परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी सुरक्षित अवकाश’

खऱ्या अर्थाने परागवाहक असलेल्या बंबल बी या माश्यांच्या सुरक्षिततेसाठी एक्स्टर विद्यापीठातील संशोधकांनी शेतकरी आणि शेती व्यवस्थापकांच्या साह्याने आभासी सुरक्षित अवकाश (व्हर्च्युअल सेफ स्पेस) हे साधन विकसित केले आहे.
परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी सुरक्षित अवकाश’
परागवाहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘आभासी सुरक्षित अवकाश’

परागवाहकांसाठी सुरक्षित जागा असे म्हटल्यावर आपल्याला एखादे शेत किंवा बाग याचे चित्र डोळ्यासमोर येईल. मात्र खऱ्या अर्थाने परागवाहक असलेल्या बंबल बी या माश्यांच्या सुरक्षिततेसाठी एक्स्टर विद्यापीठातील संशोधकांनी शेतकरी आणि शेती व्यवस्थापकांच्या साह्याने आभासी सुरक्षित अवकाश (व्हर्च्युअल सेफ स्पेस) हे साधन विकसित केले आहे. आजूबाजूला असलेल्या परिस्थितीनुसार एखाद्या ठिकाणाची मधमाश्यांच्या दृष्टीने उपयुक्तता बदलू शकते. एखाद्या ठिकाणी भरपूर फुले असूनही मधमाश्या किंवा बंबल बी येत नसल्याचे दिसून येते. मधमाश्यांच्या वसाहतींनी तग धरणे, त्यांची वाढ होणे यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. अशा वेळी अशा व्यक्ती आणि संस्थांना मदत होईल, अशा प्रकारची आधुनिक साधने विकसित करण्याचा प्रयत्न इंग्लंड येथील एक्स्टर विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यांनी एखाद्या जागेवर बंबल बीच्या वसाहती कशा प्रकारे सुरक्षित राहतील, या दृष्टीने योग्य ते निर्णय घेण्यास मदत करणारे ‘बी स्टेवॉर्ड’ हे साधन तयार केले आहे. या साधनाद्वारे संगणकीय सिम्युलेशन द्वारे बंबल बी च्या तग धरण्याच्या स्थितीचा अंदाज घेता येतो. या साधनाचा वापर संशोधक, शेतकरी, धोरणकर्ते वेगवेगळ्या जमिनीच्या मधमाशी उपयुक्ततेच्या दृष्टीने तपासणीसाठी करू शकतात. त्याविषयी माहिती देताना एक्स्टर विद्यापीठाच्या पर्यावरण आणि शाश्‍वतता संस्थेचे डॉ. ग्रेस ट्विस्टन- डेव्हिस यांनी सांगितले, की मधमाश्यांची संख्या वेगाने कमी होत असल्याचे सर्वांना ज्ञात आहे. त्याचा फटका पिकांना आणि जंगली फुलांनाही बसणार आहे. ‘बी स्टेवॉर्ड’ हे ऑनलाइन साधन सर्वांसाठी मोफत असून, त्यातून बंबलबीवर परिणाम करणाऱ्या विविध गुंतागुंतीच्या घटकांचा एकाच वेळी विचार करणे शक्य होते. त्यातून मधमाश्यांना उपयुक्त ठरणाऱ्या व्यवस्थापन पद्धतींचा पर्याय निवडणे शक्य होते. या संशोधनपूरक सॉफ्टवेअरची माहिती ‘मेथड्स इन इकॉलॉजी अॅण्ड इव्हॅल्युएशन’ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. प्रत्यक्षामध्ये प्रत्येक जमिनीच्या वेगवेगळ्या घटकांसाठी तपासणी करण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्या ऐवजी एक्स्टर विद्यापीठातील संशोधकांनी बीहॅव (मधमाश्यांसाठी) आणि बंबल बीहॅव (बंबल मधमाश्यांसाठी) अशी दोन संगणकीय प्रारूप तयार केले आहेत. त्याचा वापर करून सामान्य माणसेही जमिनी, शेते किंवा जंगले यांची परागवाहकांच्या योग्य अयोग्यतेची चाचणी घेऊ शकतात. सध्या बंबल बी संवर्धन ट्रस्ट कडून ‘बी स्टेवॉर्ड’चा वापर कॉर्नवेल येथील बंबल बी आणि शेती व्यवसायाच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी करत आहे. त्यांनी आजवर १५०० हेक्टर क्षेत्राचे परीक्षण केले आहे. या क्षेत्रामध्ये इंग्लंडमधील बंबल बी प्रजातींची वाढ, वर्तन आणि तग धरण्याचा विचार केला गेला. ‘बी हॅव’ प्रारूपांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गटाच्या प्रमुख प्रो. ज्युलिएट ओसबोर्न यांना २०१७ या वर्षाचा बीबीएसआरसी सोशल इनोव्हेटर हा पुरस्कार मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com