वापरण्यास सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल!

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोझीकोडे (केरळ) येथील भारतीय मसाले संशोधन संस्थेने नॅनो तंत्रज्ञानावर आधारित मायक्रोबियल इन्कॅप्सुलेशन’ पद्धतीतून बायोकॅप्सूल खते विकसित केली आहेत. नुकतेच या कॅप्सूलेशन तंत्राला भारत सरकारकडून पेटंटही मिळाले आहे.
वापरण्यास सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल!
वापरण्यास सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल!

मातीची सुपीकता ही त्यातील अन्नघटकांइतकीच त्यातील उपलब्ध उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या प्रमाणावर ठरत असते. मातीमध्ये दिलेली किंवा उपलब्ध असलेली खते पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम सूक्ष्मजीव करतात. त्यामुळे बीजप्रक्रिया व आळवणीद्वारे सूक्ष्मजीवांचा समावेश असलेल्या (जैविक) खतांचा वापर केला जातो. मात्र सध्या जैविक खते व घटक प्रामुख्याने टाल्कम आधारित फॉर्म्यूलेशनमध्ये उपलब्ध आहेत. मात्र साठवण, वाहतूक आणि हाताळणीमध्ये अनेक अडचणी येतात. हे टाळण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोझीकोडे (केरळ) येथील भारतीय मसाले संशोधन संस्थेतील माजी संचालक डॉ. एम. आनंदराज, मृदा सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. दिनेश आणि डॉ. वाय. के. बिनी या संशोधन गटाने अतिसूक्ष्म (नॅनो) तंत्रज्ञानावर आधारित बायो कॅप्सूल स्वरूपातील खते विकसित केली आहेत. प्रमाणीकरण केले आहे. जैव खत उद्योगातील जगातील हे पहिले इन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञान असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. बायो कॅप्सूल व वापर : कॅप्सूलमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांचे विशिष्ट फॉर्म्यूलेशन भरले जाते. साधारणपणे एक ग्रॅम वजनाच्या कॅप्सूलमध्ये स्थिर व निष्क्रिय अवस्थेतील एक लाख कोटी जिवाणूंचा समावेश केलेला असतो. आदर्श परिस्थितीत, एका कॅप्सूलमध्ये सूक्ष्मजीवाची १० चा १२ वा घात सीपीयू (कॉलनी फॉर्मिंग युनिट्स) असतात. ही एक कॅप्सूल १०० लिटर पाण्यात मिसळल्यास प्रत्येक मिलिलिटर द्रावणामध्ये सूक्ष्मजीव तयार करणाऱ्या एक दशलक्ष वसाहती असतील. संपूर्ण इनकॅप्सूलेशन प्रक्रिया सामान्य खोलीत २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानात केली जाऊ शकते. त्याची प्रक्रिया सोपी आहे. त्यासाठी फारशा अत्याधुनिक उपकरणांची आवश्यकता नसते. उपयुक्त सूक्ष्मजीवांचे अनेक प्रकार बायोकॅप्सूल स्वरूपात उपलब्ध करण्यात यश आले आहे. पिकाच्या प्रकारानुसार योग्य त्या जैविक खतांचा वापर केल्यास फायदेशीर ठरते. उपयुक्त जिवाणू किंवा बुरशीयुक्त बायोकॅप्सूलचा वापर करण्याच्या पद्धतीत फरक आहे. अ) बायोकॅप्सूलमध्ये उपयुक्त बुरशी (उदा. ट्रायकोडर्मा स्पे.) असल्यास एक बायो-कॅप्सूल २०० लिटर सामान्य पाण्यात मिसळून त्याची रोपांना आळवणी करता येते. ब) उपयुक्त जिवाणू (उदा. बॅसिलस स्पे., स्यूडोमोनास स्पे., ॲझोटोबॅक्टर इ.) असलेली एक बायोकॅप्सूल उकळून थंड केलेल्या एक लिटर निर्जंतुक पाण्यात मिसळली जाते. हे द्रावण ८ तास उष्मायनासाठी ठेवले जाते. नंतर साधारण २०० लिटर सामान्य पाण्यात मिसळून त्याची फवारणी किंवा आळवणी करता येते. तंत्रज्ञानाचे फायदे :

  • पिकांना उपयुक्त आणि आवश्यक सूक्ष्मजीवांचे वितरण, हाताळणी, साठवणूक सुलभ होते.
  • पर्यावरण अनुकूल हरित तंत्रज्ञान
  • सामान्य तापमानात उत्पादन शक्य.
  • उत्पादनासाठी अत्याधुनिक उपकरणे, पायाभूत सुविधा किंवा अटींची आवश्यक नाही. म्हणून कमी उत्पादन खर्च शक्य.
  • सामान्य तापमानात साठवणूक शक्य. १८ ते २४ महिन्यांची उच्च टिकवणक्षमता.
  • तंत्रज्ञान परवाना व व्यापारीकरण : भारतीय मसाले संशोधन संस्था व ‘अ‍ॅग्रीइनोव्हेट इंडिया’ यांच्या माध्यमातून क्षेत्रीय चाचण्या घेऊन व्यावसायीकरण केले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी संस्थेच्या तंत्रज्ञान व्यवस्थापन, व्यवसाय नियोजन आणि विकास विभागाने देशातील चार खासगी कंपन्यांना बायो-कॅप्सूल इनकॅप्सूलेशन तंत्रज्ञानाचा परवाना दिला आहे. त्यात कोडगू अ‍ॅग्रीटेक (कुशलनगर, कर्नाटक), एसआरटी अ‍ॅग्रो सायन्स प्रा.लि. (दुर्ग, छत्तीसगड), कृषी विकास सहकारी समिती लि.(भंडारा, हनुमानगड, राजस्थान) व कृष्णा अ‍ॅग्रो बायोप्रोडक्ट्स (इडा नचरम, हैदराबाद तेलंगणा) यांचा समावेश आहे. या कंपन्यांद्वारे उत्पादित बायोकॅप्सूलचा वापर देशातील विविध राज्यांमधील शेतकऱ्यांद्वारे केला जात आहे. उदा. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तर-पूर्व राज्यांसह नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा इ. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, मुंबई व एसआरटी अ‍ॅग्रो सायन्स, छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने बायो कॅप्सूल ‘अ‍ॅग्रोकमल’ या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे. कांदा, बटाटा, विविध भाजीपाला पिके, द्राक्ष, ऊस, चिकू या पिकांसाठी राज्यातील शेतकरी वापर करू लागले आहेत. संशोधनाला पेटंट : भारतीय मसाले संशोधन संस्था (ICAR-IISR) यांनी विकसित केलेल्या बायोकॅप्सूलद्वारे पीजीपीआर/सूक्ष्मजीव साठवणूक आणि देण्याची नावीन्यपूर्ण पद्धतीसाठी १३ ऑगस्ट २०१३ रोजी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडे बौद्धिक हक्क संरक्षित करण्यासाठी अर्ज केला होता. यावर १२ मार्च २०२१ रोजी त्यास मायक्रोबियल इन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञानासाठी पेटंट (पेटंट क्र. ३६१०२१) मिळाले आहे. बायोकॅप्सूलची किंमत (प्रति नग) : ३६० रुपये बायोकॅप्सूलचे प्रकार...पीक रायझो कॅप्सूल...द्विदलवर्गीय पिकांसाठी नत्राचा पुरवठा. उदा. हरभरा, सोयाबीन व सर्व कडधान्य ॲझो कॅप्सूल...एकदल वर्गीय पिकांसाठी नत्राचा पुरवठा. उदा. ज्वारी, बाजरी, गहू, मका इ. पी.एस.बी. प्लस कॅप्सूल...सर्व पिकांसाठी स्फुरदाचा पुरवठा. एन.पी.के. कॅप्सूल...सर्व पिकांसाठी नत्र, स्फुरद व पालाशचा पुरवठा. झिंक ग्रो कॅप्सूल...सर्व तेलवर्गीय पिकांसाठी झिंकचा पुरवठा. पोटॅश ग्रो कॅप्सूल...सर्व पिकांसाठी पालाशचा पुरवठा. अँसिटो कॅप्सूल...सर्व पिकांसाठी नत्राचा पुरवठा. उदा. ऊस, रताळी, ज्वारी. ॲझोस्पिरिलिअम कॅप्सूल...सर्व पिकांसाठी नत्राचा पुरवठा. (सर्व बायोकॅप्सूल बीज प्रक्रिया व जमिनीत ओलावा असताना वापरासाठी आहेत.) बायो कॅप्सूल वापरण्याची पद्धत -एक कॅप्सूल रात्री ५ लिटर पाण्यामध्ये (पाणी गरम करून थंड केलेले) मिसळून ठेवल्याने मिश्रण तयार होते. -बी पेरणी करण्यापूर्वी १ लिटर मिश्रणात बियाणे भिजवून सावलीत सुकवावे. -उर्वरित मिश्रण दुसऱ्या दिवशी सकाळी २०० लिटर पाण्यात मिसळून पिकांच्या मुळाशी किंवा जमिनीवर फवारणी करता येते. -फवारणी, ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाद्वारेही वापर शक्य. -बादलीमध्ये तयार मिश्रण घेऊन छोट्या भांड्याने किंवा फवारणी पंपामध्ये भरून नोझल काढूनही पिकांच्या मुळाशी मिश्रण देता येते. बायो कॅप्सूल वापराचे शेतासाठी फायदे :- १) एका बायोकॅप्सूलमध्ये १ लाख कोटी जिवाणू असतात. एका वेळी एकरी एक कॅप्सूल पुरेशी ठरते. ते जमिनीत मिसळले गेल्याने जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. जमिनीचा पोत, जलधारण क्षमता वाढते. २) कॅप्सूलमधील जिवाणू किंवा बुरशीच्या प्रकारानुसार नत्र, स्फुरद, पालाश, झिंक इ. खताची उपलब्धता किंवा रोगकारक घटकांपासून बचाव शक्य होतो. ३) पर्यावरणपूरक ४) पिकाच्या गुणवत्ता व उत्पादनात वाढ. खतांवरील खर्चात बचत. ५) बायोकॅप्सूल सोबत प्रॉम व मायक्रोरायझा या जैविक खतांचा वापर शक्य. प्रतिक्रिया व अनुभव : बायोकॅप्सूलमुळे तृणधान्य, कडधान्य, मसाले, भाजीपाला, फळे अशा पिकांसाठी सूक्ष्मजीवांची उपलब्धता व वितरण सुनिश्‍चित होते. योग्य वापरामुळे रासायनिक खतांची मात्रा कमी होते. पर्यायाने मातीचे आरोग्य आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हे दोन्ही सुधारण्यास हातभार लागतो. - डॉ. प्रवीणा रवींद्रन, वरिष्ठ शास्त्रज्ञ, पीक संरक्षण विभाग कांदा, ऊस पिकांसाठी बायोकॅप्सूल वापरले होते. पूर्वी चिवट असणारी जमीन या वापरामुळे भुसभुशीत झाली. जमिनीतून दिलेल्या खतांचे शोषण चांगल्या प्रकारे झाल्याने पिकाची जोमदार वाढ होऊन प्रामुख्याने कांद्याचा आकार व रंग चांगला आला. कांद्याची चकाकी वाढली. एकरी २० क्विंटल उत्पादन वाढले आहे. प्रथम ऊस पिकासाठी वापर केला होता. उसाचे पेरे व वजन वाढल्याचे आढळले. -विष्णू नामदेव पवार, ९९७५६५२८८१ (कांदा उत्पादक, भऊर, ता. देवळा, जि. नाशिक) बायोकॅप्सूल विकसित केल्यानंतर सर्वात प्रथम कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात व्ही. एल. अजय कुमार यांच्या शेतात आले पिकात वापर केला. ते १५ वर्षांपासून आले लागवड करतात. जिलेटिन कॅप्सूलमधील सूक्ष्मजीव समाविष्ट करण्याच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे सकारात्मक परिणाम मिळाले. रोगाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाले. बायोकॅप्सूलच्या वापरामुळे पूर्वीचे २५ टन उत्पादन वाढून ३३ टन झाले. एकरी ८ टन उत्पादन वाढले. संपर्क: बिझनेस प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट विभाग, भारतीय मसाले संशोधन संस्था फोन : ०४९५-२७३१४१० विस्तारित क्र.२०५ -मेल : iisrbpd२०१९@gmail.com

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com