शेती, पूरक उद्योगातून महिला गट झाला स्वावलंबी

पूरक व्यवसायाला मिळाली चालना गटातील महिलांनी शेतीतपीक बदल केला. तसेच शेती पूरक व्यवसायालाही चालना दिली आहे. त्यामुळे गटातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. याचा शेती आणि पूरक उद्योगाच्या वाढीला फायदा होत आहे. - सुचिता नानगुडे, ९५४५९३४८६८ (अध्यक्ष, ऋचा महिला शेतकरी भाजीपाला व भात उत्पादक गट)
महिला गटाने केलेली झेंडू लागवड.
महिला गटाने केलेली झेंडू लागवड.

पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे बु. (ता. हवेली) येथील ऋचा महिला शेतकरी भाजीपाला व भात उत्पादक गटातील सदस्यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली आहे. शेती, पूरक व्यवसायाच्या बरोबरीने शेतमाल विक्रीची स्वतंत्र व्यवस्था उभारून महिलांनी आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे.

पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले गोऱ्हे बु. हे सुमारे साडेचार हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील महिलांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड देण्यासाठी पुढाकार घेतला. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सुचिता प्रशांत नानगुडे यांनी २०१२ मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून ऋचा महिला शेतकरी भाजीपाला व भात उत्पादक गट स्थापन केला. बचत गटाच्या उभारणीसाठी कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, कृषी पर्यवेक्षक गुलाब कडलग, कृषी सहायक मोहन गावडे, अरुण नेवसे यांचे मार्गदर्शन मिळाले. याचबरोबरीने सुचिता यांचे पती प्रशांत नानगुडे आणि दीर विलास नानगुडे, प्रकाश नानगुडे यांनी चांगली साथ दिली. ऋचा महिला शेतकरी भाजीपाला व भात उत्पादक गटामध्ये वीस महिला आहेत. सुचिता नानगुडे या गटाच्या अध्यक्षा, तर नीलम नानगुडे सचिव आहेत. गटातील महिला दर महिन्याला शंभर रुपयांची बचत करतात. बचत वाढत गेल्याने बॅंकेने बचतीवर कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. पूर्वी हा गट भाजीपाला व भात उत्पादन करीत होता. त्यानंतर महिलांनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी, फळबाग लागवड, दुग्धव्यवसायास सुरवात केली.

विविध पिकांची लागवड गटातील महिलांकडे सरासरी ८० एकर शेती आहे. बहुतांश शेतीमध्ये इंद्रायणी भाताचे उत्पादन घेतले जाते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा, फळभाज्या, पालेभाज्याचे उत्पादन घेतले जाते. काही सदस्यांनी फूलशेतीवर भर दिला आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून सात महिलांनी आंबा, सीताफळ,चिकू, काजू लागवड केली आहे. यंदाच्या वर्षी गटातील सदस्या अनुराधा नानगुडे यांनी वीस गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला. या पिकातून चांगले उत्पन्न मिळाल्याने पुढील वर्षी गटातील महिलाही स्ट्रॉबेरी लागवडीचे नियोजन करत आहेत. पीक व्यवस्थापनासाठी गटातील महिलांना अनिल नानगुडे यांचे चांगले मार्गदर्शन मिळते.

शेतीमालाची थेट विक्री सिंहगडावर दररोज पर्यटक येतात. हे लक्षात घेऊन बचत गटाने गावामध्येच पर्यटकांना पालेभाज्या, फळभाज्याची विक्री करण्यास सुरवात केल्यामुळे चांगला दर मिळतो. गटातर्फे तांदूळ, गहू, ज्वारीची विक्री कृषी महोत्सव, तांदूळ महोत्सव, आठवडे बाजार तसेच पुणे शहरातील सोसायटांच्या मध्ये केली जाते. पुणे शहरातील ग्राहकांना मागणीनुसार शेतमालाची पॅकिंगमध्ये विक्री केली जाते.

उत्पन्नात झाली वाढ गटातील महिला विविध पूरक व्यवसाय सक्षमपणे करत आहेत. पूरक व्यवसायाच्या माध्यमातून साधारणपणे गटातील महिलेला वार्षिक सरासरी तीस हजारांचे अधिकचे उत्पन्न मिळते. पूरक उद्योगामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या. गटाला नुकताच आत्मातर्फे पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट महिला गटाचा पुरस्कार मिळाला आहे.

महिलांनी घेतले प्रशिक्षण गटातील महिलांनी जयपूर येथे सेंद्रिय शेती आणि पुण्यामध्ये खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन पीक नियोजनात बदल करतात. काही महिला एका बॅंकेला भेटवस्तू पॅकिंगसाठी दरवर्षी एक हजार लहान कापडी पाऊच तयार करून देतात.

जमीन सुपीकतेवर दिला भर गटातील प्रत्येक महिलेकडे दोन ते चार जनावरे आहेत. गटातील सहा महिलांनी गांडूळ खत निर्मितीला सुरवात केली आहे. शेतीमध्ये शेणखत, गांडूळ खत आणि जीवामृताचा वापर केला जातो. भात, गहू, हरभरा, कडधान्ये, फळपिकांना सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर केला जातो.

खाद्य महोत्सवात सहभाग आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गटातील महिला भीमथडी, यशस्विनी अभियान, पवनाथडी, खासगी खाद्य उपक्रमातही सहभागी होतात. यामध्ये पुरणपोळी, शाकाहारी आणि मांसाहारी खाद्य पदार्थांची विक्री केली जाते. याशिवाय ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असेल तर खाद्यपदार्थ घरपोच दिले जातात. या उपक्रमामध्ये गटातील सहा महिला सहभागी आहेत.

गोवऱ्यांची विक्री सुचिता नानगुडे यांच्याकडे चार खिलार गाई आहेत. फेबुवारीनंतर गोवऱ्यांची निर्मिती केली जाते. गोवऱ्या निर्मितीसाठी त्यांनी बिस्कीट आकाराचा साचा तयार केला. चार महिन्यांत साधारणपणे ५५ हजार गोवऱ्यांची निर्मिती होते. पुणे शहरामध्ये धार्मिक पूजा साहित्य दुकानामध्ये गोवऱ्यांची विक्री होते. साधारणपणे ५० गोवऱ्यांचे एक पाकीट वीस रुपयांना विकले जाते. या व्यवसायातून दोन महिलांना रोजगार मिळाला आहे.

बचत गटाचे उपक्रम

  •  पीक बदलातून उत्पन्न वाढ.
  •  प्रक्रिया आणि खाद्यपदार्थांची निर्मिती.
  •  दुग्धव्यवसायाला चालना.
  •  फूलशेतीमध्ये वाढ.
  •  स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग.  
  •  सेंद्रिय शेतीकडे वाटचाल.
  •  पीठ गिरणी उद्योगास सुरवात.
  •  शालेय पोषण आहार निर्मिती.
  •  ग्राहकांना शेतमालाची थेट विक्री.
  • फळबागेतून उत्पन्न वाढ मी गटाच्या माध्यमातून शेतात फळबाग केली. यासाठी कृषी विभागाचे सहकार्य मिळाले. शेतात आंबा, चिकू आणि सीताफळाची लागवड केली आहे. फळांची जागेवरच विक्री होत असल्यामुळे चांगले उत्पन्न मिळते. - अनुराधा नानगुडे.

    पीक बदल ठरला फायदेशीर आमची एकत्रित कुटुंबाची अठरा एकर शेती आहे. यामध्ये पालेभाज्या, भात, गहू लागवड असते. गटातील महिलांशी वेळोवेळी चर्चा करून पीक व्यवस्थापनात बदल करते. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ झाली. - मोहिनी नानगुडे

    दूध प्रक्रिया उद्योगाला सुरवात माझ्याकडे दोन एकर शेती आहे. यामध्ये भात ,गहू, ज्वारी, लागवड असते. शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. माझ्याकडे वीस म्हशी असून दररोज दोनशे लिटर दूध उत्पादित होते. या दुधापासून पनीर, लस्सी तयार करून विक्री केली जाते. - नीलम नानगुडे,९८३४९२९०५९ (सचिव, ऋचा महिला शेतकरी भाजीपाला व भात उत्पादक गट)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com