शेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोड

गव्हांकुर उत्पादनासाठी लागवड क्षेत्राची  पहाणी करताना ऋतुजा ढोबळे.
गव्हांकुर उत्पादनासाठी लागवड क्षेत्राची पहाणी करताना ऋतुजा ढोबळे.

जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा नितीन ढोबळे या बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पारंपरिक पिकांच्या बरोबरीने शेवगा तसेच चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड करतात. याचबरोबरीने पूरक उद्योगाच्यादृष्टीने गव्हाकुंर पावडरनिर्मितीस देखील त्यांनी सुरवात केली आहे.

जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा नितीन ढोबळे यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून प्रक्रिया उद्योगाच्यादृष्टीने अभ्यास सुरू केला. या दरम्यान गव्हाकुंराच्या उपयोगाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गव्हांकुर पावडर तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याचा विचार केला. सुरवातीला पुरेशी माहिती नसल्याने अनेक अडचणी आल्या. परंतु, त्यांचे पती नितीन यांची चांगली मदत आणि मार्गदर्शन मिळाल्याने गव्हाकूर निर्मितीला सुरवात केली. सुरवात करताना ऋतुजा ढोबळे यांनी प्रथम कुंड्यांमध्ये गव्हांकुर उत्पादनाचा प्रयोग केला. त्यानंतर उत्पादनाचा अंदाज येताच त्यांनी शेतीमध्ये एक मीटर बाय एक मीटर अंतराचे वाफे तयार करून गव्हांकुर उत्पादनास सुरवात केली. सुरवातीला दररोज गव्हाकुंराचा रस तयार करून परिसरातील ग्राहकांना पुरवठा केला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु तयार रस जास्त काळ टिकत नसल्याने त्यांनी गव्हांकुर पावडर बनविण्याचा निर्णय घेतला. मागणी वाढू लागल्याने २०११ मध्ये त्यांनी दोन गुंठे क्षेत्रावर गादीवाफे करून गव्हांकुर उत्पादनास सुरवात केली. गेल्या दोन वर्षांपासून सेंद्रिय खताचा वापर केलेल्या वीस गुंठे क्षेत्रात पाच फूट रूंदीचे गादी वाफे तयार करून त्यावर गव्हाची पेरणी सुरू केली. गव्हाकुरांची पावडर आणि तयार रसाला आजारी व्यक्तींच्या उपचारासाठी आयुर्वेदिक वैद्यांकडून चांगली मागणी असल्यामुळे कमी कालावधीत मागणी वाढू लागली.

गव्हांकुर निर्मितीस मिळाली गती

  • ऋतुजा ढोबळे यांना गव्हांकुरनिर्मिती व्यवसाय मोठ्या स्वरूपात करण्याची इच्छा होती. परंतु, आर्थिक अडचणी असल्याने त्यांनी सहकारी बँकेकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले.
  • गव्हांकुरनिर्मितीसाठी रासायनिक खतांचा वापर न केलेली दोन एकर जमीन निवडली. त्याक्षेत्रात अर्धा एकराचे टप्पे पाडले. दर अर्ध्या एकरात नऊ गादी वाफे तयार केले. टप्याटप्याने गादी वाफ्यावर लोकवन गव्हाची पेरणी केली जाते. प्रत्येक पेरणीला लागवड क्षेत्र बदलले जाते. सेंद्रिय खतांचा वापर केला जातो.
  • सरासरी आठ दिवसांत गव्हांकुरांची ६ ते ८ इंच वाढ होते. वाढीच्या टप्‍प्यात योग्य प्रमाणात पाणी दिले जाते. कोवळ्या गव्हाकुंरावर थेट सूर्यप्रकाश पडून कोवळे अंकुर सुकू नयेत यासाठी शेडनेटचा वापर केला जातो.
  • गव्हाकुरांची आठव्या दिवशी जमिनीपासून वर योग्य पद्धतीने कापणी केली जाते. कोवळी पाने व्यवस्थित स्वच्छ करून सावलीत वाळवली जातात. पावसाळ्यात मात्र ड्रायरमध्ये वाळवली जातात.
  • ग्राईंडरमध्ये पावडर तयार करून बाटलीमध्ये पॅकिंग केले जाते.
  • असे आहे विक्री नियोजन

    गव्हांकुर पावडर विक्रीबाबत ऋतुजा ढोबळे म्हणाल्या, की सुरवातीला उत्पादित पावडरची मंचर येथे विक्री केली जात होती. बाजारपेठेत स्वतःची वेगळी ओळख तयार करण्यासाठी तेजस्विनी ब्रँन्ड तयार केला. गव्हांकुर पावडर विक्री जुन्नर, औरंगाबाद, मुंबई, पुणे, खेड येथे केली जाते. प्लॅस्टिक बाटलीत १०० ग्रॅम पावडर पॅकिंग करून विक्रीला पाठविली जाते. याशिवाय भीमथडी, कृषी प्रदर्शन, पवनाथडी, धान्य महोत्सव अशा ठिकाणी ग्राहकांना थेट विक्री केली जाते. साधारणपणे प्रतिकिलोस चार हजार रुपयांपर्यत दर मिळतो. होलसेल बाजारपेठेत अडीच हजार रुपयांपर्यत दर मिळतो. ग्राहकांच्या काही नातेवाइकांनी ही पावडर परदेशातही नेली आहे. ढोबळे या सरासरी आठ महिने गव्हाकुंराचे उत्पादन घेतात. महिन्याला शंभर किलोपर्यंत पावडर तयार होते. आठ महिन्यांच्या कालावधीत पावडर तयार करून टप्याटप्याने विक्री केली जाते. गेल्या काही वर्षांपासून परराज्यातही गव्हांकुर पावडर विक्रीसाठी  पाठविली जाते. ढोबळे यांच्या गव्हांकुरनिर्मिती व्यवसायात वर्षभर दहा महिलांना रोजगार मिळाला आहे. यामध्ये गादीवाफ्यावर गव्हाच्या लागवडीपासून ते विक्रीपर्यंतच्या कामात महिलांची चांगली मदत मिळते.

    शेतीमध्येही बदल

  • ऋतुजा ढोबळे यांच्या कुटुंबाची बारा एकर शेती आहे. यामध्ये दहा एकर बागायती आणि दोन एकर जिरायती आहे. दहा एकरापैकी दोन एकर क्षेत्रांत गव्हांकुर उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबरीने दोन एकरांवर मका, एक एकर ज्वारी, दोन एकर कांदा अशी लागवड असते. दीड एकरात शेवगा लागवड आहे. गव्हांकुरासाठी लागणाऱ्या गव्हाचीदेखील त्या लागवड करतात. मात्र, काही वेळेस गव्हाकुंरासाठी गहू कमी पडत असल्याने गावातील शेतकऱ्यांकडूनही बाजारभावापेक्षा दोन रुपये अधिक दर देऊन खरेदी केला जातो.
  •  ज्या क्षेत्रात भाजीपाला किंवा ऊस लागवड शक्य नाही, अशा दीड एकर क्षेत्रामध्ये दीड वर्षापूर्वी शेवग्याची लागवड केली. शेवग्याचे सेंद्रिय पद्धतीने  व्यवस्थापन ठेवले आहे. त्यांनी पहिला बहार घेतला नाही. दुसऱ्या बहरात कमीतकमी शेंगा ठेवल्या. या झाडांपासून २२५ किलो शेंगाचे उत्पादन मिळाले. शेवग्याची विक्री मंचर, पारगाव, लोणी या ठिकाणी केली. प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर मिळाला. लागवड खर्च आणि इतर खर्च वजा जाता पाच हजार रुपये नफा राहिला. आॅगस्टमध्ये शेवग्यांची छाटणी करून आता चालू वर्षी बहार ठेवला असून चांगले उत्पादन मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.
  •   दरवर्षी जून, जुलै आणि नोव्हेंबरमध्ये कांद्याची लागवड केली जाते. यंदा दोन एकरांवर गावरान जातीच्या बियाणांपासून रोपे तयार करून लागवड केली होती. सध्या दोन एकरांपैकी अर्धा एकर कांदा काढण्याचे बाकी आहे. यंदा जास्तीत जास्त सेंद्रिय खते आणि सेंद्रिय कीडनाशकांचा वापर केला आहे. दोन एकरांमध्ये दोनशे क्विंटल कांदा उत्पादन झाले. कांद्याची मंचर आणि चाकण येथील बाजार समितीत विक्री केली. यंदा फारसा चांगला दर मिळाला नसल्याने खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
  •   परिसरातील शेतकऱ्यांकडून चारा पिकाची मागणी लक्षात घेऊन दोन एकर क्षेत्रावर टप्याटप्याने चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड केली जाते. सेंद्रिय खताचाच वापर होतो. योग्य नियोजन करून अडीच ते तीन महिन्यांत शेतकऱ्यांना मका चाऱ्याची विक्री केली जाते. अर्ध्या एकरातून खर्च वजा जाता चारा विक्रीतून वीस हजारांची मिळकत झाली.
  •   सध्या दोन एकर रब्बी ज्वारी चांगली वाढलेली आहे. एक एकर उन्हाळी बाजरीची लागवड केलेली आहे.
  • - ऋतुजा ढोबळे, ७५८८९४२३०२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com