मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे तयार करणारे अवजार

कोरडवाहू शेतीमध्ये पावसाचे पाणी अडवून तिथेच मुरवण्यासाठी बंदिस्त वाफे तयार करून मूलस्थानी जलसंधारण केले जाते. बंदिस्त वाफे तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे बनविणारे अवजार विकसित करण्यात आले आहे.
मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे तयार करणारे अवजार
मूलस्थानी जलसंधारणासाठी बंदिस्त वाफे तयार करणारे अवजार

सातत्याने बदलत असलेल्या वातावरणात कृषी उत्पादनासाठी प्रामुख्याने जमीन, पाणी आणि हवामान या महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची आवश्यकता असते. जमीन ही मूलभूत साधनसंपत्ती असून, त्यापासून शाश्‍वत उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीची सुपीकता टिकवली पाहिजे. धूप थांबवण्याबरोबरच महाराष्ट्रात दर तीन ते चार वर्षांनी येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतामध्येच पाणी अडविणे व साठविणे हे मोठे आव्हान आहे. पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतात थांबवून जिरवला पाहिजे. याला मूलस्थानी जलसंधारण असे म्हणतात. पावसाच्या पडलेल्या प्रत्येक थेंबाचा पीक संगोपन व वाढीकरिता कार्यक्षम उपयोग करून घेतल्यास पीक उत्पादनात निश्‍चित शाश्‍वतता आणता येईल. कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणामुळे जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून पिकाच्या संवेदनशील अवस्थेत उपयोगात येतो. परिणामी उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ मिळते. कोरडवाहू शेती ही नेहमी एकूण पडणाऱ्या पावसावर अवलंबून नसून ती पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी जमिनीत मुरणाऱ्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. पावसाचे पाणी वाचविण्याचा सर्वांत कार्यक्षम आणि स्वस्त मार्ग जमिनीत मूलस्थानी जलसंधारणद्वारे मुरवून पाणी ठेवणे. माती आणि जलसंधारणाच्या प्रभावी पद्धतींपैकी एक म्हणजे शेतात बंदिस्त वाफे तयार करणे. उताराला आडवे वाफे व उभे वाफे समांतर अंतराने जोडून बंदिस्त वाफे तयार करता येतात. सध्या शेतीमध्ये बंदिस्त वाफे हे पारंपरिक पद्धतीने बनविले जातात. पारंपरिक पद्धतीमध्ये शेतमजुरांची अधिक आवश्यकता भासते. हे अधिक कष्टाचे काम असून, वाढलेल्या मजुरीमुळे खर्च वाढत चालला आहे. या काळात शेतमजुरांचीही टंचाई भासते. अशा परिस्थितीत जलद आणि कमी खर्चात बंदिस्त वाफे तयार करण्यासाठी यंत्र अधिक उपयुक्त ठरते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पामध्ये ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे बनविणारे अवजार विकसित केले आहे. या यंत्राने ६ मीटर लांबी व २ मीटर रुंदी असलेले बंदिस्त वाफे तयार करता येतात. वाफ्याच्या वरंब्याची उंची साधारणपणे २० ते २२ सें. मी. राहते. यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी मुरवणे किंवा वाहून जाणारे पाणी अडवणे शक्य होते. फायदे ः

  • जमिनीमध्ये ५० टक्के जास्त ओल साठवली जाते.
  • पाण्याची व मातीची धूप रोखते, आर्द्रता वाचते आणि पिकाचे उत्पादन वाढते.
  • या यंत्राच्या फार्मर्स फर्स्ट प्रकल्प, कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, राहुरी; कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, सोलापूर प्रक्षेत्रावर चाचण्या घेण्यात आल्या. या यंत्राची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता खूप चांगली आहे. त्यात रब्बी ज्वारीसाठी जमिनीत परतीच्या पावसाचे पाणी मुरविण्यासाठी बंदिस्त वाफे तयार केल्यामुळे रब्बी ज्वारीचे उत्पादन २ ते ३ क्विंटल पर्यंत वाढल्याचे आढळले.
  • वैशिष्ट्ये ः

  • हे यंत्र ३५ अश्‍वशक्ती किंवा त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.
  • या यंत्राने एका दिवसात ४ ते ४.५ हेक्टर क्षेत्रावर बंदिस्त वाफे तयार करणे शक्य.
  • यंत्राच्या वापरामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ३० ते ४० टक्के बचत होते.
  • पावसावर अवलंबून असणाऱ्या (कोरडवाहू) पिकांसाठी जास्त फायदेशीर ठरते. उदा. ज्वारी, बाजरी, मका, डाळी आणि तेल बियाणे, काही नगदी पिके उदा. कापूस, एरंडेल आणि भुईमूग इ. परिणामी पिकांचे उत्पादन वाढते.
  • डॉ. टी. बी. बास्टेवाड, ९४२३३४२९४१ (प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वयीत कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com