पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली सक्षम

उसामध्ये भाजीपाल्याचे आंतरपीक
उसामध्ये भाजीपाल्याचे आंतरपीक

राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील प्रशांत आणि गौरी पाटील या शेतकरी दांपत्याने काटेकोर नियोजनातून शेती किफायतशीर केली. संतुलित खत व्यवस्थापन, ऊस रोपनिर्मिती, भाजीपाल्याच्या आंतरपिकातून उत्पादन खर्चात बचत केली. याचबरोबरीने गूळनिर्मिती आणि पशूपालनातून आर्थिक परिस्थितीही सक्षम केली आहे.

राशिवडेपासून एक किलोमीटर अंतरावर प्रशांत सदाशिव पाटील यांची साडेआठ एकर शेती आहे. यातील साडेचार एकर शेती बागायती आहे. या क्षेत्रात ऊस, भात, भाजीपाला आदी पिकांची लागवड असते. जिरायती शेतीत पावसाळ्यात गवत, भुईमूग, नाचणी या पिकांची लागवड केली जाते. प्रशांत पाटील यांनी उपलब्ध पाणी, लागवड क्षेत्र आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आंतरपीक पद्धती आणि पीक फेरपालटीवर भर दिला. साधारणपणे पन्नास टक्के रासायनिक खते आणि पन्नास टक्के सेंद्रिय खतांच्या वापरावर त्यांचा भर आहे. शेणखतामध्ये राख, जिवाणू संवर्धके आणि शिफारशीनुसार सूक्ष्मद्रव्ये मिसळून हे मिश्रण जमिनीत मिसळून दिले जाते. यामुळे जमिनीचा कस आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले. याचा चांगला परिणाम पीक उत्पादन वाढ आणि दर्जावरही झाला आहे. दरवर्षी पाटील माती व पाणी परीक्षण करतात. आंतरपिकातून उत्पन्न वाढ पाटील दांपत्याने साडेचार एकर बागायती क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. बारमाही पाण्याच्या विहिरी असूनही सुरवातीपासूनच ठिबकचा पर्याय त्यांनी निवडला. गूळ निर्मितीच्यादृष्टीने पाटील यांनी को- ९२००५ या ऊस जातीची लागवड केली आहे. पूर्व हंगामी लागवड केली जाते. चार फुटाची सरी करून उसाच्या मधल्या पट्यात मेथी, वांगी, कोथिंबीर, कोबी, फ्लॉवरचे आंतरपीक घेतले जाते. उसाचे एकरी सरासरी ३५ ते ४० टन उत्पादन निघते. पाटील खोडवा तसेच निडवाही ठेवतात. सर्व ऊस गूळनिर्मितीसाठी वापरला जातो. गौरी पाटील गावातील स्थानिक बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्री करतात. स्थानिक बाजारपेठेत एका वेळी मेथी, कोथिंबिरीच्या प्रत्येकी शंभर पेंढ्या आणि सुमारे पंचवीस किलो इतर फळभाज्यांची विक्री होते. ताज्या, दर्जेदार भाज्यांना गावामध्येच चांगली मागणी असते. शेतातून निघून गावातील बाजारात जाईपर्यंत निम्याहून अधिक भाजीपाल्याची विक्री झालेली असते. दरमहा भाजीपाला विक्रीतून सरासरी पाच हजारांची मिळकत होते. ही मिळकत दैनंदिन घर खर्च आणि अन्य मशागतीच्या कामांना वापरली जाते. गादीवाफ्यावर ऊस रोपनिर्मिती प्रशांत पाटील उसाची लागवड पारंपरिक पद्धतीने न करता रोप पद्धतीने करतात. ट्रे मध्ये रोपे न करता गादीवाफ्यावर एक डोळा कांडी, शेणखत, गांडूळ खताचा वापर करून रोपनिर्मिती केली जाते. या पद्धतीने ट्रे मध्ये रोपे तयार करण्याच्या तुलनेत सत्तर टक्के खर्च कमी येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. परिसरातील साखर कारखान्यातील अधिकारी तसेच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनीही त्यांच्या रोपनिर्मितीचे कौतुक केले आहे. शेतीतूनच केली प्रगती दुधाळ गाईंची संख्या वाढविणे, घर, विहिरीचे नूतनीकरण आणि शेती सुधारणा या सर्व बाबी पाटील दांपत्याने शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून केल्या आहे. काटेकोर शेती व्यवस्थापन आणि दैनंदिन जमाखर्चाच्या नोंदी हे त्यांच्या यशाचे गमक आहे. दराच्या बाबतीत जरी कमी जास्तपणा झाला तरी उत्पन्न व दराचा मेळ घालत ऊस, भाजीपाल्याच्या उत्पादनात पाटील यांनी सातत्य ठेवले. गेल्या वर्षी अति पावसामुळे निम्याहून अधिक नुकसान झाले. परंतु इतरवेळी पीक उत्पादनात सातत्य असल्याने तो तोटा इतर पिकांतून भरून निघाल्याचे पाटील सांगतात.

गुऱ्हाळातून वाढविला नफा बाजारपेठेतील चढ उतारामुळे गेल्या काही वर्षांपासून गूळ उत्पादक तोट्यात आहे. पण प्रशांत पाटील यांचा अनुभव वेगळा आहे. पाटील गेली वीस वर्षांपासून कोणत्याही कारखान्याला ऊस न देता गूळ करून कोल्हापूर बाजारपेठेत विकतात. गुणवत्तापूर्ण गुळामुळे त्यांना चांगला दर मिळतो. पाटील यांच्याकडे साडेतीन ते चार एकर ऊस लागवड क्षेत्र असते. गुळासाठी उपयुक्त असणाऱ्या को-९२००५ या ऊस जातीची लागवड करतात. गूळनिर्मितीबाबत प्रशांत पाटील म्हणाले, की पूर्वी माझे वडील गावातील गुऱ्हाळघर मालकांना ऊस विकायचे. १९९६ पासून मी शेती पाहाणे सुरू केल्यानंतर स्वत: गूळ तयार करून विकतो. सध्या एक किलोची ढेप तयार करतो. दहा किलोच्या ढेपेपेक्षा या एक किलोच्या ढेपेला चांगला दर आणि मागणी आहे. योग्य पॅकिंगकरूनच गूळ बाजारपेठेत पाठविला जातो. साखरेमध्ये रिकव्हरीचा फायदा जसा कारखान्यांना होतो, तसाच फायदा गुळाच्या निर्मितीत मला होतो. मला एकरी सरासरी ३० ते ३५ टन उसाचे उत्पादन मिळते. यातून साधारणत:४२०० किलो गूळ तयार होतो. या गुळास प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ३८०० ते ४२०० रुपये इतका दर मिळतो. साखर कारखान्याला ऊस देण्यापेक्षा गूळनिर्मितीतून चांगला आर्थिक नफा मिळतो.

 दुग्ध व्यवसाय केला फायदेशीर शेतीला पूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसायाकडेही पाटील यांनी गांभिर्याने लक्ष दिले आहे. सध्या त्यांच्या मुक्त संचार गोठ्यात पाच होल्स्टिन फ्रिजीयन गाई आहेत. सध्या दोन गाभण आणि तीन दुधात आहेत. दिवसाला सरासरी साठ लिटर दूध जमा होते. हे सर्व दूध सहकारी संस्थेला दिले जाते. गाईंच्या धारा यंत्राने काढल्या जातात. गाईंच्या व्यवस्थापनासाठी मजूर ठेवलेला नाही. गाईंच्या व्यवस्थापनाची जबाबदारी गौरी पाटील सांभाळतात. प्रामुख्याने गाईंना पुरेसे पशूखाद्य, वैरण, पाणी याचे व्यवस्थापन, औषधोपचार, धारा काढण्याच्या यंत्राची हाताळणी ही सर्व कामे गौरीताई करतात. पहाटे पाचपासून गाईंच्या व्यवस्थापनाला सुरवात होते. सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास पाटील दांपत्य गाईंच्या व्यवस्थापनासाठी देतात. सकस चाऱ्यासाठी पाटील मूरघासही तयार करतात. शेणखताचा वापर स्वतःच्या शेतीमध्ये केला जातो. काटेकोर नियोजन केल्याने पशूपालनातूनही चांगला नफा शिल्लक राहातो, असे पाटील सांगतात.

गौरीताईचा सकारात्मक दृष्टीकोन शेती आणि पशूव्यवस्थापनात प्रशांत पाटील यांच्या पत्नी गौरी यांचाही मोठा वाटा आहे. त्यांचे माहेर एकोंडी. गौरीताईंचे वडील लष्करी सेवेत असल्याने घरात कडक शिस्त. लग्न होईपर्यंत त्यांचा फारसा दैनंदिन शेती व्यवस्थापनात सहभाग नव्हता. मात्र तरीदेखील गौरी यांच्या माहेरच्यांनी त्यांचे लग्न प्रयोगशील शेतकरी असणाऱ्या प्रशांत यांच्याशी करून दिले. प्रशांत हे बीएस्सी झालेले आहेत. पण त्यांनी नोकरीचा विचार न करता शेतीला प्राधान्य दिले. प्रशांत सुधारित तंत्राने शेती करत असल्याने गौरी यांनाही आवडीने शेती व्यवस्थापनात साथ देण्यास सुरवात केली. ऊस, भाजीपाल्यातील भांगलण, यंत्राने मशागत, भाजीपाला विक्री, गाईंच्या व्यवस्थापनात गौरीताई रमल्या आहेत. हर्षवर्धन आणि राजवर्धन ही दोन्ही मुले शाळेत शिकत आहेत. गौरीताईंच्या साथीने शेती आणि पशूपालनात एक वेगळेच समाधान मिळत असल्याचे प्रशांत सांगतात.

-  प्रशांत पाटील, ९२८४३९८६७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com