‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वाद

प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कल्चर्ड मांसाच्या निर्मितीवेळीच त्यात मेद तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे.
‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वाद
‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वाद

प्रयोगशाळेत पेशींपासून वाढवलेल्या मांसाला नेहमीच्या मांसाप्रमाणे चव, पोत आणि स्वाद येण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. चव, स्वाद, पोत या बाबी अन्नाला वेगवेगळ्या घटकांमुळे येत असतात. प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कल्चर्ड मांसाच्या निर्मितीवेळीच त्यात मेद तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. जपानी शास्त्रज्ञांनी गाईच्या पेशीतून मिळवलेल्या स्नायूंच्या पेशी आणि मेद यामध्ये योग्य ते जनुकीय बदल घडवून एकत्रितरीत्या वाढवले आहे. पर्यावरण आणि नैतिकतेविषयी जागरूकता वाढत असून, मांसासाठी पशुपालनावर लोकांचा आक्षेप वाढत जाणार आहे. मात्र जागतिक पातळीवर मांसाहारी असलेल्या लोकांचे प्रमाणही तुलनेने मोठे आहे. मांस उत्पादनासाठी पशू-पक्षीपालन हा प्रमुख कृषिपूरक व्यवसाय आहे. मात्र या पशुपक्ष्यासाठी लागणारे पाणी, अन्न आणि जमीन यांचा ताण सध्याच्या उपलब्ध स्रोतांवरच पडणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत. या भविष्यातील स्पर्धेचा विचार करता प्रयोगशाळेत पर्यायी मांस उत्पादन व्यवसायाला चालना मिळू शकते. सध्या काही प्रमाणात वनस्पतिजन्य मांसाच्या निर्मितीकडेही लोक वळले आहेत. मात्र या दोन्ही पद्धतीतून मिळवलेल्या मांसाला मूळ मांसाप्रमाणे चव, स्वाद येत नसल्याची तक्रार खवय्यांची असते. प्रयोगशाळेत मांसाची निर्मिती ः सध्या संपूर्ण प्राणी योग्य कालावधीसाठी वाढवून त्यांची हत्या केली जाते. यामुळे एखाद्या अन्य सजीवाला मारण्याचा अधिकार माणसांना कोणी दिला, असा एक नैतिक प्रश्‍न विचारला जातो. त्याला सामोरे जाण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये प्राण्यांच्या पेशींची वाढ करून त्याचा वापर मांस म्हणून केला जातो. या प्रक्रियेमध्ये पारंपरिक मांस उत्पादनाच्या तुलनेमध्ये कमी जागा व पाणी लागते. तसेच कर्ब उत्सर्जनही कमी होत असल्याचा दावा केला जातो. अर्थात, हा उद्योग आता सुरू होत असल्याने त्याचे नेमके फायदे, तोटे लक्षात येण्यास काही काळ जाऊ द्यावा लागेल. हा उद्योग यशस्वी होण्यामध्ये मांसाची किंमत आणि चव, पोत या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. १) २०१३ मध्ये ज्यावेळी प्रयोगशाळेमध्ये मांसाच्या उत्पादनाला सुरुवात झाली त्यावेळी त्यांची किंमत होती, ३.२५ लाख डॉलर प्रति बर्गर. ती कमी होत आता २०२० मध्ये दहा डॉलरपर्यंत खाली आली आहे. सध्या केवळ सिंगापूरमध्ये नियंत्रित कल्चर्ड मांस उत्पादनाच्या विक्रीला परवानगी आहे. येथे एक चिकन नगेट्स २३ डॉलरला मिळते. म्हणजेच ते अद्यापही महागच असले तरी भविष्यात उत्पादनाचे प्रमाण वाढल्यानंतर किंमत नक्कीच कमी होऊ शकते. उदा, सध्या वाग्यू स्टिक्सची प्रति पौंड (सुमारे अर्धा किलो)२०० डॉलर इतकी पडते, अशा वेळी कल्चर्ड मांस स्वस्तात पडू शकते. २) दुसरा मुद्दा आहे त्याच्या चवीचा! या तयार होत असलेल्या मांसामध्ये केवळ तंतुमय पदार्थ अधिक असतात, तर मेद अजिबात असत नाही. त्यामुळे सध्याच्या मांसाला जो एक चरबीचा विशिष्ट स्वाद येतो, तो नव्या मांसाला येत नाही. या मांसापासून अन्नपदार्थ तयार करताना त्यात बाहेरून मेद मिसळावे लागते. मात्र मांस निर्मितीवेळीच त्यासोबत मेदाची निर्मिती करण्यासाठी जपाशी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यांनी जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करत गाईंच्या स्नायूंच्या पेशींसोबतच मेद वाढवण्याची नवी पद्धत शोधली आहे. हे संशोधन जर्नल सेलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. आव्हाने संपलेली नाहीत... सध्या या नव्या पद्धतीने संशोधकानी मांसाच्या अर्धा मिलिमीटर व्यासाच्या लहान तुकड्यापासून १.५ सेंटिमीटर व्यासाचे तुकडे तयार केले आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारची तेले आणि मेद मिसळता येतात. यामुळे या पद्धतीने मांसाची वाढ करण्यासाठी साधारण २१ दिवस लागतात. अर्थात, हा उद्योग अद्याप बाल्यावस्थेमध्ये आहे. १० वर्षांपूर्वीची एक संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी २०२१ उजाडले आहे. अमेरिका आणि इस्राईलमध्ये कल्चर्ड मांसाची निर्मिती केंद्रे सुरू झाली असली तरी विक्री आणि अन्य प्रक्रियांसाठी अनेक ठिकाणी अद्याप परवानग्या दिलेल्या नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com