द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशियम बारबॅटम खोडकिडीचे व्यवस्थापन

द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशियम बारबॅटम खोडकिडीचे व्यवस्थापन
द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशियम बारबॅटम खोडकिडीचे व्यवस्थापन

द्राक्षाच्या जुन्या बागांमध्ये खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या किडीची अंडी घालण्यास सुरुवात करते. अंडी अवस्थेत खोडकिडीचे नियंत्रण करणे तुलनेने सोपे असून, या काळातच नियंत्रणासाठी त्वरीत उपाययोजना कराव्यात. द्राक्षबागेमध्ये स्ट्रोमॅशियम बारबॅटम ही महत्त्वाची व नुकसानकारक अशी खोडकिडीची प्रजात मानली जाते. ती ६-७ वर्षे किंवा त्याहूनही जुन्या द्राक्षबागेत प्रामुख्याने दिसून येते. या किडीची पहिली अळी अवस्था (ग्रब्स) ही खोडामध्ये शिरून त्यामध्ये पोखरत राहते. त्यातून खोडाची भुकटी तयार करते. प्रामुख्याने ही कीड जुन्या सुकलेल्या खोडावर आढळते. ज्या बागांमध्ये ओलांडे डागाळलेले, जुने किंवा सुकलेले आहेत, अशा ठिकाणी या किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येते.

  • जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खोडकिडीचा प्रौढ द्राक्षबागेत प्रादुर्भाव करण्यास सुरुवात करतो. जून महिन्याच्या मध्यापर्यंत या किडीचा प्रसार बऱ्यापैकी झालेला दिसतो. काही परिस्थितीत सप्टेंबर महिन्यापर्यंतही किडीचा प्रादुर्भाव आढळतो.
  • या किडीच्या सर्वेक्षणासाठी द्राक्षबागेबाहेर प्रकाश सापळे लावावेत. त्यात सापडणाऱ्या किडीच्या संख्येनुसार खोडकिडीच्या प्रादुर्भावाची कल्पना येईल.
  • प्रौढ खोडकीड ही खोडातील व ओलांड्यावरील सालीच्या खाली आढळून येते. याच भागात ही कीड अधिक प्रमाणात अंडी घालते. म्हणूनच पाऊस सुरू होण्यापूर्वीच वेलीच्या खोड आणि ओलांड्यावरील ढिली झालेली साल काढून टाकणे फायद्याचे ठरते. असे केल्यास प्रौढ खोडकिडींनी अंडी घालण्यासाठी उपयुक्त जागा मिळणार नाही. या भागावर कीडनाशकांची फवारणीही कार्यक्षमपणे करणे शक्य होईल. परिणामी किडीचा प्रादुर्भाव कमी होईल.
  • किडीचा जीवनक्रम आणि नियंत्रण

  • या किडीच्या नियंत्रणासाठी अंडी घालण्याची अवस्था म्हणजेच जून महिन्याचा पहिला आठवडा फारच महत्त्वाचा असतो. या कालावधीमध्ये साली काढून टाकून त्वरीत फवारणीचे नियोजन करावे. हा कालावधी सुटल्यास खोडकिडीची दुसरी अवस्था अळी व कोषावस्था या अवस्थेमध्ये नियंत्रण अवघड होते.
  • या किडीची अळी अवस्था ९ महिन्यांची असते. ही अवस्था खोडाच्या आतमध्ये असल्याने बाहेरून वेलीवर त्याचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.
  • डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये जुन्या बागेत या किडीची अळी अवस्था खोड पोखरण्यास प्रारंभ करते, त्या वेळी खोडामधून कीड काहीतरी खात असल्याचा आवाज येतो. काही बागांमध्ये एकेका वेलीमध्ये १०० पेक्षा जास्त खोडकिडीच्या अळ्या असल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारे खोडकिडीचा २-३ वर्षे प्रादुर्भाव राहिल्यास उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होते.
  • मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही कीड कोषावस्थेमध्ये जाते. ही अवस्था साधारणपणे चार आठवडे असते.
  • कोषातून बाहेर पडलेले प्रौढ खोडकीड खोडामध्येच वास्तव्य करते. पाऊस सुरू होण्याची वाट पाहते.
  • या किडीच्या विविध अवस्थेत होणाऱ्या हालचालीबद्दल व व्यवस्थापनाबद्दलची माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या यू-ट्यूब चॅनेलवर दिलेली आहे. याचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल. http:/www.youtube.com/watch?v=Yvx७dibPEAU
  • नियंत्रणाकरिता उपाययोजना ः

  • खोडकिडीची सुरवात होताच खोड व ओलांड्यावर फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६ ग्रॅम प्रति लिटर किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ सीएस) ०.५ मि.लि. प्रति लिटर किंवा इमीडाक्‍लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची फवारणी करून चांगल्या प्रकारे धुवून घेणे. ही प्रक्रिया रात्रीच्या वेळी कीडनाशक बदलून केल्यास कीड नियंत्रण शक्य होईल.
  • लॅंबडा सायहॅलोथ्रीन ( ५ सीएस) ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी हे द्रावण खोडकिडीची अंडी मारण्यास महत्त्वाची भूमिका निभावते.
  • राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे केलेल्या प्रयोगामध्ये क्‍लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणीमुळे खोडकिडीची अंडी व प्रौढावस्थेवर नियंत्रण मिळत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, द्राक्षबागेत या कीडनाशकांसाठी लेबल क्‍लेम नसल्यामुळे वापर टाळावा.
  • - डॉ. दिपेंद्रसिंग यादव, ०२० -२६९५६०३५ (कीटकशास्त्रज्ञ) राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com