ऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी’ तंत्रज्ञान

उसाच्या बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी’ तंत्रज्ञान
उसाच्या बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी’ तंत्रज्ञान

अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसाची रोपे तयार केली जात असली तरी त्याचा खर्च वाढतो. यावर मात करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील गणपतराव पाटील यांनी स्वतः सुपर केन नर्सरी तयार केली आहे. हे तंत्र सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लागवड व वाहतुकीच्या दृष्टीने सुलभ असून, खर्चात बचतीबरोबरच जोमदार रोपे मिळू शकतील. यातून प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः रोपांच्या निर्मितीकडे वळावे, हा मागील उद्देश आहे. शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रो ट्रेमध्ये एक डोळा पद्धतीने उसाची रोपे तयार करतात. मात्र, त्यामध्ये होणारा प्रो ट्रे किंवा पिशव्या, त्या भरणे हा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी नवीन सुपरकेन नर्सरी पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. हे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. स्वत: तयार केला बियाणे प्लॉट गेल्या वर्षी अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व दत्त साखर कारखाना यांच्यामार्फत फुलें २६५ जातीचा ऊस आणून एक एकर क्षेत्रावर पायाभूत बियाणे तयार केले. यात प्रथम श्रेणीच्या तीन उसापासून पंधरा डोळ्याचा एक ऊस याप्रमाणे एकूण ४५ डोळ्यांची लागवड केली. त्यापासून ५०० उसांची निर्मिती केली. प्रती उसापासून वीस डोळे तयार झाल्यानंतर या १० हजार डोळ्यांपासून ऊस रोपे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. ही रोपे एक एकरासाठी पुरेशी होतात. यातून एकूण दोन लाख रोपे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण सेंद्रीय पद्धतीने जोपासलेली ही फुलें २६५ जातीची रोपे स्वतःच्या शेतात लावण्यात येणार आहेत. या पद्धतीने शेतकऱ्यांनी स्वत:चे बियाणे स्वत:च्या शेतात तयार करावेत हा प्रयत्न आहे. या या नवीन तंत्रामुळे पिशवी किंवा प्रो ट्रे मधील रोपांपेक्षा अत्यंत कमी खर्चात सशक्त रोपे तयार होतात. अशी आहे पद्धत

  • खताच्या रिकाम्या गोण्या लांबीच्या दोन्ही बाजूनी उसवाव्यात. यामुळे सहा फूट लांब व अडीच फूट रुंद अशा पट्ट्या तयार होतील.
  • पाण्याच्या खड्ड्याच्या आजूबाजूची जमीन एकसारखी करावी. त्यावर या पट्ट्या एकाला एक जोडत अंथराव्यात.
  • या पट्ट्यावर तिथल्याच मातीचा दोन इंच थर द्यावा.
  • बीजप्रक्रीया करून रात्रभर द्रावणात भिजवलेले बेणे पोत्यावर काढून घ्यावे. निथळल्यानंतर ॲसिटोबॅक्‍टर १५० मिलि प्रती १५ लिटर पाणी या द्रावणाची बेण्यावर फवारणी करावी. ही प्रक्रिया केलेले बेणे बेडवर मांडावीत. बीजप्रक्रिया केलेल्या खड्ड्यातील द्रावणांची झारीने वरचेवर बेडवर शिंपडावे.
  • सोपे सुटसुटीत तंत्र

  • प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक ट्रे, कोकोपीट अशा खर्चिक बाबींची गरज नाही
  • खताची गोणपाटे सच्छिंद्र असतात. त्यामध्ये बेडप्रमाणे पाणी साठून रोपे पिवळी पडण्याचा धोका नसतो.
  • गोणपाटामुळे त्या खालचे तण बेडवर उगवत नाही.
  • बेण्याच्या डोळ्याखालील कांडीची लांबी जास्तीत जास्त ठेवता येते.
  • या तंत्रज्ञानाचे फायदे

  • कमी वेळेत, कमी खर्चात उसाची निरोगी, सशक्त रोपे तयार करता येतात.
  • कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या द्रावणात बेणे बुडून राहिल्यामुळे ते निरोगी होते.
  • ॲसिटोबॅक्टर उसाच्या शरीरात वाढत राहिल्याने नत्राचा पुरवठा वाढतो.
  • चुन्याच्या निवळीमुळे पेशीमध्ये कॅल्शिअमचा शिरकाव होतो.
  • पेशीपटल आणि मायटोकोंड्रियामधील विकरे जलद कार्यान्वित होतात.
  • उगवण जलद होऊन रोपे जोमदार वाढतात.
  • रोपांची कणखरता व ताण सहनशीलता वाढते.
  • बीज प्रक्रियेमुळे रोपांची वाढ चांगली होते. ती रोगांना बळी पडत नाहीत.
  • रोपाची वाढ जोमदार सोळा ते अठरा दिवसांत रोपे चार पानांची होतात. बाविसाव्या दिवशी लागणीस योग्य होतात. तिसाव्या दिवसांपर्यंत वाढ लावणीयोग्य असते. चाळिसाव्या दिवसांपर्यंत लावली तरी चालतात. सुलभ वाहतूक गोणपाटाची टोके बाहेर काढून थोडी उचलली तरी तेवढा बेड उचलून बांबूच्या शिडीवर किंवा साध्या स्ट्रेचरवर घेता येतो. तो लागवडीच्या ठिकाणी नेता येतो. रोपे मोठ्या बुट्टीतूनही वाहतूक करता येतात. कोरुगेटेड बॉक्‍स किंवा कोणत्याही बॉक्‍समध्ये व्यवस्थित आडवी ठेवून दूर अंतरापर्यंत नेता येतात.

    ऊस लागवडीतील अनावश्‍यक खर्च कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असतो. प्रो ट्रे मध्ये रोपांच्या निर्मितीपेक्षा या नव्या सुपरकेन नर्सरीचा खर्च कमी होतो. त्याचे प्रमाणे वाहतुकीसाठीही सुलभ ठरते. या सोप्या पद्धतीचा प्रसार करण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेतला आहे. माझ्या शेतात ही पद्धत राबवली असून, अन्य शेतकऱ्यांनीही स्वतःसाठी आवश्यक दर्जेदार बियाणे स्वत:च्या शेतात तयार करावे, हा हेतू आहे. - गणपतराव पाटील, ९४२२५८२२२०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com