डाळिंब पिकावरील खोड किडा व्यवस्थापन

डाळिंब बागांमध्ये अलीकडच्या काळात खोड पोखरणाऱ्या किडीचा (भुंगेऱ्याचा) प्रादुर्भाव वाढत आहे. डाळिंबाची झाडाची पाने पिवळी होणे, अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येणे, फांद्या कोमेजणे अथवा वाळणे अशी लक्षणे दिसून येत असतील तर खोड पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव तर नाही ना, याची खात्री करावी. योग्य निदान केल्यानंतर त्यानुसार वेळीच योग्य व्यवस्थापन करावे.
डाळिंब पिकावरील खोड किडा व्यवस्थापन
डाळिंब पिकावरील खोड किडा व्यवस्थापन

डाळिंब पिकामध्ये झाडाची पाने पिवळी होणे किंवा फांद्या वाळण्याची अनेक कारणे असू शकतात. १. अन्नद्रव्य कमतरता किंवा अति वापरामुळे विषबाधा. २. असंतुलित पाण्याचा वापर (कमतरता, अति वापर, जास्त पाऊस). ३. रोगकारक बुरशी, जिवाणू किंवा मुळांवर गाठी निर्माण करणारे सूत्रकृमी यांचा प्रादुर्भाव. ४. खोड पोखरणाऱ्या किड्यामुळे झाडाच्या खोडावर आणि फांद्यांवर सुईच्या आकाराची छिद्रे दिसून येणे. वरीलपैकी नेमक्या कोणत्या कारणामुळे पाने पिवळी पडली आहेत, याचे निरीक्षण करून खात्री करावी. जर त्यात खोड पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असल्यास पुढील प्रमाणे नुकसानीचे स्वरुप दिसून येते. नुकसानीचे स्वरुप : खोड किडा (शा. नाव - झायलेबोरस स्पेसीज) हा भुंगेरा पीन किंवा सुईच्या आकाराची छिद्रे खोडावर बनवतो. तो प्रामुख्याने झाडाच्या जमिनीलगतच्या भागात प्रादुर्भाव करतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडांच्या जलवाहिनी आणि रसवाहिनीद्वारे मुळाकडून फांद्याकडे जाणारे अन्नद्रव्य व पाणी यात अडथळा निर्माण होतो. परिणामी पाने पिवळी होवून फांद्या सुकू लागतात. पुढे झाड शेंड्याकडून खोडाकडे वाळत येते. वाढत्या प्रादुर्भावामध्ये पूर्ण झाड मरते, वाळून जाते. हंगामी प्रादुर्भाव आणि जीवनचक्र :

  • डाळिंब बागेमध्ये खोडकीडा वर्षभर सक्रिय असला तरी त्याचा प्रादुर्भाव पावसाळ्यात जास्त दिसून येतो.
  • डाळिंबामध्ये खोड किड्याचा प्रादुर्भाव हा सुरूवातीला त्याने प्रवेश केलेल्या छिद्रातून पांढरा द्रव बाहेर येतो यावरून ओळखावा.
  • प्रौढ मादी भुंगेरा नुकतेच मेलेल्या, मरणाऱ्या किंवा कमकुवत असणाऱ्या झाडावर प्रादुर्भाव करून फांद्या व खोडातच राहतात. अशा प्रादुर्भावग्सर्त फांद्या सुकून जातात.
  • मादी खोडाच्या आतील भागात अर्ध गोलाकार किंवा पूर्ण गोलाकार व लहान फांद्यांमध्ये रेखांशासारखे बोगदे बनवते. एकदा प्रवेश छिद्र पूर्ण झाल्यानंतर मादी भुंगेरे लहान पुंजक्यांमध्ये अंडी घालतात. तीन अवस्था असलेला हा भुंगेरा फांदीच्या आत बोगद्यांमध्ये वाढणाऱ्या सहजीवी ॲम्ब्रोसिया या बुरशीवर उपजीविका करतो. त्याच ठिकाणी तो कोषात जातो. त्यातून नव्याने बाहेर आलेली मादी अनेक दिवस तिथेच राहते. पुढे मिलन झाल्यानंतर मादी किडी प्रवेशद्वारातून बाहेर येतात.
  • भुंगेरा अन्नवाहिनीवर वाढ झालेल्या बुरशीवर उपजीविका करतो. त्यांच्या शरीरावर खिश्यासारखी रचना (त्याला ‘माइकांजिया’ असे म्हणतात) असते. त्यातून ते ही बुरशी नव्याने प्रादुर्भाव केलेल्या झाडावर घेऊन जातात. ॲम्ब्रोसिया बुरशी ही खोड भुंगेऱ्याच्या जीवनचक्राचा अविभाज्य घटक आहे. भुंगेऱ्यासाठी ही बुरशी पोषक तत्वांचा स्रोत म्हणून कार्य करते. ही सहजीवी बुरशी झाडाच्या वाहक उतींवर प्रादुर्भाव करते. पेशीसमूहाचा भाग नष्ट करते. परिणामी प्रादुर्भित फांदी किंवा झाड सुकते. मरून जाते. याच्या व्यवस्थापनासाठी खोड किडा (शॉट हॉल बोरर) नियंत्रणाकडे लक्ष दिले पाहिजे.
  • डाळिंबाव्यतिरिक्त खोड भुंगेऱ्यास बळी पडणारी पिके : एरंड. चहा, आंबा, कॉफी, पेरु, साग इ. नुकसानीची लक्षणे प्रौढ मादी खोडाच्या जमिनीलगतच्या भागात आणि उघड्या मुळ्यांवर छिद्रे करतात. बऱ्याच वेळा भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव, त्याने केलेले छिद्र आणि त्यातून बाहेर येणारा भुस्सा यावरून सहज ओळखता येतो. भुंगेऱ्याने खोडावर आणि उघड्या मुळ्यांवर केलेल्या छिद्रांमुळे झाडांची पाने पिवळी पडतात. जेव्हा खोड किड्याचा वा बुरशीजन्य मर रोगाचा एकाच वेळेस प्रादुर्भाव होतो, तेव्हा संपूर्ण झाड वाळते किंवा मरून जाते. व्यवस्थापन : प्रतिबंधात्मक उपाय : १. बागेची योग्य आंतरमशागत करून बाग शक्य तेवढी सशक्त ठेवा. २. पीक आणि तण यात अन्नद्रव्य स्पर्धा टाळण्यासाठी बाग तणमुक्त ठेवावी. ३. बागेत पाणी साठून राहू नये म्हणून काळजी घ्यावी. विशेषत: पावसाळा संपल्यानंतर वाळलेल्या फांद्यांचे वारंवार निरीक्षण करून सुरुवातीच्या अवस्थेतच खोड कीडीचे व्यवस्थापन करावे. ४. भुंगेराचा प्रसार अन्यत्र होऊ नये, यासाठी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, अति प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा झाडाचे अन्य अवशेष व्यवस्थित जाळून नष्ट करावीत. ५. सामान्यपणे बुरशीजन्य मर रोगाचे बिजाणू खोडकिड्यासोबत जगतात. मर रोगाची बुरशी अनेक वर्ष सुप्तावस्थेत राहू शकते म्हणून उपटून काढलेले झाड किंवा अवशेष कधीही मातीत गाडू नयेत. शक्यतो जाळून नष्ट करावेत. ६. भुंगेरा किडीचे पर्यायी अन्न असलेली झाडे किंवा पिके बागेतून किंवा बांधावरून काढून टाकावीत. ७. पिकामध्ये हेक्टरी १ याप्रमाणे सायंकाळी आपोआप सुरू होणारा सोलर इलेक्ट्रॉनिक दिव्याचा प्रकाश सापळा लावावा. ८. बागेत पांढरे चिकट सापळे वापरावेत. त्यात क्विएरसीव्होरोल आणि अल्फा कोपेन यांचा वापर भुंगेऱ्यांना आकर्षित करण्यासाठी केला जाऊ शकतो. वरबेनॉनचा वापर भुंगेऱ्यांना दूर ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. ९) बागेतील प्रादुर्भावमुक्त भागात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ मि.लि. प्रति लिटर व इमामेक्टिन बेंझोएट (५ % एसजी) २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा आलटून पालटून फवारावे. १०) पहिल्या पावसानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून इमामेक्टिन बेंझोएट (५ % एसजी) २ ग्रॅम अधिक प्रोपीकोनॅझोल (२५ % इसी) २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे एकत्रित ड्रेंचिंग करावे. खोड कीड व मर रोगाची बुरशी यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. ११) खोडावर लेप लावणे : दोन वर्षापुढील बागेत बहार घेण्यापूर्वी फळांची काढणी झाल्यानंतर जमिनीपासून दोन फुटापर्यंत खोडावर /फांदीवर खालील प्रमाणे लेप लावावा लाल माती ४ किलो अधिक इमामेक्टिन बेंझोएट (५% एसजी) २० मिली अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्ल्यूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी. वरील लेप १० टक्के बोर्डो मिश्रणासोबत फेरपालट करून वापरावा. ब) किड व्यवस्थापन : अ) ड्रेंचिंग : १. इमामेक्टिन बेंझोएट (५ % एसजी) २ ग्रॅम अधिक प्रोपीकोनॅझोल (२५ % ईसी) २ मि.लि. प्रति लिटर. २. पहिल्या ड्रेंचिंगनंतर १५-२० दिवसांच्या अंतराने, दुसरी ड्रेचिंग - इमामेक्टिन बेंझोएट (५ % एसजी) २ ग्रॅम अधिक कार्बेंन्डाझिम (५० % डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ % एसएल) २ मि.लि. अधिक कार्बेंन्डाझिम (५० % डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर. वरील द्रावण ५ ते १० लिटर प्रति झाड याप्रमाणे घेऊन वर्तुळाकार ड्रेंचिंग करावी. ३. प्रादुर्भाव व तीव्रता विचारात घेवून दुसऱ्या ड्रेंचिंगनंतर १५-२० दिवसांच्या अंतराने, पुन्हा पहिल्या ड्रेंचिंगसाठी वापरलेल्या द्रावणाची ड्रेचिंग करावी. ब) खोडावर फवारणी : प्रादुर्भाव मुक्त खोड किंवा फांद्यावर थायामेथोक्झाम (२५ % डब्ल्यूजी) १ ते २ मि.लि. प्रति लिटर + स्टीकर स्प्रेडर ०.५ मि.लि. प्रती लिटर. त्यानंतर ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ३ मि.लि. प्रति लिटर अधिक स्टीकर स्प्रेडर ०.५ मि.लि. प्रति लिटर. लक्षात ठेवा... १. ड्रेंचिंग करण्याच्या एक दिवस आधी पिकाला व्यवस्थित पाणी द्यावे. ड्रेंचिंगनंतर ३-५ दिवस पाणी बंद ठेवावे. पावसाळ्यात ड्रेंचिंग करणे टाळावे. जर ड्रेंचिंगच्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशी पाऊस झाला तर तीच ड्रेंचिंग पुन्हा करावी. २. तिसऱ्या ड्रेंचिंगचा निर्णय करताना प्रादुर्भाव व तिव्रता विचारात घ्यावी. ३. उपचार पद्धतीमध्ये ड्रेंचिंग + खोडावर फवारणी + खोडाला लेप लावणे या क्रमाने उपाययोजना कराव्यात. लेप लावण्याची प्रक्रिया १ ते २ दिवसात संपवावी. संपर्क - ०२१७-२३५००७४ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com