agricultural stories in Marathi, Technowon, compressed biogas : opportunity or mirage? | Page 3 ||| Agrowon

कॉम्प्रेस्ड बायोगॅस ः सुवर्णसंधी की मृगजळ?

गजानन पाटील
बुधवार, 28 जुलै 2021

पुढील ५ वर्षांत गाड्यांमध्ये पेट्रोल, डिझेल यांचा वापर झपाट्याने कमी होऊन सीएनजी व विजेचा वापर वाढणार आहे, हे खरे. कोणताही प्रकल्प कागदावरील मांडणीमध्ये उत्कृष्ट दिसत असला तरी त्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकरी, गुंतवणूकदार, तंत्रज्ञांनी सर्व बाबींची खात्री करूनच आपला वेळ, पैसा, शेतजमीन यांची गुंतवणूक करावी.

पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे देशाचे व सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडत चालले आहे. सोबतच पेट्रोलजन्य घटकांच्या वापरामुळे होत असलेले प्रदूषण एखाद्या भस्मासुराप्रमाणे पर्यावरण, शेतजमिनी नापिक करण्यापर्यंत पोहोचले आहे. त्याला आळा घालण्यासाठी इंधनामध्ये बायो सीएनजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस - CBG) आणि स्फुरदयुक्त सेंद्रिय खत (PROM) यांच्या उत्पादनाकडे वळावे लागेल. हा वायू आपण सीएनजी वर चालू शकणाऱ्या वाहने, कारखाने, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये वापरता येतो. सध्या अशा प्रक्रिया उद्योगामध्ये (हॉटेल्स) एलपीजी किंवा डिझेल किंवा प्रोपेन यांचा वापर होतो.

सतत योजना :
केंद्रातील पेट्रोलियम मंत्रालयाने ऑक्टोबर २०१८ मध्ये सतत (SATAT -Sustainable Alternative Towards Affordable Transportation) ही योजना जाहीर केली. त्या अंतर्गत बायो सीएनजी निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादित सीएनजी विक्री व वितरण व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. बायो सीएनजीच्या माध्यमातून पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी करणे, उपलब्ध घनकचरा, ओला सेंद्रिय कचरा यापासून बायोगॅस मिळवून योग्य प्रक्रिया करणे, सेंद्रिय खतांची उपलब्धता वाढवणे, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती असे उद्देश आहेत.
२०२५ पर्यंत ५ हजार प्रकल्प संपूर्ण भारतभरात उभारण्याच्या उद्देशाने अंदाजे १,७५,००० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय हे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि., महाराष्ट्र नॅचरल गॅस लि., गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लि. आणि इंडियन ऑइल कार्पोरेशन लि. या कंपन्यांच्या माध्यमातून सीबीजीची वितरण प्रणाली उपलब्ध केली जाईल. वरील कंपन्या फक्त वितरण प्रणाली उपलब्ध करून देणार आहेत. ही खरेदीची हमी नव्हे, हे लक्षात घ्यावे. म्हणजेच जेवढा गॅस विकला जाईल त्या प्रमाणे उत्पादकाला पैसे मिळतील. या सर्व कंपन्या दररोज किमान २००० किलो सीबीजी उत्पादनाची मागणी करतात.

शेतकऱ्यांना संधी :

 • २००० किलो सीबीजी उत्पादनासाठी किमान ५० ते ६० टन कच्च्या मालाचा अखंडित पुरवठा आवश्यकता आहे. तांत्रिक मार्गदर्शन, यंत्रे, गुंतवणूकदार उपलब्ध होतील, मात्र कच्च्या मालाचा अखंडित पुरवठा हे एक मोठे आव्हान आहे.
 • ओला कचरा उपलब्ध होणाऱ्या पोल्ट्री फार्म, मोठे डेअरी प्रोसेसिंग फार्म, प्रेस मड, भाजीपाला व फळ बाजार व अन्न प्रक्रिया उद्योगातील शिल्लक अवशेष यापासून बायोगॅस बनवणे.
 • बायोगॅसमधील कार्बन डायऑक्‍साइड, हायड्रोजन सल्फाइड, सिलोक्सझेन हे व अन्य अशुद्ध घटक वेगळे करून मुख्य घटक -मिथेन वायू ९५ टक्क्यांपेक्षा शुद्ध केले जाते.
 • मिथेन २५० बार या उच्च दाबाखाली विशिष्ट टाक्यांमध्ये भरला जातो. या शुद्ध वायूला ‘बायो सीएनजी (सीबीजी) म्हणतात. केंद्र शासनाने ठरवलेले गुणवत्ता निकष पूर्ण करावे लागतात.
 • अशा प्रकारच्या प्रकल्प उभारणीसाठी कच्च्या मालाची किंमत ही प्रति किलो एक ते सव्वा रुपयापेक्षा जास्त असून चालणार नाही. साखर कारखान्यातील प्रेसमड कमी खर्चात उपलब्ध होऊ शकतो. पण त्याची उपलब्धता केवळ १८० ते २०० दिवस असल्याने पर्यायी विचार करावा लागेल. पर्याय म्हणून नेपियर ग्रास उत्तम ठरू शकतो. कारण तो चारा, पशुखाद्य आणि इंधन अशा तिन्हींसाठी उपयुक्त आहे.
 • हा प्रकल्प केवळ सीबीजीच्या उत्पन्नातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकत नाही. कारण सीबीजीचा उत्पादन खर्च हा किमान २८ रुपये प्रति किलो येतो. म्हणून या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या स्लरीपासून खत विशेषतः उच्च स्फुरदयुक्त खत - प्रॉम दाणेदार किंवा द्रवरूप बनवावे लागेल. त्याच्या विक्रीसाठी साखळी उभारावी लागेल. प्रॉम हे संपूर्ण सेंद्रिय असून, सध्या वापरल्या जाणाऱ्या डीएपी आणि एसएसपीला पर्याय म्हणून वापरता येते. (Fertilizer Control Order २०१२ नुसार प्रमाणित). महाराष्ट्र राज्यात वर्षाकाठी ४० लाख टन स्फुरदयुक्त खताचा वापर होतो, हे लक्षात घेतल्यास मागणीचा अंदाज येऊ शकतो.

बायोगॅसमधून निघणाऱ्या स्लरीला द्रवरूप खत म्हणून मान्यता मिळाली आहे. (केंद्र शासनाने ३१ मे २०२१ रोजी द्रवरूप खतांच्या निकषांतील बदलानुसार). वरील दोन्ही खते ही जमिनीच्या सुपीकतेसाठी फायद्याची ठरणार आहेत.

नेपियर गवतासाठी संधी :
नेपियर ग्रास हे चारापीक ऊर्जा पीकही मानले जाते. एकरी वार्षिक साधारण १०० ते १२० टन उत्पादन देते. एकदा लागवड केल्यानंतर पाच वर्षांपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता आहे. लागवडीसाठी सुरुवातीला प्रति एकर साधारणतः ५० हजार रुपये खर्च होतो. पुढील ५ वर्षे एकरी एक ते सव्वा लाख रुपये (अंदाजे) उत्पन्न मिळू शकते. १०० टन गवतापासून १२ हजार घनमीटर बायोगॅस मिळतो. पूर्ण शुद्धतेनंतर त्यातून ५ टन (५००० किलो) सीएनजी मिळतो. यासाठी बायोगॅस उभारणी, विशिष्ट प्रकारची शुद्धीकरण यंत्रणा व अति उच्च दाबाचा कॉम्प्रेसर व सीएनजी सिलिंडर्स इ.ची आवश्यकता असते. हे एकरी उत्पादनाचे वार्षिक गणित असून, दररोज ५ टन सीएनजी उत्पादनासाठी किमान ४०० ते ५०० एकर क्षेत्र आवश्यक असेल.

प्रकल्पाची थोडक्यात माहिती :
कच्चा माल ः १०० टन प्रतिदिन
प्रकार ः प्रेसमड किंवा नेपियर ग्रास
सीबीजी ः ५ टन प्रतिदिन
प्रॉम(PROM) ः २५ टन प्रतिदिन
द्रवरूप सेंद्रिय खत ः १ लाख लिटर प्रतिदिन
प्रकल्पासाठी जागा ः ६ एकर
किंमत ः ३० कोटी रुपये.

१०० टन प्रतिदिन प्रेसमड आधारित प्रकल्पाचा आर्थिक ताळेबंद :
क्षमता : १०० टन प्रतिदिन
बायोगॅस निर्मिती :१२००० घन मीटर प्रतिदिन
सीबीजी निर्मिती : ४८००-५००० किलो प्रतिदिन
दाणेदार (स्फुरद युक्त) खतनिर्मिती : २५ हजार किलो प्रतिदिन
द्रवरूप खतनिर्मिती : १ लाख लिटर प्रतिदिन
प्रकल्प खर्च : ३० कोटी रुपये
प्रकल्पाला मिळणारे शासकीय अनुदान : ४ कोटी
सीबीजी विक्री किंमत : रुपये ४६/- प्रति किलो
PROM विक्री किंमत : रुपये १२/- प्रति किलो
द्रवरूप खत विक्री किंमत : रुपये १/ प्रति लिटर
मिळणारी उत्पन्न :
गॅस विक्रीतून : ४६ रु. / किलो × ५००० किलो × ३५० दिवस = ८०० लाख / वर्ष
PROM विक्रीतून : १२ रु. / किलो × २५००० किलो × ३५० दिवस = १०५० लाख / वर्ष
द्रवरूप खत विक्रीतून : १ रु. / लिटर × १०० घन मीटर × २०० दिवस = २०० लाख / वर्ष
अपेक्षित नफा :
एकूण मिळणारी रक्कम = २० कोटी रुपये / वर्ष
दैनंदिन कामे, देखभाल व अन्य खर्च = १० कोटी रु. / वर्ष
अपेक्षित निव्वळ नफा = १० कोटी रु. / वर्ष

तथ्य जाणून मृगजळापासून दूर राहा...

 • १०० टन प्रतिदिन नेपियर ग्रास प्रकल्पासाठी ५०० एकर क्षेत्र पुरेसे होऊ शकेल. प्रत्येक एक एकर या प्रमाणे ५०० शेतकरी एकत्र येऊन लागवड करणे शक्य आहे. उत्पादित ५ टन सीबीजीची विक्री आपल्या तालुक्यामध्ये शक्य होईल. प्रकल्पास सेंद्रिय खत व द्रवरूप खत यांच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळेल.
 • कोणताही प्रकल्प कागदावरील मांडणीमध्ये उत्कृष्ट दिसत असला तरी त्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकरी, गुंतवणूकदार, तंत्रज्ञांनी सर्व बाबींची खात्री करूनच आपला वेळ, पैसा, शेतजमीन यांची गुंतवणूक करावी.
 • कोणताही आर्थिक जोखीम उचलण्याचा निर्णय घेण्यापूर्वी या क्षेत्रात कार्यरत शासनमान्य तज्ज्ञ मंडळी, शासकीय संस्था उदा. महाऊर्जा, पुणे, ऊर्जा मंत्रालय -एमएनआरइ, न्यू दिल्ली व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे यांच्याकडून सर्व बारकावे जाणून घ्यावेत.
 • सध्या काही कंपन्या १०० टन प्रति दिवस सीएनजी उत्पादनासाठी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये प्रकल्प लावण्यासंदर्भात पत्रकबाजी करत आहे. यात १०० टन म्हणजेच एक लाख किलो सीएनजी प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्प उभारणी करण्याविषयी सांगत दहा हजार शेतकरी जोडणार असल्याचे सांगते. सभासद शेतकऱ्यांनी नेपियर ग्रास (हत्ती गवत) उगवून, कंपनीला आणून द्यायचे. सदर कंपनी त्यातून बायो सीएनजी बनवणार. निर्माण होणारे खत शेतकऱ्यांनाच विकणार असा प्रकल्प मांडत आहे. मात्र यातून तयार होणाऱ्या प्रति दिन १०० टन सीबीजी विक्री कोठे होणार? दररोज १०० टन सीबीजीचा खप असणारा एकही तालुका किंवा जिल्हा सध्यातरी नाही. पुणे किंवा मुंबई सारख्या शहरात सीबीजीला मागणी असली, तरी १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची वाहतूक परवडत नाही. कारण एका ट्रकवर कमाल २००० किलो सीबीजी आपण वाहून नेऊ शकतो. हे लक्षात ठेवावे. कोणत्याही मृगजळाच्या मागे धावू नका.
 • पुढील ५ वर्षांत गाड्यांमध्ये पेट्रोल, डिझेल यांचा वापर झपाट्याने कमी होऊन सीएनजी व विजेचा वापर वाढणार आहे, हे खरे. पण आपण स्वतः कोणत्याही फसवणुकीच्या गर्तेत अडकणार नाही, याची काळजी घ्या. केवळ ऊस, सोयाबीन वर अवलंबून राहण्यापेक्षा हा भविष्यात चांगला पर्याय ठरेलही. पण शेतकरी बांधवांनी सध्या पूर्ण विचारांती पावले टाकावीत.

(लेखक ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.चे कार्यकारी संचालक आहेत.)


इतर टेक्नोवन
एकात्मिक पद्धतीने कमी करता येईल ...विनामशागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये...
नवे अन्न गोठवण तंत्र वाचवेल प्रचंड ऊर्जागोठवलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी...
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्रमहाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
पिकाच्या गरजेवेळीच पाणी देणारे ‘ग्रो...आपण पिकाला पाणी कधी देतो? पिकाला गरज असताना की...
परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी...परागवाहकांसाठी सुरक्षित जागा असे म्हटल्यावर...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
केळी पिठापासून नावीन्यपूर्ण पदार्थ...केळी ताजी खाण्यासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित...
मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे...सातत्याने बदलत असलेल्या वातावरणात कृषी...
तलावातील शास्त्रीय मत्स्यपालनातून वाढले...बराकपूर (कोलकाता) येथील केंद्रीय भूजलाशयीन मत्स्य...
स्मार्टफोन स्क्रीनवर तपासता येईल माती,...केवळ फोन करणे किंवा गेम खेळण्यापेक्षाही...
पिकांच्या काढणीसाठी ‘रिपर बाइंडर’पारंपरिक पद्धतीने पिकांच्या काढणीसाठी एकरी १० ते...
मका मुळांची वाढ, कोन ठरवणारे जनुक ओळखलेमुळाची वाढ होताना त्यांचा कोन निर्धारित करण्याचे...
वातावरण नियंत्रणासाठी फॉगिंग तंत्राचा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ते तापमान, आर्द्रता...
अशोक कोळपे ठरतेय शेतकऱ्यांना उपयोगीशेतीत मजूर ही सर्वात मोठी समस्या ठरत असून...
सौरऊर्जेवर कार्यरत सूक्ष्मजीव पुरवतील...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट सौरऊर्जेवर अधिक...
बुरशींच्या संबंधाने वनस्पतींच्या गाली...जेव्हा वनस्पतीच्या मुळाभोवती उपयुक्त बुरशींची...
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सूक्ष्मजीवांच्या साह्याने बनवले...अमेरिकेतील सेंट लुईस येथील वॉशिंग्टन...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
नत्राच्या वापराबाबत अचूक सूचना देणारे...कोणत्याही पिकाच्या व्यवस्थापनामध्ये वापरल्या...