देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीर

देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीर
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीर

गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे दूध खरेदी करून ते पॅकिंग करत शहरी ग्राहकांना पुरविण्याचा व्यवसाय सोलापुरातील सौ. सुचित्रा सुदेश गडद यांनी सुरू केला आहे. याचबरोबरीने त्यांनी शेतकऱ्यांना पशू उपचाराची माहिती तसेच शेतमाल विक्रीची व्यवस्था सोलापूर शहरात केली आहे.

सोलापूर शहरातील सौ. सुचित्रा गडद या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पदवीधर. त्यांचे पती सुदेश हे भांडी दुकान आणि इतर व्यवसायात आहेत. लहानपणापासूनच सुचित्राताईंना सामाजिक कामाची आवड होती, त्यातही त्यांना मुक्या प्राण्यांविषयी तळमळ आणि जिव्हाळा होता. या आवडीतून त्यांनी दहा वर्षांपूर्वी गोशाळांमध्ये काम सुरू केले. त्यासाठी डेअरी डिप्लोमा पूर्ण केला. पशू वैद्यकांच्याकडून पशू उपचार पद्धती शिकून घेतल्या. एम. एस. डब्लूची पदवीही घेतली. अर्थात, पती सुदेश यांच्या पाठिंब्यामुळेच त्यांना या सर्व गोष्टी सहजशक्य झाल्या. या सगळ्या कामाचे टप्पे पार करताना त्यांच्या कार्याचा विस्तार वाढत गेला. २०१४ मध्ये त्यांनी देशी गोवंश संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी परिसरातील गोशाळातील गाईंवर पशुतज्ज्ञांच्या मदतीने मोफत उपचार सुरू केले. सोलापूरच्या आसपासच्या गावातील देशी गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करताना सुचित्राताईंना देशी गाईच्या दूध विक्रीची संकल्पना सुचली. मागील तीन वर्षांत त्यांनी सोलापूर शहरात थेट घरपोच गाईच्या दुधाची विक्री सुरू केली. भंडारकवठे गावातून सुरवात  देशी गाईच्या दुधाचे संकलन आणि विक्री हे काम सुरवातीला काहीसे कठीणच होते, पण धाडस आणि जिद्दीने सुचित्राताईंनी यात उतरण्याचा निर्धार केला. तीन वर्षांपूर्वी सुचित्राताईंनी भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) गावातील देशी गाईंचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. या गावातील गीर गाईंचे संगोपन करणारे तीस शेतकरी त्यांनी जोडले आहेत. गावातील पाच शेतकऱ्यांकडे तीसहून अधिक गाई आहेत. तर काही शेतकऱ्यांकडे दोन-चार गीर गाई आहेत. या शेतकऱ्यांबरोबर समन्वय साधून सुचित्राताईंनी दूध संकलन आणि विक्रीचे नियोजन बसवले. गावात पाच ठिकाणी दूध संकलन केंद्रे तयार केली. येथे सर्व शेतकरी दूध जमा करतात. तेथून हे दूध गाडीने सोलापूर आणले जाते. सध्याच्या काळात दुधाचे संकलन संध्याकाळी केले जाते. सकाळी जमा होणाऱ्या दुधापासून तूपनिर्मिती केली जाते. तीन वर्षांपूर्वी दिवसाला केवळ ३० लिटर दूध संकलन व्हायचे. आता हे संकलन २५० लिटरपर्यंत पोचले आहे. शेतकऱ्यांशी बोलून देशी गाईच्या दुधाचा दर ठरवला. बाजारभावापेक्षा किमान एक-दोन रुपये जास्त देऊ, असे सांगून दुधाच्या रतिबाला सुरवात केली. गावातील शेतकऱ्यांपर्यंत पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती पुरविली जाते. दरवर्षी सर्व गाईंचे लसीकरण आणि गरजेनुसार औषधोपचारही केले जातात, अशी माहिती सुचित्राताईंनी दिली.

प्रतिदिन २५० लिटर दूध संकलन सुचित्राताईंनी जेव्हा दूध संकलनाला सुरवात केली तेव्हा पहिल्या टप्प्यात भंडारकवठे गावातील चार-पाच शेतकरी तयार झाले. गेल्या तीन वर्षांत तीस शेतकरी जोडले गेले आहेत. सध्या दैनंदिन संकलन २५० लिटरवर पोचले आहे. शेतकऱ्यांना जागेवर प्रतिलिटर २८ रुपये इतका दर दिला जातो. खासगी दूध व्यावसायिक किंवा संस्था सध्या प्रतिलिटर १८ ते २० रुपयांवर दर देत नाहीत आणि शासनानेही जाहीर केलेला २५ रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत नाही. साहजिकच जागेवरच प्रतिलिटर २८ रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.    दररोज घरपोच दूध सुचित्राताईंकडे रोज आदल्या दिवशी सायंकाळपर्यंत २५० लिटर दुधाचे संकलन पूर्ण होते. दूध आल्यानंतर त्याचे अर्धा, एक लिटर पॅालिथिन पिशवीत पॅकिंग केले जाते. त्यानंतर दुधाच्या पिशव्या डीपफ्रिजरमध्ये थंड करण्यासाठी ठेवल्या जातात. पहाटेपासून सोलापूर शहरातील जुळे सोलापूर, विजापूर रस्ता, होटगी रस्ता अशा वेगवेगळ्या भागातील ग्राहकांच्या घरापर्यंत पोचविले जाते. सुचित्राताई स्वतः पॅकिंग करण्यापासून दूध पिशवी ग्राहकांच्या घरी पोच करण्यापर्यंत सगळी कामे करतात. अलीकडे थोडासा व्याप वाढल्याने तीन महाविद्यालयीन तरुणांना त्यांनी ग्राहकांपर्यंत दूध पिशव्या पोचविण्यासाठी रोजगार दिला आहे. सुचित्राताई स्वतः थेट शेतकऱ्यांकडून दूध संकलन करतात. वाहतूक, पॅकिंग, शीतकरण आणि पुन्हा थेट घरपोच  पिशवीतील दूध पोचविण्याचा खर्च धरता ग्राहकाला ५५ रुपये प्रतिलिटर या दराने विक्री केली जाते. सर्वसामान्य ग्राहकालाही देशी गाईचे दूध योग्य दरात उपलब्ध व्हावे असा सुचित्राताईंचा प्रयत्न आहे.

तयार केले मार्केट सुचित्राताईंनी स्वतःच्या ओळखीवर सोलापूर शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, इंजिनियर यांच्या घरी देशी गाईंच्या दुधाची विक्री सुरू केली. देशी गाईच्या दुधातील पौष्ठिकता, त्याच्यातील घटक आणि आरोग्याच्यादृष्टीने असणारे महत्त्व सांगून खास ग्राहक तयार केला. दुधाच्या बरोबरीने ग्राहकांना १६०० रुपये प्रतिकिलो दराने तूप विक्री केली जाते. सुचित्राताईंनी देशी गाईच्या दुधाची पुण्यातील एका प्रयोगशाळेत तपासणी करून प्रमाणपत्रही घेतले आहे. त्यामुळे ग्राहकांना देशी गाईंचे दूध आणि तुपाबद्दल विश्वासार्हता वाढली. सध्या सोलापूर शहरातील २१३ ग्राहकांना दररोज दुधाचा पुरवठा केला जातो. 

विविध उत्पादनांची विक्री  

  •  सुचित्राताईंनी देशी गाईंच्या दूध विक्री बरोबरीने इतर उत्पादनांची निर्मिती आणि विक्रीला सुरवात केली आहे. सोलापूर शहरात नवीपेठेमध्ये त्यांनी विक्री केंद्राची सुरवात केली आहे.  
  •   गोरस पूजा धूप, गोसेवा साबण, गोसेवा फिनेल, अमृतधारा नावाने डोकेदुखी, सर्दी यासाठी गुणकारी बामची निर्मिती आणि विक्री.
  •   सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न. शेतकरी तसेच शहरी ग्राहकांसाठी गांडूळखत, जीवामृत, पंचगव्याची निर्मिती आणि विक्री.
  •   सोलापूर शहरात दूध, तूप विक्रीच्या बरोबरीने सेंद्रिय भाजीपाला, लिंबू, गुलकंद, द्राक्ष विक्रीची सोय.
  • समाजकार्यातही सहभाग देशी गाईंच्या दुधाची विक्री सांभाळत सुचित्राताई पिपल्स फॅार अॅनिमल वेल्फेअर ही संस्था चालवतात. त्या माध्यमातून शहरात रस्त्यावर मोकाट फिरणारी कुत्री, गाढव यांच्यावर औषधोपचाराचे काम केले जाते. याचबरोबरीने गोशाळेतील आजारी गाईंवर देखील उपचाराची सोय त्या करतात. गोशाळेतील गाईंच्या व्यवस्थापनासाठी जमेल तशी आर्थिक मदतही केली जाते. समाजकार्य, व्यवसाय आणि घर अशा तीनही आघाड्यांवर सुचित्राताईंची सुरू असलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.

    - सौ. सुचित्रा गडद,९५११६९५९७९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com