agricultural stories in Marathi, Technowon, Flowery diets help predatory insects help farmers keep pests in check | Agrowon

पीक संरक्षणासह परागीकरणासाठी शेतात फुलपट्ट्याचे नियोजन फायद्याचे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 मे 2021

किडीच्या नियंत्रणासाठी भक्षक कीटकांचा वापर केला जातो. या भक्षक कीटकांचा आयुष्यकाळ वाढविण्यासाठी मध आणि पराग महत्त्वाचे ठरत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे भविष्यात शाश्‍वत शेती पद्धतीमध्ये शेतीभोवती, शेतामध्ये स्थानिक फुले येणाऱ्या वनस्पतींची लागवड करणे गरजेचे ठरणार आहे.

किडीच्या नियंत्रणासाठी भक्षक कीटकांचा वापर केला जातो. या भक्षक कीटकांचा आयुष्यकाळ वाढविण्यासाठी मध आणि पराग महत्त्वाचे ठरत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे भविष्यात शाश्‍वत शेती पद्धतीमध्ये शेतीभोवती, शेतामध्ये स्थानिक फुले येणाऱ्या वनस्पतींची लागवड करणे गरजेचे ठरणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना केवळ उत्पादनवाढीसाठी फुलांचा उपयोग होतो असे नाही, तर पिकांच्या संरक्षणासाठीही फुले उपयुक्त होऊ शकतात.

पिकाच्या संरक्षणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर वाढत आहे. त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावरही होत आहे. अशा वेळी संतुलित आणि एकात्मिक कीडनियंत्रणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची शिफारस शास्त्रज्ञ करतात. या एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये मित्रकीटक म्हणून भक्षक कीटकांचा वापर होतो. मात्र प्रसारण केल्यानंतर पिकामध्ये खाण्यासाठी किडींच्या विविध अवस्था उपलब्ध असेपर्यंत हे मित्रकीटक तग धरू शकतात. त्यानंतर अशा कीटकांना तग धरण्यासाठी फुलांचा आहार पुरवणे गरजेचे असल्याचे कोपनहेगन विद्यापीठातील अभ्यासात पुढे आले आहे.
भक्षक कीटक हे पिकांमध्ये लपलेल्या कीटकांचा शोध घेऊन फडशा पाडत असल्याने अधिक उपयुक्त ठरतात. मात्र ते तग धरण्यासाठी आजवर ते शिकारीवरच अवलंबून असल्याचे मानले जात होते. कोपनहेगन येथील वनस्पती आणि पर्यावरणशास्त्र विभागातील संशोधकांनी जगभरामध्ये झालेल्या विविध संशोधने एकत्र करून, त्याचे विश्‍लेषण आणि तुलना केली आहे. त्याचे निष्कर्ष ‘जर्नल बायोलॉजिकल कंट्रोल’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

सहायक प्राध्यापिका लिने सिग्सगार्ड यांनी सांगितले, की पिकाभोवती फुलोऱ्यावर येणाऱ्या वनस्पतींचे पट्टे ठेवल्यास त्यातून हॉव्हरफ्लाय, लेसविंग, पायरेट ढेकूण, फायटोसाईट माइट (कोळी) आणि दोन ठिपक्यांचे ढाल्या कीटक अशा भक्षक कीटकांना खाद्याची शाश्‍वती मिळते. अवतीभवती शिकारीसाठी कीटक उपलब्ध नसताना त्यांना या अन्नाचा उपयोग होतो. यासाठी पिकाभोवती लवकर आणि उशिरा अशा दोन्ही टप्प्यांमध्ये फुलोऱ्यावर येणाऱ्या वनस्पतींची लागवड केली पाहिजे. या वनस्पतींचा फायदा परागवाहक कीटकांनाही होणार आहे.
सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये व रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू इच्छिणाऱ्यांसाठी कीडनियंत्रणातील मित्रकीटकांचे प्रसारण किंवा संवर्धन ही हरित पद्धत अधिक शाश्‍वत बनवणे शक्य आहे.

कोणती फुलझाडे लावावीत?

१) या कीटकांसाठी वेगळ्या प्रकारच्या फुलांची लागवड अपेक्षित आहे. कारण या कीटकांना मध गोळा करणाऱ्या मधमाशीसारख्या कीटकांप्रमाणे लांब सोंड नसते. त्यांच्यासाठी पूर्णपणे उघडणारी, आतील मध आणि परागकण सहजतेने उपलब्ध होतील, अशी फुले बांधावर किंवा शेतामध्ये लावण्यात येणाऱ्या वनस्पती पट्ट्यांमध्ये लावावीत. उदा. जंगली गाजर, ऑक्स आय डेझी, डील, डॅन्डेलिन इ.
२) यासाठी शिफारस करताना संशोधक स्थानिक, बहुवार्षिक फुलांची निवड करण्यास सांगतात. कारण त्यातून भक्षक कीटकांसाठी कायमस्वरूपी रहिवास तयार होईल. त्यांना थंडीमध्येही त्याचा वापर करता येईल.
३) लागवड करताना वेगवेगळ्या हंगामात फुलोरा येणाऱ्या प्रजातींची निवड करावी.
४) शेतामध्ये हे फुलपट्टे तयार करण्यासाठी संशोधकांनी साधारणपणे ३० ते ४० वेगवेगळ्या स्थानिक वनस्पतींवर संशोधन केले आहे. त्यात काही गवतांचाही समावेश आहे.
५) कीडनियंत्रण आणि परागीकरण वाढवण्याच्या उद्देशाने कीटकांना आकर्षित करण्यासाठी कोणती फुले आणि त्यांचे मिश्रण अधिक उपयुक्त राहील, या अनुषंगाने अधिक संशोधन सुरू ठेवले आहे.

कीटकांचा आयुष्यकाळ वाढतो आठपट

१) जर या भक्षक कीटकांना दरम्यानच्या काळामध्ये खाण्यासाठी फुलांचा आहार (पराग, मध इ.) उपलब्ध झाला तर मादी कीटक २.२ पट अधिक काळ तग धरतात, आणि नर कीटक १.७ पट अधिक काळ तग धरतात. ही तुलना फुलांशिवाय नुसतेच पाणी उपलब्ध असलेल्या कीटकांसोबत केली आहे.
२) अर्थात, सर्व भक्षक कीटकांचे वर्तन एकसारखे असते असे नाही. काही भक्षक कीटक हे केवळ फुले उपलब्ध असलेल्या ठिकाणीच अंडी घालतात. तपासणी करण्यात आलेल्या १७ भक्षक कीटक हे एकापेक्षा अधिक फुलांना प्राधान्य देतात. नऊ भक्षक कीटक (त्यात लेसविंग, दोन ठिपक्यांचे लेडी बर्ड बीटल, पायरेट ढेकूण इ) हे फुलांसोबत दीर्घकाळ आयुष्य काढतात. उर्वरित आठ प्रजातींचा (त्यात भक्षक कोळी समाविष्ट) आयुष्यकाळ हा तितका दीर्घ असत नाही.
३) फुलांमधील फरकही कीटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. उदा. बकव्हिटची फुले उघडी असून, ते पीक म्हणून शेतात घेतले जाते. बकव्हिटच्या फुलांवर भक्षक कीटक नुसत्या पाण्याच्या तुलनेमध्ये सरासरी ८.६ पट अधिक जगत असल्याचे दिसून आले. तसेच मॅलो, यारो आणि ऑक्स आय डेझी ही पूर्णपणे उमलणारी फुले भक्षक कीटकांच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच वेळी ज्यांच्या नलिका मोठ्या असतात, अशी कमळ, विपर्स बगलॉस ही कमी उपयुक्त असतात.

 

भविष्यातील शेतीचे नियोजन आणि आरेखन करताना त्यात शेताभोवती फुलोरा येणारी झाडांचा व जंगली फुलांचा समावेश करण्याची गरज आहे. त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. त्याच प्रमाणे शेतामध्ये विशिष्ट फुले येणाऱ्या वनस्पतींची काही ओळींमध्ये लागवड करणे ही एकाच वेळी परागवाहक आणि भक्षक कीटकांना आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याचा फायदा अधिक फळे लागून शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी होईल. तसेच किडींचे नियंत्रणही शाश्‍वत पद्धतीने करताना जैवविविधतेला मदत होईल.
- लिने सिग्सगार्ड, सहायक प्राध्यापिका, वनस्पती आणि पर्यावरणशास्त्र विभाग, कोपनहेगेन विद्यापीठ.
ok


इतर टेक्नोवन
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
सलग सोयाबीनपेक्षा सुधारित पट्टापेर...सोयाबीन पिकात फुलोऱ्यानंतरच्या वाढीच्या...
भातशेतीसाठी उपयुक्त यंत्रेडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच काही...
ट्रॅक्टरचलित पाच ओळींचे बीबीएफ, रासणी...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जमिनीतील ओलावादर्शक उपकरणशेतीच्या सिंचनासाठी पाण्याचे स्रोत कमी होत आहेत,...
टोमॅटो परागीभवनासाठी रोबो!बेल्जियम येथील बायोबेस्ट ग्रुप आणि इस्राईल येथील...
निसर्गाप्रमाणे प्रकाशाचे ग्रहण करणारा...निसर्गामध्ये वनस्पती आणि जिवाणूंकडून...
लहान ट्रॅक्टरचलित बियाणे, खते पेरणी...अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
एसआरटी’ तंत्रामुळे भाताची एकरी पाच...पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी पारंपरिक...
जनावरांच्या देखरेखीसाठी ‘स्मार्ट टॅग’पूर्वी आपल्याकडे जनावरे गायरान किंवा परिसरातील...
मल्चिंग पेपर अंथरणी केवळ पाचहजार...नाशिक जिल्ह्यातील आडगाव टप्पा (ता. चांदवड) येथील...
मधमाशी पालन व्यवसायास लागणारी उपकरणे,...मधमाशांच्या वसाहती विशिष्ठ प्रकारच्या...
पेरोव्हस्काइट सौरसेल ः सौर...अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेचे महत्त्व...
कपाशी पिकाच्या अवशेषांपासून मूल्यवर्धित...भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत मुंबई येथे...
बीबीएफ’ तंत्रामुळे खर्चात बचत अन्...ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान...
वापर बीबीएफ यंत्राचा...बीबीएफ ही पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या...
पीक संरक्षणासह परागीकरणासाठी शेतात...किडीच्या नियंत्रणासाठी भक्षक कीटकांचा वापर केला...