यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळ

यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळ
यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळ

हातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा विचार करून विज्ञान आश्रम या स्वयंसेवी संस्थेने हातसडीचा तांदूळ बनवणारे विद्युतचलीत यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र ग्रामीण भागातील युवा उद्योजक आणि महिला बचत गटांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. आरोग्य आणि आहाराविषयीच्या जागृतीमुळे हातसडीच्या तांदुळाला चांगली मागणी आहे. भात उत्पादक पट्यातील अनेक महिला बचत गट हाताने कांडून साळ काढतात. भाताच्या बाहेरील टरफलाखाली (साळी) पातळ लालसर रंगाचा थर असतो. भाताच्या जातीनुसार हा थर कमी जास्त आणि लाल ते तांबूस काळ्या रंगाचा असतो. सर्वसाधारणपणे भाताच्या वजनाच्या १० ते १२ टक्के कोंडा भातामध्ये असतो. कोंड्यामध्ये आहेत अन्नद्रव्ये ः स्वयंचलित विद्युत यंत्रचा उपयोग करून तांदूळ बनवताना पॉलिश करून पांढरेशुभ्र केले जाते आणि हा लालसर थर पूर्णपणे काढून टाकला जातो. खरेतर भाताच्या कोंड्यामध्ये पांढऱ्या शुभ्र तांदुळापेक्षा दुपटीने फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक आणि लोह सारखे घटक असतात. परंतु तांदूळ पॉलिश करताना ते काढून टाकले जातात. कर्बोदके आणि थोड्या प्रमाणात तंतुमय पदार्थ शिल्लक राहतात. हातसडी तांदूळ तयार करणारे यंत्र ः

  1. हातसडीच्या पद्धतीने तांदूळ तयार करण्याची प्रक्रिया कष्टाची आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा पॉलिश यंत्रामधून एकदा भात घालून निघालेला तांदूळ हातसडीचा म्हणून दिला जातो. या प्रक्रियेत साळेवर कमी प्रक्रिया होते आणि तांदळाची जास्त तूट होते.
  2. हातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा विचार करून विज्ञान आश्रम या स्वयंसेवी संस्थेने हातसडीचा तांदूळ बनवणारे विद्युतचलीत यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र ग्रामीण भागातील युवा उद्योजक आणि महिला बचत गटांना फायदेशीर ठरणारे आहे.
  3. हे यंत्र साधारणपणे घरातील पिठाच्या चक्कीच्या आकाराचे आहे. घरातील विद्युत प्रवाहावर (सिंगल फेज) एक अश्वशक्ती मोटरच्या सहाय्याने चालते.
  4. यंत्र क्षमता ताशी १५ ते २० किलो आहे. यंत्रामध्ये ८० ते ९० टक्के साळवर प्रक्रिया होते.
  5. यंत्रामध्ये रबरी जाती विशिष्ट प्रकारे बसवलेल्या आहेत. त्यामुळे भाताच्या कोंड्याची कोणतेही हानी न होता फक्त साळ वेगळी करण्यात येते. तांदळाचा तुकडा फक्त १ ते २ टक्के दिसून येतो. साळीचे टरफल व तांदूळ या आपोआप वेगळा होतो.
  6. हातसडीच्या तांदळात पोषक मूल्ये आणि कोंड्यात तेलाचे प्रमाण जास्त असल्याने त्याच्याकडे कीडे आकर्षित होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणात तांदूळ न भरडता, ग्राहकांच्या मागणीनुसार साळीवर प्रक्रिया करून विक्री करावी.
  7. आपल्याला गेली अनेक दशके पॉलिश भात शिजवून खाण्याची सवय आहे. त्यामुळे सुरवातीला तांदूळ अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून त्यानंतर कुकरमध्ये मंद आचेवर एक शिट्टी होईपर्यंत शिजवावा किंवा पाण्यामध्ये न भिजवता मंद आचेवर ४० मिनिटांपर्यंत शिजवावा.
  8. हातसडीचा तांदूळ विकताना ग्राहकांना भात शिजवण्याची योग्य माहिती दिली तर कायम स्वरूपी ग्राहक मिळू शकतो.
  9. यंत्राची किंमत साधारणपणे ६५,००० रुपये आहे.

संपर्क ः डॉ. योगेश कुलकर्णी, ९७३०००५०१६ (विज्ञान आश्रम, पाबळ, जि. पुणे)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com