हळदीचे अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित जातींची निवड करा

हळद जात फुले स्वरूपा
हळद जात फुले स्वरूपा

हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत चांगले उत्पादन मिळते.

जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. जमिनीची खोली २० ते २५ सें.मी. असावी. भारी काळ्या, चिकण व क्षारयुक्त जमिनी या पिकांस मानवत नाहीत. अशा जमिनीमध्ये पिकाची पाल्याची वाढ जास्त होते, परंतु पाहिजे त्या प्रमाणात कंद पोसत नाहीत, परिणामी उत्पादन कमी मिळते. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घ्यावे, त्यानुसार खतांचे नियोजन करावे. हलक्‍या जमिनीत सरासरी उत्पादन मिळविण्यासाठी सुपीकता वाढवावी, पोत सुधारावा. जमिनीची चांगली मशागत करावी. चुनखडीयुक्त जमिनीत हळदीची लागवड करू नये, अशा जमिनीत पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो. पिकाची वाढ समाधानकारक होत नाही.

फुले स्वरुपा

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. मध्यम उंच वाढणारी, पानांची संख्या ११ ते १३ असते.
  • पक्वतेचा काळ २५५ दिवसांचा असून फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रती झाड असते.
  • गड्डे मध्यम आकाराचे असून वजनाने ५० ते ५५ ग्रॅमपर्यंत असतात. हळकुंड वजनाने ३५ ते ४० ग्रॅम असतात. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सें. मी. असते. हळकुंडे सरळ व लांब वाढतात.
  • हळकुंडाच्या गाभ्याचा रंग पिवळसर असून कुरकुमीनचे प्रमाण ५.१९ टक्के इतके असते. या जातीपासून ओल्या हळदीचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन ३५८.३० क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे ७८.८२ क्विंटल उत्पादन मिळते. या जातीचा उतारा २२ टक्के इतका आहे.
  • पानांवरील करपा रोग तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक.
  • सेलम

  • सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्हयामध्ये लागवडीसाठी शिफारस.
  • पाने रुंद, १२ ते १५ पाने येतात.  सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये जास्त आर्द्रता, सततचा रिमझिम पाऊस असल्यास फुले येतात.
  • हळकुंडे, उप-हळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडांची साल पातळ असून गाभ्याचा रंग गर्द पिवळा असतो. चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत उंची ५ फुटापर्यंत वाढते.३ ते ४ फुटवे येतात.करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो.
  • कुरकमीनचे प्रमाण ४ ते ४.५ टक्के इतके आहे. ओल्या हळदीचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन ३५० ते ४०० क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळते.
  • हळद परिपक्व होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात.
  • राजापुरी

  • सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये लागवड क्षेत्र.
  • १० ते १५ पाने येतात. पाने रंद, फिकट हिरवी व सपाट असतात. झाडास फुले क्वचित येतात.
  • हळकुंडे व उप-हळकुंडे आखूड, जाड व अंगठ्यासारखी ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.
  • कुरकुमीनचे प्रमाण ६.३० टक्के आहे. शिजविल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के पडतो. या जातीपासून ओल्या हळदीचे सरासरी हेक्‍टरी २५० ते ३०० क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळते.
  • हळद परिपक्व होण्यास ८ ते ९ महिने लागतात.
  • राजापुरी जातीला स्थानिक बाजारपेठेत आणि गुजरात, राजस्थान राज्यातून चांगली मागणी असल्याने दरही चांगला मिळतो. हळद वायदेबाजारातील भाव राजापुरी जातीवरून ठरला जातो. यामुळेच ही जात कमी उत्पादन देणारी असली तरी शेतकरी लागवडीसाठी या जातीस पसंती देतात.
  • कृष्णा

  • ही जात हळद संशोधन केंद्राने विकसित केली आहे. पाने आकाराने रुंद, रंगाने हिरवट व सपाट असतात.
  • सरासरी १० ते १२ पाने येतात. हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडांचा गाभा पांढरट पिवळा असतो. पेरे संख्या ८ ते ९ इतकी असते. हळकुंडाच्या दोन पेरांमधील अंतर इतर जातींच्या तुलनेने जास्त असते.
  • वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात. वाळल्यानंतर मुख्य हळकुंडाची लांबी ६ ते ७ सें. मी. असते. करकुमीनचे प्रमाण २.८० टक्के इतके आहे.
  • वाळलेल्या हळदीचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन ७५ ते ८० क्विंटल एवढे मिळते. या जातीमध्ये पानांवरील ठिपके रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.
  • टेकुरपेटा

  • हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. मात्र, हळकुंडाचा गाभा आणि पानांचा रंग फिकट पिवळा असतो.
  • कुरकुमीनचे प्रमाण १.८० टक्के इतके आहे.
  • कच्च्या हळदीचे उत्पादन ३८० ते ४०० क्विंटल व वाळलेल्या हळदीचे ६५ ते ७० क्विंटल प्रती हेक्‍टर मिळते.
  • वायगाव

  • ही जात चंद्रपूर जिल्ह्यातील असून ७ ते ७.५ महिन्यांत पक्व होते. या जातीमध्ये जवळ जवळ ९० टक्के झाडांना फुले येतात.
  • पानांचा रंग गर्द हिरवा व चकाकणारा असतो. ८ ते १० पाने येतात. पानांना तीव्र सुवास असतो. करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.
  • हळद पावडरीस वेगळी चव असते. कुरकुमीनचे प्रमाण ६ ते ७ टक्के इतके आहे. जातीचा उतारा २० ते २२ टक्के असतो.
  • हळकुंडे लांब व प्रमाणबद्ध असतात. गाभा गर्द पिवळा असतो.
  • कच्च्या हळदीचे उत्पादन १७५ ते २०० क्विंटल व वाळलेल्या हळकुंडांचे उत्पादन ३८ ते ४५ क्विंटल प्रती हेक्‍टरी मिळते.
  •  - डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४ (कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com