agricultural stories in Marathi, technowon, milk collection centre implments | Agrowon

दूध संकलन केंद्रासाठी आवश्यक उपकरणे
संतोष चोपडे, डॉ. माधव पाटील, निळकंठ पवार
सोमवार, 10 जून 2019

दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यापैकी दूध संकलन ही पहिली पायरी असून, असे केंद्र दूध प्रक्रिया क्रेंद्र व दूध उत्पादक यांच्यातील दुवा ठरते. यातून ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होते. या व्यवसायासाठी आवश्यक साधने, उपकरणे यांची माहिती घेऊ.

दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यापैकी दूध संकलन ही पहिली पायरी असून, असे केंद्र दूध प्रक्रिया क्रेंद्र व दूध उत्पादक यांच्यातील दुवा ठरते. यातून ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होते. या व्यवसायासाठी आवश्यक साधने, उपकरणे यांची माहिती घेऊ.

दूध उत्पादनाच्या दृष्टीने भारताचा १६५.४ दशलक्ष टन वार्षिक दूध उत्पादनासह जगात प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या एकूण दूध उत्पादनाच्या १८.५ प्रतिशत उत्पादन भारतात होते. भारतातील दूध उत्पादन विखुरलेले असून, त्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. भारतातील ८५ टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे ४५ टक्के जमीन असून, त्यांच्याकडे ७५ टक्के दुधाळ जनावरे आहेत. त्यांच्यामार्फत ६०-६५ टक्के दूध उत्पादन होते. अशा स्थितीत खासगी दूध संकलन केंद्र चालू करणे फायद्याचे ठरते. सध्या प्रतिलिटर दुधामागे खासगी डेअरी २ ते ३ रुपये एवढे कमिशन देतात. दूध संकलन केंद्रावरील दूध शीतकरण, दुधाची गुणवत्ता ओळखणे, मजूर व वाहतूक इ. सर्व खर्च वगळता प्रतिलिटर दुधामागे दीड ते दोन रुपये नफा राहू शकतो. प्रति एक हजार लिटर दूध संकलन झाल्यास चांगली प्राप्ती होऊ शकते. यात स्वतःचे काही प्रमाणात दूध उत्पादन असल्यास दूध संकलन केंद्रातील सोयी-सुविधांचा उपयोग अधिक कार्यक्षमतेने घेता येतो.
परिसरातील सर्व दूध उत्पादकांशी संपर्क ठेवत त्यांना दूध उत्पादनवाढ, स्वच्छता याविषयी अद्ययावत माहिती देत राहावी. यातून उच्च प्रतीचे दूध संकलन होऊ शकते.

दूध संकलन केंद्र उभारताना...

  • योग्य ठिकाण ः अधिक दूध उत्पादन होणाऱ्या क्षेत्रात परिसरातील सर्व दूध उत्पादकांना जवळ होईल असे ठिकाण निवडावे.
  • योग्य क्षमता ः कमी क्षमतेचे केंद्र उघडल्यास व्यवस्थापन करणे अवघड होते, तर अनावश्यक अधिक क्षमतेमुळे गुंतवणूक वाढून त्याचा अंतिम भार व्यवसायावर पडतो. संकलन केंद्राची क्षमता ठरवण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात.
  1. दूध उत्पादकांची संख्या
  2. दूध संकलनाची वारंवारता (दिवसातून एक किंवा दोन वेळा)
  3. सुगीच्या काळातील प्रतिदिन दूध उत्पादन
  4. परिसरातील इतर दूध संकलन केंद्रांची संख्या
  5. दूध प्रक्रिया केंद्रापर्यंत पोचण्याकरिता लागणारा वेळ

दुधाची गुणवत्ता ओळखण्यासाठी चाचण्या व आवश्यक उपकरणे :

१. दुधाचे ज्ञानेंद्रियानुसार (संवेदनात्मक) मूल्यमापन ः दुधाची चव, रंग, वास व गंध या आधारे दुधाला स्वीकृत किंवा अस्वीकृत करावे. दुधाला चारा, मल-मूत्र व इतर दुर्गंध येत असल्यास, तसेच दूध चवीला आंबट व लालसर/गुलाबी दिसून येत असल्यास अस्वीकृत करावे. याकरिता कुठल्याही उपकरणाची गरज नसते.

२. आम्लता ः गाईच्या दुधाची आम्लता ०.१२० ते ०.१४०, तर म्हशीच्या दुधाची आम्लता ०.१४ ते ०.१६ टक्के लॅक्टिक आम्ल असते. यासाठी हायड्रॉक्साईड, फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर, कॅपिलरी नळी, शंकाकार काचेचा चंबू इ. साहित्य लागते. दुधाला आंबटपणा असेल तर या चाचणीद्वारे निश्चित करून दूध अस्वीकृत केले जाते.

३. क्लॉट ऑॅन बॉयलिंग (गरम केल्यानंतर दूध साकळणे ) ः या चाचणीचा उपयोग दुधाच्या आम्लतेचा अंदाज लावण्यासाठी होतो. ५ मिलि दूध परीक्षानळीत घेऊन परीक्षानळी उकळत्या पाण्यात ठेवा. दूध उकळल्यानंतर फाटले/ साकळले तर दूध स्वीकृतीसाठी अयोग्य ठरविले जाते.

४. दुधातील स्निग्धांश व स्निग्धेतर घन घटक तपासणे व दुधाचे तापमान ः दूध संकलन व्यवस्थापनातील दूध खरेदी दर हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. दूध खरेदी दर दुधाच्या दर्जाशी निगडित ठेवल्यामुळे चांगल्या प्रतीचे दूध संकलन शक्य होते. दुधाचा खरेदी दर स्निग्धांशाच्या प्रमाणावर आधारित असतो, त्यामुळे त्याचे प्रमाण कमी वेळेत अचूकपणे ओळखणे गरजेचे असते.
दुधाचे स्निग्धांश ओळखण्यासाठी गर्बर पद्धतीचा उपयोग होतो. तसेच लॅक्टोमीटरने स्निग्धेतर पदार्थ व घनघटकाचे प्रमाण माहिती होते. मात्र, या पद्धतीने जास्त वेळ लागतो. याकरिता इलेक्ट्रॉनिक दूध चाचणी उपकरणाच्या साह्याने दुधातील स्निग्धांश, स्निग्धेतर, घनघटकांचे प्रमाण व दुधाचे तापमान तसेच दुधामधील पाण्याची भेसळ काही सेकंदांत ओळखता येते.

५. दुधाची घनता तपासणे (दुधामधील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी) ः गाईच्या दुधाची घनता १.०२८ ते १.०३०, तर म्हशीच्या दुधाची घनता १.०३० ते १.०३२ असते. पाण्याच्या भेसळीमुळे दुधाची घनता कमी होते. इलेक्ट्रॉनिक दूध चाचणी उपकरण उपयुक्त ठरते.

दूध संकलन केंद्रासाठी आवश्यक साधने

अ) दूध मोजणारी/ वजन करणारी प्रणाली :

सरासरी एका दूध उत्पादकाकडून किमान संकलित होणाऱ्या दुधाचे प्रमाण ठरवून दूध मोजणाऱ्या प्रणालीची क्षमता ठरवावी. दूध आकारमानानुसार किंवा वजनानुसार खरेदी केले जाते. भारतात मुख्यतः दूध वजनानुसार खरेदी केले जाते. सरासरी एका उत्पादकाकडून ८० किलोपेक्षा कमी दूध संकलन होत असल्यास स्टेनलेस स्टील प्लॅटफॉर्म असलेली वजन प्रणाली खरेदी करावी. यापेक्षा जास्त दूध संकलित होत असेल तर लोड सेलधारक स्टेनलेस स्टीलच्या टाकीचा (अनुरूप क्षमतेची) उपयोग करावा.

ब) संगणक, प्रिंटर आणि बॅटरी :

दूध संकलनाबाबतचा दैनंदिन व्यवहार साठवण्याकरिता संगणकाची गरज असते. यातून व्यवहारातील त्रुटी कमी होतात. कमी वेळेत अचूक हिशेब तयार होतो. दूध उत्पादकाकडून किती दूध घेतले व किती मोबदला दिला याबाबतची माहिती काही सेकंदांत मिळते. संगणकासोबत प्रिंटरची व्यवस्था करावी, म्हणजे दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांनी दिलेल्या दुधाच्या देयकाची पावती काढता येईल. त्याचप्रमाणे विजेच्या भारनियमनातही संगणक व सर्व प्रणाली व्यवस्थित चालण्यासाठी बॅटरी आवश्यक ठरते.

क) दूध साठविण्यासाठी उष्णातारोधक शीत टाकी/ बल्क मिल्क कूलर :
दूध प्रक्रिया केंद्राद्वारे दूध नेण्यासाठी टँकर दिवसातून एकदाच येत असेल किंवा दूध संकलित झाल्यानंतर तीन तासांपेक्षा अधिक काळ लागत असल्यास दूध संकलन केंद्रावर दूध साठविण्यासाठी उष्णतारोधक शीत टाकी/ बल्क मिल्क कूलर आवश्यक असतो. दररोज होणाऱ्या सरासरी दूध संकलनानुसार टाकीची क्षमता ठरवावी. जास्त संकलन असल्यास दूध प्रक्रिया केंद्र बल्क मिल्क कूलर उपलब्ध करून देते.

दूध संकलन केंद्र सुरू करण्याचे फायदे :-

१. सद्यःस्थितीत प्रतिलिटर दुधामागे दूध प्रक्रिया क्रेंद्राकडून रु. २ ते ३/- कमिशन दिले जाते. मजूर, विद्युत व इतर खर्च सोडल्यास प्रतिलिटर रु. १.५ ते २/- निव्वळ नफा मिळतो.
२. दूध संकलनात सकाळी व सायंकाळी दोन ते तीन तास काम असते. अन्य वेळी शेती किंवा इतर उद्योग करता येतात.
३. दुधाचे संकलन अधिक असल्यास आणि भांडवल उपलब्ध करणे शक्य असल्यास दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीविषयक योग्य प्रशिक्षण घेऊन स्वतःच दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करण्याचा विचार करावा. प्रक्रिया उद्योगातून अधिक नफा मिळू शकतो.
४. दूध संकलन केंद्र जवळ असणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.

संपर्क ः संतोष चोपडे, ९०११७९९२६६
दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर
 

इतर टेक्नोवन
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
फळांच्या व्यावसायिक प्रतवारीसाठी यंत्र...भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कृषी...
शेवाळापासून पर्यावरणपूरक दिवे...फ्रेंच जैव रसायनतज्ज्ञ पियरे कॅल्लेजा यांनी...
कृषी अवशेष, रबर यांच्या मिश्रणापासून...शहरामध्ये अंगण नसले तरी गच्ची, गॅलरीमध्ये...
तणनियंत्रणासाठी घरगुती साधनांतून तयार...वर्धा जिल्ह्यातील कासारखेडा (ता. आर्वी) येथील...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी निचरा...मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेने...
पारंपरिक पदार्थांसाठी वातावरणरहित तळण...भारतीय लोकांना तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात...
बायोगॅसद्वारे विद्युतनिर्मिती फायदेशीरडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
ऊर्जा कार्यक्षम गूळ प्रक्रिया यंत्रसाखरेच्या तुलनेत गूळ हा अधिक प्रमाणात पौष्टीक,...
पारंपरिक साठवण पद्धतीला नव्या...पारंपरिक साठवण पद्धतींना नव्या तंत्रज्ञानाची जोड...
बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणीरुंद वरंबा सरी यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५०...
कढीपत्ता भुकटी निर्मितीकढीपत्ता हा आहारामध्ये स्वाद वाढवण्यासाठी, रुचकर...
धान्य, बियाणे साठवणुकीसाठी झिल्ले,...महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यांत अनेक...
निर्वातात पदार्थ तळण्याचे तंत्रज्ञान तळलेले पदार्थ हे आपल्या आहाराचा एक भाग आहे....
सागरी पवनचक्क्यांच्या उभारणीतील...गेल्या काही वर्षांपासून अमेरिकी ऊर्जा विभागाच्या...
कांदा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रेकांद्याच्या उत्पादनासोबतच दरामध्ये मोठी चढ-उतार...
बेकरी प्रक्रिया उद्योगासाठी उपकरणेप्रामुख्याने तृणधान्यावरील प्रक्रिया उद्योगामध्ये...
ट्रॅक्‍टरची तांत्रिक तपासणी महत्त्वाची...ट्रॅक्‍टरची योग्य निगा राखावी. ट्रॅक्‍टर...