शेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मात

आलेगाव(जि.अकोला) ः शेतीकामामध्ये रमलेल्या मंगलाताई आणि भारती.
आलेगाव(जि.अकोला) ः शेतीकामामध्ये रमलेल्या मंगलाताई आणि भारती.

आलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश ढोणे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हार न मानता योग्य नियोजन करीत सव्वा एकर शेती नव्या जोमाने फुलविली आहे. शेती व्यवस्थापनाची तंत्रे शिकत प्रसंगी मुलांची मदत घेत शेती विकासाच्या दिशेने मंगलाताईंची वाटचाल सुरू आहे.

एखाद्याच्या वाटेला संघर्ष यावा तरी तो किती. अल्पभूधारक कुटुंब. पतिच्या अाजारपणावर लाखोंचा खर्च करावा लागला. हा खर्च करूनही दुर्दैवाने पतिचा जीव वाचवता अाला नाही. पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा अाधार बनण्यालायक झालेला मुलगा सुद्धा मनोरुग्ण झाला. अशा धक्क्यातून श्रीमती मंगला रमेश ढोणे परिस्थितीशी हरल्या नाहीत. धिरोदात्तपणे परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी सव्वा एकर शेतीमध्ये हंगामानुसार पीक लागवडीचे नियोजन बसविले आहे. कुटुंब, शेतीची जबाबदारी मंगलाताईंचे लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार चालू झाला. ढोणे यांना अमोल, हर्षल आणि भारती ही मुले. पंधरा वर्षांपूर्वी मंगलाताईंच्या पतीचे अाजारपण सुरू झाले. दिवसेंदिवस प्रकृती ढासळत होती. अशा परिस्थितीत ठिकठिकाणी औषधोपचार केले. मंगलाताई लहान मुलांसह पतिला घेऊन अनेक दिवस मोठ्या रुग्णालयातही राहिल्या. मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले. रमेश यांचे २०१३ मध्ये निधन झाले. या दरम्यान त्यांच्या औषधोपचारावर लाखाेंचा खर्च झाला. शेतीकडेही दुर्लक्ष झालेले. पतिच्या अाजारपणामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून मंगलाताईच्या खांद्यावर कुटुंबाचा संपूर्ण भार आला. हा भार त्यांनी समर्थपणे पेलला आहे. अाज घरची कामे करून शेतीचीही जबाबदारी त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. घरचा कर्ता पुरुष अाता मंगलाताई झाल्या आहेत. मंगलाताईंच्या वाट्याला संकटे नवी नाहीत. मोठा मुलगा अमोल बारावीपर्यंत शिकला. सुंदर हस्ताक्षरासाठी त्याची अोळख होती. मात्र अचानक तो मनोरुग्ण झाला. या संकटांमध्ये कुटुंबीय, नातेवाइकांनी धीर दिला. तरीही ही लढाई त्यांनाच लढावी लागत अाहे. आता मंगलाताई दुसरा मुलगा हर्षल आणि मुलगी भारतीच्या सहकार्याने उभ्या अाहेत. शेती कामे आणि आर्थिक परिस्थितीमुळे हर्षलचे मध्यंतरी शिक्षण सुटले होते. अाता कुटुंब थोडे सावरल्यानंतर हर्षल आणि भारती पुन्हा पदवीचे शिक्षण घेत आहेत. दोघेही शिक्षण संभाळून शेतातील कामांसाठी मंगलाताईंना मदत करतात. शेतीचे केले नियोजन अालेगाव शिवारात मंगलाताईंची सव्वा एकर शेती आहे. जमीन काळी कसदार, विहिरीला पुरेसे पाणी असल्याने वर्षभर हंगामानुसार पीक नियोजन करणे त्यांना शक्य झाले आहे. पीक नियोजनाबाबत मंगलाताई म्हणाल्या की, मी खरिपात सोयाबीन, तूर लागवड करते. जमिनीची चांगली मशागत करून शेणखत, रासायनिक खतांची मात्रा देऊन सोयाबीनच्या दहा ओळी आणि तुरीची एक ओळ अशी पेरणी केली जाते. मी गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्याने कीड, रोग नियंत्रणाचे उपाय करते. दरवर्षी मी पीक व्यवस्थापनात बदल करत असते. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ मिळत आहे. यंदा मला एकरी अकरा क्विंटल सोयाबीन आणि चार क्विंटल तूर उत्पादन मिळाले. विक्री अकोला बाजारपेठेतच केली जाते. गरज असेल तरच मजुरांची मदत घेतली जाते. बहुतांश शेती कामे मुलांच्या सहकार्याने पूर्ण करण्यावर भर असतो. खर्च वजा जाता मला तीस हजारांचे उत्पन्न मिळाले. रब्बी हंगामात एका एकरामध्ये हरभऱ्याच्या जाकी जातीची लागवड करते. लागवडीपूर्वी पुरेसे शेणखत, रासायनिक खतांची मात्रा देऊन ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्राने हरभरा पेरणी करते. परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून पेरणी यंत्र घेतले जाते. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर दिलेला आहे. यासाठी परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन मी पीक व्यवस्थापनाची सातत्याने माहिती घेत असते. हरभऱ्याला मी तुषार सिंचनाने पाणी देते. हा तुषार सिंचन संचदेखील मला शेजारील शेतकरी देतात. गेल्यावर्षी हरभऱ्याचे मला एकरी नऊ क्विंटल उत्पादन अाले. खर्च वजा जाता मला हरभऱ्यातून वीस हजार शिल्लक राहिले. जानेवारीमध्ये एक एकर कांदा लागवडीचे नियोजन करते. मी स्वतः गावरान लाल कांद्याचे बीजोत्पादन घेते. त्यामुळे दर्जेदार बियाणे उपलब्ध होत असल्याने पीकही चांगले येते. मी स्वतः रोपे तयार करून लागवड करते. कांदा पिकालाही पुरेसे शेणखत, रासायनिक खताची मात्रा देते. एकरी १०० क्विंटल कांद्याचे उत्पादन मिळते. बाजारपेठेतील दरानुसार टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करते. कांदा साठवणुकीसाठी ३०० क्विंटल क्षमतेची चाळ बांधलेली आहे. गेल्यावर्षी बाजारपेठेतील दरामुळे खर्च वजा जाता सरासरी ऐंशी हजारांचे उत्पन्न मिळाले होते.

शेती व्यवस्थापनाची सूत्रे

  •   कुटुंबातील सर्व सदस्य पीक लागवड ते विक्रीच्या टप्प्यात सहभागी. कमीत कमी मजुरांचा वापर.
  •   जमिनीची सुपीकता जपण्यावर भर, तुषार सिंचन वापरातून पाणी बचत.
  •   गावातील महिला शेतकरी, नातेवाइकांना पीक व्यवस्थापनात मदत, त्यामुळे त्यांच्याकडूनही पेरणी ते काढणीपर्यंत चांगले सहकार्य.
  •   प्रयोगशील शेतकरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठातील तज्ज्ञांशी चर्चा करून पीक व्यवस्थापन.
  •   परिसरातील शिवारफेरी, कृषी प्रदर्शनाला भेटी देऊन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब.
  •   पीक उत्पादन वाढीवर भर. बाजारपेठेचा अभ्यासकरून शेतमाल विक्रीवर भर.
  •   येत्या काळात पशूपालनाचे नियोजन.
  • इतरांसाठी बनल्या प्रेरणा वर्षभर मंगलाताई शेतीमध्ये राबत असतात. शेतीतील सर्व प्रकारची कामे त्या स्वतः करतात. आर्थिक कारणामुळे मध्यंतरी लहान मुलगा हर्षलचे चार वर्षे शिक्षण थांबले होते. परंतु आता त्याने पुन्हा एकदा पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. शेतीमध्ये मंगला ताईंना हर्षल आणि भारतीची मदत होते. मंगलाताईंचे शेतीमधील कष्ट आणि पीक उत्पादनातील वाढ लक्षात घेऊन गाव परिसरातील अल्प भूधारक शेतकरीदेखील शेतीमध्ये प्रयोग करू लागले आहेत.

     -  मंगला ढोणे, ९७६६५३९१८२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com