सुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्ट

सुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्ट
सुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्ट

खरीप हंगामातील ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, बाजरी अशा प्रमुख पिकांच्या पेरणीसाठी सुधारीत यंत्राचा वापर केल्यास श्रम आणि कष्टासोबत पेरणी खर्चातही बचत होते. या लेखामध्ये विविध पेरणी यंत्रांची ओळख करून घेऊ.

पारंपरिक पेरणी पद्धतीमध्ये शेतकरी एक चाड्याची पाभर प्रामुख्याने वापरत असे. त्यातून बियांची पेरणी होत असली तरी खतांची मात्रा अंदाजाने शेतात फोकून दिली जाई. यातही हाताने बी सोडले जात असल्याने कमी अधिक प्रमाण होण्याची शक्यता असे. पुढे एका चाड्याच्या पाभरीऐवजी दोन चाड्याच्या पाभरीचा पर्याय पुढे आला. या दुसऱ्या चाड्याद्वारे जमिनीमध्ये खत पेरून दिले जाई. खत बियांच्या जवळ मातीमध्ये खाली पेरून दिल्यामुळे उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के वाढ मिळू लागली. अर्थात दोन चाड्याच्या पेरणीमध्ये खत आणि बी पेरणीसाठी अनुभवी, कुशल माणसांची आवश्यकता असे. पूर्वी ही पाभर बैलाच्या साह्याने चालवली जाई. बैलचलित पाभरीने अंदाजे २.५ ते ३ एकर पेरणी शक्य होते. तसेच पीक उगवल्यानंतर विरळणी किंवा पुनर्लागवड मजुरांच्या साह्याने करावी लागते. अलीकडे मजुरांचा उपलब्धता कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्याचप्रमाणे केवळ मशागत आणि पेरणीसाठी बैल सांभाळणे जिकिरीचे होत असल्याने बैलांचे प्रमाण गावपातळीवर कमी झाले आहे. ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्रणांचा वापर वाढला आहे. या यंत्रामुळे आठ तासामध्ये ६ ते ७ एकरपर्यंतची पेरणी शक्य आहे. वरील शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन विद्यापीठामध्ये सुधारित अवजारे व यंत्रे विकसित केली आहेत.

बैलचलित बहुउद्देशीय फुले शेती यंत्र

या यंत्राद्वारे ज्वारी, करडई, तूर, मका, सूर्यफूल, भुईमूग, हरभरा इ. पिकाची पेरणी करता येते. तसेच कुळवणी व फणणी करता येते. दोन ओळीतील अंतर ३० के ४५ सेंमी राखता येते. हे यंत्र एका बैलजोडीने चालते. त्याची कार्यक्षमता २.३३ हेक्टर प्रति दिन इतकी आहे.

ट्रॅक्टरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, हरभरा, तूर इ. पिकाची टोकण व दाणेदार खतांची मात्रा पेरता येते. या यंत्रात २२.५ सेंमी अंतरावरील पिकासाठी ९ ओळी, ३० सेंमी अंतरावरील पिकासाठी ७ ओळी आणि ४५ सेंमी अंतरावरील पिकासाठी ५ ओळी एकाच वेळी पेरता येतात. प्रत्येक फणाची पेटी वेगळी असल्याने तुरीसारख्या आंतरपिकाची पेरणीही त्याच वेळी करता येते. किमान ३५ एच ट्रॅक्टरवर चालणारे यंत्र ८ तासात ३ ते ३.५ हेक्टर क्षेत्रावर टोकण पद्धतीने पेरणी करू शकते.

पॉवरटिलरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, हरभरा, तूर इ. पिकाची टोकण व दाणेदार खतांची मात्रा पेरता येते. दोन ओळीतील अंतर २२.५, ३० किंवा ४५ सेंमी ठेवता येते. हे यंत्र १२ एचपी पॉवरटिलरने चालवता येते. या यंत्राची कार्यक्षमता ०.७५ ते १ हेक्टर इतकी आहे.

ट्रॅक्टरचलित फुले सरी वरंबा बहुपीक टोकण यंत्र या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, हरभरा, तूर इ. पिकाची सरी वरंबा टोकण पद्धतीने पेरणी करता येते. सरीच्या दोन्ही बाजूला पेरणी होते. सरीच्या अंतरानुसार लागवडीचे अंतर बदलता येते. हे यंत्र ५५ एचपी ट्रॅक्टरवर चालते. त्याची कार्यक्षमता ०.४५ हेक्टर प्रति तास इतकी असून, कोरडवाहू क्षेत्रासाठी विशेष शिफारस करण्यात आली आहे.

कमी अश्वशक्ती ट्रॅक्टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्र या यंत्राद्वारे मका, भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, तूर इ. पिकाची टोकण व दाणेदार खतांची मात्रा पेरता येते.   

 :  टी. बी. बास्टेवाड, ०२४२६ -२४३२१९ (अखिल भारतीय समन्वयीत कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com