सुधारित तंत्राने भेंडी लागवड
सुधारित तंत्राने भेंडी लागवड

सुधारित तंत्र, सूक्ष्म सिंचनातून भाजीपाल्याची यशस्वी शेती

प्रताप दाभाडे हे बोकटे (ता. येवला, जि. नाशिक) येथील प्रयोगशील शेतकरी. बाजारपेठेचा अभ्यास करत त्यांनी पारंपरिक पिकांच्यापेक्षा ढोबळी मिरची, भेंडी, शेवगा आणि डाळिंब शेतीवर लक्ष केंद्रित केले. दर्जेदार उत्पादनावर भर देत दाभाडे यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.

बोकटे (ता. येवला, जि. नाशिक) येथे प्रताप शिवाजीराव दाभाडे यांची सोळा एकर शेती आहे.  बालपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबासह शेतीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आली. बारावीनंतर शिक्षण सोडून ते शेती पाहू लागले. बोकटे गावशिवाराचा भाग नेहमी दुष्काळी स्वरूपाचा असल्याने ते मका, कपाशी, सोयाबीन आणि कांदा पिकांची लागवड करीत होते. खरीप हंगामातील भुसार पिके तसेच रब्बी कांदा पीक वगळता दुसरी नगदी पिके नव्हती. शेती किफायतशीर करण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने बदल करण्यास सुरवात केली. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेत त्यांनी भाजीपाला आणि फळबागेवर लक्ष केंद्रित केले. बाजारभावाचा अभ्यास करून डाळिंब, सिमला मिरची, हिरवी मिरची आणि भेंडी लागवड करत आर्थिक नफा वाढवत नेला.

  सुधारित शेतीकडे वाटचाल प्रताप दाभाडे यांची वडिलोपार्जित शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. मात्र  काळाची गरज ओळखून दाभाडे यांनी संरक्षित शेतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. २०१६-१७ या वर्षी कृषी विभागाच्या मदतीने शासकीय अनुदानातून २० गुंठे क्षेत्रावर शेडनेट हाउस उभारले. यामध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि काटेकोर व्यवस्थापनातून पीक उत्पादनात वाढ मिळवली. सूक्ष्म सिंचनातून त्यांनी उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर सुरू केला. सुधारित पद्धतीने पीक उत्पादनात वाढ मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. तीन एकरावर डाळिंबाची बाग उभी केली.

पीकबदलातून यशस्वी उत्पादन पीक नियोजनाबाबत दाभाडे म्हणाले की, बाजारपेठेचा अंदाज घेत मी ढोबळी मिरची, हिरवी मिरची आणि भेंडी लागवडीवर लक्ष केंद्रित केले. ढोबळी मिरची, साधी मिरचीची लागवड जुलै महिन्यात आणि भेंडीची लागवड जानेवारी महिन्यात केली. नियोजनानुसार २० गुंठे शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, २० गुंठे क्षेत्रावर इनसाईड नेटचा वापर करून हिरवी मिरची आणि २० गुंठे क्षेत्रावर भेंडी लागवड आहे. भेंडीला प्लॅस्टिक आच्छादन केले आहे.  ठिबक सिंचनाने पाणी नियोजन केले जाते. भेंडीच्या क्षेत्रामध्येच शेवग्याची लागवड केली आहे. या पीक पद्धतीतून आर्थिक नफा वाढणार आहे. यंदा पाऊस कमी असताना देखील काटेकोर पाणी नियोजनातून ही पिके चांगली आली आहेत. भाजीपाल्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत तीन पिकांवर साडेतीन लाख रुपये खर्च केले. खर्च वजा जाता मला पाच लाखांचा निव्वळ नफा मिळत आहे. शेती करताना मला तालुका कृषी अधिकारी अभय फलके, कृषी सहायक सोनाली कदम यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभते. याशिवाय राज्यातील विविध प्रयोगशील शेतकरी यांच्या क्षेत्राला मी भेटी देतो. त्यांच्या शेतीचा अभ्यास करून मी शेती नियोजनात बदल करत असतो.

बांधावरच भाजीपाल्याची विक्री   ढोबळी मिरची आणि हिरव्या मिरचीची विक्री कोपरगाव, नाशिक येथील बाजारपेठेत केली जाते. शेतमालाची गुणवत्ता चांगली असल्याने आता परिसरातील व्यापारी बांधावर खरेदीला येतात.  त्यामुळे अपेक्षित दरही मिळतो. व्यापाऱ्यांनी शेतमाल जागेवरच खरेदी केल्याने वाहतूक खर्चाची बचत होत आहे. ढोबळी मिरचीचे  २० गुंठे  क्षेत्रातून २० टन  उत्पादन मिळते. सरासरी प्रति किलो  २० ते ३० रुपये दर मिळाला आहे.हिरवी मिरचीचे २० गुंठे  क्षेत्रातून    ११ टन उत्पादन मिळते. सरासरी प्रति किलो २० ते ५० रुपये दर मिळाला आहे.भेंडीचे २० गुंठे क्षेत्रातून  ३ टन उत्पादन मिळाले. सरासरी प्रति किलोस ३५ ते ४५ रुपये दर मिळाला आहे.

पाण्याचे व्यवस्थापन

  • शेतात दोन विहिरी आणि दोन कूपनलिका आहेत. एका विहिरीला थोडेच पाणी असून जानेवारीपासून दिवसभरात फक्त अर्धा तास पाणी उपलब्ध.
  • संरक्षित पाण्यासाठी १०० फूट बाय १०० फूट बाय ४० फूट शेततळे. पावसाळ्यात विहीर, कूपनलिकेतील पाणी शेततळ्यात साठविले जाते.
  • सर्व शेतीला ठिबक सिंचन. यातूनच सिंचन क्षमता वाढवून कमी पाण्यात चांगले पीक उत्पादन.
  • डाळिंब, भेंडी, शेवगा, कांदा पिकांच्या दर्जेदार उत्पादनावर भर.
  • शेतीकामाची विभागणी

  •   दाभाडे यांचे चार जणांचे कुटुंब, शेतीचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन प्रताप दाभाडे स्वतः करतात. शेतीकामासाठी गरजेनुसार मजुरांची मदत घेतली जाते.
  •   पत्नी रोहिणी यांच्याकडे शेती कामकाज व देखरेखीची जबाबदारी.
  •   शुभम आणि साहिल ही मुले सध्या शाळेत शिकत असून गरजेनुसार शेतीकामात मदत. शेती खर्च, मजूर, निविष्ठा तसेच माल वाहतूक यांच्या दैनंदिन नोंदी दोन्ही मुले ठेवतात.
  • जमा, खर्चाचा ताळेबंद चालू पिकातून मिळालेले उत्पन्न आणि त्यावर झालेला खर्च याची सविस्तर नोंद ठेऊन पुढील हंगामाचे नियोजन केले जाते. शेतीत जर दोन पैसे खर्च केले, तर त्यातून चार पैसे कसे मिळतील याकडे दाभाडे यांचा कल असतो.

    ग्रामविकासातही सहभाग प्रताप दाभाडे हे वयाच्या २१ व्या वर्षांपासून ग्रामविकासात सहभाग आहेत. गेल्या १४ वर्षांपासून बोकटे ग्रामपंचायतीमध्ये ते कार्यरत आहेत. मागील पाच वर्षे सरपंच पद आणि सध्या उपसरपंच पदाची धुरा त्यांच्याकडे आहे. स्वतःची शेती सांभाळून ग्रामविकासातही त्यांचा चांगला सहभाग आहे.

    असे आहे नियोजन

  •   संरक्षित शेतीपद्धतीचा वापर करून कमी क्षेत्रावर अधिक उत्पादन. आंतरपीक पद्धतीचा वापर. 
  • जमीन सुपिकतेवर भर. शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशके, खतांचा वापर. जीवामृत वापरावर भर.  
  • पिकानुसार मजुरांचे नियोजन. दैनंदिन पीक व्यवस्थापनात स्वतःचा सहभागी. त्यामुळे मजुरांमध्ये बचत.
  • कुटुंबात शेतीच्या जबाबदाऱ्या निश्चित; यामुळे शेतकामाचे सोयीस्कर नियोजन.  
  • भांडवलाप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाचा शेतात वापर.
  • - प्रताप दाभाडे, ७५८८०३७१७१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com