बुरशींच्या संबंधाने वनस्पतींच्या गाली पसरेल लाली!

जेव्हा वनस्पतीच्या मुळाभोवती उपयुक्त बुरशींची वसाहत वाढू लागते, तेव्हा त्या पेशी किंवा स्नायू लाल रंगाच्या होणारी वनस्पती तयार करण्यात केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे.
बुरशींच्या संबंधाने वनस्पतींच्या गाली पसरेल लाली!
बुरशींच्या संबंधाने वनस्पतींच्या गाली पसरेल लाली!

जेव्हा वनस्पतीच्या मुळाभोवती उपयुक्त बुरशींची वसाहत वाढू लागते, तेव्हा त्या पेशी किंवा स्नायू लाल रंगाच्या होणारी वनस्पती तयार करण्यात केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. वनस्पतींच्या मुळांना अन्नद्रव्ये उचलण्यामध्ये मदत करणाऱ्या बुरशी प्रत्यक्ष त्या वेळीच पाहणे शक्य होणार आहे. जिवंत वनस्पतींच्या मुळांमध्ये होत असलेली ४०० दशलक्ष वर्षांपासून सुरू असलेली प्रक्रिया प्रत्यक्ष पाहणे आता शक्य होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे. हे संशोधन ‘जर्नल प्लॉस बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. कोणत्याही वनस्पतीची वाढ आणि विकास हा त्यांना जमिनीतून शोषलेल्या अन्नद्रव्यांवर अवलंबून असतो. जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण्याच्या प्रक्रियेमध्ये विविध सूक्ष्मजीव, बुरशी अत्यंत मोलाची भूमिका निभावतात. बहुतांश सर्व वनस्पतीचे या विशिष्ट प्रकारच्या बुरशींशी (त्यांना अर्ब्युस्कलर मायकोरायझा म्हणतात.) सहजीवी पद्धतीचे संबंध असतात. या बुरशी मुळांच्या पृष्ठभागावर वाढून त्यांना अन्नद्रव्ये उचलण्यास मदत करतात. नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेली अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उचलल्यास कृत्रिम खतांची आवश्यकता कमी होऊ शकते. सध्या ज्ञात असलेल्या प्रक्रिया जाणून, त्याला अधिक कार्यरत केल्यास त्यांचा फायदा पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठीही करता येईल. या प्रक्रियेचा केंब्रिज विद्यापीठातील सॅन्सबरी प्रयोगशाळेतील डॉ. सेबास्टियन स्कोरनॅक व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष वेळेवर अभ्यास करण्यासाठी नवीन तंत्र शोधले आहे. त्याविषयी माहिती देताना ते म्हणाले, की वनस्पती आणि बुरशी यांच्यातील नेमक्या संबंधांचा अभ्यास प्रत्यक्ष वेळेवर, जिवंत अवस्थेमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न होता. ही प्रक्रिया सूक्ष्मदर्शकाच्या वापराशिवाय पाहता येत नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. शेंगावर्गीय आणि तंबाखू अशा दोन प्रारूप वनस्पती अभियांत्रिकी पद्धतीने तयार केल्या. त्यात मायकोरायझा बुरशीच्या संपर्कात येताच रंग दर्शविणारे दोन जनुके त्यात वाढवण्यात आली. त्यामुळे मायकोरायझा बुरशी वनस्पतींच्या मुळावर वाढताच, त्याच वेळी बीटरूटमधील लाल रंगासाठी कारणीभूत असे रंगद्रव्य बिटालेन तयार होते. त्या लालसर रंगामुळे बुरशी वाढल्याचे त्वरित समजू शकते. सध्या या पद्धतीचा होतो वापर सध्या वनस्पतींच्या मुळावर वाढत असलेल्या बुरशींचा मागोवा घेण्यासाठी एक तर त्या काचेच्या पेटीमध्ये वाढवाव्या लागतात. किंवा प्रत्यक्ष जमिनीतून उपटून विविध रसायनांचा किंवा सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. हे दोन्ही प्रकार महागडे, वनस्पतींना इजा पोहोचवणारे आहेत. तसेच प्रत्यक्ष वेळेवर होणारी वाढ तपासता येत नाही. या नव्या संशोधनामुळे प्रत्यक्ष डोळ्याने वनस्पतीचे मूळ आणि बुरशीमध्ये असलेले सहजीवी संबंध पाहता येतात. डॉ. सॅम ब्रोकिंगटन यांनी सांगितले, की बीटरूट रंगद्रव्ये ही स्पष्टपणे दिसणारी असून, साध्या डोळ्यांनी पाहता येतात. ही नैसर्गिक रंगद्रव्ये असल्याने वनस्पती किंवा बुरशीद्वारे सहजतेने सहन केली जातात. ती अजिबात हानिकारक ठरत नाहीत. या नव्या साधनामुळे वनस्पती व बुरशीच्या प्रक्रियांचे निरीक्षण अत्यंत सोपे झाले आहे. मायकोरायझा बुरशीचे महत्त्व शेतीक्षेत्रामध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीने मायकोरायझा या उपयुक्त बुरशीने शास्त्रज्ञांचे लक्ष बऱ्याच वर्षांपासून वेधले आहे. ही बुरशी वेगवेगळ्या प्रकारच्या मातीमध्ये वेगवेगळ्या वनस्पतीसोबत सहजीवी पद्धतीने वाढते. ज्या वनस्पतींच्या मुळांवर त्यांची वसाहत वेगाने होते, त्या वनस्पतींची वाढ व विकास वेगाने होत असल्याचे पुढे आले आहे. भविष्यामध्ये पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जमिनीतील उपलब्ध किंवा दिल्या जाणाऱ्या अन्नद्रव्यांचे शोषण चांगल्या प्रकारे होण्यासाठी या सहजीवी बुरशी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मुळांवरील किंवा मुळांच्या परिसरातील वाढीमागील विविध घटकांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. यातून रासायनिक खतांचा वापरही कमी व नेमका करता येईल. जमिनी व पाण्याचे होणारे प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com