कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान तंत्रज्ञान

पारंपरिक हळद प्रक्रियेमध्ये १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. त्याच प्रमाणे ही प्रक्रिया वातावरणावर अवलंबून असल्याने त्याचा दर्जाबाबत खात्री देता नाही. मात्र नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हीच प्रक्रिया १२ ते २४ तासांमध्ये पूर्ण होते. त्यातून मिळणाऱ्या कुरकुमीनचे प्रमाणही वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे.
 कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान तंत्रज्ञान
कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान तंत्रज्ञान

* १२ ते २४ तासांत ओल्या हळदीपासून भुकटी शक्य * हळदीप्रमाणेच आले, कांदा, लसूण प्रक्रियाही शक्य बदलत्या वातावरणात शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. त्यातही जमिनीच्या पोटात रुजणाऱ्या हळद, आले, कांदा, लसूण यांकडे त्यांचा कल दिसत आहे. कारण अवकाळी पाऊस, वादळवारा, गारपीट व त्या अनुषंगाने वाढणारे रोगांचे प्रमाण यांपासून या पिकामध्ये बऱ्याच अंशी शेतीमालाचे रक्षण होते. या मूळवर्गीय पिकांच्या विक्रीसाठी नावाजलेल्या बाजारपेठाही महाराष्ट्रामध्ये सांगली, वसमत, हिंगोली, लासलगाव, नाशिक अशा ठिकाणी उपलब्ध आहेत. स्थानिकांच्या आहारामध्ये समावेश असलेल्या या शेतीमालांना परदेशातूनही मागणी वाढत आहे. आले, हळद ः जागतिक एकूण उत्पादनापैकी सुमारे ८० टक्के हळदीचे उत्पादन भारतात होते. मात्र त्यापैकी फक्त १५ ते २० टक्के हळद निर्यात होते. राज्यामध्ये हळद पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून, उत्पादन ४२,५०० मे. टन इतके होते. पारंपरिक पद्धतीने प्राथमिक प्रक्रिया करून ओल्या हळदीपासून हळकुंड आणि आल्यापासून सुंठनिर्मिती केली जाते. अनेक उद्योजक हळकुंडापासून भुकटी तयार करून आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध करून देत आहेत. सामान्यपणे शेतकऱ्यांना बाजार समितीत मिळालेल्या हळकुंडाच्या दरापेक्षा (सरासरी सहा ते दहा हजार रु. प्रति क्विंटल) ते दुप्पट ते तिप्पट दराने (१५ ते २० हजार रु. प्रति क्विंटल) विक्री करतात. हळदीतील कुरकुमीन, आल्यापासून तेल (जिंजरॉल), कांदा व लसणामधील अॅलिसिन, थाओसल्फीनेट हे सक्रिय घटक (अल्कलॉईड) वेगळे केल्यास त्यांना औषधी उद्योग आणि खाद्य प्रक्रिया उद्योगामध्ये मोठी मागणी आहे. हे सक्रिय घटक वेगळे मिळविण्यासाठीही हळकुंड, आले वाळवले जाते. हळदीतील कुरकुमीन हे नैसर्गिक रंग म्हणून खाद्यपदार्थात व सूती कपड्यांना रंग देण्याकरिता होतो. कांदा, लसूण ः कांदा व लसूण उत्पादनात भारताचा चीननंतर जगात दुसरा क्रमांक आहे. त्यांची लागवड अनुक्रमे ११ व २ लाख हेक्टर आहे. महाराष्ट्रात कांद्याची लागवड सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्रावर असून, त्यातून साठ लाख मे. टन कांदा उत्पादित होतो. सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर चाळीस हजार मे. टन इतके लसूण उत्पादन घेतले जाते. कांदा व लसूण हा नाशवंत शेतीमाल आहे. साठवणीदरम्यान शेतकऱ्यांचे सुमारे २५ ते ३५ टक्के नुकसान होते. हे नुकसान प्रक्रियेद्वारे वाचवणे शक्य आहे. वास्तविक कांदा व लसूण यांच्या मूल्यवर्धित पदार्थांची जागतिक मागणी दोन लाख टन इतकी असूनही सद्यपरिस्थितीमध्ये भारतात केवळ पंधरा हजार टनांवरच आपण प्रक्रिया करत आहोत. भारतातही कांदा, लसूण प्रक्रियेचे मोठे उद्योग हे गुजरात राज्यातील निमच येथे आहेत.      महाराष्ट्रातील हळद लागवडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता, हळद प्रक्रियेसाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. त्याची शिफारस कृषी विद्यापीठाच्या संशोधन समितीने २००९ मध्ये केली. त्याच वर्षी विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा सुरक्षेकरिता नोंदणी अर्ज पेटंट कार्यालयाकडे करण्यात आला. पारंपरिक हळद प्रक्रियेमध्ये हळद शिजविणे, उघड्यावर वाळविणे, पॉलिश करणे इ. प्रक्रियांचा समावेश असतो. यासाठी सुमारे १२ ते १५ दिवस लागतात. उन्हामध्ये वाळवण्याच्या प्रक्रियेत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे व्यत्यय येऊ शकतो. तयार होणाऱ्या हळदीच्या दर्जामध्ये घट होऊ शकते. नव्या तंत्रज्ञानामध्ये या पारंपरिक प्रक्रिया पद्धतीला फाटा देण्यात आला आहे. यामुळे सुमारे १५ दिवसांची प्रक्रिया १२ तासांपर्यंत कमी करणे शक्य झाले. काय आहे हे तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान हळदीच्या पेशीतील विकरांची (एंझाईम्स) क्रिया थांबविण्यावर आधारीत आहे. त्याकरिता एक विशेष संयंत्र (बायो-रिॲक्टर) विकसित करण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रिया स्वच्छ, आरोग्यवर्धित व कमीत -कमी वेळेत करण्यासाठी विविध यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला आहे. ओल्या हळदीवर प्रक्रिया करून भुकटी तयार करण्याच्या पाच पायऱ्या आहेत. १) शेतातील काढलेली कच्ची हळद ब्रश रोलर असलेल्या यंत्राने स्वच्छ केली जाते. २) कापणी किंवा तुकडे करण्याच्या यंत्राने ओल्या हळदीचे योग्य आकाराचे तुकडे किंवा काप केले जातात. हळदीतून कुरकुमीन वेगळे करायचे असल्यास तुकडे करणे योग्य ठरते. मात्र भुकटी करावयाची असल्यास काप करणे हितावह ठरते. कारण वाळवल्यानंतर अगदी साध्या घरगुती मिक्सरमध्येही भुकटी करणे शक्य होते. भविष्यात हवाबंद पॅकिंगमध्ये हळदीचे काप उपलब्ध करणेही शक्य होईल. घरगुती ताजी हळद महिला स्वतः तयार करून घेऊ शकतील. ३) हळदीच्या पेशीतील विकरांची क्रिया थांबविणे, ही महत्त्वाची पायरी आहे. त्याकरिता बायो-रियाक्टर ओल्या हळदीचे तुकडे किवा काप यावर विशिष्ठ तापमानात एक तासाकरिता प्रक्रिया केली जाते. बायोरिॲक्टरमध्ये वाफ हळदीच्या थेट संपर्कात येऊ दिली जात नाही. या प्रक्रियेमुळे हळदीचा मूळ रंग, चव, गंध यामध्ये वाळविल्यांवरही कोणताच फरक पडत नाही. ४) या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्वांत जास्त वेळ हा हळद तुकडे किंवा काप सुकविण्यासाठी लागतो. उन्हामध्ये वाळवण्याऐवजी नव्या तंत्रज्ञानामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार योग्य त्या क्षमतेच्या व प्रकाराच्या वाळवण यंत्राची निवड करावी. बाजारात मध्यम किमतीच्या ट्रॉली आधारित ट्रे-ड्रायरपासून तर खर्चिक बेल्ट आधारित कंटिन्युअस टनेल ड्रायरही उपलब्ध आहेत. आपली प्रक्रियेची गरज आणि आर्थिक गुंतवणुक क्षमता यानुसार ड्रायरची निवड करू शकतो. ५) पुढील टप्प्यामध्ये वाळवलेल्या कापापासून भुकटी केली जाते. त्यासाठी फक्त ५ एच. पी. वर चालणारे दळण यंत्र वापरू शकतो. पिन मिल वापरल्यास अतिउत्तम. यात हळकुंडापासून भुकटी करण्याकरिता एकूण ४० एच. पी. क्षमतेची दोन यंत्रे लागतात. गुंतवणूक ः प्रति दिन २.५ टन ओल्या हळदीवर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाच्या यंत्रसामग्रीसाठी सुमारे एक कोटी रुपये इतकी गुंतवणूक अपेक्षित आहे. ओली हळद ही वर्षातील साधारणपणे चार ते पाच महिने उपलब्ध असते. त्यामुळे उर्वरित कालावधीत यंत्रणा कार्यक्षमपणे वापरली जाण्यासाठी या सोबत थोडी अधिक यंत्रे घेतल्यास या प्रकल्पामध्ये कांदा, लसूण स्वच्छ करणे, वाळवणे, भुकटी तयार करणे किंवा पेस्ट तयार करणे अशी अधिक उत्पादने तयार करता येतात. त्यातून एकूण प्रकल्पाची गुंतवणूक लवकर वसूल होऊ शकते. या प्रकल्पाचा ब्रेक इव्हन पॉइंट तीन वर्षे इतका आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने निव्वळ फायद्यांमध्ये वाढ होते. प्रकल्पासाठी सुमारे अर्धा एकर जागा पुरेशी असून, ३५०० वर्गफूट शेड अपेक्षित आहे. आपल्या साठवण गरजेनुसार वेगळे शेड करावे लागतात. प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

  •  संपूर्ण आरोग्यवर्धित यांत्रिक प्रक्रिया
  • किमान वेळेत प्रक्रिया होत असल्याने अधिक शेतीमालावर प्रक्रिया शक्य.
  • ओली हळद, आले, लसूण, कांदा यांचे थेट काप किंवा भुकटीत रूपांतर.
  • कापापासून मिळणाऱ्या भुकटी उताऱ्यात वाढ.
  • हळदीतील कुरकुमीनचे प्रमाण पारंपरिक पद्धतीपेक्षा दीड पट जास्त. (> ५%).
  • मूळ रंग, वास, चव यामध्ये कोणताच बदल होत नाही.
  • आर्द्रतेचे प्रमाण ६ टक्क्यांपर्यंत कमी राखल्यामुळे साठवण क्षमतेत वाढ.
  • अमेरिकन व युरोपीय देशाकरिता निर्यातक्षम पदार्थ.
  • या भुकटीतून कुरकुमीन, ॲलिसिनसारखे सक्रिय घटक सुपर क्रिटिकल तंत्रज्ञान वापरून सहज वेगळे करता येतात. उताराही जास्त मिळतो.
  • ग्रामीण रोजगारनिर्मिती
  • हळद निर्यातीचे निकष (अमेरिकन स्पाइस अँड ट्रेड असोसिएशन) वैशिष्ट्ये : तपशील आर्द्रतेचे प्रमाण % : <९.० कुरकुमीन % : ५.५ – ६.६ बाह्य पदार्थ % (वजनानुसार) --- <०.५ बुरशी % ; <३.० अस्थिर तेल मि.लि. प्रति १०० ग्रॅम : <३.५ विभाग : यंत्रसामग्री शेतीमाल साठवणूक व हाताळणी विभाग : योग्य साठवणूक, हाताळणी व उचलणी उपकरणे शेतीमाल स्वछता विभाग : शेतीमाल धुण्याकरिता ब्रश रोलर मशिन कापणे, तुकडे करणे विभाग : हळद, अद्रक, कांदा, लसूण कापणी उपकरणे विकरांची क्रिया थांबविणे ; बायो-रीॲक्टर प्रक्रिया उपकरण ड्रायर (विद्युत / वाफ) ; ट्रे / टनेल / रोटरी इ. भुकटी विभाग : ग्राइंडर किंवा भुकटी यंत्र साठवणूक व पॅकेजिंग विभाग : निर्वात साठवणूक व पॅकेजिंग विभाग प्रक्रियेची पद्धती (२.५ टन शेतीमाल करिता) हळद / अद्रक / कांदा / लसूण                 ।।                 ।। प्राथमिक प्रक्रिया : धुणे, साल किंवा आवरण काढणे (१ तास)                 ।।                 ।। काप करणे, तुकडे करणे (२ ते ३ तास)                 ।।                 ।। विकराची प्रक्रिया करणे (१ तास)                 ।।                 ।। कमी तापमानात सुकवणे (८ ते २० तास)                 ।।                 ।। भुकटी करणे (२ ते ४ तास) डॉ. संजय भोयर, ९९२१९५८९९९ (प्राध्यापक, कृषी रसायनशास्त्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com