सुधारित शेती, ग्रामविकासाच्या उपक्रमातून लहान ठरले ‘स्मार्ट ग्राम’

ग्रामविकासात महिलांचा पुढाकार ग्रामस्थांना विविध सुविधा देण्यासोबत गावातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एका महिला बचत गटातर्फे स्वस्त धान्याचे दुकान चालविले जाते. महिलांच्या पुढाकारातून गावात दारूबंदी करण्यात आली. - शोभाबाई लक्ष्मणराव रणखांब, सरपंच
ग्रामसभेमध्ये महिलांची चांगली उपस्थिती
ग्रामसभेमध्ये महिलांची चांगली उपस्थिती

लहान (ता.अर्धापूर, जि. नांदेड) गावातील शेतकऱ्यांनी केळी, ऊस, हळद या नगदी पिकांच्या लागवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे गावाच्या अर्थकारणाला गती मिळाली. आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त ग्रामपंचायतीतर्फे  विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जातात. जिल्हा परिषदेने ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’ देऊन गावाचा गौरव केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील लहान गावशिवारात हलकी ते मध्यम प्रकराची जमीन आहे.मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरील पैनगंगा नदीवर इसापूर येथे बांधण्यात आलेल्या ऊर्ध्वपैनगंगा प्रकल्पाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात अर्धापूर तालुक्याचा समावेश आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करतात. लहान हे केळी उत्पादक गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

ग्रामपंचायतीमध्ये लहान गाव आणि तांड्याचा समावेश आहे. केळी, ऊस तसेच हळद ही गावातील प्रमुख पिके आहेत. खरिपात सोयाबीन, कापूस तर रब्बीत गहू तसेच ज्वारी लागवड असते. गावात दर शनिवारी आठवडे बाजार भरतो. जिल्हा परिषदेची दहावीपर्यंत शाळा आहे. तसेच गावांत दहा अंगणवाड्या आहेत. गावातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांची संख्या वीस आहे. एका महिला बचत गटातर्फे स्वस्त धान्याचे दुकान चालविले जाते.

सुधारित पद्धतीने हळद लागवड केळी आणि उसाच्या तुलनेत कमी पाण्यावर कमी कालावधीत येणाऱ्या हळकीकडे या गावातील  शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शेतकऱ्यांनी हळदीची सरी पद्धतीने लागवड बंद केली असून, गादी वाफा पध्दतीने हळद लागवड करीत आहेत. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी तसेच विद्राव्य खते दिल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. हळदीमध्ये बऱ्यापैकी यांत्रिकीकरण झाले आहे.

सिंचन पद्धतीत बदल केळी, ऊस, हळदीसाठी आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटेकोर कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. गावशिवारातील ४१५ शेतकऱ्यांचे ५३५ हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे.

गावात पक्के रस्ते गावातील बहुतांश रस्ते सिमेंटचे आहेत. काही ठिकाणी पेव्हर ब्लॅाक बसविण्यात आले आहेत. गावात प्रवेश करणारा मुख्य रस्ता डांबरी आहे. रस्त्याच्या बाजूने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी गटांराची व्यवस्था करण्यात आली आहे. मनरेगा अंतर्गंत ३५० शोषखड्डे बांधण्यात आले आहेत.

  लोकसहभागातून वृक्ष लागवड लोकसहभागातून ‘माझं गाव- माझा वृक्ष’ ही मोहीम राबिण्यात आली. गावातील सर्व रस्त्याच्या दुतर्फा, ग्रामपंचायत, शाळा,सार्वजनिक जागा आदी ठिकाणी २ हजार १०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

आपारंपरिक ऊर्जा साधनावर भर गावात सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे बसविण्यात आले आहे. विजेची बचत करण्यासाठी एलईडी बल्ब लावण्यात आले. बहुतांश ग्रामस्थ एलईडी बल्बचा वापर करतात. गावात पाच बायोगॅस आहेत.

घनकचरा व्यवस्थापन गावातील प्रत्येक कुटुंबातील ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे घंटा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गावात प्लॅस्टिक बंदी आहे.

महिलांच्या पुढाकारातून दारुबंदी

  • दारूच्या व्यसनामुळे गावातील कुटुंबाची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी गावातील महिलांच्या पुढाकारातून गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • २०१७ मध्ये महिला ग्रामसभेत मतदान घेऊन दारूबंदी करण्यात आली.
  • स्वच्छतागृहांची सुविधा गावातील सर्व कुटुंबांसाठी वैयक्तिक स्वच्छतागृहे आहेत. ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी आदी सार्वजनिक ठिकाणी देखील स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

    जलसंधारणावर भर जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत २०१५-१६ मध्ये गावाची जलयुक्त शिवार अभियान मध्ये निवड झाली होती. त्या वर्षी गावशिवारातील ओढे-नाल्यावर  अकरा सिमेंट बंधारे बांधण्यात आले. शिवारातील १८ विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले. त्यामुळे संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले.

    ग्रामपंचायतीचे आधुनिकीकरण ग्रामपंचायत कार्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी ग्रामस्थांना विविध १९ प्रकारची संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यासाठी आपले सरकार केंद्र कार्यान्वित आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सभागृह, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचे कक्ष आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कार्यालयाच्या इमारती भोवती विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ग्रामसभा घेण्यासाठी कार्यालयसमोरच्या मैदानावर सिमेंटचे पेव्हर ब्लॅाक बसविण्यात आले आहेत.

    ग्रामपंचायतीला मिळालेले पुरस्कार

  • आयएसओ ९००१ ः२०१५
  •  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार ः २०१७ जिल्हास्तर द्वितीय
  •  जिल्हास्तरीय प्रथम स्मार्टग्राम पुरस्कार ः २०१७
  • शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गंत लहान तसेच परिसरातील पाटणूर, आंबेगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लहान ॲग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. या शेतकरी उत्पादक कंपनीचे २३९ शेतकरी सभासद आहेत. हळद आणि केळी या कच्चा मालाची उपलब्धता लक्षात घेऊन कंपनीतर्फे हळद, केळी प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. कच्या हळदीपासून पावडरनिर्मितीची चाचणी घेतली आहे. प्रक्रिया उद्योगासाठी एक्स्प्रेस फीडरद्वारे वीजपुरवठा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर हळद पावडर तसेच केळीपासून चिप्सनिर्मिती सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष बालाजी लगुटकर यांनी दिली.

    वॉटर एटीएमद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेच्या दोन विहिरी आहेत. कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु ग्रामस्थांना माफत दरात पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आरओ संयंत्र बसविण्यात आले आहे. २०० रुपये शुल्क भरलेल्या ग्रामस्थांना वॉटर एटीएम कार्ड दिले जाते. हे कार्ड पाणी शुद्धीकरण केंद्राजवळील नळाजवळ लावलेल्या यंत्राजवळ नेले की नळाच्या तोटीमधून एकावेळी २० लिटर पाणी बाहेर पडते. केवळ ५ रुपयांमध्ये २० लिटर पाणी दिले जाते. शुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे आरोग्य विभागाने ग्रामपंचायतील ग्रीन कार्ड दिले आहे.

    दृष्टिक्षेपात गाव शिवार

  •  भौगोलिक क्षेत्र ः २२६७ हेक्टर
  •   लागवड योग्य क्षेत्र ः १६७३ हेक्टर
  •   विहितीखालील क्षेत्र ः १६०३ हेक्टर
  •   पडीक, वनक्षेत्र ः ५१४
  •   विहिरी ः २८०
  •   कूपनलिका  ः२४०
  •   खरीप क्षेत्र ः १६७२ हेक्टर
  •   रब्बीचे क्षेत्र १०८७ हेक्टर
  •   प्रमुख बागायती पिके ः केळी, हळद, ऊस
  •   प्रमुख खरीप पिके ः सोयाबीन, कापूस
  •   केळी लागवड क्षेत्र ः २२२ हेक्टर
  •   ऊस लागवड क्षेत्र ः २८० हेक्टर
  •   हळद लागवड क्षेत्र ः ३९० हेक्टर
  •   लोकसंख्या ः ५५६० (२०११ नुसार)
  •   शेतकरी खातेदार संख्या ः ३५४९
  •   कुटुंबसंख्या ः ८५०
  •   वैयक्तिक स्वच्छतागृह ः८५०
  •   जि.प.शाळा ः १ दहावीपर्यंत
  •   महाविद्यालय ः १ खासगी
  • सुधारित तंत्रावर भर दहा एकर शेती आहे. केळी, ऊस, हळदीची लागवड केली आहे. दोन विहिरी आहेत. दहा वर्षांपासून ठिबक सिंचन पद्धती वापर करत आहे. तेव्हापासून केळी तसेच हळदीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. हलक्या जमिनीवर अर्धापूर तलावातील ६०० ट्रॅाल्या गाळ मिसळला आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली. केळीचे धांडदेखील शेतातमध्येच कुजवतो. गांडूळ खताचा वापर करतो. ॲग्रोवन मधील माहिती मार्गदर्शक ठरते आहे. - अंबादास पतंगे

    ॲग्रोवनमधील यशकथांमुळे प्रेरणा मिळते. त्यामुळे शेतीमधील प्रयोगाच्या कल्पना सुचतात. दरवर्षी ॲग्रोवनचा दिवाळी अंक वाचत असतो. मजुरांच्या समस्यामुळे यांत्रिकीकरण गरजेचे झाले आहे. - हरिदास राणेवाड

    हळद लागवड फायदेशीर चार एकर जमीन आहे. त्यामध्ये दोन एकर केळी, दोन एकर ऊस लागवड असते. दुसऱ्या शेतकऱ्याची तीन एकर शेती केली आहे. तेथे हळद लागवड केलेली आहे. दोन म्हशी आहेत. घरची गरज भागून चार लिटर दूध डेअरीला देतो. दर वर्षी दोन ट्रॅाल्या शेणखत मिळते. - शेख समीर

    शुद्ध पाण्याची उपलब्धता ग्रामपंचायतीकडून नळ योजनेद्वारे कुटुंबांना पाणीपुरवठा केला जातो, तसेच माफक शुल्कात पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. त्यामुळे कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. - प्रकाश गिरी

    लोकसहभागातून प्रगती ग्रामस्थांच्या सहभागातून गावात विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जातात. ग्रामपंचायतीतर्फे संगणकीकृत प्रमाणपत्रे दिला जातात. ग्रामस्थांना शुद्ध पेयजल पुरवठा केला जातो. - राजेश्वर भुरे, (ग्रामसेवक)

    ग्राम स्वच्छतेवर भर लोकसहभागातून गावात स्वच्छताविषयक, तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबबिले जातात. वृक्षारोपण तसेच संवर्धन करण्यात आले आहे. घंटागाड्यामार्फत गावातील कचरा गोळा करून विल्हेवाट लावली जाते. यामुळे गावात कायम स्वच्छता रहाते. - सतीश देशमुख-लहानकर, ९८५०५१४१४७ (उपसरपंच)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com