नाशीवंत शेतीमालाच्या साठवणीसाठी आधुनिक शीतगृह

फळे आणि भाज्या उत्पादनामध्ये जाणवणाऱ्या विक्रीशी संबंधित उच्च विपणन खर्च, किमतीतील चढ-उतार इ. बहुतेक समस्यांसाठी शेतीमालाचा नाशवंतपणा जबाबदार आहे. हा शेतीमाल कमी तापमानात दीर्घकाळापर्यंत टिकू शकतो.
नाशीवंत शेतीमालाच्या साठवणीसाठी आधुनिक शीतगृह
नाशीवंत शेतीमालाच्या साठवणीसाठी आधुनिक शीतगृह

जागतिक पातळीवर भारत हा भाजीपाला व फळ उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. मात्र या उत्पादनाचे काढणीपश्‍चात होणारे नुकसान सर्वाधिक (सुमारे २५ टक्के ते ३० टक्के) आहे. त्यात उष्ण वातावरण, वाहतूक आणि हाताळणीतील हलगर्जी यामुळे होणारे नुकसान अधिक आहे. विशेषतः ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत उत्पादनांची गुणवत्ता खालावते. शीतगृहाची स्थिती ः देशात फळ आणि भाज्यांचे अंदाजे वार्षिक उत्पादन सुमारे १३० दशलक्ष टन (एकूण कृषी उत्पादनांच्या १८%) आहे. सुधारित, संकरित जाती, खतांचा वापर यासह आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनामध्ये वाढ होत आहे. अर्थात, विकसित देशांशी तुलना केली असताना प्रत्येक पिकांची उत्पादकता वाढविण्यास अद्याप भरपूर वाव आहे. मात्र काढणीपश्‍चात नुकसान, हानी टाळण्यासाठी शीतगृह आणि शीतसाखळी सुविधांची उभारणी यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कारण यामुळे उत्पादनाचा सुमारे २५ टक्के भाग आपण नक्कीच वाचवू शकतो. सध्या उपलब्ध शीतगृह सुविधा ही प्रामुख्याने बटाटा, सफरचंद, द्राक्षे, डाळिंब, फुले इ. उत्पादनांसाठी वापरली जाते. पदार्थांची साठवणूक आणि स्थिती कमी तापमानामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ व क्रियाशीलता कमी होते. त्यामुळे अन्न व अनेक पदार्थ, शेतीमाल यांची साठवण कमी तापमानात अधिक काळासाठी करता येते. सूक्ष्मजीवामध्ये जिवाणू, यीस्ट आणि बुरशी यांचा समावेश होतो. नैसर्गिक स्थितीत नाशीवंत पदार्थ जतन करण्याचा शीतकरण एक व्यावहारिक मार्ग आहे. उत्पादनाच्या प्रकारानुसार थंड तापमानाचे पेशींना इजा होऊन विपरीत परिणामही होऊ शकतात, त्यामुळे शीतगृहामध्ये योग्य तितके कमी तापमान ठेवण्याची आवश्यकता असते. उत्पादनांचे प्रमुख तीन गट : १) साठवणूक, वितरण आणि विक्रीच्या वेळी जिवंत असणारा शेतीमाल. उदा. फळे आणि भाज्या इ. २) सामान्यतः जिवंत नसलेले व काही प्रमाणात प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ. उदा. मांस आणि मासे उत्पादने इ. ३) नियंत्रित तापमानात साठवल्याने गुणवत्ता स्थिर राहणारे किंवा मूल्यवर्धन होणारे पदार्थ उदा. बिअर, तंबाखू, खांडसरी इ. तंत्रज्ञान पदार्थांच्या साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या खोलीचे वातावरण थंड करण्यासाठी शीतकरण प्रणालींचा वापर केला जाते. असे वातावरण दीर्घकाळ स्थिर ठेवण्यासाठीही उष्णता रोधक घटकांचा वापर त्याच्या उभारणीमध्ये केला जातो. अशा संपूर्ण व्यवस्थेस शीतगृह असे संबोधतात. शीतकरण प्रणाली सामान्यतः दोन तत्त्वांवर कार्य करते. १) वाफ शोषण प्रणाली (व्हीएएस) ः ही प्रणाली तुलनात्मकदृष्ट्या महाग असली तरी कामकाजासाठी ती किफायतशीर मानली जाते. यासाठी प्रारंभिक गुंतवणूक अधिक असली तरी दीर्घकाळासाठी वापरण्याची क्षमता लक्षात घेता पुरेपूर भरपाई शक्य होते. यामुळे ऊर्जा बचत आणि कमी देखभाल खर्च यामुळे दीर्घकालीन विचार करता फायदेशीर ठरते. तापमानाची आवश्यकता १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास या प्रणालीमध्ये काही मर्यादा येतात. शेतीमालासाठी विशेषतः बियाणे, आंबा वगळता अन्य अनेक फळे आणि भाज्यांच्या दीर्घ साठवणीसाठी यापेक्षा कमी तापमान आवश्यक असते. २) वाफ दबाव प्रणाली (व्हीसीएस) ः ही प्रणाली स्वस्त असून, साठवणगृहातील शीतकरण व्यवस्थेनुसार तीन प्रकार होतात. उदा. डिफ्यूझर, बंकर आणि फिन कॉइल. अ) डिफ्यूझर शीतकरण व्यवस्था तुलनेने महाग असते. जेव्हा साठवणगृहाची उंची कमी असताना तिची निवड करतात. या युनिटची देखभाल, चालवण्याचा खर्च जास्त आहे. ब) बंकर शीतकरण व्यवस्था सर्वांत स्वस्त आहे. साठवणगृहाची उंची साधारणपणे ११.५ मीटरपेक्षा जास्त असताना या व्यवस्थेला प्राधान्य दिले जाते. हे चालवण्याचा खर्च कमी आहे. क) फिन कॉइल व्यवस्था ही बंकर व्यवस्थेपेक्षा सुमारे ५ टक्क्यांनी महाग असली, तरी आणि उत्पादनांच्या साठवणुकीसाठी जास्त जागा उपलब्ध होते. ही व्यवस्था ऊर्जा कार्यक्षम असल्याने ऊर्जेवरील खर्चात बचत होते. खोलीची उंची ५.४ मीटर असलेल्या साठवणगृहासाठी उपयुक्त ठरते. शीतकरण प्रणालीमध्ये विविध रेफ्रिजंट्स वापर केला जातो. मात्र पर्यावरणासाठी हानिकारक विशेषतः जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरत असलेल्या रेफ्रिजंट्सवर २००८ पासून बंदी आलेली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक आधुनिक रेफ्रिजंट्सची निवड करावी. शीतगृहासाठी संगणक नियंत्रक शीतगृहातील तापमान स्थिर व एकाच पातळीवर ठेवण्यासाठी सातत्याने निरीक्षण व बदल करावे लागत. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे संगणकावर आधारित युटिलिटी मॉडेल शीतगृह तापमान नियंत्रणासाठी फायदेशीर ठरत आहे. या रचनेमध्ये तापमान शोधक युनिट, की-बोर्ड, डिस्प्ले युनिट, सिंगल चीप मायक्रो कॉम्प्युटर, व्होल्टेज मॉनिटरिंग सर्किट आणि रिले युनिट इ.चा समावेश केलेला असतो. सिंगल चीप मायक्रो कॉम्प्युटर अनुक्रमे प्रत्येक युनिट आणि सर्किटशी जोडले जाते. यामुळे स्वयंचलित पद्धतीने तापमानावर नियंत्रण ठेवले जाते. यात मानवरहित पद्धतीने डीफ्रॉस्टिंगही शक्य होते. व्होल्टेज मॉनिटरिंग सर्किट कंट्रोलरद्वारे यंत्रणा सुरू करणे, बंद करणे या क्रिया होतात. तापमानाचे हे निकष आपण आत साठवणीसाठी वापरावयाच्या पदार्थ किंवा शेतीमालानुसार ठरवावे लागतात. ही प्रणाली व्यावसायिक रेफ्रिजरेशन, शीतगृह उपकरणे आणि उद्योगातील रेफ्रिजरेशन सिस्टम, वैद्यकीय कारणांसाठी उपयुक्त ठरते. शीतगृहाचे आरेखन करताना...

  • शीतगृहाचे आरेखन करताना सामान्यत: तापमान भार या घटकांचा विचार केला जातो. म्हणजेच आतील तापमान कोणकोणत्या घटकांमुळे वाढू शकते, याचा विचार केला जातो. तापमान वाढीसाठी कारणीभूत घटक किमान पातळीवर ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.
  • भिंत, मजला आणि छत यांचे तापमान बाह्य उष्णतेमुळे वाढते.
  • भिंत, छत यावर सरळ पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण पाहिले जाते.
  • साठवणगृहाचा दरवाजा किती वेळा उघडला जाणार, याचाही अंदाज घेतला जातो. वारंवार दरवाजा उघडल्यामुळे आणि ताजी हवा आत येत राहिल्याने (हवेच्या समाकलनामुळे) तापमान भार वाढतो.
  • येणाऱ्या वस्तू, शेतीमालामुळे वाढणारा तापमान भार. (उत्पादन भार)
  • साठवलेल्या उत्पादनाच्या श्‍वसनामुळे वाढणारी उष्णता.
  • साठवणखोलीत काम करणाऱ्या कामगारांमुळे वाढणारी उष्णता. (किती लोक किती वेळेसाठी साठवणगृहात काम करणार?)
  • कुलर पंख्यामुळे वाढणारा भार. (फॅन भार)
  • उपकरणांमुळे वाढणारा भार.
  • शीतगृहामध्ये फळे आणि भाज्यांचे साठवणुकीचे वातावरण

    वस्तू तापमान  (अंश से.) सापेक्ष आर्द्रता  (टक्के)
    सफरचंद  -१ ते ३  ९० ते ९८
    जर्दाळू  -०.५ ते ०  ९० ते ९५
    ॲव्हाकॅडो  ७ ते १३  ८५ ते ९०
    शतावरी  ० ते २  ९५ ते ९७
    बीट रूट  ० ते २   ९५ ते ९७
    ब्रोकोली  ० ते २   ९० ते ९५
    ब्लॅक बेरी  -०.५ ते ०   ९५ ते ९७
    कोबी  ० ते २   ९० ते ९५
    गाजर  ० ते २   ९० ते ९५
    फुलकोबी  ० ते २   ९० ते ९५
    चेरी  ०.५ ते ०   ९० ते ९५
    काकडी  ७ ते १०   ९० ते ९५
    वांगे  ० ते २   ९० ते ९५
    द्राक्षे  -१ ते १   ८५ ते ९०
    लिंबू  ३ ते १०   ८५ ते ९०
    आंबा  ११ ते १८   ८५ ते ९०
    खरबूज   २ ते ४   ८५ ते ९०
    संत्रा  ० ते १०   ८५ ते ९०
    बटाटा  १.५ ते ४   ९० ते ९४
    पीच  -१ ते १   ८८ ते ९२

    वापराचे फायदे ः शीतगृहामध्ये नाशीवंत शेतीमाल, पदार्थ अधिक काळापर्यंत साठवता येतात. नाशीवंत पदार्थ खराब होण्याचे, विकृत होण्याचा दर कमी होतो. रहीम खान, ९३७१३७३३९९ (कनिष्ठ संशोधन सहायक, नाहेप प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com