पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला यांत्रिकीकरणातून इतिहास

२६ शेतकऱ्यांनी आपापल्या गरज आणि आर्थिक कुवतीनुसार मनुष्यचलित, अर्धस्वयंचलित किंवा संपूर्ण स्वयंचलित पुनर्लागवड यंत्रे खरेदी केली. मग या यंत्रांचा वापर केवळ स्वतःच्या गावापुरताच न राहता आसपासच्या गावामध्ये होऊ लागला. आज या परिसरातील १६५० हेक्टर ( सुमारे ६५ टक्के) क्षेत्रामध्ये यंत्राद्वारे भात पुनर्लागवड होत आहे.
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला यांत्रिकीकरणातून इतिहास
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला यांत्रिकीकरणातून इतिहास

भारतातील भात आणि गहू यांचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरियाना, पंजाब राज्यांमध्ये आजवर पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती. या पिकांच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचनाचे पाणी इ. निविष्ठांचे प्रमाण अचूकतेपेक्षा अंदाजावर आधारित होते. याचा फटका पर्यावरणाला तर बसतोच, पण शेतकऱ्यांनाही प्रति किलो निविष्ठा उत्पादनाचे प्रमाण कमी राहते. परिणामी खर्चात वाढ होते. यावर मात करण्यासाठी विविध स्रोत संवर्धन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी संशोधन संस्थांनी कंबर कसली आहे. स्रोत संवर्धन तंत्रामध्ये पारंपरिक भात पुनर्लागवड तंत्राऐवजी सरळ पेरणी, जमिनीसाठी लेसर आधारित जमीन सुधारणा यांचा समावेश आहे. गेल्या दशकांमध्ये मजुरांची समस्या सर्वच शेतीक्षेत्राला मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यात गेल्या दीड वर्षामध्ये कोरोनामुळे मजुरांचा आणखीनच तुटवडा जाणवत आहे. परिणामी यंत्रे, तंत्रज्ञानाच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. यात बद्दुवाल (जि. मोगा) या छोट्याशा गावाने चांगलीच आघाडी घेतली आहे. अनेक शेतकरी आता यांत्रिक पद्धतीने भाताची पुनर्लागवडही करत आहेत. सध्या बाजारात दोन प्रकारची भात पुनर्लागवड यंत्रे उपलब्ध आहेत. मागून चालवता येणाऱ्या यंत्राने केवळ दोन ते तीन माणसांच्या साह्याने या यंत्राद्वारे २.५ एकर पुनर्लागवड करणे शक्य होते. चार चाकांना गती देणाऱ्या स्वयंचलित भात पुनर्लागवड यंत्राद्वारे पाच माणसांच्या साह्याने ८ ते १० एकर प्रति दिन पुनर्लागवड करता येते. या यंत्रांचा महत्त्वाचा फायदा म्हणजे एक समान अंतरावर रोपांची लागवड होत असल्यामुळे रोपांची संख्या प्रति एकरी योग्य राहते. त्यात रोपांची वाढीसाठी योग्य तितके अंतर, खेळती हवा, फवारणी करण्याची गरज भासल्यास चालण्यासाठी मोकळी जागा अशा अनेक कारणांमुळे उत्पादनामध्ये वाढ शक्य होते. पारंपरिक पद्धतीने रोपांची संख्या कमी अधिक राहत असल्याने पिकांची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यांत्रिक पुनर्लागवडीसाठी मॅट पद्धतीची रोपवाटिका ही पूर्वअट असते. बद्दुवाल गावाने मॅट पद्धतीची रोपवाटिका करण्यासाठी ट्रे किंवा पॉलिथिन शीटचा वापर करण्याची पद्धत वापरली आहे. पॉलिथिन पेपरवर एक फ्रेम ठेवली जाते. त्या फ्रेममध्ये शेतातील माती भरली जाते. त्यात भात बियाणे लावले जातात. या पद्धतीने तीन ते चार एकरासाठी भात रोपवाटिका करण्यासाठी दोन माणसे पुरेशी होतात. या प्रक्रियेसाठी ट्रॅक्टर चलित नर्सरी सीडरही उपलब्ध आहेत. त्याद्वारे जमिनीवर पॉलिथिन पेपर अंथरण्यापासून बाजूची माती त्यावर उचलून घेणे, त्यावर बिया पसरणे ही सर्व कामे एकाच वेळी केली जातात. या यंत्रामुळे प्रति तास ०.२८ एकर क्षेत्र ( आठ तासात २.२४ एकर क्षेत्र) रोपवाटिका शक्य होते. मजुरांची संख्या व कष्ट कमी होतात. उत्पादन खर्चातही सुमारे ६० टक्क्यांपर्यंत बचत होते. ‘केव्हिके’चे प्रशिक्षणात योगदान ः कोणत्याही नवे तंत्र शिकताना किंवा अवलंबताना काही अडचणी नक्कीच येतात. रोपवाटिका कशी करायची, माणसांद्वारे चालणारी यंत्रे, अर्ध किंवा संपूर्ण स्वयंचलित यंत्रे कशी चालवायची, याची माहिती पोचून कौशल्य शेतकऱ्यांमध्ये निर्माण होण्यास काही कालावधी नक्कीच लागतो. या टप्प्यामध्ये बद्दुवाल येथील कृषी विज्ञान केंद्राने मोठे काम केले. त्यांनी पारंपरिक पद्धतीच्या रोपवाटिकांपासून शेतकऱ्यांना मॅट पद्धतीच्या रोपवाटिकांकडे व यांत्रिक लागवडीकडे वळविण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांनी मोगा जिल्ह्यातील धरमकोट ब्लॉकमध्ये शेतकऱ्यांची सातत्याने प्रशिक्षणे घेतली. एकट्या बद्दुवाल गावामध्ये ६४६ लहान आणि मध्यम शेतकरी कुटुंबे असून, त्यांच्याकडे २८०० एकर शेती आहे. त्यातील ९० टक्के क्षेत्रामध्ये भात आणि गहू ही पीक पद्धती राबवली जाते. ‘मास्टर ट्रेनर’ ते व्यावसायिक २०१३ मध्ये बद्दुवाल गावातील शेतकरी गुरजंत सिंग यांनी पहिला यांत्रिक भात प्लॅंटर खरेदी केला. त्यानंतर मॅट पद्धतीने रोपवाटिका करून यंत्राने पुनर्लागवड सुरू केली. सुरवातीपासून यंत्राद्वारे लागवडीचा अनुभव मिळाल्याने याच शेतकऱ्याला कृषी विज्ञान केंद्राने मास्टर ट्रेनर म्हणून प्रोत्साहन दिले. अनेक शेतकऱ्यांना या नव्या तंत्राचे फायदे दिसून लागल्याने त्यांच्या मागोमाग अनेकजण नव्या तंत्राकडे वळले. गुरजंत सिंग यांनी स्वतःच मोठ्या प्रमाणात मॅट पद्धतीने रोपे तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर यंत्र भाड्याने देऊन लागवडीचाही व्यवसाय जोमात सुरू झाला. त्यांना सुरू झालेले दुहेरी उत्पन्न पाहता अन्य २६ शेतकऱ्यांनी आपापल्या गरज आणि आर्थिक कुवतीनुसार मनुष्यचलित, अर्धस्वयंचलित किंवा संपूर्ण स्वयंचलित पुनर्लागवड यंत्रे खरेदी केली. मग या यंत्रांचा वापर केवळ स्वतःच्या गावापुरताच न राहता आसपासच्या गावामध्ये होऊ लागला. आज या परिसरातील १६५० हेक्टर ( सुमारे ६५ टक्के) क्षेत्रामध्ये यंत्राद्वारे भात पुनर्लागवड होत आहे. हे यंत्र २५०० रुपये प्रति एकर या भाड्याप्रमाणे पुनर्लागवड करून दिली जाते. पुनर्लागवडीचा हा खर्च माणसांद्वारे पुनर्लागवडीच्या खर्चाच्या ( ३ ते ४ हजार रुपये प्रति एकर) तुलनेत कमी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार किती वेगाने होऊ शकतो, याचा मार्गच या बद्दुवाल गावाने सर्वांना दाखवला आहे. अधिक मजुरांवर अवलंबून असलेल्या पारंपरिक तंत्राऐवजी भात आणि गहू लागवडीच्या यंत्राकडे शेतकरी वळत आहेत. मॅट पद्धतीच्या रोपांची निर्मिती व विक्री, पुनर्लागवडीसाठी यंत्र भाड्याने देणे, पुनर्लागवड करून देणे अशा अनेक प्रकारे येथील तरूणांनी किमान स्वयंरोजगार ते उद्योजकता इथपर्यंतचा मोठा टप्पा पार पाडला आहे. (स्रोत ः भारतीय कृषी संशोधन संस्थेचे कृषी तंत्रज्ञान वापर संशोधन संस्था (ATARI), लुधियाना, पंजाब.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com