‘आरोग्यम्’ ठरले शेतकरी अन् ग्राहकांमधील दुवा

भाजीपाला आणि फळांच्या विक्रीसाठी स्वतंत्र रॅकची सोय.
भाजीपाला आणि फळांच्या विक्रीसाठी स्वतंत्र रॅकची सोय.

सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने उत्पादित शेतीमालाचे आरोग्याच्यादृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन सोलापूर शहरातील मनीषा प्रकाश वाले यांनी ‘आरोग्यम’ नावाने स्वतंत्र विक्री दालन सुरू केले आहे. त्याचबरोबरीने स्वतःचा ब्रॅण्डही तयार केला. या माध्यमातून त्यांनी स्वतःचा व्यवसाय तर साधला, त्याचबरोबरीने शेतकऱ्यांनाही हक्काचे मार्केट मिळवून दिले आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेल्या सौ. मनीषा प्रकाश वाले यांची स्वतःची कर्नाटक राज्यात, तसेच पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये शेती आहे. सध्या त्यांनी ही शेती बटाईने दिली आहे. पण लहानपणापासून त्यांना शेतीची आवड. व्यावसायिक कारणामुळे मनीषाताई सोलापूर शहरात स्थायिक झाल्या असल्या, तरी त्यांनी शेतीची साथ सोडलेली नाही. विशेषतः परसबागेची त्यांना आवड आहे. त्यांच्या घरात त्यांनी उत्तमरीत्या परसबाग फुलवली आहे. भाज्या, फळे, फुलांसह विविध प्रकार त्याठिकाणी उपलब्ध आहेत. मनीषाताई स्वतः एम.कॉम.च्या पदवीधर आहेत. गेली काही वर्षे त्यांनी सौंदर्यशास्त्र विषयात काम केले. आता ते पूर्णतः बंद करून, त्या शेतमाल खरेदी- विक्री व्यवसायाकडे वळल्या.

आवड असूनही दूर अंतरामुळे त्यांना दररोज शेतीवर जाणे शक्य होत नाही. परंतु शेती आणि शेतकऱ्यांविषयीची आस्था, त्यांच्या मनात कायम असल्यामुळे त्यांनी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती संकल्पनेचा अभ्यास सुरू केला. नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादित शेतमालाचे आरोग्याच्यादृष्टीने असणारे महत्त्व त्यांनी जाणले. नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादन करणारे शेतकरी आणि शेतमालाला मिळणारे मार्केट याचाही अभ्यास केला. तेव्हा गुणवत्तापूर्ण उत्पादन असूनही शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आले. यातूनच त्यांना अशा शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करून विक्री करण्याची कल्पना सुचली. वर्षभरापूर्वी सोलापूर शहरातील होटगी रस्त्यावर सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने उत्पादित शेतमालाचे विक्री केंद्र त्यांनी सुरू केले. अर्थात  त्यांना पती प्रकाश वाले यांचे साह्य आणि सर्वतोपरी पाठिंबा मिळाला.

शेतकरी, शेतकरी गटांना प्राधान्य सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्यांकडूनच मनीषाताई शेतमाल खरेदी करतात. खरेदीपूर्वी त्या स्वतः थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पीक पाहणी करतात, योग्य पद्धतीने हा शेतमाल उत्पादित केला आहे का? सेंद्रिय वा नैसर्गिक पद्धत अवलंबली आहे, याची पडताळणी त्या करतात. तसेच प्रमाणीकरण आहे का, याचीही माहिती घेतात. योग्य शेती पद्धती आणि प्रमाणीकरण असलेल्या शेतकऱ्यांकडूनच शेतमालाची खरेदी केली जाते. त्यात वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट यांना त्यांनी प्राधान्य दिले आहे.

भाजीपाला, फळे आणि धान्ये मुख्यतः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला, फळे आणि धान्ये या विक्री केंद्रावर विक्रीस उपलब्ध आहे. त्यामध्ये मेथी, कोथिंबीर, शेपू यासह बटाटे, टोमॅटो, वांगी, हिरवी मिरची आणि सर्वप्रकारची फळे, कडधान्ये, गळित धान्ये, सेंद्रिय गूळ, काकवी याशिवाय शुद्ध तूप, दुग्धजन्य पदार्थ, गीर गाईचे दूध आदींचा समावेश आहे. पण सहजासहजी न मिळणारे मकना, हातसडीचे तांदूळ, लाकडी घाण्यावरील तेल, विविध प्रकारचे मीठ, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित द्राक्ष, देशी केळी यांचीही विक्री केली जाते.

महिला बचत गटांना रोजगार  मनीषाताईंनी या उपक्रमामध्ये महिला बचत गटांनाही सामावून घेतले आहे. बचत गटातील महिलांकडून तयार उत्पादने घेण्याऐवजी त्यासाठीचा कच्चा माल देऊन त्या विविध पदार्थ तयार करून घेतात. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या चटण्या, बाजरीचे सांडगे, पापड, शेवया यांसह विविध प्रक्रिया पदार्थांचा समावेश आहे. मसाल्यापासून ते अगदी गहू, रवा असे आवश्‍यक घटक त्या गटांना पुरवतात. त्यातून त्यांना रोजगार देणे आणि विक्रीसाठी खात्रीशीर उत्पादनाची हमी मिळवणे, हा त्यांचा उद्देश आहे.

केला तयार ‘आरोग्यम्’ ब्रॅण्ड सेंद्रिय प्रमाणीकरण असलेले शेतकरी आणि शेतकरी गटांकडून प्रत्येक शेतमालाची पूर्वखात्री करून खरेदी केली जाते. तरीदेखील पुढे ग्राहकांची कोणतीही फसवणूक होऊ नये, याची त्या काळजी घेतात. शेतमालाची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे, असे समजून त्यांनी स्वतःचा ‘आरोग्यम्’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. प्रत्येक पॅकिंगवर ‘आरोग्यम्’चा स्टिकर लावला आहे. त्यांचा हा ब्रॅण्ड आता सगळीकडे ओळखला जाऊ लागला आहे.

मातीची भांडी मातीची भांडी आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. त्याचा स्वतंत्र विभाग त्यांनी विक्री केंद्रामध्ये ठेवला आहे. खास गुजरातेतून त्यांनी ही भांडी मागवली आहेत. यामध्ये कप, ग्लास,पॅन, माठ, वॉटर फिल्टर, कुकर, डीनर सेट ते नॅचरल फ्रिजसारख्या अनेक गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे.

फेसबुक पेज, व्हॉट्सॲप ग्रुप

विक्री केंद्राला शेतमाल पुरवणारे सुमारे १०० ते १५० शेतकरी, २० शेतकरी गट आणि १० महिला बचत गट आहेत. यामध्ये पंढरपूर, माढा, मंगळवेढा, बार्शी आदी भागांतील शेतकरी आणि गटांचा समावेश आहे. शेतमाल खरेदी करणाऱ्या शहरी ग्राहकांची संख्या सुमारे ८०० इतकी आहे. खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा त्यांनी स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. या माध्यमातून विक्री केंद्रावर उपलब्ध असलेला शेतमाल, नवीन मागणी याची नोंदणी केली जाते. त्यातूनही वेगळे मार्केट त्यांनी तयार केले आहे. त्याशिवाय फेसबुकचे स्वतंत्र पेजही त्यांनी सुरू केले आहे. त्या माध्यमातून सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतीमालाची गरज आणि महत्त्व याची माहिती दिली जाते.

  - सौ. मनीषा वाले, ९४२३०६७२८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com