आरोग्यकार्डानुसार शेतात, व्यवस्थापनात बदल घडवा

आरोग्यकार्डानुसार शेतात, व्यवस्थापनात बदल घडवा
आरोग्यकार्डानुसार शेतात, व्यवस्थापनात बदल घडवा

केवळ आरोग्यकार्डाचे वाटप झाले म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपिकता, उत्पादकता वाढणार नाही. जमिनीची आरोग्यपत्रिका कशी वाचायची, त्यातील त्रुटीचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामामध्ये, शेतात काय बदल करणे गरजेचे आहे, अशी माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करून शेतकऱ्यांना देणे, ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. ती राबवताना जमिनीच्या सुपिकतेसंबंधित एखादा मोठा दस्तऐवज शेतकऱ्यांच्या हातात देत असल्याचे भासविले जाते. मोठमोठ्या मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोठ्या कार्यक्रमामध्ये आरोग्यपत्रिका दिली जाते. याच्या बातम्या होतात. शेतकऱ्यांचेही फोटो प्रसिद्धिमाध्यमात झळकतात. पुढे तो पत्रिकेचा कागद शेतकरी आपल्या घरातील कपाटात नेऊन जपून ठेवतो. इतक्या शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिका वाटपाचे काम पूर्ण, अशाही बातम्या झळकत सरकारच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे पुढील १-२ वर्षांत प्रकल्पाची इतिकर्तव्यता पूर्ण होईल. पण, या कपाटात ठेवलेल्या आरोग्यपत्रिकेचा, पर्यायाने जमिनीच्या सुपीकतेचा प्रश्न तसाच लोंबकळत राहील. आरोग्यपत्रिकेतील प्रत्येक घटकांची माहिती देत त्यानुसार जमिनीमध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये कोणते बदल करायला पाहिजे, याचे ज्ञान शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. आरोग्यपत्रिकेचे दोन भाग आहेत. उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचा अभ्यास करून चालू पिकाच्या खतांच्या शिफारसी हा अर्धा भाग सर्वांना महत्त्वाचा वाटतो. तो तसा समजण्यास सोपाही आहे. मात्र, सूक्ष्मजीव शास्त्राच्या अभ्यासानंतर त्यातील त्रुटी समोर येतात, हे आपण मागील लेखामध्ये पाहिले. दुसरा अर्ध्या भागामध्ये जमिनीचा सामू, क्षारता व सेंद्रिय कर्बाची टक्केवारी असते. यात अति कमी-कमी, समाधानकारक, भरपूर अशा पद्धतीने प्रमाणित आकडेवारीशी सेंद्रिय कर्बाचा तुलनात्मक माहिती असते. सामू सातपेक्षा कमी (आम्लधर्मी), सातपेक्षा जास्त अल्कधर्मी, अगर उदासीन (६.५ ते ७.५ या दरम्यान) अशी आकडेवारी दिलेली असते. क्षारता १ पेक्षा अधिक असल्यास धोकादायक पातळीपर्यंत आणि क्षारता १ पेक्षा कमी असणे म्हणजे योग्य पातळी इतपत माहिती शेतकऱ्यांना समजते. मात्र, त्याचा प्रत्यक्ष शेतासाठी कसा उपयोग करता येईल, याचे प्रबोधन आवश्यक आहे. सेंद्रिय कर्बाची पातळी कोणतीही असली, तरी सरधोपट हेक्‍टरी ४०-५० गाड्या चांगले कुजलेले शेणखत कंपोस्टचा वापर करावा, अशी शिफारस सार्वत्रिक केली जाते. शेतकरी ही शिफारस वाचतो आणि सोडून देतो. कारण घरच्या जनावरापासून तयार झालेले अगर बाहेरून शक्‍य तितके विकत घेऊनही त्याच्या सर्व क्षेत्राची गरज भागविणे प्रत्यक्षात आणि आर्थिकदृष्ट्याही केवळ अशक्‍य असल्याचे शेतकरी जाणून आहेत. आपण जे सेंद्रिय खत रानात टाकतो, त्याचे पुढे काय होते? ते शेतकऱ्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. सामान्य शेतकऱ्यांना त्याचा उपयोग केवळ जमिनीची सुपिकता वाढविणे, टिकवण्यासाठी असल्याचे माहीत आहे. सेंद्रिय खतामधून पिकाची काही अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. परंतु, सेंद्रिय कर्बातून पिकाच्या मुळाभोवती काम करणाऱ्या सूक्ष्मजिवांना शरीर वाढीसाठी व प्रजोत्पादनासाठी ऊर्जा मिळते. या व्यतिरिक्त हे जिवाणू पिकाच्या मागणीप्रमाणे पिकाला उपलब्ध साठ्यातून गरजेप्रमाणे अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम करतात. त्यासाठी आवश्यक त्या जैवरासायनिक क्रियांसाठी आवश्यक ऊर्जेची गरज सेंद्रिय कर्बातूनच भागविली जाते. ही झाली तांत्रिक माहिती. ती केवळ सांगून शेतकऱ्यांचे प्रबोधन होणार नाही. अन्नद्रव्ये उपलब्ध कसे केले जाते मातीतील जिवाणू पिकासाठी स्वयंपाक करीत असतात. घरात जेवणासाठी सर्व साहित्य असले, तरी आचारी किंवा स्वयंपाक करणारी व्यक्ती व ते शिजवण्यासाठी आवश्यक इंधन (गॅस, लाकडे, कोळसा, रॉकेल) असल्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही. तसेच पिकांचे जेवण हे जिवाणू आणि सेंद्रिय कर्ब नसल्यास होऊ शकत नाही. पिकाचे चांगले उत्पादन पाहिजे असल्यास जमिनीत गरजेइतका सेंद्रिय खताचा पुरवठा केलाच पाहिजे, याला कोणताही पर्याय नाही. नेमकी ही माहिती नसल्याने बहुतांशी शेतकरी रासायनिक खते वगैरे टाकत असले, तरी अनेक कारणाने सेंद्रिय खत वापराकडे दुर्लक्ष करतात. पुन्हा एकदा सेंद्रिय खत टाकले, की त्याचा प्रभाव २-३ वर्षे टिकतो, ही शेतकऱ्यांत असलेली आणखी एक गैरसमजूत. एकदा टाकलेले खत एखाद्या ३-४ महिन्यांच्या हंगामी पिकाअखेर ८० ते ९०% संपून जाते ही गोष्ट शेतकऱ्यांना सांगितली पाहिजे. आरोग्यपत्रिकेत फक्त टक्केवारी देऊन फार तोकडी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवितो. सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनावर यापूर्वीच्या लेखातून माहिती दिलेली आहे. क्षारता व सामू या दोन गुणधर्माविषयी क्षारता ही १ टक्क्यापेक्षा जास्त झाल्यास पिकाला धोकादायक ठरते, तर सामू ७.५ चे पुढे जाणे पिकाला त्रासदायक ठरते, इतकीच माहिती अभ्यासू शेतकऱ्यांना असू शकते. उर्वरित माहिती व आकडे याविषयी अज्ञानच अधिक. आजपर्यंत अशी समजूत होती, की पाऊसमान कमी असणाऱ्या भागात क्षारता साठत जाऊन काळजी न घेतल्यास धोक्‍याच्या पातळीपर्यंत वाढू शकते. परंतु, जास्त पाऊस पडणाऱ्या भागांतही क्षारता वाढू शकते, हे गुळाच्या उदाहरणातून लक्षात येते. कोल्हापूर जिल्ह्यात गूळ मोठ्या प्रमाणावर तयार केला जातो. पूर्वी ज्या क्षेत्रातून शुद्ध गोड गूळ निर्माण होई, तिथे प्रथम कमी गोडीचा व पुढे खारट गूळ तयार होऊ लागला आहे. हे जमिनीतील क्षारता वाढल्याचेच उदाहरण आहे. इथे कोठेही सवळ किंवा क्षारयुक्त पाण्याचा वापर होत नाही, की जमिनी क्षारपड नाहीत. पीक वाढत असताना होणाऱ्या जैवरासायनिक क्रियांतून क्षारांची निर्मिती होत असावी. हे क्षार हळूहळू साठत जाऊन ४०-५० वर्षांनंतर गूळ खारट झाल्यामुळे ही बाब लक्षात आली. ज्यावेळी ऊस साखर कारखान्याला ऊस जातो, त्या वेळी अशी कोणतीच नोंद होण्याची शक्‍यता नाही. इथे क्षारामुळे पिकाचे उत्पादन घटत आहे, अशी नोंद सापडत नाही. अवर्षण-प्रवण भागात क्षारतेचे प्रश्‍न निर्माण होतात. त्याचा पिकाचे उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. विहिरीचे पाणी सवळ होऊ शकते. पिकाच्या अन्न शोषणावर परिणाम होतो. सर्वांत महत्त्वाचे उत्पादनाच्या प्रतीवर विपरीत परिणाम होतो. पिकाचे मूळ अनुवंशिक चव, स्वाद, सुगंध लुप्त होतात. सुधारित शेतीला सुरवात झाल्यानंतर २०-२५ वर्षांनी आता बहुतेक उत्पादनाच्या प्रतीवर परिणाम झाला आहे. फळे, धान्ये, कडधान्ये, भाजीपाला आता मूळ चवीचा राहिलेला नाही, अशी वयस्कर मंडळी तक्रार करतात. १ टक्क्यावर क्षारता ही धोकादायक पातळी ओलांडल्याची सूचना आहे. सामू ७ म्हणजे उदासीन, ७ पेक्षा कमी म्हणजे आम्ल, तर ८च्या पुढे म्हणजे अल्कधर्मी. घाटाकडेला धरणे बांधून कालव्याद्वारे अवर्षणप्रवण भागात पाणी फिरविलेल्या बहुतेक सर्व भागांत सामू ७.५ च्या पुढे ८- ८.५ असा दिसून येतो. हे अल्कक्षार जमिनीत नेमके येतात कोठून? हा प्रश्‍न पुढे उभा राहतो. बहुतेक वेळा याचा सर्व दोष रासायनिक खत वापराला दिला जातो. खोलात शिरून अभ्यास केला, तर बहुतेक रासायनिक खतांचे शेषभाग आम्लधर्मी आहेत. खतामुळे सामू बदलणार असेल, तर तो आम्लधर्मी होणे भाग होते. परंतु, सामू सर्वत्र अल्कधर्मी दिसून येतो, याचा अर्थ हा खतांचा दोष नाही. मग अल्कता येते कोठून? एक तर्क ः सूक्ष्मजीवशास्त्रानुसार, पिकाचे अवशेष कुजत असताना सेंद्रिय आम्लांची निर्मिती होते. कुजणे ही आम्लधर्मी क्रिया आहे. कुजण्याच्या उलट वाढणे असे समजल्यास वाढणे ही अल्कधर्मी क्रिया ठरते. पिके घेतो म्हणजे आपण अल्कधर्मी क्रिया जमिनीत करतो, तर कुजविण्याची आम्लधर्मी क्रिया जमिनीबाहेर करतो. ही आम्ले तेथे काम नसल्याने संपून जातात. अल्कता जमिनीत साठत जाते. कालांतराने वाढत सामू ८- ८.५ झाल्याचे सर्वत्र जाणवत आहे. अर्थात, हा केवळ एक तर्क आहे. याला कोणत्याही पुस्तकात दुजोरा मिळत नाही. अल्कता कमी करण्यासाठी कुजण्याची क्रिया थेट रानातच घडवल्यास अल्क -आम्ल एकमेकांचे संतुलन करतील. जमीन उदासीन राहील. बिना नांगरणीच्या शेतीत हे सर्व आपोआप घडत असल्याने तेथे पिकाच्या उत्पादनात लगेच वाढ दिसून येते. क्षारता व सामू या विषयी नुसतीच माहिती देऊन प्रश्न सुटणार नाही, तर त्यासाठी शाश्वत अशी पद्धती बसवावी लागेल. या पद्धतींवर शास्त्रीय अभ्यास करून, त्याचे संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढले पाहिजेत. अन्यथा या आरोग्यकार्डाचा उपयोग शोभेपेक्षा अधिक राहणार नाही

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com