सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित प्रकाश सापळा

प्रकाशाकडे आकर्षित होणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी खास सौरऊर्जेवर चालणारा स्वयंचलित प्रकाश सापळा कटक (ओडिशा) येथील राष्ट्रीय भात संशोधन केंद्राने विकसित केला आहे. त्यामध्ये कीटक संकलनानंतर शत्रू किडी व मित्र कीटक वेगळे करण्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. स्वयंचलित, वापरण्यास सोपा व टिकाऊ असलेल्या या प्रकाश सापळ्याला देशातील पहिले पेटंट प्राप्त झाले आहे.
 सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण  स्वयंचलित प्रकाश सापळा
सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित प्रकाश सापळा

पीक संरक्षणाच्या  खर्चात वाढ होत असून, असंतुलित रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे पर्यावरण प्रदूषणही वाढत आहे. एकात्मिक कीडनियंत्रणामध्ये सापळे महत्त्वाचे असून, त्याचे विविध प्रकार आहेत. त्यातील पतंगवर्गीय किडींची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रकाश सापळे उपयुक्त ठरतात. मात्र अनेक ठिकाणी शेतात विजेची उपलब्धता नसते, भारनियमनामुळे अनियमित पुरवठा यामुळे प्रकाश सापळे वापरताना मर्यादा येतात. यासाठी कटक (ओडिशा) येथील राष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील कीटक शास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. श्यामरंजन दास महापात्र आणि वनस्पती संरक्षण विभागाचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मायाबिनी जेना यांनी सौरऊर्जेवर चालणारा प्रकाश सापळा विकसित केला आहे. त्याचे सर्वांत वैशिष्ट्य म्हणजे या सापळ्यात किडी (शत्रू कीटक) अडकून नियंत्रण होत असताना मित्र कीटकांचे रक्षण करणे शक्य होते.  सापळ्याचे वेगळेपण व रचना 

  • प्रकाशाकडे आकर्षित होणाऱ्या पतंगवर्गीय किडींसाठी प्रकाश सापळा विकसित केला आहे. त्यावर सौर पॅनेल बसवले असून, त्यातून दिवसभर शोषलेली सौरऊर्जा ही बॅटरीमध्ये साठवली जाते. अंधार पडताच प्रकाश सापळा सुरू करण्यासाठी एक सेन्सर बसवला आहे.   
  • प्रकाश सापळ्यात जमा झालेल्या किडी खाली लावलेल्या नरसाळ्यातून संकलनपात्रात येतात. 
  •  मा होणाऱ्या कीटकांपैकी शत्रू कीड आणि मित्र कीटक यांच्या आकाराचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार शत्रू किडी या आकाराने मोठ्या, तर मित्र कीटक हे आकाराने लहान असल्याचे लक्षात आले. त्या अनुषंगाने संकलनपात्रामध्ये योग्य मेशची जाळी बसवली असून, खाली दोन स्वतंत्र कप्प्यांची विभागणी केली आहे. 
  • शत्रू किडी आणि मित्र कीटक हे वेगवेगळ्या कप्प्यात जावेत, यासाठी पात्राच्या वरील भागातच कंपक समायोजन व्यवस्था (vibration Assembly) वापरली आहे. त्याच्या नियंत्रणासाठी कंट्रोलर व स्वतंत्र दुसरा सेन्सर बसवला आहे. 
  • तांत्रिक बाबी 

  • बॅटरी ही सोलर फोटोव्होल्टाइन पॅनेलद्वारे चार्जिंग.
  • बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ५ दिवस प्रकाश सापळा चालू शकतो.
  •   धुके किंवा ढगाळ वातावरणात सूर्यप्रकाश उपलब्ध न झाल्यास, या बॅटरी विद्युत ऊर्जेवर चार्जिंग शक्य. 
  • प्रकाश सापळा सुरू व बंद होण्यासाठी टायमर बसवला आहे. आपल्या गरजेप्रमाणे वेळ निश्‍चित करता येते.
  • जमलेले मित्र कीटक व शत्रू किडी वेगळे करण्यासाठी जाळीने दोन कप्पे केले असून, विशेष कंपक समायोजन व्यवस्था आहे. 
  • सापळ्याची कार्यपद्धती 

  • सापळ्यामध्ये सेन्सर बसवलेले असल्याने अंधार पडताच दिलेल्या वेळेवर स्वयंचलितपणे सापळा कार्यान्वित होतो. पुढील तीन चार तासांत पुन्हा बंद होतो. यात टायमर दिलेला असून, त्यानुसार वापरकर्त्याला प्रकाश सापळा सुरू ठेवण्याची वेळ निश्‍चित करता येते. 
  • सेन्सरमुळे अंधार पडताच सापळ्यातील बल्ब सुरू होतो. प्रकाशाकडे आकर्षित होऊन सर्व प्रकारचे कीटक खालील नरसाळ्याद्वारे संकलन पात्रात पडतात. पात्राच्या वरील भागात जाळी बसवलेली आहे. याच पातळीवर सापळ्यातील दुसरा सेन्सर कंपनक्रिया सुरू करण्यासाठी कंट्रोलरला सूचना देतो. कंपन क्रिया सुरू झाल्यानंतर संकलन पात्राच्या वरील भागात बसवलेल्या जाळीच्या माध्यमातून आकाराने छोटे असलेले मित्र कीटक जाळीतून खाली स्वतंत्र कप्प्यात पडतात. आकाराने मोठे असलेले शत्रू किडी या दुसऱ्या कप्प्यात जाऊन पडतात.
  • सापळ्याच्या खालील भागातील दोन्ही कप्प्यांची उघडझाप करता येते. त्यामुळे जमा झालेले मित्र कीटक पुन्हा पर्यावरणात सोडून देता येतात. तर दुसऱ्या कप्प्यातील शत्रू किडींची संख्या मोजून सर्वेक्षण करता येते. त्यांना नष्ट करण्यासाठी शिफारशीप्रमाणे रसायन किंवा उकळत्या पाण्याचा वापर करता येत असल्याचे डॉ. महापात्र सांगतात.
  • सापळ्याच्या चाचण्या व निरीक्षणे 

  • भात, डाळवर्गीय पिके, फळभाज्या यांसह आंबा या पिकांच्या लागवड क्षेत्रात सुरुवातीच्या टप्प्यात हा सापळा बसवून निरीक्षणे नोंदविण्यात आली. अधिक कीटक आकर्षित करणाऱ्या बल्बचा वापर केला गेला. सातत्याने चाचण्या घेऊन निरीक्षणे नोंदवून योग्य ते बदल करण्यात आले. उसासह विविध पिकांसाठी हानिकारक ठरणाऱ्या हुमणी अळीचे प्रौढ भुंगेरे हे वळवाच्या पहिल्या पावसाच्या वेळी (मेअखेर ते जून) जमिनीतून मिलनासाठी बाहेर पडतात. परिसरातील कडुनिंबासह विविध झाडांवर रात्रीच्या वेळी एकत्र येतात. हे भुंगेरे प्रकाश सापळ्यामध्ये सुमारे ७० टक्क्यांपर्यंत अडकत असल्याचे निरीक्षणात दिसून आले. हा सापळा बहुतांश पतंगवर्गीय किडींच्या सर्वेक्षण आणि नियंत्रणासाठी उपयुक्त असल्याचे डॉ. महापात्र यांनी सांगितले. 
  • रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय. 
  • एकदा गुंतवणूक करून दीर्घकाळ वापर करणे शक्य.
  • पतंगवर्गीय व प्रकाशाकडे आकर्षित होणाऱ्या केवळ शत्रू कीटकांचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य. 
  • कीटक अडकल्यामुळे प्रजननात आपोआप घट होऊन संभाव्य प्रादुर्भाव कमी राहतो.
  • किडींचे सर्वेक्षण करून एकात्मिक उपाययोजना करणे शक्य.
  • सापळ्याचे फायदे 
  • पर्यावरणपूरक पद्धतीने शत्रू किडींचे नियंत्रण शक्य. वेगळ्या कप्प्यांमुळे मित्र कीटकांना जीवदान देणे शक्य. 
  • रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होण्यास मदत. 
  • विविध प्रकारच्या कीटकांचे एकत्रितपणे प्रभावी नियंत्रण.
  • आवश्यकतेनुसार एका शेतातून दुसरीकडे सापळ्याचे स्थलांतर करणे शक्य.
  • सापळा टिकाऊ असून अधिक वर्षे वापरता येत असल्याने किफायतशीर.
  • वापरण्यास सुलभ आणि देखभाल खर्च कमी.
  • शेतात अशा प्रकारे वापरावा सापळा 

  •  सापळ्याचा खांब स्थिरपणे जमिनीवर राहील, अशी व्यवस्था करावी.
  •  ज्या शेतात कीटक नियंत्रण करायचे त्या पिकाजवळ किंवा पिकाच्या उंचीपेक्षा ६० सें.मी उंचीवर सापळा बसवावा. 
  •  जमिनीपासून पाच मीटर अंतरावर प्रकाश स्रोत असावा.
  •  सौर पॅनेल, प्रकाशस्रोत, नरसाळे व संकलन पात्र नियमितपणे स्वच्छ करावे. 
  •  दररोज सकाळी अडकलेल्या शत्रू किडी गोळा करून नष्ट कराव्यात. वेगळ्या कप्प्यातील उपयुक्त मित्र कीटक निसर्गात पुन्हा मुक्त कराव्यात.
  • किमान खर्चात सापळ्याची निर्मिती 
  • मोठ्या आकाराचा प्रकाश सापळ्याची रेंज १०० मीटर असून, १ हेक्टर क्षेत्रासाठी एक (सर्वेक्षण) पुरेसा ठरतो. नियंत्रणासाठी हेक्टरी तीन वापरावे लागतात. त्याची किंमत ८८०० रुपये आहे. लहान आकाराच्या प्रकाश सापळ्याची किंमत ४१०० रुपये असून, ८३ मीटर रेंज असलेला हा सापळा सर्वेक्षणासाठी एकरी एक तर नियंत्रणासाठी एकरी तीन सापळे पुरेसे आहेत. या तंत्रज्ञानाचे हस्तांतर झाले आहे.
  • पीकनिहाय या किडींचे नियंत्रण 

  •   भात ः खोड किडा, पाने गुंडाळणारी, तुडतुडा, हुमणी.
  •   कडधान्य : शेंग पोखरणारी अळी, नाकतोडा, मुळे खाणारी काळी अळी इ.
  •   मका ः खोड किडा
  •   सोयाबीन ः उंट अळी व लष्करी अळी
  •   भाजीपाला ः फळे व शेंगा पोखरणारी अळी, चौकोनी ठिपक्यांच्या पतंग, उंट अळी इ.
  •   ऊस ः हुमणी, तुडतुडे, खोड पोखरणारी अळी इ.
  •   भुईमूग ः केसाळ अळी, फुलकिडे
  •   आंबा ः पतंग, नाकतोडे
  • - डॉ. श्यामरंजन दास महापात्र, ८२८०२४९२०४ (प्रमुख शास्त्रज्ञ, कीटक शास्त्र विभाग, राष्ट्रीय भात संशोधन केंद्र, कटक, ओडिशा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com