agricultural stories in Marathi, swayamsevi sanstha, Manavlok | Agrowon

मानवलोक... ग्रामीण पुनर्रचनेसाठी प्रामाणिक प्रयत्न

संतोष मुंढे
रविवार, 20 जून 2021

शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण स्त्रियांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे, श्रमाला महत्त्व प्राप्त करून देणे ही मानवलोकची प्रमुख भूमिका आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाचे मासिक उत्पन्न किमान २५ हजार रुपये करण्याचे ध्येय ठेवून संस्था कार्यरत आहे.

शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण स्त्रियांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे, श्रमाला महत्त्व प्राप्त करून देणे ही मानवलोकची प्रमुख भूमिका आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाचे मासिक उत्पन्न किमान २५ हजार रुपये करण्याचे ध्येय ठेवून संस्था कार्यरत आहे.

अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजूर आणि स्त्रियांच्या जीवनात सामूहिक व रचनात्मक समानतेच्या पाऊलखुणा उमटविण्याच्या उद्देशानेच १९८२ मध्ये मराठवाडा नवनिर्माण लोकायत (मानवलोक) या संस्थेची स्थापना डॉ. द्वारकादासजी शालिग्राम लोहिया यांनी केली. आयुर्वेदिक डॉक्टर असलेले द्वारकादासजी हे राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. गावोगावीचे प्रश्‍न सोडवतानाच आणीबाणीमध्ये १८ महिने कारावासही सहन केला. मानवलोक संस्थेने सुरुवातीला अंबाजोगाई (जि. बीड) येथील दहा गावातून सुरू केलेले काम आता केज, माजलगाव, परळी, धारूर, बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर अशा तालुक्यांतील २५० पेक्षा जास्त गावांमध्ये पसरले आहे. मराठवाड्यातील प्रामुख्याने लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील १०० पेक्षा जास्त गावांमध्ये महात्मा गांधींचे ग्रामस्वराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

उपजीविकेच्या शाश्‍वत पर्याय निर्माणाचा ध्यास ः
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. त्यात अत्यल्प आणि अनियमित पाऊस शेतकऱ्यांची परीक्षा पाहतो. ६ ते ७ लाख लोक ऊस तोड कामगार म्हणून राज्यभरात कामासाठी जातात. या स्थलांतराचा दुष्परिणाम आरोग्य, शिक्षण, जीवनमान, सामाजिक सुरक्षितता, आर्थिक दर्जा व कुटुंब व्यवस्थेवर पडतो. यांच्यासाठी मानवलोकने काही शाश्‍वत पर्याय निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

उसनवार मदतीतून सावकारी पाश दूर...
मानवलोकने प्रामुख्याने ग्रामीण भागात कृषक पंचायतचे बचत गटाचे जाळे निर्माण केले. त्यातून चालवल्या जाणाऱ्या बळिराजा सहकारी ग्राहक भांडार मार्फत सुमारे १५०० जुन्या-नवीन कुटुंबांना दरवर्षी उसनवारीवर खते व बी-बियाणाचे वाटप केले जाते. आजवर १० हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत मदत केली. ही मदत शेतकरी डिसेंबर ते मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के परत करतात. यामुळे खासगी सावकारीच्या पाशातून अनेक कुटुंबांची मुक्ती शक्य झाली. शेती विकासासाठी २००० सामुदायिक विहिरी, २००० शेतकऱ्यांना सूक्ष्मसिंचनासाठी मदत, १००० शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, ठिबक उभारणीसाठी मदत केली आहे.

एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पाणलोट विकास ः

  • ‘शिवारातले पाणी शिवारात’ या संकल्पनेतून पडीक जमीन व पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पाणलोटाचे उपचार केले. त्यात बांध बंदिस्ती, सलग समतल चर, अनघड दगडी बांध, जलशोषक चर, माती नाला बांध, शेततळे, तलावातील गाळ काढणे, नाल्यांचे पुनरुज्जीवन यांचा समावेश होता.
  • ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना मानवलोक शासनाच्या सहकार्याने मराठवाड्यात राबवते. छोट्या मोठ्या धरणांतील साठलेला जवळपास ५४ लाख घनमीटर गाळ उपसा करून निकृष्ट जमिनींमध्ये टाकला जातो. यामुळे अल्पभूधारकांच्या उत्पादनात २ ते ३ पटीने वाढ अनुभवास आली.

निसर्ग संवर्धनासह शेती विकासासाठी...

  • मानवलोकने निसर्ग संवर्धनासाठी रोपवाटिका- निर्माण केल्या असून, त्यातून आवळा, चिंच, लिंबू, करंज, सप्तपर्णी, वड, पिंपळ, कडुनिंब अशा झाडांच्या सुमारे दीड लाख रोपांचे वाटप केले.
  • मानवलोकने सीताफळ लागवडीसाठी शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रुपयांपर्यंत अर्थसाह्य केले असून, मागील २ वर्षांत ९७ एकर क्षेत्रावर सीताफळ लागवड व ठिबक सिंचन शक्य झाले.
  • मानवलोकने हवामानपूरक कृषी तंत्रज्ञानातून कापूस लागवडीचे तंत्र विकसित केले. पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ७५ शेतकऱ्यांच्या ७५ एकरांवर त्याचे प्रयोग केले.
  • मानवलोकने सुमारे १ हजार एकरांवर सेंद्रिय शेतीचा उपक्रम हाती घेतला आहे.

कोविड काळातील काम ः

  • कोरोनाच्या काळात गोरगरिबांची उपासमार टाळण्यासाठी धान्य व गरजेच्या वस्तूंचे १५ हजार किट वाटप केले. बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी १२०० बेड क्षमतेचे १४ कोविड केअर सेंटर उभे केले.
  • टाळेबंदीच्या शेतीमालाच्या विक्रीसाठी शेतकरी व गट यांची सांगड शेतकरी उत्पादक कंपन्यांशी घालण्यात आली. यातून ३ कोटी रुपयांचा भाजीपाला विक्री करण्यात आला.

मार्गदर्शन, मदतीतून व्यवसायाला साह्य ः

१) शेतमजूर, विधवा महिला, एकल महिला यांची उपजीविका चालण्यासाठी घरगुती व्यवसायाला प्रोत्साहन दिले. त्याकरिता शेळ्या, शिलाई मशिन वाटप, विविध व्यवसायांचे प्रशिक्षण, आर्थिक मदत दिली. मागील ३ वर्षात १२५ हून अधिक भूमिहीन, शेतमजूर कुटुंबांना खात्रीचे किमान उत्पन्न मिळते.
२) मानवलोक बीड जिल्हा व परिसरातील १० शेतकरी उत्पादक कंपन्यांना तांत्रिक मार्गदर्शन करत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण, क्षमता बांधणी व मार्केट लिंकेजकरिता ‘एफपीओ सपोर्ट सेंटर’ स्थापन करण्यात आले आहे.

प्रमुख उपक्रम ः

१) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, धारूर आणि परळी वैजनाथ तालुक्यातील गावांमध्ये ५०० एकर सेंद्रिय/ हवामान पूरक शेतीसाठी मानवलोक काम करत आहे. यात एनपीओपी प्रमाणिकृत सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, निविष्ठा उपलब्धता आणि सेंद्रिय माल किमान हमीभावाने खरेदी यंत्रणा विकसित करत आहे.
२) उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लोहारा तालुक्यांतील ६० जुन्या विहिरीतील गाळ काढून देण्यात येत आहे.
३) पूर्णा पाटबंधारे विभागातील २८० कि.मी. लांबीच्या लघुवितरिकेची स्वच्छता केली. यामुळे टोकाकडील शेतकऱ्यांपर्यंत रब्बीचे पाणी पोहोचले.
४) कानडीघाट ता. बीड येथे २७०० घ. मी. गाळ काढला. याच गावात ८१४ मी लांब नाला खोलीकरण, रुंदीकरणासह साठवण तलाव दुरुस्तीची कामे केली.
५) उमरद (ज) ता. बीड येथे ५३८ मी. नाला खोलीकरण, रुंदीकरण केले. पांगूळगव्हाण ता. आष्टी येथे २५ हेक्टर क्षेत्रावर डीप सीसीटी उभारले.
६) कर्जत-जामखेड येथे ८ कि. मी. पांदण रस्ते दुरुस्त केले.
७) केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे येथे दोन तलावातील गाळ काढला.यामुळे सुमारे १ कोटी लिटर पाणी साठवणक्षमता वाढली. गाळ ३० एकर जमिनीवर पसरवला. नवीन २० छोट्या मोट्या तलावांचे काम व ९ कि.मी. ओढ्याचे खोलीकरण-रुंदीकरण सुरू आहे.
८) उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात २.५ कि. मी. नाला खोलीकरण-रुंदीकरण केले.
९) औरंगाबाद जिल्ह्यातील इको बटालियन येथील वृक्षारोपणासाठी ७५० तास मशिन उपलब्ध केले. २ लाख रोपांची रोपवाटिका उभारली असून, त्यातील रोपे या वर्षी लागवडीकरिता वापरली जातील.
१०) रुटी-इमनगाव धरण, ता. आष्टी जि. बीड येथे धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ४८ हजार घ. मी. गाळ काढून शेतजमिनीवर पसरवला.
११) कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई यांची २५ एकर पडीक जमीन लागवडयोग्य करून, ९५० मीटर क्षेत्रावर बांधबंदिस्ती केली.
१२) लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांतील जवळपास ४०० गावे, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका, नांदेड-हिंगोली-परभणी जिल्ह्यातील अनेक गावे, नगर, सांगली जिल्‍ह्यांतील सुमारे ५० ठिकाणी कामे सुरू आहेत.

 

यापुढील काळात मानवलोक हवामानआधारीत पीक व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक संघांचे बळकटीकरण, प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे मासिक उत्पन्न किमान २५००० रुपये करणे, यावर भर देत आहे. यासाठी सेंद्रिय शेतीचे क्लस्टर विकसन, सीताफळ, उस्मानाबादी शेळीपालन, रेशीमकोष संगोपनातून मूल्य वृद्धी यासाठी प्रामुख्याने काम करत आहोत.
-अनिकेत लोहिया, ९६७३५९९९९९
कार्यवाह, मानवलोक, अंबाजोगाई, जि. बीड.


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
चाळीस एकरांत उत्कृष्ट कांदा शेतीचा आदर्शनाशिक जिल्ह्यातील अंतापूर (ता. सटाणा) येथील जाधव...
‘थ्री स्टार’ लिंबू वर्गीय रोपनिर्मिती लिंबूवर्गीय पिकांच्या रोपनिर्मितीला लागणारा २० ते...
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
‘आयटी’ मित्रांची शेती व्यवस्थापन कंपनीतुमची शेती आमच्यावर सोपवा, आम्ही आधुनिक...
लवांडे यांनी उभारली चारा पिकांची...फत्तेपूर (जि.. नगर) येथील अल्पभूधारक सोमेश्वर...
एकोप्याच्या बळावर बदलले वडगाव गुप्ताचे...दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या वडगाव गुप्ता (ता. जि....
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...
जिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...
वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...