agricultural stories in Marathi, success story of sponge gourd cultuavtion,Hemraj Sapkale,Kathora,Dist.Jalgaon | Agrowon

गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळ
चंद्रकांत जाधव
बुधवार, 22 मे 2019

बाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील हेमराज प्रल्हाद सपकाळे यांनी चार वर्षांपासून गिलका लागवडीस सुरवात केली. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सपकाळे गिलक्‍यांची चार एकरावर लागवड करतात. केळी पिकाच्या बरोबरीने गिलका लागवडीतही त्यांनी वेगळी ओळख तयार केली आहे.

बाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील हेमराज प्रल्हाद सपकाळे यांनी चार वर्षांपासून गिलका लागवडीस सुरवात केली. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सपकाळे गिलक्‍यांची चार एकरावर लागवड करतात. केळी पिकाच्या बरोबरीने गिलका लागवडीतही त्यांनी वेगळी ओळख तयार केली आहे.

कठोरा (जि. जळगाव) हे गाव तापी नदीकाठी आहे. या भागातील जमीन काळी कसदार आणि पाणीदेखील बऱ्यापैकी असल्याने केळीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. हेमराज सपकाळे यांच्याकडे आठ एकर शेती असून, त्यामध्ये केळी, कापूस, मका या पिकांची प्रामुख्याने लागवड असते. शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी त्यांच्याकडे तीन कूपनलिका आहेत. स्वतःच्या शेतीबरोबरीने आणखी आठ एकर शेती ते करार पद्धतीने करतात. दरवर्षी आठ एकरांवर केळी आणि आठ एकरांवर कपाशी लागवड असते. या पारंपरिक पिकाच्या बरोबरीने त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून गिलके या पिकाची लागवड सुरू केली.

गिलक्याची शेती

  • पीक बदलाबाबत हेमराज सपकाळे म्हणाले की, चार वर्षांपूर्वी केळीच्या पिकाला कमी दराचा फटका बसला होता. त्यामुळे शाश्वत आर्थिक उत्पन्नासाठी मी चार वर्षांपूर्वी गिलक्याची लागवड सुरू केली. मी दरवर्षी तीन एकर क्षेत्रावर गिलक्‍यांची लागवड करतो. कापसाखालील क्षेत्र रिकामे करून रोटाव्हेटर मारतो. एकरी पाच ट्रॉली शेणखत मिसळून रान तयार करतो. १५ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत गिलक्याची लागवड केली जाते.
  •  साधारणपणे दर दहा फुटांवर लॅटरल अंथरून सव्वा फुटांवर दोन बिया टोकतो. बाजारपेठेतील मागणीचा विचार करून मी संकरित जातीची लागवड करतो. लागवडीच्या वेळी रासायनिक खतांचा बेसल डोस देत नाही. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दर आठ दिवसांनी विद्राव्य खताची मात्रा दिली जाते. वाढीच्या टप्प्यात या पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव ओळखून वेळेवर कीडनाशकांची फवारणी केल्याने कीड नियंत्रणात येते. गिलक्याचे वेल हे शेतातच पसरले आहेत.
  • लागवडीनंतर दीड महिन्यात काढणी सुरू होते. सुरवातीला १५ दिवस एक दिवसाआड काढणी केली जाते. पीक जोमात आल्यानंतर दररोज गिलक्यांची काढणी केली जाते.

कुटुंबाची मिळाली साथ
हेमराज यांना अरुण व नरेंद्र हे दोन लहान बंधू आहेत. ते विभक्त झाले आहेत. अरुण व नरेंद्रदेखील गिलक्‍यांची लागवड करतात. हे बंधूदेखील स्वतःची शेती सांभाळून मोठे बंधू हेमराज यांना गिलक्‍यांच्या काढणीसाठी रोज मदत करतात. भावांमध्ये पीक व्यवस्थापनाबाबत चर्चा होत असल्याने दर्जेदार उत्पादनासाठी फायदा होतो. हेमराज यांच्याकडे एक सालगडी आहे. पीक व्यवस्थापन तसेच गिलक्यांच्या काढणीसाठी बंधू, सालगडी आणि कुटुंबीयांची मदत  होते. यामुळे पीक व्यवस्थापनासाठी बाहेरचा मजूर लागत नाही. सध्या उष्णता अधिक असल्याने गिलक्यांची काढणी सायंकाळी पाच वाजता सुरू होते. एप्रिलमध्ये चार एकरांत दररोज दोन ते सव्वादोन क्विंटल गिलक्यांचे उत्पादन मिळत होते. १ मेपासून रोज अडीच ते तीन क्विंटल गिलक्यांचे उत्पादन मिळते. प्लॅस्टिकच्या १५ आणि २० किलो क्षमतेच्या पिशवीत गिलके भरले जातात. पहाटे जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गावातील एका मालवाहू रिक्षातून गिलके विक्रासाठी नेले जातात. सरासरी २० किलो गिलक्‍यांच्या वाहतुकीसाठी २० रुपये खर्च येतो.
दराबाबत हेमराज सपकाळे म्हणाले की, गिलक्‍यांना एप्रिलमध्ये सुमारे २० दिवस प्रतिकिलो ५० ते ५५ रुपये असा दर मिळाला. १ मेपासून प्रतिदिन ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. २०१६ मध्ये मला कमाल ७० रुपये प्रतिकिलो दर मिळाला होता. त्यावर्षी तीन एकरांत तीन महिन्यांच्या गिलके पिकाने खर्च वजा जाता पावणेपाच लाख रुपये उत्पन्न दिले. यंदाच्या हंगामात तीन एकरांत खर्च वजा जाता आतापर्यंत सुमारे सव्वादोन लाख रुपये उत्पन्न आले आहे. केळीच्या शेतीचा व्याप असल्याने हातविक्री करायला फारसा वेळ नाही. गिलक्‍यांचे क्षेत्र १ जूनपर्यंत रिकामे करून त्यात ५ जूनपर्यंत कापूस लागवडीचे नियोजन केले आहे.

गिलक्यांचा बाजार स्थिर  

  • जळगाव जिल्ह्यात सुमारे ५० ते ६० हेक्‍टरवर गिलक्‍यांची लागवड झाल्याचा अंदाज शेतकरी सांगतात. गिलके उत्पादनासाठी जामनेरातील पहूर, चिंचखेडा, हिंगणे, पाचोऱ्यातील कुरंगीचा परिसर; जळगावमधील कठोरा, भादली खुर्द; यावलमधील डांभुर्णी, चोपडामधील धानोरा भाग प्रसिद्ध आहे.
  • जळगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गिलक्यांची आवक होते. मागील चार-पाच महिन्यांत सरासरी २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दर स्थिर राहिला आहे. जळगाव बाजार समितीत १ मेपासून प्रतिदिन आठ ते नऊ क्विंटल गिलक्‍यांची आवक होत आहे. सध्या प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये असा दर मिळत आहे. दुष्काळ असल्याने दर टिकून आहेत. यंदा हिंगणे, कठोरा, भादली भागात पाणी मुबलक असल्याने या भागातील शेतकऱ्यांना या पिकातून चांगला फायदा मिळत आहे. 

 

केळीतही सातत्य

हेमराज सपकाळे यांचे केळी हेदेखील प्रमुख पीक आहे. या पिकाचेही ते काटेकोर व्यवस्थापन ठेवतात. वडिलांपासूनच त्यांच्याकडे केळी लागवड केली जाते. ऑक्टोबर महिन्यात केळी लागवड केली जाते. श्रीमंती आणि महालक्ष्मी या पारंपरिक जातीची ते लागवड करतात. लागवड पाच बाय सहा फुटांवर करतात. केळीलादेखील ठिबक सिंचन केलेले आहे. काढणी ऑक्टोबरअखेरीस सुरू होते ती जानेवारीपर्यंत चालते. केळीची १८ ते २० किलोपर्यंतची रास मिळत असल्याने चांगला उठाव असतो. केळीची विक्री किनोद (ता. जळगाव) येथील व्यापारी किंवा चोपडा येथील खरेदीदारांना केली जाते. मागील हंगामात त्यांना जागेवर प्रतिक्विंटल ७०० ते ९०० रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात प्रतिक्विंटल ९०० रुपये सरासरी दर मिळाला.
केळीमध्ये रासायनिक खतांचे प्रमाण कमी ठेवतात. घरची दहा जनावरे असल्याने पुरेशा प्रमाणात शेणखत उपलब्ध होते. यातून जमिनीची सुपीकता जपली जाते. वाढीच्या टप्प्यात पुरेशी अन्नद्रव्ये मिळावीत, यासाठी ठिबक सिंचनातून विद्रव्य खते दिली जातात. केळीची काढणी आटोपल्यानंतर शेतात जे कंद असतात; त्यांचे वितरण ते आपल्या परिसरातील शेतकरी, मित्रमंडळी, इतरांना मोफत करतात. फक्त कंद काढणी व वाहतुकीची मजुरी यावर इतरांना त्यांच्या शेतातील केळीचे कंद मिळतात.

- हेमराज सपकाळे, ७७९८७९७०८५

 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,...‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा’ ही ज्येष्ठ...
कमी खर्चातील चवळी झाले नगदी पीक नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष...
भूमिहीन खवले यांनी करार शेतीतून उंचावले...भूमिहीन कुटुंब. मात्र करार पद्धतीने, प्रयोगशील...
गोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...
ग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तरआर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी,...