agricultural stories in Marathi, Technowon, implements in bee keeping | Agrowon

मधमाशी पालन व्यवसायास लागणारी उपकरणे, यंत्रे

धनंजय मनोहर वाखले
बुधवार, 2 जून 2021

भारतातही मधमाशी पालन व्यवसायामध्ये वाढ होत आहे. मधमाश्या पालनाचे यश पूर्णपणे मधमाशी वसाहतींची देखभाल, शास्त्रीय पद्धतीने केलेले व्यवस्थापन या प्रमाणेच त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमाणित पेट्या, यंत्रे, उपकरणे आणि अवजारे यावर अवलंबून असते.

मधमाशांच्या वसाहती विशिष्ठ प्रकारच्या पेट्यांमध्ये ठेवून त्यांचे पालन, पोषण आणि व्यवस्थापन केले जाते, त्यास आधुनिक मधमाशी पालन असे म्हणतात. मधमाशी पालन तंत्राचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतल्यास चांगले मध उत्पादन व इतर उत्पादने घेता येतात. मधमाशी पालन व्यवसाय हा कृषी आधारित फायदेशीर व्यवसाय आहे. मधमाशी वसाहतींच्या देखभाल, व्यवस्थापनासाठी प्रमाणित पेट्या, यंत्रे, उपकरणे आणि अवजारे यांची माहिती या लेखात घेऊ.

भारतीय मधूपेटी
निसर्गात मधमाश्या आडोशाच्या जागी, झाडांच्या ढोलीत समांतर पद्धतीने आपले मेणाचे पोळे बांधतात. त्यात मध, पराग, अंडी इ. साठवून ठेवतात. मधमाश्या कधीही एकट्या - दुकट्या नसतात. त्या कायम समूहातच वसाहत करून राहतात. एका वसाहतीत साधारणपणे १० ते ३५ हजार मधमाश्या असतात. त्यांची प्रमुख एक राणी माशी (क्वीन), १० - २० नर माशा (ड्रोन ) आणि बाकीच्या सर्व कामकरी माशा (वर्कर )असतात. प्रत्येकाचे आपले ठरलेले असते. त्यानुसार त्या शिस्तीत काम करतात. यासाठी योग्य व सोयीस्कर ठरेल, अशा लाकडी पेट्या तयार करून त्यात मधमाश्यांच्या वसाहती ठेवतात. संपूर्ण मधुपेटी जमिनीवर साधारण अडीच फुटी स्टॅन्डवर ठेवतात. भारतीय मानक संस्थे द्वारे मधुपेट्या प्रमाणित केल्या आहेत. ( IS १५१५ : १९७८ ).
भारतीय मधूपेटयांचे हे सर्व भाग लाकडी फळ्यापासून तयार करतात. पोळे बांधण्याकरिता तयार केलेल्या मधुपेट्या व त्यांतील चौकटी तयार करताना काटेकोरपणा पाळावा लागतो. त्यांचे प्रमुख भाग पुढील प्रमाणे.

तळ पाट : यावर संपूर्ण मधू पेटीचे भाग असतात. मधमाशांचे पराग, मेण, मेलेल्या मधामाशा त्यांचे शरीराचे भाग, विष्ठा इ. तळ पाटावर असतात. ते नेहमी स्वच्छ करून ठेवतात.

प्रवेश द्वार किंवा राणी द्वार : कामकरी मधमाश्यांना पेटीच्या आंत - बाहेर जाण्यासाठी व राणी माशीला मात्र मज्जाव करण्यासाठी हे द्वार असते.

ब्रूड चेंबर व ब्रूड फ्रेम्स : पेटीचा सर्वांत प्रमुख भाग म्हणजे ताल पाटावर असलेला ब्रूड चेम्बर. यात ब्रूड फ्रेमच्या सरकत्या चौकटी चिकटून समांतर ठेवतात. या लाकडी चौकटींच्या आंतच मधमाश्या आपले पोळे तयार करतात. सर्वांत महत्वाचे राणी माशीला सहज एका चौकटीवरून दुसऱ्या चौकटीवरील पोळ्यातील कोषात अंडी घालण्यासाठी जाता येता यावे, यासाठी चौकटीच्या वरील दोन्ही बाजूला जागा ठेवतात, त्याला ‘बी स्पेस’ म्हणतात. प्रामुख्याने सरकत्या चौकटी असतात. आधुनिक पद्धतीत हलविता येणाऱ्या चौकटी असलेल्या लाकडी पेट्यांचा उपयोग केला जातो. या व्यवस्थेमुळे मधमाशीपालकास चौकटी हलवून बघता येतात. आत काय चालले आहे, याचा अंदाज घेता येतो.

क्वीन एक्स्ल्युडर किंवा ब्रूड झाकण : ब्रूड चेंबर आणि सुपर चेंबरच्या मध्ये एक जाळी असते, त्यामुळे राणी माशीला वरच्या सुपर फ्रेमवर जाता येत नाही. ‘क्वीन एक्सक्लुडर’ च्या ऐवजी ब्रूड झाकण पण वापरता येते.

सुपर चेंबर व सुपर फ्रेम्स : हा ब्रूड चेंबरच्या वर त्याच्या जवळ जवळ अर्ध्या मापाचा असतो. सुपर चेंबरमध्ये फक्त मध साठवण्यासाठी फ्रेम किंवा चौकटी ठेवलेल्या असतात. मधाच्या हंगामात गरजेप्रमाणे सुपर चेंबर एकावर एक ठेवून वाढवता येतात. सुपर फ्रेम्समध्ये पोळ्यात मध सील बंद पोळ्यातूनच काढतात.

टॉप कव्हर किंवा वरचे झाकण : सुपर चेंबरच्या वर एक झाकण छतासारखे असते, त्यामुळे ऊन, पाऊस, वारा, शत्रू कीटक, पक्षी, प्राणी, इ. पासून मधमाश्यांचे व पोळ्याचे संरक्षण होते.

बी व्हेल, बी ड्रेस
एका टोपीला डोक्यावरून व चेहऱ्यावर संरक्षणासाठी जाळी असते, त्याला ‘बी व्हेल’ म्हणतात. मधमाश्यांच्या डंखापासून संरक्षण व्हावे, यासाठी संपूर्ण शरीर झाकणारे जाड कापडाचे सैल कपडे शिवले जातात. हात मोजे आणि पायात बूटपण गरजेचे असते. मधमाश्यांच्या वसाहतींची पाहणी करण्यास, त्यांच्या जवळ जाण्यास किंवा मधुवनातून फेरफटका मारायचा असला तरी मधमाश्यांचे आणि जवळ जाणाऱ्या व्यक्तीचे परस्पर संसर्ग किंवा अन्य त्रासापासून संरक्षणसाठी ‘बी व्हेल’, ‘बी ड्रेस’ आवश्यक असतात.

धूर यंत्र ( स्मोकर ) 
हे एक हातात धरण्याजोगे लहान व स्टीलपासून बनवलेले पात्र असते. त्यात वाळलेले गवत, काड्या, काटक्या भरता येतात. सोबत ताग, तरटाचे बोळे किंवा कापसाचे बोळे, वेस्ट कॉटन इ. टाकून पेटवून त्याचा धूर करतात.धूर बाहेर टाकण्यासाठी वरच्या झाकणाला छिद्रे किंवा एकाच मोठे छिद्र असते. त्याला जोडूनच चामड्याचा लहानसा भाता जोडलेला असतो. हा भाता दाबल्यावर त्यातून हवेचा झोत तयार होतो. तो त्या पात्रातील धूरसोबत बाहेर पडतो. हा धुराचा झोत पोळ्यावर सोडतात. यामुळे मधमाश्या बाजूला जातात. यामुळे मधूपेट्यांची पाहणी करता येते किंवा मध काढणीसाठी चौकटी सहजपणे काढून घेता येतात.

हाईव्ह टूल किंवा पटाशी 
मधुकोशातील लाकडी चौकटी मेणामुळे एकमेकींस चिकटल्यास, त्या अलग करण्याकरिता या हत्याराचा उपयोग केला जातो. मधुकोश किंवा शिशुकोश यांच्या तळावर काही घाण चिकटून बसल्यास तीही या हत्याराने खरडून काढता येते.

मध पोळ्याची सुरी (अन कॅंपिंग नाईफ) 
सुपर फ्रेममध्ये मेणाच्या झाकणाने बंद केलेल्या पोळ्यातून पूर्ण परिपक्व मध काढण्यासाठी या सुरीचा उपयोग करतात. मेणाचे झाकण अलगद कापून ती चौकट मध उत्सर्जन यंत्रात ठेवून मध काढतात, त्यामुळे पोळे तसेच्या तसे राहते. ते चौकटीसह पुन्हा पुन्हा वापरता येते.

मध उत्सर्जन यंत्र (हनी एक्स्ट्रॅक्टर ) 
आपल्या घरी वापरात असलेल्या वॉशिंग मशीनप्रमाणे पोळ्यातील मध काढण्याकरिता यंत्राचा उपयोग केला जातो. मधाला स्पर्श होणारे याचे सर्व भाग स्टीलचे असतात. या स्टेनलेस स्टील ड्रममध्ये मधाने भरलेल्या चौकटी उभ्या ठेवतात. हॅण्डलच्या साहाय्याने गोल फिरवतात. केंद्रोत्सारक प्रेरणेने त्यांतील मध बाहेर फेकला जातो. यंत्राच्या तळाशी असलेल्या नलिकेतून तो जमा केला जातो. या पद्धतीत पोळ्याची व माश्यांची हानी होत नाही. मोकळी चौकट पुन्हा मधुपेटीत ठेवल्यास त्याच चौकटीतील रिकाम्या पोळ्यात पुन्हा मध साठवितात. तसेच पोळे परत बांधण्यासाठी लागणारे मेण व ते तयार करण्यासाठी लागणारा मध यांचीही बचत होते. मधमाश्यांचा वेळ वाचतो. परिणामी मधाचे उत्पादन वाढते. मोठ्या प्रमाणावर मध उत्पादन व प्रशोधन करण्यासाठी योग्य क्षमतेची सयंत्रे वापरतात. मोठे साठवण, बॉटलिंग, पॅकेजिंग, लेबलिंग इ. हाताने किंवा स्वयंचलित यंत्राद्वारे करतात.

मेण उत्सर्जन व मेण तळ पट यंत्र किंवा कोंब फौंडेशन मिल 
मधमाश्यांच्या जुन्या झालेल्या पोळ्याचे लहान तुकडे करून एका भांड्यात गरम किंवा उकळत्या पाण्यात वितळवून, गाळून स्वच्छ मेणाच्या ढेपा करतात. हे मेण पुन्हा वितळवून द्रवरुप मेण लाकडी किंवा जाड काचेच्या पातीमध्ये बुडवून मेणाचे एक सारखे सपाट ताव करतात. ते कॉम्ब फौंडेशन मिलमधून काढून पोळ्यातील षटकोनी आकाराचे ठसे उमटवतात. अशा मेण पत्रांना ब्रूड फ्रेम किंवा सुपर फ्रेमच्या आकारात कापून गरजेनुसार योग्य ते आकार दिले जातात. त्यावर मधमाशा नवीन पोळे बांधतात. या प्रक्रियेमुळे वेळ वाचतो. उत्पादकता वाढून उत्पादनांची गुणवत्ताही उच्च प्रतीची मिळू शकते. व्यापारी तत्वावर केल्या जाणाऱ्या मधमाशी पालनामध्ये एक दोन हजार वसाहतींच्या व्यवस्थापनामध्ये अशी मेण पत्रे उपयोगी ठरते. ती ॲटोमॅटिक कोंब फौंडेशन मिलद्वारे तयार केली जातात.

अन्य साधने 

  • वाढत्या मधमाशी पालनाच्या प्रमाणानुसार इतर अनेक उपकरणे, यंत्रे, साहित्य इ.ची गरज भासू लागते.
  • -पराग सापळा (पोलन ट्रॅप) लावून मधमाशांच्या वसाहतीपासून पराग मोठ्या प्रमाणावर उत्पादन येते.
  •  राजअन्न (रॉयलजेली) च्या उत्पादनासाठी ग्राफ्टिंग उपकरणे आणि क्वीन कप किट यांचा उपयोग करतात.
  • प्रोपोलिस गोळा करण्यासाठी विशिष्ठ जाळी आवश्यक असते.
  • बी व्हेनोम (विष) मिळवण्यासाठी उपयुक्त उत्सर्जन यंत्रणेचा उपयोग करतात.
  • मधमाश्यांच्या वसाहतींचे स्थलांतरासाठी योग्य प्रकारचे विशेष ट्रक, मधुपेट्या ट्रकमध्ये भरण्यासाठी लोडर, मधाच्या वाहतुकीसाठी टँकर यांचा वापर केला जातो.
  •  चालत्या गाडीवर असलेले ‘मोबाईल बी हाऊस’ ही तयार करण्यात आले असून, त्यांचा काही देशात वापरही होत आहे.

संपर्क ः डॉ. धनंजय वाखले, ८९२८८२१३३४
(निवृत्त सहाय्यक संचालक, केंद्रिय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, के.व्ही.आई.सी., पुणे.)


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
सलग सोयाबीनपेक्षा सुधारित पट्टापेर...सोयाबीन पिकात फुलोऱ्यानंतरच्या वाढीच्या...
भातशेतीसाठी उपयुक्त यंत्रेडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच काही...
ट्रॅक्टरचलित पाच ओळींचे बीबीएफ, रासणी...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जमिनीतील ओलावादर्शक उपकरणशेतीच्या सिंचनासाठी पाण्याचे स्रोत कमी होत आहेत,...
टोमॅटो परागीभवनासाठी रोबो!बेल्जियम येथील बायोबेस्ट ग्रुप आणि इस्राईल येथील...
निसर्गाप्रमाणे प्रकाशाचे ग्रहण करणारा...निसर्गामध्ये वनस्पती आणि जिवाणूंकडून...
लहान ट्रॅक्टरचलित बियाणे, खते पेरणी...अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
एसआरटी’ तंत्रामुळे भाताची एकरी पाच...पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी पारंपरिक...
जनावरांच्या देखरेखीसाठी ‘स्मार्ट टॅग’पूर्वी आपल्याकडे जनावरे गायरान किंवा परिसरातील...
मल्चिंग पेपर अंथरणी केवळ पाचहजार...नाशिक जिल्ह्यातील आडगाव टप्पा (ता. चांदवड) येथील...
मधमाशी पालन व्यवसायास लागणारी उपकरणे,...मधमाशांच्या वसाहती विशिष्ठ प्रकारच्या...
पेरोव्हस्काइट सौरसेल ः सौर...अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेचे महत्त्व...
कपाशी पिकाच्या अवशेषांपासून मूल्यवर्धित...भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत मुंबई येथे...
बीबीएफ’ तंत्रामुळे खर्चात बचत अन्...ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान...
वापर बीबीएफ यंत्राचा...बीबीएफ ही पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या...
पीक संरक्षणासह परागीकरणासाठी शेतात...किडीच्या नियंत्रणासाठी भक्षक कीटकांचा वापर केला...