शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथ

यंत्राने गाईंचे दूध काढताना सारिका थोपटे.
यंत्राने गाईंचे दूध काढताना सारिका थोपटे.

शेतीला पूरक उद्योगाची जोड देत वर्षभर उत्पन्नाचा खात्रीशीर स्राेत तयार करता येतो, हे पुणे जिल्ह्यातील थोपटेवाडी (पिंपरे खुर्द) येथील सौ. सारिका गणेश थोपटे यांनी दाखवून दिले आहे. पशुपालन, कुक्कुटपालन, रोपवाटिका आणि गांडूळ खतनिर्मितीतून थोपटे यांनी शेती शाश्वत केली आहे.

पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील पूर्वेकडील भाग हा कमी पावसाचा परिसर. या परिसरातील थोपटेवाडी (पिंपरे खुर्द) हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव. गावापासून तीन किलोमीटर अंतरावरून निरा नदी असल्याने काही भाग बागायती झाला असला तरी उन्हाळ्यात पाणी टंचाई ठरलेली. या गावशिवारात थोपटे कुटुंबीयांची पंधरा एकर शेती आहे. या शेतीमध्ये ऊस, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा आणि चारा पिकांची लागवड असते. थोपटेवाडी(पिंपरे खुर्द) येथील गणेश हरिभाऊ थोपटे यांच्याशी २००५ साली सारिकाताईंचा विवाह झाला. त्यानंतर सारिकाताई आणि त्यांचे पती गणेश हे पुणे शहरात खासगी बॅंकेत नोकरी करत होते. सारिकाताईंना शेतीची आवड असल्यामुळे त्या दर शनिवारी आणि रविवारी गावी जाऊन शेती नियोजनात रमू लागल्या. शेती व्यवस्थापनामध्ये त्यांना आत्माचे तालुका व्यवस्थापक विश्वजित मगर, डॉ. शैलेश मदने यांचेही चांगले मार्गदर्शन मिळू लागले. बाजारपेठेचा अभ्यास करत उपलब्ध पाण्यावर टोमॅटो, वांगी, पपई, शेवगा, कांदा लागवडीस त्यांनी सुरवात केली. साधारणपणे आठ वर्षे बँकेतील नोकरी सांभाळून त्यांनी कुटुंबाच्या मदतीने शेतीकडे लक्ष दिले. या दरम्यान शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्यासाठी सरिकाताईंनी पशुपालन करण्याचा निर्णय घेतला. गाईंना चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी तीन एकर मका आणि दहा गुंठ्यावर नेपिअर गवताची लागवड केली. त्यामुळे वर्षभर चारा उपलब्ध असतो. त्यांनी शेती आणि पूरक उद्योगाला समर्थ कृषी उद्योग फार्म असे नाव दिले आहे. दरम्यानच्या काळात पूरक व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने सारिकाताईंनी बॅंकेतील नोकरी सोडून शेती नियोजनात लक्ष देण्यास सुरवात केली. सारिकाताईंनी चार कुटुंबांना आणि पाच महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शेतीवरील गोठा, मिल्किंग पार्लर, रोपवाटिकेतील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सारिकाताईंनी आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सारिकाताईंना दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, शेणखत, गांडूळखत विक्रीतून वर्षभर आर्थिक उत्पन्न मिळते. दोन वर्षांपूर्वी सारिकाताईंनी दोन होल्स्टिन फ्रिजियन गाई आणि दहा कालवडी खरेदी करून त्यांचे संगोपन करण्यास सुरवात केली. हळूहळू गाईंची संख्या वाढत गेल्याने शेतामध्येच मुक्त संचार गोठा तयार केला.

  •  सध्या गोठ्यात २२ होल्स्टिन फ्रिजियन गाई, चार कालवडी. त्यापैकी १४ गाई दुधात असून दररोज १८० लिटर दूध उत्पादन.
  •  आहारात कडबा, ऊस वाढ्याची कुट्टी.
  •  पशू तज्ज्ञांकडून गाईंची आरोग्य तपासणी, योग्य औषधोपचार.
  •  स्वच्छ दूधनिर्मितीवर भर. दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर.
  •   उत्पादित १०० ते १२५ लिटर दूध गावातील संकलित केंद्रामध्ये आणि उर्वरित ५० लिटर दुधाची पुणे शहरात विक्री. गावात विक्री होणाऱ्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये, तर पुण्यात ३० रुपये दर.
  •  कुटुंबातील सदस्यांचा पशुपालनात सहभाग. खर्च वजा जाता दरमहा ४० टक्के नफा शिल्लक.
  • शेवगा पावडर विक्री सारिकाताईंच्या बांधावर वीस शेवगा झाडांची लागवड आहे. गेल्या वर्षीपासून शेवग्याच्या शेंगांच्याबरोबरीने वाळविल्या पाल्याच्या पावडरीची विक्री सुरू केली. अर्धा आणि एक किलोचे पॅकिंग केले जाते. प्रतिकिलो ४०० रुपये या दराने पुण्यातील ग्राहकांना थेट विक्री केली जाते. शेवग्याची रोपवाटिका दोन वर्षांपूर्वी सारिकाताईंनी शेवगा रोपवाटिका तयार केली. रोपनिर्मितीसाठी कोईमत्तूर येथून शेवग्याचे जातिवंत बियाणे मागविले. सध्या दर तीन महिन्यांला दोन हजार रोपांची निर्मिती केली जाते. या रोपांची तसेच बियाण्यांची विक्री जळगाव, सोलापूर, पुणे, पनवेल येथे केली जाते. खर्च वजा जाता रोपवाटिकेतून वर्षभरातून एक लाखांचे उत्पन्न मिळते.

    देशी कोंबडीपालन ग्रामीण भागात देशी कोंबड्यांची मागणी लक्षात घेऊन सारिकाताईंनी एक वर्षांपूर्वी १०० कोंबड्या आणल्या. कोंबड्यांसाठी छोटी शेड तयार केली. दिवसभर कोंबड्या मुक्त संचार गोठ्यामध्ये सोडल्या जातात. त्यामुळे गाईंच्या अंगावरील गोचिडांच्या नियंत्रणास मदत होते. सध्या त्यांच्याकडे ३५० कोंबड्या आहेत. कोंबड्यांची वजनावर विक्री केली जाते. सरासरी एक कोंबडी १५० रुपये तर कोंबडा २५० ते ३०० रुपयांना विकला जातो. दर महिन्याला कोंबडीपालनातून पाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. शेळीपालनाची जोड

  •  शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालनाचे नियोजन.
  •  सध्या गोठ्यामध्ये बारा गावरान
  • शेळ्यांचे संगोपन.
  •  लेंडीखताचा स्वतःच्या
  • शेतीमध्येच वापर.
  • शेणखत, गांडूळखताची थेट विक्री

    दोन वर्षांपूर्वी पुणे शहरात बागकाम करणाऱ्यांकडून गणेश थोपटे यांना शेणखताची मागणी आली. पहिल्यांदा त्यांनी वीस किलो शेणखताची विक्री केली. हळूहळू शेणखताची मागणी वाढू लागली. यामुळे सारिकाताईंनी ग्राहकांच्या मागणीनुसार मुक्त संचार गोठ्यातील शेणखत बॅग पॅकिंग करून विक्रीस सुरवात केली. पाच किलो शेणखताची बॅग ९९ रुपयाला विकली जाते. शेणखताच्याबरोबरीने गांडूळ खताची मागणी वाढल्याने सारिकाताईंनी एक वर्षांपूर्वी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला. पाच किलो बॅगमध्ये गांडूळ खत ९९ रुपयांना आणि पाच लिटर व्हर्मीवॉश ११० रुपयांना विकले जाते. शेणखत, गांडूळ खत विक्रीतून दर महिना पंधरा हजारांचे उत्पन्न मिळते. 

    मिळवली किचनगार्डनची कामे पुणे शहरात किचन गार्डनची वाढती मागणी लक्षात घेऊन सारिकाताईंनी भाजीपाला लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यास सुरवात केली.

  • बंगला, सोसायटीमधील टेरेस गार्डनमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनासाठी सल्ला सेवा.
  • किचन गार्डनसाठी माती, शेणखत, गांडूळ खत, व्हर्मीवॉश आणि बियाण्यांची थेट घरपोच विक्री.
  • - सौ. सारिका थोपटे, ८६००५६६६८३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com