संरक्षित शेतीने आर्थिक पाया केला भक्कम

बीजोत्पादनाबाबत तज्ज्ञांनी चर्चा करताना मेहेत्रे कुटुंबातील सदस्य
बीजोत्पादनाबाबत तज्ज्ञांनी चर्चा करताना मेहेत्रे कुटुंबातील सदस्य

दुष्काळाशी तोंड देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यांतील शेतकऱ्यांना संरक्षित शेतीने चांगला आधार दिला. जिद्द, चिकाटीतून शेतकऱ्यांनी परिस्थितीवर मात करत काटेकोर शेतीमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. नशिराबाद, चांगेफळ गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेडनेटमधील शेतीचा घेतलेला आढावा...

विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवर सिंदखेडराजा तालुक्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून सातत्याने कमी पावसाचा फटका बसत आहे. अशा परिस्थितीतही प्रयोगशील शेतकरी पारंपरिक शेतीसोबतच थोड्या क्षेत्रावर शेडनेटमध्ये बीजोत्पादन करून उत्पन्न वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. अशा शेतकऱ्यांपैकी आहेत नशिराबादमधील दिलीप कुंडलिकराव मेहेत्रे आणि चांगेफळमधील किसन हिंमतराव नरवाडे.

जालना-बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील नशिराबाद हे गाव. काही वर्षांपूर्वी मागासलेले, कोरडवाहू पीकपद्धतीमुळे जेमतेम उत्पादन मिळवणारे गाव म्हणून नशिराबाद ओळखले जात होते. या गावशिवारात दिलीप मेहेत्रे हे २००१ पर्यंत शेतमजुरी करायचे. पण आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी मेहेत्रे यांनी पुढाकार घेऊन शेतीतील पीकपद्धती बदलण्याचा निर्णय घेतला. यासाठी गाव सोडून पहिल्यांदा शेतात राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सध्या त्यांच्याकडे बारा एकर शेती आहे. सन २००१ साली सुरवातीला त्यांनी दहा गुंठे क्षेत्रावर शेडनेटमध्ये बियाणे कंपनीसाठी मिरची बीजोत्पादनाला सुरवात केली. यासाठी प्रयोगशील शेतकरी, बियाणे कंपनीतील अधिकाऱ्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. या भागात तेव्हा कुणीही अशाप्रकारे बीजोत्पादन घेत नव्हते. मात्र मेहेत्रे यांनी काही पिकानंतर बीजोत्पादनात जम बसविल्याचे पाहून गावातील इतर शेतकरीदेखील संरक्षित शेती आणि बीजोत्पादनाकडे वळाले. सध्या मेहेत्रे चार एकरांवर बीजोत्पादन घेतात. सध्या त्यांच्याकडे बारा शेडनेट असून त्यामध्ये मिरची, टोमॅटो, काकडी, खरबुजाचे बीजोत्पादन घेतले जाते.

बदलेले अर्थकारण दुसऱ्याकडे मोलमजुरी करणारे मेहेत्रे कुटुंब आज स्वतःच्या आर्थिक ताकदीवर उभे आहे. त्यांनी शेतातच टुमदार घर बांधले आहे. शेती कामांसाठी दोन ट्रॅक्टर, स्वतःसह मुलांसाठी दुचाकी, चारचाकी गाडी दारात उभी आहे. संरक्षित सिंचनासाठी पाणी मिळवण्यासाठी विहीर, कूपनलिकेसह त्यांनी एक कोटी क्षमतेचे शेततळे बांधले. एका शेडनेटमधील (दहा गुंठे) बीजोत्पादनापासून झालेली सुरवात आता बारा शेडनेटपर्यंत पोचली आहे.   दिलीप मेहेत्रे यांचे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु आता आर्थिक प्रगतीमुळे मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले. मोठा मुलगा प्रदीप हा बीएससी झाला आहे. प्रदीपची बायको सौ. रेखा ही डिफार्म झाली आहे. लहान मुलगा सतीश हा एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात आहे. आई-वडील, दिलीप व त्यांची पत्नी, मुलगा व सून असे सर्वजण दररोज शेती व्यवस्थापनात रमतात. २००१ मध्ये दुसऱ्याच्या शेतीमध्ये मजुरी करणाऱ्या दिलीप यांच्याकडे आज २५ मजूर कामासाठी येतात. हे सर्व मजूर शेडनेटमधील शेतीत तांत्रिक कामे कुशलपणे करतात. तासाप्रमाणे त्यांना मजुरी दिली जाते. बीजोत्पादनाच्या बरोबरीने मेहेत्रे यांच्या आठ एकर शेतीमध्ये सोयाबीन, कपाशी, मका या पिकांची लागवड असते. या पिकांच्यामध्येही चांगले उत्पादनाचे ध्येय मेहेत्रे यांनी ठेवले आहे.

नशिराबाद शिवारात दीडशेवर शेडनेट

नशिराबाद गावात संरक्षित शेतीची सुरवात करणाऱ्या मेहेत्रे यांच्या दिशादर्शक कामामुळे गावातील शेतीला प्रगतीची दिशा मिळाली. आज या गावातील सुमारे ३५ शेतकरी सुमारे दीडशेपेक्षा अधिक शेडनेटमध्ये बीजोत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांची प्रयोगशीलता आणि चिकाटी लक्षात घेऊन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बियाणे कंपन्या या गावात मिरची, काकडी, टोमॅटो, खरबूज व इतर भाजीपालावर्गीय पिकांचे बीजोत्पादनास प्राधान्य देतात. बीजोत्पादनाने या गावाच्या शेतीचे चित्र पालटून टाकले आहे. काटेकोर पीक व्यवस्थापनासाठी शेतकरी गावातील घरे सोडून शेतांमध्ये स्थायिक झाले. यामुळे पहाटेपासूनच शेतीमध्ये कामांची लगबग सुरू होते.  
नरवाडे यांची संघर्षांतून प्रगती
चांगेफळ (ता. सिंदखेडराजा) गावातील किसन नरवाडे यांची शेतीमधील प्रगतीदेखील एक संघर्ष गाथा आहे. त्यांच्या संघर्षाला बीजोत्पादनाची मोलाची साथ मिळाल्याने शेत शिवाराला आर्थिक गती मिळाली. लहानपणापासूनच किसनराव यांच्या वाटेला संघर्ष आलेला. लहानपणी ते मोलमजुरीसाठी जळगाव येथे गेले. सिमेंट पाइपनिर्मिती करणाऱ्या कंपनीत ते कामाला राहिले. कंपनी मालकाने सचोटी पाहून किसनराव यांना जबाबदारीची कामे देण्यास सुरवात केली. किसनराव यांनी विहिरींसाठी साचे बनविणे सुरू केले. पाच फुटांपासून ते ६० फूट खोलीपर्यंत विहिरीची खोदाई सुरू केली. किसनरावांच्या घरी सुरवातील एक गुंठाही जमीन नव्हती. काटकसर करत त्यांनी पैसे जमविले. बरीच वर्षे अंग मेहनतीची कामे केल्यानंतर किसनराव यांनी गावी येत जमा झालेल्या रक्कमेतून दोन एकर शेती खरेदी केली.  टप्याटप्याने शेती वाढवत आज ते चौदा एकराचे मालक झाले आहेत. त्यांचा मुलगा राजीव हा एका बियाणे कंपनी नोकरीला आहे. अशा सुस्थितीतीत आज नरवाडे कुटुंब आहे. मात्र तरी देखील वयाची सत्तरी ओलांडलेले किसनराव पहाटेपासून रात्री दहा वाजेपर्यंत शेती कामात व्यस्त असतात. सध्या नरवाडे कुटुंबीय २२ गुंठे क्षेत्राच्या तीन शेडनेटमध्ये काकडी, मिरची, टोमॅटो, कारले, झेंडू, टरबूजाचे बीजोत्पादन घेतात.
गुणवत्ता, निष्ठा जोपासली मागील काही वर्षांपासून किसनराव नरवाडे हे आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठीच भाजीपाल्याचे बीजोत्पादन करतात. कंपनीला हवे असलेल्या दर्जाचे बियाणे उत्पादित करण्यासाठी अहोरात्र मेहनत नरवाडे कुटुंब घेते. कंपनीकडून तांत्रिक व पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन मिळते. त्यानंतर संपूर्ण बीजोत्पादन क्षेत्राचे व्यवस्थापन नरवाडे कुटुंब करते. गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादित करून कंपनीला दिले जाते. दर्जेदार बियाणे उत्पादनासाठी  संपूर्ण तांत्रिक कामे कुशलतेने व वेळच्यावेळी केली जातात. तुम्ही कुठलेही काम एकनिष्ठेने करा, यश मिळेल असे किसनराव नरवाडे सांगतात.
- किसन नरवाडे, ९८८१६४२०५०
 - दिलीप मेहेत्रे : ९३२५०९३८८१ - प्रदीप मेहेत्रे : ९२८४२१३२२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com