शिक्षण, ग्रामविकासाला `श्रमजीवी'ची साथ

सुधारित पद्धतीने भात लागवडीला चालना
सुधारित पद्धतीने भात लागवडीला चालना

सातारा जिल्ह्यातील श्रमजीवी जनता सहायक मंडळ ही स्वयंसेवी संस्था शिक्षण, शेती, जल-मृद संधारण, ग्रामविकास आणि महिला बचत गटांमध्ये कार्यरत आहे. संस्थेने लोकसहभागातून शेती आणि पूरक उद्योगाला चांगल्या प्रकारे चालना दिली आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांत संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरणासाठी जागा देणारी अनेक गावे विस्थापित झाली. या गावांतील विस्थापित शेतकरी तसेच नागरिकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी याच परिसरातील बाळासाहेब कोळेकर यांनी श्रमजीवी जनता सहायक मंडळ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून विस्थापित गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण, शेतकऱ्यांना शेती, पूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन आणि सहकारी संस्थांचे जाळे तयार झाले. पाटण तालुक्यातील डिचोली गावातील पदवीधर बाळासाहेब कोळेकर यांनी नोकरी करत असतानाच धरणासाठी विस्थापित झालेल्या गावांतील लोकांसाठी श्रमजीवी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांना चालना दिली. या विस्थापित गावांना भेटी देऊन समस्या समजून घेतल्या. विस्थापित गावातील मुलांच्या शिक्षणांची आबाळ होत असल्याने कोळेकर यांनी १९७७ मध्ये कोयना खोऱ्यातील मळ्याचा वाडा येथे प्राथमिक शाळा सुरू केली. चुलत बंधू नाना कोळेकर यांची त्यांना चांगली मदत झाली. या शाळेत विविध गावातील विद्यार्थी येऊ लागले. यातून पाच गावात शाळा सुरू झाल्या. बाळासाहेब कोळेकर ज्या संस्थेत काम करत होते त्या संस्थेनेदेखील या उपक्रमाला आर्थिक मदत केली. या मदतीमुळे कोळेकर यांनी  कराड-चिपळूण रस्त्यावर राममळा येथे संस्थेच्या उभारणीसाठी नऊ एकर जमीन खरेदी केली. या ठिकाणी टप्प्याटप्प्याने विविध उपक्रम तसेच प्रशिक्षणांची सुरवात झाली.सध्या श्रमजीवी संस्था सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, चंद्रपूर जिल्ह्यातील ५१९ गावांत कार्यरत आहे. संस्थेने १५०० कातकरी महिल्यांना एकत्र करत ११० बचत गटांची निर्मिती केली आहे. तसेच ६५ सहकारी संस्था स्थापन करून त्यामध्ये अनेक तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. सध्या संस्थेचे कामकाज सातारा आणि राममळा येथून चालते. रेशन वितरणासाठी सहकार्य   पूर्वी दुर्गम कोयना खोऱ्यात लोकांकडे रेशनिंग कार्ड असून रेशन मिळत नव्हते. या परिसरातील लोकांना रेशन मिळाले या हेतूने श्रमजीवी संस्थेने शासनाकडून रेशन वितरणाची जबाबदारी घेतली. लाँचमधून दुर्गम भागातील २७ गावात रेशनिंग पोचवण्यास सुरवात केली. अलीकडे धरण क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन झाल्याने ही योजना बंद करण्यात आली आहे. पशुपालन, दुग्धव्यवसायाला चालना श्रमजीवी मंडळाच्या माध्यमातून सुरवातीच्या पाच वर्षात गावोगावच्या तरुणांच्या सहकार्याने ग्रामविकास तसेच पूरक उद्योगांची आखणी करण्यात आली. कोयना खोऱ्यात बहुसंख्य गवळी, धनगर तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. मात्र, वाहतुकीच्या अडचणीमुळे दुधाला दर मिळत नव्हता. यावर उपाय म्हणून सुरवातीस दूध सहकारी संस्थाची निर्मिती सुरू केली. पूर्वीच्या काळी सर्व वाहतूक धरणाच्या पाण्यातून असल्याने संस्थेच्या बोटी धरणक्षेत्रातील गावांच्यामध्ये फिरून दूध गोळा करू लागल्या. हे गोळा केलेले दूध पाटण, कराड येथे जाऊ लागल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला. अलीकडे रस्ते वाहतुकीमध्ये सुधारणा झाल्याने सध्याच्या काळात ३२ गावातील १० सहकारी तसेच वैयक्तिक दूध संस्थांच्या माध्यमातून ४५२ सभासदांकडून दररोज १७५० लिटर दूध गोळा केले जाते. हे दूध पाटण तालुका सहकारी दूध संघ तसेच खासगी दूध संघाला पुरविले जाते. लोकसहभागातून पाणलोट विकास

श्रमजीवी संस्थेने २००१ मध्ये जल, मृद संधारणाचे काम हाती घेतले. यामध्ये माण तालुक्यातील चार गावे, सातारा तालुक्यातील सहा गावे, पाटण तालुक्यातील नऊ गावे आणि रायगड जिल्ह्यातील म्हसाळा तालुक्यातील नऊ गावे असे एकूण २८ गावांतील १७ हजार ६८४ हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे सुरू आहेत. या कामामुळे जमिनीतील पाणीसाठ्यात वाढ झाली. विहिरीतील पाणी पातळी वाढली. शेतीला संरक्षित पाणी मिळाल्याने पीक उत्पादनात वाढ मिळू लागली आहे.

मासेमारी संस्थेतून रोजगार

कोकणातील कातकरी समाजाची अवस्था पाहून त्याच्या उदरनिर्वाहासाठी २००५ मध्ये श्रमजीवी संस्थेने काम हाती घेतले. संस्थेने कातकरी समाजातील शिकलेल्या पंधरा उत्साही तरुणांना निवडले. त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्यामार्फत समाजाशी संवाद साधला. खात्रीशीर रोजगार मिळावा यासाठी सात सहकारी संस्था तयार केल्या. या संस्थांच्या माध्यमातून मासेमारीचे काम सुरू केले. लोकांना तलावातील मासेमारीचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे राज्यभरात विविध गावातील तलावात मासेमारी सुरू झाली. या प्रकल्पातून ७५० जणांना रोजगार मिळाला. रायगड जिल्ह्यातील खैरेवलंग धरणाजवळ संस्थेचे मत्स्यबीज केंद्र आहे. येथे रोहू, कटला, मृगळ, सायप्रिनस मत्स्यबीज उपलब्ध होते. दरवर्षी पाच कोटी मत्स्यबीज निर्मिती केली जाते. हे मत्स्यबीज राज्यभर पाठविले जाते. कातकरी लोकांच्याकडे शेतीचे क्षेत्र आहे, मात्र तांत्रिक माहिती, साधने आणि भांडवल उपलब्ध नसल्याने फारशी शेती केली जात नव्हती. श्रमजीवीने पुढाकार घेत शेतीकडे तरुण शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. सहकारी तत्त्वावर अवजारे, बियाणे, खते उपलब्ध करून दिली. सध्या बरेच शेतकरी सुधारित पद्धतीने भात शेती करत आहेत. पडीक शेतजमीन लागवडीखाली येऊ लागल्या आहेत.    

संस्थेचे उपक्रम, प्रशिक्षणाची सोय

  •   वनौषधी प्रकल्प आणि प्रशिक्षण.
  •   वेत आणि बांबू प्रक्रिया प्रकल्प.
  •   महिला बचत गट प्रशिक्षण.
  •   शेतमाल आणि फळ प्रक्रिया केंद्र.
  •   युवा शेतकरी, महिलांसाठी शेती तंत्र प्रशिक्षण.
  •   विद्यार्थ्यांसाठी कृषि तंत्र निकेतन
  • पुरस्कारांनी गौरव श्रमजीवी संस्थेला गेल्या ३९ वर्षांच्या कार्यकाळात भारत सरकारचा बॅायोटेक्नॉलॅाजी सोशल डेव्हलपमेंट पुरस्कार, राज्य सरकारचा वनश्री पुरस्कार, वसंतराव नाईक पुरस्कार तसेच विविध संस्थांच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. गोड्या पाण्यातील मत्स्यशेती संदर्भात राज्य शासनाच्या नियोजन समितीवर तज्ज्ञ संचालक म्हणून संस्थेची निवड झाली आहे. 

    - डॉ. गिरीश बडवे, ८८८८९०९३९८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com