रिया झाल्यानंतर कीटकनाशकाची प्रक्रिया वर नमूद केलेल्या पद्धतीने करावी.

जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया

२५० ग्रॅम जिवाणू संवर्धकाचे पाकीट १० ते १५ किलो बियाण्यास वापरावे.
१ लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम जिवाणू संवर्धन टाकून बियाण्यास लेप समप्रमाणात बसेल असे हळुवारपणे लावावे. बियाण्यांचा पृष्ठभाग (साल) खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी. बियाणे ओलसर करून जिवाणू संवर्धके बियाण्यास चोळावीत. नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे. बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी ताबडतोब करावी.

जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करताना...

  • बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांच्या प्रक्रियेनंतर जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
  • जिवाणू संवर्धके लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीडनाशकांची प्रक्रिया केलेली असल्यास जिवाणू संवर्धकाचे प्रमाण नेहमीपेक्षा दीडपट ठेवावे.
  • रायझोबियम जिवाणू संवर्धके एकदल, द्विदल किंवा नगदी पिके या साठी वेगवेगळी आहेत. आपल्या पिकानुसार योग्य गटाची निवड करावी.
  • ट्रायकोडर्मा या जैविक बुरशिनाशकासोबत रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करता येते.

बीजप्रक्रियेचा हा क्रम लक्षात ठेवा
१) सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
२) कीटकनाशकाची प्रक्रिया.
३) त्यानंतर ३ - ४ तासांनी जैविक घटक (रायझोबिअम /अॅझोटोबॅक्टर) बीजप्रक्रिया करावी.
४) सर्वांत शेवटी पी.एस.बी.ची बीजप्रक्रिया करावी.

डॉ. धीरज कदम (सहयोगी प्राध्यापक), ९४२१६२१९१०
विवेक सवडे (आचार्य पदवी विद्यार्थी), ९६७३११३३८३

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर कृषी सल्ला
एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजनाची...पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर...
शेतीतंत्रामध्ये योग्य बदल आवश्यककोणत्याही पिकाच्या उत्पादनासाठी आवश्यक...
सुधारित पद्धतीने करावी बटाटा लागवडउत्तम उत्पादनासाठी बटाटा लागवडीमध्ये ठिबक किंवा...
हवामानबदलाच्या स्थितीत शेतीमध्ये बदल...सन १९५५ सालानंतर पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या...
पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी...हानिकारक पतंगवर्गीय किडींच्या बंदोबस्तासाठी...
कृषी सल्ला कोकण विभागभुईमूग    पेरणी अवस्था    भुईमुगाची लागवड...
विना नांगरण, तण व्यवस्थापनातून शेतीचे...सध्या रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे. चालू वर्षी...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...
तंत्र कांदा बीजोत्पादनाचे...बीजोत्पादनासाठी निवडलेले कांदे गोल, मध्यम किंवा...
कृषी सल्ला (राहुरी विभाग)हवामान अंदाज ः पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील....
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात - पक्व अवस्था  पुढील काही दिवस पावसाची...
फवारणीकर्त्यांची सुरक्षितता महत्त्वाचीअवजारांची निगा, फवारणी करीत असता घ्यावयाची काळजी...
रब्बी पिकांसाठी सुक्ष्मअन्नद्रव्ये...महाराष्ट्रातील जमिनींमध्ये प्रामुख्याने जस्त (३९...
बागेत डाऊनी, भुरी नियंत्रणावर लक्ष द्या...पुढील ६ ते ७ दिवस सर्वच द्राक्ष विभागांमध्ये...
द्राक्ष : रोगाच्या प्रादुर्भावाची...गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनमहाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक असलेल्या तुरीची...