गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा दर्जा फुलशेतीला मिळू लागला आहे.
टेक्नोवन
कृषी क्षेत्रामध्ये महिला अनुकूल यंत्रे, अवजारांचा विकास आवश्यक
प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान कौतुकास्पद असून, कृषी क्षेत्रामध्येही त्यांचा वाटा मोठा आहे. मात्र त्यांच्या कष्ट, अडचणी आणि क्षमता किंवा एकूणच शारीरिक संरचना यांचा विचार अवजारे, यंत्रे आणि तंत्रज्ञान निर्मितीमध्ये फारसा होताना दिसत नाही. खास महिलांच्या कामाच्या दृष्टीने आधुनिक यंत्रांची निर्मिती करणे गरजेचे आहे.
प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान कौतुकास्पद असून, कृषी क्षेत्रामध्येही त्यांचा वाटा मोठा आहे. मात्र त्यांच्या कष्ट, अडचणी आणि क्षमता किंवा एकूणच शारीरिक संरचना यांचा विचार अवजारे, यंत्रे आणि तंत्रज्ञान निर्मितीमध्ये फारसा होताना दिसत नाही. खास महिलांच्या कामाच्या दृष्टीने आधुनिक यंत्रांची निर्मिती करणे गरजेचे आहे.
पारंपरिक शेतीमध्ये प्रामुख्याने मानवचलित किंवा पशूचलित साधनांचा वापर केला जात असे. अलीकडे त्यात आधुनिकीकरण होत असून, यांत्रिक आणि विद्युत ऊर्जा स्रोतांचा वापर विविध कृषी कार्यांसाठी होऊ लागला आहे. आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर, इलेक्ट्रिक मोटर्स, डिझेल इंजिन यांचा वापर वाढला आहे. अशा कृषी संसाधनाद्वारे व ऊर्जा स्रोतांद्वारे सुमारे १२ कोटी कृषी यंत्रे किंवा उपकरणे चालवली जातात. कृषी क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या मानवचलित उपकरणांची संख्या सुमारे ४० कोटी आहे. देशातील ५५ टक्के कामगार शेतीमध्ये काम करत असून, त्यापैकी ३७ टक्के महिला आहेत. या सर्वांचा पीक उत्पादन आणि काढणीपश्चात प्रक्रियेच्या कामात सहभाग असतो. मागील वाढीचा दर आणि बदलत्या सामाजिक-आर्थिक बाबींचा विचार केल्यास २०२० च्या एकूण कामगारांमधील शेतमजुरांचे प्रमाण कमी होऊन ४१ टक्के होईल. त्यापैकी सुमारे ४५ टक्के महिला शेतमजूर असतील. या आकडेवारीवरून शेतीमधील पुरुष श्रमिकांची संख्या कमी होऊन महिला श्रमिकांची संख्या वाढत आहे.
भविष्यामध्ये विविध उद्योगांमध्ये स्वयंचलित कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त यंत्रे, उपकरणांचा वापर वाढत आहे. अशा मानवाद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्वयंचलित यंत्राचे नियंत्रक म्हणून सुमारे २० टक्के पुरुष कामगार असतील. मात्र अशा आधुनिक यंत्राचे चालक म्हणून महिला कामगारांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. नजीकच्या भविष्यात (२०२२ पर्यंत) पुरुष कामगारांपैकी ३०-३५ टक्के, तर स्त्री कामगारांपैकी यंत्र नियंत्रक म्हणून कार्यरत असतील.
भारतातील सुमारे ८५ टक्के शेतकऱ्यांची जमीनधारणा २ हेक्टरपेक्षा कमी आहे. कृषी क्षेत्रातून नोकरीच्या निमित्ताने पुरुष उद्योग व सेवा क्षेत्रात पर्यायाने शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. म्हणूनच कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच, महिलांद्वारे चालवली जाणारी कृषी साधने आणि उपकरणाचा विकास अशाच वेगाने होण्याची आवश्यकता आहे. भारतीय शेतीमध्ये वेगाने बदलत होत असले, तरी महिलांकडून केल्या जाणाऱ्या कामात फारसा बदल झालेला दिसत नाही. पुरुष आणि स्त्रिया यांची शारीरिक रचना आणि क्षमता यांच्यात वेगळ्या आहेत. या वैशिष्ट्यांचा विचार करून महिलांसाठी योग्य कृषी उपकरणे विकसित केली पाहिजेत. यंत्राचे आरेखन महिला चालकांच्या दृष्टीने झाल्यास त्यांची उपयुक्तता वाढेल. महिलांच्या कष्टात बचत होऊन त्यांच्या सक्षमीकरणास मदत होईल.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विविध संस्था (उदा. केंद्रीय कृषी महिला संस्था, भुवनेश्वर; केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था (सीआयएई), भोपाळ इ.) विविध कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत प्रकल्प (उदा. श्रम विज्ञान आणि शेतीत सुरक्षितता (AICRP-ESA), आणि गृहविज्ञान विभाग इ.) या द्वारे महिलांसाठी उपयुक्त साधने, उपकरणे विकसित केली जातात. त्यामध्ये सायकल कोळपे (व्हील हो), मानवचलित आणि बॅटरी पेरणी यंत्र (सीडर), बॅटरीचलित तणकाढणी यंत्र, बॅटरीचलित पालेभाजी कापणी यंत्र, बीजप्रक्रिया ड्रम, चार ओळींचे ड्रम सीडर, तीन ओळींचे भात लावणी यंत्र, कोनो वीडर, भुईमूग स्ट्रिपर, नारळ सोलणी यंत्र, भुईमूग फोडणी यंत्र, मका सोलणी यंत्र, फळतोडणी यंत्र, मानवचलित रिज मेकर, भेंडी तोडणी यंत्र, सुलभा बॅग अशा अनेक यंत्र, अवजारांचा समावेश आहे.
प्रसारासाठी अधिक प्रयत्न आवश्यक
- यंत्रे अवजारांच्या निर्मितीसोबतच त्यांचा वापर, देखभाल, दुरुस्ती यांचे प्रशिक्षणही देणे आवश्यक असते.
- ग्रामीण भागातील अधिक जाचक सामाजिक-सांस्कृतिक बंधनामुळे महिला शेतमजूर क्वचितच स्वतःहून पुढे येतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गावपातळीवर अधिक प्रयत्न केले गेले पाहिजेत. अशी प्रशिक्षणे शक्यतो गावातच किंवा पंचक्रोशीमध्ये घेतली जावीत. प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीमध्ये केंद्र, राज्य सरकारसोबतच स्थानिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा. अशी केंद्रे चालवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेता येईल.
- प्रशिक्षणाच्या ठिकाणी महिलांसाठी पूरक अशा मूलभूत सुविधा असाव्यात.
- -प्रशिक्षणामध्ये शिकलेल्या यंत्रे, उपकरणे किंवा अवजारांचा वापर प्रत्यक्ष शेतावर करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या गेल्या पाहिजे. त्या सोडविण्यासोबतच आवश्यक वाटल्यास यंत्राच्या संरचनेमध्ये योग्य त्या सुधारणांसाठी आग्रही राहिले पाहिजे.
- कृषी विस्तार सेवेमध्ये पुरुषांचा वरचष्मा आहे. महिला विषय तज्ज्ञ, महिला विस्तार कर्मचारी यांचे प्रमाण वाढवले जावे.
- महिला अनुकूल उपकरणाच्या निर्मितीसाठी उद्योजक, उत्पादक या प्रोत्साहन दिले पाहिजे. आवश्यकतेप्रमाणे निर्मिती, उत्पादन सुनिश्चित केल्यानंतर ग्रामीण भागापर्यंत त्यांची उपलब्धताही होईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. आवश्यक त्या प्रमाणात विविध माध्यमातून ही माहिती शेतकरी, महिलांपर्यंत पोहोचवली पाहिजे.
- स्थानिक, विभागीय, तालुका पातळीवर विविध प्रदर्शनांमध्ये अशा यंत्र, उपकरणे उत्पादकांना स्थान मिळावे. त्यातून विविध उपकरणे महिलांपर्यंत पोहोचू शकतील.
- -कृषी उपयोगी साधनांच्या खरेदीसाठी ग्रामीण महिलांना विशेष सवलती दिल्या जाव्यात. खरेदीसाठी बँका व अन्य वित्तीय संस्थाकडून आवश्यक तेव्हा कमी व्याजाने कर्जाची उपलब्धता केली जावी.
डॉ. रश्मी बंगाळे, ०९६५७८८१७६६
(कृषी अभियांत्रिकी, इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय, रायपूर, छत्तीसगड)
- 1 of 23
- ››