उत्पादकता वाढीसाठी सोयाबीन पिकातील व्यवस्थापन

सोयाबीन हे खरिपातील महत्त्वाचे पीक बनले आहे. दरवर्षी सोयाबीन पिकांमध्ये येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन येत्या हंगामात योग्य ते व्यवस्थापन केल्यास उत्पादकता वाढवणे शक्य होईल.
उत्पादकता वाढीसाठी सोयाबीन पिकातील व्यवस्थापन
उत्पादकता वाढीसाठी सोयाबीन पिकातील व्यवस्थापन

खरीप हंगामातील सामान्यतः सोयाबीन पिकाची सलग लागवड किंवा सोयाबीन : तूर असे आंतरपीक घेतले जाते. या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन पिकात मुख्यत्वे खोडमाशीच्या अळीचा प्रादुर्भाव, मूळसड आणि अवास्तव वाढ या बाबींमुळे मोठे नुकसान झाले. परिणामी, उत्पादकतेत मोठी घट झाल्याचे आढळले. पुढील हंगामात या समस्या लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने व्यवस्थापन केल्यास उत्पादकतेत निश्‍चितच वाढ होऊ शकेल.  व्यवस्थापनातील अत्यावश्यक बाबी 

  • किमान ७०-१०० मि.लि. इतका पाऊस झाल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करू नये, अशी स्पष्ट शिफारस आहे.
  • सोयाबीनची वेळेत (१५ जुलैपर्यंत) पेरणी करावी. उशिरा पेरणी जास्तीत जास्त २२ जुलैपर्यंतच करावी.
  • सोयाबीनची धूळपेरणी (कोरड्या शेतात बियाणे फोकून) करू नये, अशी स्पष्ट शिफारस आहे.
  • पेरणी करताना शक्यतोवर शेताच्या उताराला आडवी, सोडओळ (पट्टापेर) पेरणी पद्धतीने करावी.
  • ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने पेरणी करताना पेरणीची खोली फक्त ३ ते ५ सेंमीपर्यंत राखावी. पेरणीसोबतच बियाणे योग्यप्रकारे मातीने झाकले जाईल, याची दक्षता घ्यावी. त्याकरिता पेरणी यंत्राच्या मागे लोखंडी पट्टी अथवा पेरणी पाठोपाठ काटेरी फांदी फिरवावी अथवा पठाल मारावी.
  • पाणथळ अथवा पाणबसन प्रकारच्या जमिनीत (पावसाच्या अथवा ओलिताच्या पाण्याचा योग्य निचरा न होऊ शकणाऱ्या जमिनीत) पेरणीपूर्वी जमिनीत ओल असताना ३ ते ५ बॅग जिप्सम हे भूसुधारक प्रति एकर याप्रमाणे जमिनीत योग्य प्रकारे मिसळून घ्यावे.
  • सोयाबीन पिकाच्या बियाण्याला बीजप्रक्रिया करताना बीजप्रक्रियेचा क्रम बुरशीनाशक - कीटकनाशक - जिवाणू संवर्धक याप्रमाणे राखावा. प्रत्येक बीज प्रक्रियेदरम्यान ३० मिनिटे कालावधी ठेवावे.
  • रायझोबियम, पीएसबी, केएसबी जिवाणू संवर्धकांची १० मि.लि. प्रति किलो बियाणे याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
  • घरचे सोयाबीन बियाणे वापरणार असल्यास पेरणीपूर्वी बियाण्याची अंकुरण क्षमता तपासून घ्यावी.
  • ज्या शेतामध्ये सोयाबीननंतर हरभरा, गहू किंवा अन्य रब्बी पीक घ्यावयाचे आहे, अशा शेतात कमी कालावधीचे वाण जेएस-९३-०५ (९० दिवस कालावधी), जेएस -९५-६० (८० दिवस कालावधी) यांची निवड करावी. त्यामुळे रब्बी पिकाची वेळेत पेरणी शक्य होईल.
  • ओलिताची व्यवस्था असल्यास व पाणी मुबलक असल्यास फुले संगत, फुले किमया यांसारख्या उत्पादनक्षम व ओलिताला चांगला प्रतिसाद देणाऱ्या वाणांची निवड करता येईल.
  • सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीसाठी सोयाबीनचे कमी कालावधीचे वाण उदा. जेएस -९३-०५, जेएस -९५-६० या वाणांची निवड उपयुक्त ठरते. यामुळे तूरपिकासाठी शेत लवकर खाली होते. तूर पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी ते फायदेशीर ठरत असल्याचे अनुभवाअंती आढळले आहे.
  • उभ्या पिकात तणनाशकाची फवारणी टाळण्याच्या दृष्टीने पेरणीपासून ४८ तासांच्या आत, पेरणीनंतर परंतु उगवणपूर्व प्रकारात मोडणारे तणनाशक पेंडीमेथिलीन ३५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • सोयाबीनचे पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी आंतरमशागतीची कामे (डवरणी व निंदणी) सुरुवातीच्या ३० ते ४० दिवसांत पूर्ण करावीत. शेत तणमुक्त राखावे.
  • सोयाबीन पिकाची निगराणी ः निरीक्षण, वेळेत फवारणी, सूर्यप्रकाशाचे योग्य वितरण, एकसमान पिकाची वाढ, ओलिताची व्यवस्था असल्यास योग्य वेळी ओलित, स्प्रिंकलरचे पाइप टाकण्यासाठी जागा, पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन या बाबींसाठी सोड ओळ पेरणी पद्धतीचा (पट्टापेर) अवलंब करावा.
  • सोयाबीनचे पीक कळी अवस्थेत येताना  व पुढे शेंगामध्ये दाणे भरताना विद्राव्य सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर केल्यास सोयाबीन दाण्याची गुणवत्ता, चकाकी, एकसमान आकार व वजन चांगले मिळू शकते.
  • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पावसात मोठा खंड असताना सोयाबीनचे पीक पिवळे पडण्याची समस्या आढळून येते. याकरिता पेरणीसोबत झिंक सल्फेट ८-१० किलो व फेरस सल्फेट ४ ते ५ किलो प्रति एकर वापर करावा. पावसात मोठा खंड असताना विद्राव्य झिंक सल्फेट ५ ग्रॅम व विद्राव्य फेरस सल्फेट २.५ ग्रॅम अधिक चुन्याची निवळीचे द्रावण (२.५ ग्रॅम) प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. अशा प्रकारची फवारणी सोयाबीनचे पीक कळी अवस्थेत येताना व शेंगांमध्ये दाणे भरतानासुद्धा घेता येते.
  • पावसात खंड असताना १३:००:४५ ग्रेड विद्राव्य खताची ५ ते १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास, जमिनीतील ओल कमी असताना सोयाबीनचे पीक काही काळ तग धरू शकते, असे प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
  • फुलोरावस्था (कळी सुटण्याच्या कालावधीपासून) सुरू झाल्यानंतर शेतात आंतरमशागतीची कामे (डवरणी, कोळपणी इ.) मुळीच करू नये. यादरम्यान तण व्यवस्थापनासाठी तणनाशकाचा वापर मुळीच करू नये.
  • उभ्या पिकात तणनाशकाचा वापर करावयाचा झाल्यास इमॅझिथायपर २० मि.लि. किंवा इमॅझिथापर अधिक इमॅजामोक्स (संयुक्त तणनाशक) २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या तणनाशकाचा वापर सोयाबीनचे पीक २ ते ३ पानांवर असताना करावे. या वेळी जमिनीत मुबलक ओल असणे गरजेचे असते. जमिनीमध्ये ओल नसल्यास तणनाशकाचा वापर करू नये.
  • सोयाबीन : तूर (४:१) पट्टापेर पेरणी 

  • सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीमध्ये तुरीचे पीक सोयाबीनची कापणी, काढणी, मळणी होईपर्यंत पूर्णपणे दुर्लक्षित राहते. यामुळे तूर पिकाची उत्पादकता कमी मिळताना दिसते. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाप्रमाणेच तूर पिकाला मुख्य पिकाचा दर्जा देणे गरजेचे आहे. तुरीमध्ये निंदणीच्या वेळी विरळणी करणे, तुरीचे पीक ३० दिवसांचे असताना शेंडे खुडणी, ६० दिवसांचे आणि ९० दिवसांचे पीक असताना शेंडे छाटणी करणे अशा कामांकडे लक्ष द्यावे. त्यातून तूर पिकाच्या उत्पादकतेत शाश्‍वत वाढ शक्य होते.
  • सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीने पेरणी करताना सोडओळ पेरणी पद्धतीचा (पट्टापेर) अवलंब करताना तूर पिकाच्या ओळीच्या दोन्ही बाजूंना सोयाबीन पिकाची एक - एक ओळ खाली ठेवावी. याद्वारे सोयाबीन पिकाचे थोडे महत्त्व कमी झाले तरी तूर पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी ही पेरणी पद्धत उपयुक्त सिद्ध होते.
  • सोयाबीन पिकाच्या वाणाच्या कालावधीनुसार कायिक पक्वतेला कापणी झाल्यानंतर जास्त काळ ढीग लावून न ठेवता मळणी करावी.
  • बियाण्यासाठी वापर करावयाचा असल्यास सोयाबीनची मळणी करताना ड्रमची गती ३५० ते ४०० आरपीएम (फेरे प्रति मिनीट) यापेक्षा जास्त नसावी. सोयाबिन विक्रीसाठी उपयोगात आणणार असल्यास मळणी करताना ड्रमची गती ४५०-५०० आरपीएम राखता येते.
  • हार्वेस्टरने सोयाबीन काढणी केली असल्यास त्यामुळे शेतात त्याचे पीक अवशेष पसरतात. स्प्रिंकलरने पाणी देऊन शेत ओले करून घ्यावे. या अवशेषांवर व शेतात डीकंपोस्टिंग कल्चरचे द्रावण फवारून घ्यावे. त्यामुळे हे घटक लवकर कवजून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
  • - जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (जितेंद्र दुर्गे हे श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे सहयोगी प्राध्यापक (कृषी विद्या), तर प्रा. सविता कणसे या विभाग प्रमुख आहेत.) -------------------

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com