दुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली भक्कम साथ

दुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली भक्कम साथ
दुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली भक्कम साथ

सततची दुष्काळी परिस्थिती, गारपीट, बाजारभाव यांची न राहिलेली हमी आदी समस्यांवर बरबडी (जि. परभणी) येथील श्रीधर सोलव यांनी रेशीम शेतीतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. पुढे ‘चॉकी रेअरिंग’ सुरू केले. आज कोषनिर्मितीपेक्षाही याच व्यवसायातून दुपटीपर्यंत नफा त्यांना मिळतो आहे. दर महिन्याला २० हजार अंडीपुंजांपासून बाल्यावस्थेतील कीटकनिर्मिती करून त्यांचा पुरवठा करण्याची क्षमता सोलव यांनी निर्माण केली आहे. पारंपरिक पिकांना नसलेले बाजारभाव, दुष्काळ न अन्य समस्या लक्षात घेता परभणी जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीसारख्या पूरक व्यवसायाकडे वळले. शेजारील जिल्ह्यातही त्याचा विस्तार झाला. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील सोलव कुटूंबदेखील सन २०११ च्या सुमारास रेशीम शेतीकडे वळले. आज संपूर्ण कुटूंब गेल्या आठ वर्षांच्या अनुभवातून या शेतीत तरबेज झाले आहे.

रेशीम शेतीतून पारंपरिकतेत बदल

बरबडी येथील हरिच्चंद्र आणि मारुती या सोलव बंधूंचे एकत्रित कुटूंब आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाची त्यांची १४ एकर जमीन आहे. सिंचनासाठी तीन विहिरी आहेत. सुमारे ११ एकर जमीन सिंचनाखाली तर तीन एकर कोरडवाहू आहे. पूर्वी सोलव बंधू सोयाबीन, कापूस, हळद, भाजीपाला उत्पादन घेत. दुष्काळी परिस्थितीमुळे खात्रीशीर उत्पन्न मिळत नव्हते. मग पूरक व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले.अभ्यास व सल्ल्यातून रेशीम शेतीचा पर्याय पुढे आला. केंद्रिय रेशीम मंडळाच्या परभणी विस्तार केंद्रातील शास्त्रज्ञ ए. जे. कारंडे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॅा. सी. बी. लटपटे, रेशीम विकास कार्यालयातील जी. आर. कदम यांनी मग मार्गदर्शन केले.

रेशीम शेतीला सुरवात

सन २०११ मध्ये दोन एकरांत तुतीच्या व्ही वन वाणाची लागवड केली. कीटक संगोपनगृहाची उभारणी केली. पहिली दोन वर्षे चांगले कोष उत्पादन मिळाले. कर्नाटकातील रामनगरम येथे बाजारपेठही मिळाली.

चॉकी संगोपनाची संधी ओळखली

दरम्यानच्या काळात श्रीधर हरिच्चंद्र सोलव यांनी बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रेशीम शेतीवरच लक्ष केंद्रित केले. पूर्णा तालुक्यात रेशीम उत्पादकांची संख्या वाढत आहे. रेशीम कीटकांच्या पहिल्या दोन अवस्थांचे संगोपन अत्यंत काळजीपूर्वक व कौशल्याने करावे लागते. त्यात त्रुटी आल्यास कोष उत्पादन व दर्जावर परिणाम होतो. हीच संधी ओळखत श्रीधर यांनी चॉकी रेअरिंग अर्थात बाल्य कीटक संगोपन सुरू करून कीटकांचा शेतकऱ्यांना पुरवठा करण्याचे ठरवले.

‘चॉकी रेअरिंग’ दृष्टिक्षेपात

  • केंद्रिय रेशीम मंडळांतर्गत म्हैसूर येथील प्रशिक्षण केंद्रात तीन महिने कालावधीचे ‘चॉकी रेअरिंग’
  • विषयातील प्रशिक्षण
  • सन २०१३ मध्ये ‘चाॅकी रेअरिंग सेंटर’ची उभारणी
  • कोषनिर्मितीचे शेड- ३० बाय २२ फूट. तर चॉकी सेंटर शेड ३० बाय ३० फूट
  • तुतीच्या क्षेत्रात नऊ एकरांपर्यंत वाढ. तुतीची पाने बारीक करण्यासाठी यंत्र.
  • दोन विहिरी आहेत. त्यांचे पाणी सद्यस्थितीत पुरते.
  • सिमेंट विटांचा पक्का निवारा

    बाल्य कीटकांच्या संगोपनासाठी २१ ते २७ अंश सेल्सियस तापमान आवश्यक असते. ते योग्य राखण्यासाठी शेतात पक्क्या विटा, सिमेंटचे छत असलेले शेड बांधले. शिवाय विजेची शेगडी, लाईट याव्दारे तापमान नियंत्रित ठेवले जाते. तापमानाची नोंद घेण्यासाठी शेडमध्ये ‘थर्मामीटर’ बसविण्यात आले आहे. प्लॅस्टिकच्या रॅकमधील ट्रेमध्ये अंडीपूंज ठेवून बाल्य किटकांची वाढ केली जाते.

    मागणी प्रमाणे पुरवठा

  • सुरवातीला पूर्णा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील रेशीम उत्पादकांना कीटकांचा पुरवठा केला जात असे. आता परभणी जिल्ह्याच्या सीमांना असलेल्या हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांतून मागणी. वर्षभरात सुमारे ५०० शेतकरी ग्राहकांचे ‘नेटवर्क’
  • चॉकीसाठी शेतकऱ्यांना किमान २० दिवस रेशीम कार्यालयाकडे ‘बुकिंग’ करावे लागते.
  • त्यांच्या मागणीनुसार कार्यालयाकडून सोलव यांच्याकडे अंडीपुंजांचा थेट पुरवठा होतो.
  • सोलव यांच्या सेंटरला मग सुमारे १३ दिवस चॉकी संगोपन केले जाते.
  • त्यानंतर ठरलेल्या तारखेला सोलव संबंधित शेतकऱ्यास वाढ झालेले कीटक उपलब्ध करून देतात.
  • यामुळे नव्या रेशीम उत्पादकांनाही दर्जेदार कोष निर्मिती करणे शक्य झाले आहे.
  • उत्पादन व अर्थकारण

  • प्रति बॅच सुमारे ५ ते ७ हजार अंडीपुंज उबविता येतात.
  • महिन्यामध्ये सुमारे दोन ते तीन बॅच होतात.
  • एकूण मिळून १५ ते २० हजार अंडीपूंज उबविले जातात.
  • परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील रेशीम उत्पादकांना कीटकांचा
  • पुरवठा
  • प्रति १०० अंडीपुंजांसाठी एक हजार रुपये दर आकारण्यात येतो.
  • केवळ कोषनिर्मिती करून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा या व्यवसायातून दीडपट, दुप्पट ते काहीवेळा अधिकही उत्पन्न मिळत असल्याचे श्रीधर सांगतात.
  • उन्हाळ्यात फेब्रुवारी ते जूनपर्यंत हा व्यवसाय बंद ठेवावा लागतो. आता या काळासाठी अळिंबी व्यवसाय सुरू करण्याचा मानस आहे.
  • गुंतवणूक

    या व्यवसायासाठी सुमारे १५ लाख रूपयांचे भांडवल उभे करावे लागले. त्याचबरोबर चॉकी रेअरिंगसाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागत असल्याचे श्रीधर म्हणाले. एकत्रित कुटूंबातील ११ सदस्य सध्या या व्यवसायात कार्यरत आहेत. तुतीची शेती, पाने तोडणे, कीटकांना खाद्य देणे, स्वच्छता राखणे आदी कामे मिळून करावी लागतात.

    श्रीधर सोलव - ८३२९१८१८९८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com