ट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचाल

ट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचाल
ट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचाल

शेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या डोळ्यासमोर ट्रॅक्टरचे चित्र उभे राहते. इतके ते कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणाशी जोडले गेले आहे. मशागतीचे काम हे बैलांकडून ट्रॅक्टरकडे कधीच गेले आहे. अधिक क्षमतेचे, अत्याधुनिक ट्रॅक्टरने भारतीय बाजारपेठही सजली आहे. गेल्या तीन वर्षांच्या दुष्काळी वातावरणामध्ये ट्रॅक्टरची बाजारपेठ समाधानकारक वाढत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांपासून मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाची ट्रॅक्टर ही गरज होऊन गेली आहे. १९६० पर्यंत भारतात ट्रॅक्टर आयात केले जात होते. हरितक्रांतीचा प्रवास सुरू केलेल्या भारतात पुढील दोन दशकानंतर वर्षांत प्रतिवर्ष सुमारे ५० हजार ट्रॅक्टर विकले जावू लागले. सध्या तेच प्रमाण किमान सहा लाख ट्रॅक्टरवर पोचले आहे. आनंदाची बाब म्हणजे भारत हा केवळ ट्रॅक्टर उत्पादक देश राहिलेला नाही. दर्जेदार ट्रॅक्टर्सचा एक निर्यातदार देश म्हणून भारत वेगाने प्रगती करतो आहे. यामुळेच ६००० ते ९००० ट्रॅक्टर सध्या निर्यात होत आहेत. जॉन डिअर कंपनीचे संचालक मुकुल वार्ष्णेय सांगतात की, “जॉन डिअरच्या भारतीय प्रकल्पांमधून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ११० देशांमध्ये ट्रॅक्टर निर्यात होत आहे. उच्च गुणवत्ता आणि ग्राहकांची गरज अचूकपणे हेरल्यामुळे हे शक्य होते. विशेष म्हणजे एकाच प्रकल्पात निर्यातीचा ट्रॅक्टर आणि भारतीय शेतकऱ्यांना विकला जाणारा ट्रॅक्टर तयार असल्याने कोणताही भेद अथवा गुणवत्तेशी तडजोड होत नाही.” जगात १८३ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जॉन डिअर कंपनीची भारतातील ही ट्रॅक्टरविषयक नीती शेतकऱ्यांसाठी उपयुक्तच म्हणायला हवी. निर्यात प्रकल्पांमुळे देशात नवे तंत्रज्ञान, गुणवत्तावाढ, स्पर्धेला चालना मिळते. याशिवाय रोजगाराच्या संधीदेखील वाढतात. ट्रॅक्टर बाजारपेठेतील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरला आता केवळ शेतीमधील विविध कामे करणारा यांत्रिक सहायक राहिलेला नाही. तर स्वतःच्या शेतातील कामे आटोपल्यानंतर अन्य व्यावसायिक कामांसाठी त्याचा उपयोग होईल का, हे शेतकरी बारकाईने बघत आहेत. वाहतूक, खोदाई तसेच कस्टम हायरिंग अशा क्षेत्रात शेतकऱ्यांची नवी पिढी झपाट्याने उतरली आहे. त्यामुळेच आता भारतीय बाजारपेठेतही १२० अश्वशक्ती क्षमतेचे मोठे ट्रॅक्टर दिसत आहेत. आता ट्रॅक्टर चालवणाऱ्याच्या आरामदायीपणाचा विचार होत असून, वातानुकूलित (एसी) केबिनसह ट्रॅक्टरला मागणी वाढत आहे. ट्रॅक्टर उद्योगाचा आढावा १) गेल्या तीन वर्षांपासून भारतीय ट्रॅक्टर उद्योगाची वाटचाल समाधानकारक असून, गेल्या तीन वर्षांत साडेसहा लाख ते साडेआठ लाखांच्या दरम्यान ट्रॅक्टर विकले गेले आहेत. ट्रॅक्टर विक्रीचा वेग वाढत आहे. २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात आठ लाख ७८ हजार ट्रॅक्टरची विक्री झाली. आधीच्या हंगामापेक्षा १० टक्क्यांनी यात वाढ आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये ट्रॅक्टर विक्री (एकूण ६ लाख ६१ हजार) १५ टक्क्यांनी वाढली. २०१७-१८ मध्ये विक्री (एकूण ७ लाख ९६ हजार) २० टक्क्यांनी वाढली आहे. २) देशातील सर्वात जास्त ट्रॅक्टर विकणारी महिंद्रा कंपनीदेखील गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळामुळे स्थिर बनली आहे. देशाच्या ट्रॅक्टर बाजारात २०१७-१८ मध्ये महिंद्राचा वाटा ४१ टक्के होता आणि २०१८-१९ मध्ये हाच वाटा ४० टक्क्यांच्या आसपास आहे. गेल्या हंगामात महिंद्राने बाजारपेठेत ४० टक्के, टाफेने १८ टक्के, एस्कॉर्टने ११ टक्के तर सोनालिकाने १२ टक्क्यांच्या आसपास आपला वाटा ठेवला आहे. जॉन डिअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतिश नादीगर म्हणतात, की दक्षिण भारतात आमच्या जॉन डिअरची विक्री वाढत असून, पुणे प्रकल्पातून दक्षिण भारतासह मध्यप्रदेशातून उत्तर भारताची बाजारपेठ काबिज करण्याचे प्रयत्न आहेत. भारतीय बाजारपेठ ही मॉन्सूनवर अवलंबून आहे. मॉन्सूनचा एकूण परिणाम आताच सांगता येणार नसला तरी तेलंगणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रात दुष्काळी स्थितीमुळे बाजारपेठ काहीशी स्थिर राहील असे वाटते. आधुनिकतेकडे वाटचाल...

  • ट्रॅक्टर उद्योग पुढील दोन दशकात कमालाचा आधुनिक बनलेला असेल, असे तंत्रज्ञ सांगत आहेत. महिंद्राने ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर बाजारात आणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची धमाका उडवून दिला आहे. “शेतकऱ्याने केवळ ट्रॅक्टर चालवत किंवा त्याच्‍या मागे फिरून दिवस घालवणे योग्य नाही. त्याने अधिक उत्पादक कामांकडे लक्ष दिले पाहिजे. भविष्यातील ट्रॅक्टर हे एक प्रकारचे रोबोट असतील. त्यांना आखून दिलेली कामे ते रात्रंदिवस करीत राहतील. त्यासाठी जीपीएसची मदत घेतली जाईल. चालकाची आवश्यकता नसेल,” असे न्यू हॉलंड कंपनीच्या एका तंत्रज्ञाने स्पष्ट केले.
  • जॉन डिअर कंपनी आता ‘हॅन्डफ्री गायडन्स जीपीएस सिस्टिम’ची चाचणी घेत आहे. हे छोटे उपकरण कोणत्याही ट्रॅक्टरला लावता येईल. नांगरणी असो की इतर कोणतेही काम या उपकरणामुळे आपोआप होईल. ट्रॅक्टरवर चालक बसलेला असेल पण त्याला स्टेअरिंग फिरविणे किंवा रेषेत सरळ ट्रॅक्टर नांगरतो आहे की नाही हे बघण्याची गरज नाही.
  • देशातील विविध ट्रॅक्टर कंपन्या आता ट्रॅक्टरच्या हालचालीतील प्रत्येक टप्प्यात आधुनिक तंत्रज्ञान कसे आणता येईल, याचा मागोवा घेत आहेत. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पुरविताना जास्त शक्ती, कमी वजन आणि भरपूर सुविधा अशी त्रिसूत्री या कंपन्यांनी ठेवली आहे. ट्रॅक्टर उद्योगाचा झपाट्याने विकास होत असताना ट्रॅक्टरचलित यंत्रांचा उद्योग किंवा कृषी यांत्रिकीकरणाचा वेग संथ आहे, असेदेखील अभ्यासकांचे मत आहे.
  • “कृषी यांत्रिकीकरणाशिवाय देशाच्या शेतीमधील मजुरांची समस्या हाताळली जाणार नाही. दुर्देवाने सरकारी पातळीवर कृषी यांत्रिकीकरण म्हणजे केवळ ट्रॅक्टर व रोटाव्हेटर विकणे असा अर्थ लावला गेला आहे. कोट्यवधीचा सरकारी निधी यांत्रिकीकरणाच्या नावाखाली वाया जात आहे. हे बदलावे लागेल. भौगोलिक रचना, पीक पद्धतीनुसार आधुनिक यंत्रे शेतकऱ्यांना मिळवून दिली तरच कृषी यांत्रिकीकरणाचे धोरण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत जाईल. अन्यथा ते केवळ कागदावरचे अभियान ठरेल, असे पंजाबमधील ट्रॅक्टर बाजारपेठेच्या एका अभ्यासकाने स्पष्ट केले. अशी होती २०१८ मधील ट्रॅक्टर बाजारपेठ महिना- उत्पादन- विक्री(निर्यातीसहीत)- फक्त निर्यात जानेवारी.... ५३६८५.....५५९४८.... ६१९५ फेब्रुवारी.... ६०९६२ ... ५४५८९ ...६७८२ मार्च... ७५१७१ ...८३११४... ९८२७ एप्रिल... ७७०५२ .... ७३२६८ .... ७१६३ मे... ७९७२६ .... ७७८३८ ...८९३७ जून ...७९३०१ ....९६४८०... ८६६८ जुलै ..७३०९० ... ५९०३२... ६५६९ ऑगस्ट ८४६६६ ... ५३१६०... ८७७० सप्टेंबर ...८८३७९ ... ९७८९३... ९०७३ ऑक्टोबर... ९२४२२... १२०३१०... ७७५४ नोव्हेंबर... ७००७१... ६९१७२.... ६४७० डिसेंबर... ६२३१३ ...४८८६८ ....७०७२ ट्रॅक्टर बाजारपेठेची २०१९ मधील वाटचाल ः महिना- उत्पादन- विक्री(निर्यातीसहीत)- फक्त निर्यात जानेवारी... ७३२९५...... ५७४८८....... ६५२७ फेब्रुवारी... ५९६०४ ....५४२८१.......... ६७२१ मार्च... ५७६२९....... ७०६८६..... ८३७१ एप्रिल... ६८६२३ .....६२४९७..... ५१४२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com