रेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा प्रादुर्भाव

रेशीम किड्यावर उझी माशीचा प्रादुर्भाव
रेशीम किड्यावर उझी माशीचा प्रादुर्भाव

सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर, परभणी जिल्ह्यातील काही भागामध्ये रेशीम कीटकांवर उझी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. माशीच्या प्रादुर्भावामुळे १० ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्यास सुरवात करावी. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यात उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. फेब्रुवारी ते मे या कालखंडात वातावरणातील अतिउष्णतेमुळे उझी माशीचा प्रादुर्भाव नियंत्रणात असतो. याशिवाय वर्षभर नियंत्रणाच्या उपाययोजना न करता एकामागून एक रेशीम पिके घेतल्यानेदेखील उझी माशीची संख्यात्मक वाढ होऊन प्रसार होतो. असा होतो उझी माशीचा प्रादुर्भाव ः

  • अंडी, मॅगट, प्युपा आणि माशी या चार अवस्था.
  • नर उझी माशी, मादी उझी माशीच्या तुलनेत आकाराने मोठी.
  • माशीच्या पाठीवर गडद काळ्या रंगाचे चार उभे पट्टे असतात.
  • मादी उझी माशी तिच्या कार्यकाळात ३०० ते १००० पर्यंत अंडी घालू शकते.
  • उझी माशी चॉकी अवस्थेतील रेशीम कीटकावर अंडी घालण्याचे टाळते. आकाराने मोठ्या असलेल्या प्रौढ रेशीम किटकांवर प्रादुर्भाव करते.
  • माशी प्रौढ रेशीम कीटकाच्या वलयावर अंडी न घालता वलय सोडून नाजूक त्वचेवर एक ते दोन अंडी घालते. अंड्याचा रंग क्रिमी व्हाइट असतो. अंडे आकाराने अतिशय लहान असते.
  • अंडी घातल्यानंतर १ ते २ दिवसांत अंड्यातून मॅगट बाहेर येतो. ज्याचा रंग पिवळसर पांढरा असतो. मॅगट रेशीम कीटकाच्या नाजूक त्वचेला छिद्र पाडून शरीरात प्रवेश करतो. ज्या ठिकाणाहून प्रवेश करतो तेथे काळ्या रंगाचा डाग दिसतो.
  • मॅगट त्याच्या तीन अवस्था रेशीम कीटकाच्या शरीरात सात दिवसांत पूर्ण करतो. रेशीम कीटकाच्या शरीरातील पेशी फस्त करून मॅगट कीटकाच्या बाहेर येतो. त्यामुळे रेशीम कीटक मरण पावतो.
  • परिपूर्ण वाढ झालेला क्रिमी व्हाइट रंगाचा मॅगट कीटक संगोपन गृहातील रॅकमधील तुती फांद्या किंवा कीटक संगोपनगृहातील जमिनीला असलेल्या भेगामध्ये किंवा कीटक संगोपन गृहातील कोपऱ्यामध्ये अंधाऱ्या जागी वाटचाल करतो. या ठिकाणी त्याची पुढील अवस्था प्युपा सुरू होते.
  • प्युपा अवस्था १० ते १२ दिवसांची असते. प्युपाचा आकार लंब गोलाकार दंडाकृती असून प्रौढ प्युपाचा रंग गडद तपकिरी असतो. या प्युपामधून मादीच्या तुलनेत नर उझी माशी अगोदर बाहेर येते.
  • उझी माशीचा जीवनाचा कालावधी १७ ते १८ दिवसांचा असतो. या एकूण कालावधीपैकी ४ थ्या ते ७ व्या दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणात अंडी घालते. नर माशीपेक्षा मादी माशीचा जीवनकाल अधिक असतो. उझी माशी १००० ते २००० मीटरपर्यंत उडू शकते.
  • किडीची लक्षणे ः

  • रेशीम कीटकाच्या शरीरावर लहान एक ते दोन अंडी दिसणे किंवा रेशीम कीटकाच्या त्वचेवर काळ्या रंगाचा डाग असणे किंवा कोषाला छिद्र पाडून मॅगट बाहेर आलेला असणे.
  • उझी माशीचा प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या तिसऱ्या अवस्थेत झालेला असल्यास रेशीम कीटक कोषामध्ये पूर्वीच मरताना आढळतात. जर प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या पाचव्या अवस्थेत झालेला असेल तर पोचट कोषांची निर्मिती होते. या माशीच्या प्रादुर्भावामुळे १० ते ३० टक्के नुकसान होते.
  • नियंत्रणाचे उपाय ः भौतिक उपाय ः

  • कीटक संगोपनगृह, कोष खरेदी केंद्र, अंडीपुंजनिर्मिती केंद्र, रेशीम धागानिर्मिती केंद्रातील उझी माशीच्या मॅगट आणि प्युपा गोळा करून जाळून नष्ट कराव्यात किंवा ०.५ टक्के साबणाच्या द्रावणात नष्ट करावा.
  • कीटक संगोपनगृह, कोष खरेदी केंद्र, अंडीपुंजनिर्मिती केंद्र, रेशीम धागानिर्मिती केंद्रातील जमिनींमध्ये असलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात.
  • प्रादुर्भावास बळी पडलेले रेशीम कीटक गोळा करून नष्ट करावेत.
  • पाचव्या अवस्थेतील रेशीम कीटकास प्रादुर्भाव झाला असेल तर असे प्रादुर्भावित रेशीम कीटक इतर रेशीम कीटकाच्या तुलनेत दोन दिवस अगोदर कोष बांधतात. असे कोष मॅगट बाहेर येण्यापूर्वीच गोळा करून त्यावर कोष सुकविण्याची प्रक्रिया करावी, त्यामुळे कोषातील मॅगट मरते, कोषांचे नुकसान होणार नाही.
  • उझी माशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणावरून कोष, मॅगट, प्युपा येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • उझी माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या गावातील शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या एक ते दीड महिना पीक बंद ठेवावे. ज्यामुळे उझी माशीच्या जीवनचक्रात निसर्गतःच अडथळा निर्माण होऊन उझी माशीच्या संख्यात्मक वाढीवर व प्रसारावर नियंत्रण मिळविता येईल.
  • कीटकसंगोपन गृहाच्या खिडक्‍याद्वारे व तावदाने इत्यादींना नॉयलॉन जाळीने झाकून घ्यावे. यामुळे जवळपास २० ते २२ टक्के नियंत्रण मिळवता येते.
  • चॉकी ट्रे, रॅक नायलॉन जाळीने झाकून ठेवावे. यामुळे उझी माशीला अंडी घालणे शक्‍य होणार नाही.
  • कीटक संगोपनगृहाच्या मुख्य दरवाजा अगोदर अँटीचेंबरची व्यवस्था करावी. ते नायलॉन जाळीने झाकावेत. त्यामुळे माशीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळते.
  • संपर्क ः संजय फुले, ९८२३०४८४४० (रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, वाई, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com