अल्पभूधारकांची शेती लवचिक बनवा

दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्नदिन साजरा केला जातो. या दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अल्पभूधारकांच्या शेतीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. हे लहान शेतकरी आणि त्यांची शेती अधिक शाश्‍वत विशेषतः दुष्काळ प्रतिरोधक, लवचिक करण्याची आवश्यकता आहे.
अल्पभूधारकांची शेती लवचिक बनवा
अल्पभूधारकांची शेती लवचिक बनवा

भारतात अल्पभूधारकांचे प्रमाणे ११७ दशलक्ष असून, ते एकूण कार्यरत शेतकऱ्यांच्या ८५% आहे. ७२ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर शेती करणारे हे शेतकरी भारतीय अन्नधान्याची सुमारे ५० % गरज भागवतात. (नाथ व अन्य, २०१८). या शेतकऱ्यांकडून ८५ टक्क्यांपेक्षा अधिक उपलब्ध ताज्या पाण्याचे स्रोत शेतीसाठी वापरले जातात. म्हणजेच लहान असले, तरी हे शेतकरी भारतीय माती आणि जल संसाधनाचे एका अर्थाने कारभारी आहेत. स्थिती व सुधारणा  बहुसंख्य अल्पभूधारक शेतकरी आर्थिक आणि शेतजमिनीच्या प्रत या दोन्ही बाबत गरीब आहेत. मातीतील सेंद्रिय पदार्थांचा, कर्बाचा साठा कमी वेगाने घसरत आहे. अन्नद्रव्ये कमी झाल्याने मातीची सुपीकता व परिसंस्था बिघडली आहे. ही शेती मुख्यत्वे कोरडवाहू आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका या शेतकऱ्यांना बसतो. दुष्काळी स्थितीमुळे शेतीची व्यवहार्यताच संपुष्टात येते. लहान शेतकऱ्यांचे स्वतःचे हाल होतात, तिथे पशुधन सांभाळणे, अडचणीचे होते. शेतीचे संपूर्ण चक्र बिघडते. मृदा आरोग्य सुधारण्यासाठी, शेतात पाण्याचे भरवशाचे स्रोत राखण्यासाठी साधने व ज्ञान उपलब्ध केले पाहिजे. आजवर ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ सह पाणलोट व्यवस्थापन, शेततळी, जिरायती शेती अभियान, जलयुक्त शिवार असे अनेक कार्यक्रम पिकांना किमान एक किंवा दोन संरक्षित सिंचन उपलब्ध करण्यासाठी राबवले गेले. दुष्काळ निवारक आणि लवचिक शेती तयार करण्यासाठी आपण मातीची, पाणी, पिके, पशुधन यांची काळजी घेणे गरजेचे आहे. दुष्काळ प्रतिरोधक, लवचिक शेती म्हणजे काय? सलग दुष्काळाच्या काही विशिष्ट संख्येदरम्यान शेतीची टिकून राहण्याची क्षमता म्हणजेच दुष्काळ लवचिकता होय. थोडक्यात, माती, पिके, पशुधन आणि शेती परिसंस्थेवरील दुष्काळाचा परिणाम कमी करून ही शेती जल-कार्यक्षम, फायदेशीर, व्यवहार्य व्यवसायात रूपांतरित करणे होय. दुष्काळ- प्रतिरोधक शेती कशी बनवायची? पर्जन्यमान हे ताज्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. पावसानंतर शेती भूप्रदेशातील जमिनीच्या पृष्ठभागावर पडणारे (अ) पावसाचे पाणी मातीत जिरवणे (ब) पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवणे (क) पृष्ठभागावरील पाणी प्रवाहाची गतिशीलता कमी करणे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी (१) जमिनीच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये, (२) मातीची झिरपण गुणधर्म (३) पावसाच्या वादळाची तीव्रता आणि (४) जलसंलग्नता हे घटक महत्त्वाचे आहेत. शेतात पाण्यासाठी निसर्ग-आधारित दोन मुख्य रणनीती 

  • शेतातील मातीचे आरोग्य, कार्ये वाढवून, स्थानिक परिसंस्था जपून, पुनर्संचयित करून तिला दुष्काळ प्रतिरोधक बनवता येते.
  • शेतीमधील भूप्रदेशामध्ये माती आणि जलसंधारण उपाययोजना राबवणे. यामुळे वाहून जाणाऱ्या पावसाची गती कमी करणे, रोखणे, जिरवण वाढवणे शक्य होते.
  • शेतमातीला दुष्काळ प्रतिरोधक बनविण्यासाठी, शेतात पडणारे जास्तीत जास्त पावसाचे पाणी माती ओलाव्यात रूपांतरित करून साठवावा. त्या माती ओलाव्याचा पिकांच्या वाढीसाठी सर्वाधिक फायदा मिळवता येतो. यासाठी मातीची अधिक ओलावा अधिक काळासाठी साठवण्याची आणि योग्य वेळी पिकांना पुरवण्याची क्षमता वाढवली पाहिजेत. ते करण्यासाठी तीन मार्ग पुढील प्रमाणे - (अ) जमिनीवर पडणारे जास्तीत जास्त पावसाचे पाणी मातीत झिरपणे-जमिनीत पाणी झिरपण्याचा वेग सुधारणे. (ब) पिकांना नंतर वापरासाठी मातीत झिरपलेल्या पाण्यापैकी अधिकतम पाण्याचा मातीमध्ये साठा करणे. (क) जमिनीत वनस्पती मुळांची लांबपर्यंत वाढ होऊन पिकांच्या वाढीसाठी पाणी किंवा ओलावा योग्य वेळी उपलब्ध होणे. २) दुष्काळाची तीव्रता, परिणाम आणि सिंचनाची आवश्यकता कमी करणारे महत्त्वाचे घटक म्हणजेच सेंद्रिय पदार्थ होय. मातीतील सेंद्रिय पदार्थ मातीस दुष्काळ प्रतिरोधक बनवतात. पावसाचे पाणी मातीत झिरपण्यासाठी चांगली माती संरचना आणि मोठ्या आकाराच्या छिद्रांसह चांगल्या आकाराचे पाणी-स्थिर मातीच्या कणांचे समूह तयार करणे महत्त्वाचे आहे. सेंद्रिय पदार्थ सूक्ष्म जिवाणूंना आकर्षित करतात. जिवाणूंमार्फत तयार केलेल्या सेंद्रिय द्रव्यांमुळे मातीचे कण एकमेकास चिकटून राहतात. मातीला अधिक सच्छिद्र बनविल्यामुळे पाणी, पोषक अन्नद्रव्ये आणि हवा अधिक कार्यक्षमतेने प्रवेश करू शकते. मातीत पावसाचे अधिक पाणी झिरपते, साठवले जाते. सेंद्रिय पदार्थांत अधिक पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. पिकांच्या आवश्यकतेनुसार पाणी हळूहळू सोडले जाते. थोडक्यात, सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्मजिवांनी समृद्ध अशी निरोगी माती स्पंजाप्रमाणे कार्य करते. मातीचे आरोग्य, उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कार्बनचे प्रमाण निर्णायक पातळीपेक्षा अधिक ठेवण्याची गरज असते. त्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत यासोबतच पिकांचे उर्वरित अवशेषांचा उपयोग होतो. पिकांच्या अवशेषांचे सेंद्रिय आच्छादन करणे, जमीन झाकणारी, आडवी वाढणारी व कमी उंचीची आवरण पिके शेतात घेणे यातून मातीत सेंद्रिय पदार्थाची वाढ करता येते. ३) शेतात पाणी साठवण्याची सोय करणे ः मातीची पाणी साठवण क्षमता ही विशिष्ट गुणधर्मांवर अवलंबून असते. पीक उत्पादनासाठी जमिनीच्या मुळांच्या क्षेत्रात पाणी साठवून ठेवण्यावर मर्यादा येतात. पर्जन्यमान मर्यादित होते, पावसात मोठा खंड पडतो अशा वेळी पिके वाचविण्यासाठी संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध असली पाहिजे. सोबतच पशुधनाकरिता चारा व पाणी आणि पेयजलासाठी शेतात पाण्याचे स्रोत जिवंत राखणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मातीत ओलावा साठवण, भूजल पुनर्भरण या पाण्यासाठीच्या निसर्ग-आधारित उपायांव्यतिरिक्त अतिरिक्त पावसाचे पाणी साठवणुकीच्या रचना उभाराव्यात. उदा. वाहून जाणारे पावसाचे अतिरिक्त पाणी शेततलावामध्ये गोळा करून साठवावे. खरीप हंगामात मॉन्सूनच्या खंड काळात, पिकांच्या संवेदनशील अवस्थेत सिंचन करण्यासाठी त्याचा वापर करता येतो. पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्था उदा. फुलोरा, दाणे भरणे इ. या दरम्यान पाणी दिल्यास पिकांचे उत्पादन स्थिर होण्यास मदत होते. खरिपात हे पाणी वापरले न गेल्यास रब्बीमध्ये त्यांचा वापर संरक्षित सिंचनासाठी करता येतो. पावसाचे वाहून जाणारे पाणी वेगवेगळ्या प्रकारे गोळा करून, साठवून उत्पादक हेतूसाठी वापरण्याच्या संपूर्ण पद्धतीला ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ असे म्हणतात. या पावसाच्या पाणी जमा करण्यामुळे होणारे फायदे - प्रति युनिट पीक क्षेत्रासाठी पाणी उपलब्धता वाढते. अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. भूजलाशयांचे/विहिरीचे प्रभावीपणे पुनर्भरण होते. दुष्काळाचा प्रभाव कमी करते. शेती प्रणालीची ‘शाश्‍वत सधनता’ आणि उत्पादकता वाढवण्याचे काम करते. यातून अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह, अर्थकारण सुधारू शकते. ४) जल-कार्यक्षम शेती पद्धतींचा अवलंब ः अर्ध-शुष्क हवामानात उपलब्ध माती-पाण्याच्या कार्यक्षम वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी दीर्घकालीन भू-व्यवस्थापन नियोजन रणनीती आणि जल-कार्यक्षम शेती पद्धतींचा अवलंब करावा. यामुळे १. मातीमध्ये जास्तीत जास्त पाणी मिळवणे शक्य होते. २. अधिक पाणी जास्त काळ जमिनीत धरून ठेवता येते. ३. मातीतील साठवलेल्या पाण्याचा पिकांना अधिकाधिक वापर करता येतो. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी : १. हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या वाणांची लागवड. २. अचूक आणि काटेकोर शेती (प्रिसिजन फार्मिंग). ३. सुधारित कृषी पद्धती उदा. (अ) पेरणीच्या तारखेचे व्यवस्थापन, (ब) किमान किंवा संवर्धन मशागत पद्धती, (क) शेंगांधारी पिकांसह पीक-फेरपालट, आंतरपीक पद्धती, (ड) मायकोरायझल बुरशीचा वापर, (ई) एकात्मिक खत व्यवस्थापन आणि (फ) रोग आणि कीटकांच्या पूर्वानुमानवर आधारित एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रणाली अशा उत्तम शेती पद्धतीचा अवलंब करावा. आज तोट्यात आणि अडचणीत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेती वरील प्रयत्नातून दुष्काळ- प्रतिरोधक, लवचिक आणि फायदेशीर करता येईल. धोरणात्मक पातळीवर, गावपातळीवर व्यवहार्य तोडगे राबवून अल्पभूधारकांच्या शेतीला मदत करता येऊ शकते. डॉ. गोविंद स. जाधव, ९८९०९५४२३१ (माजी संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com