गुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७

गुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७
गुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७

गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी आणि गुऱ्हाळ घरातील प्रक्रिया या बाबी दर्जेदार गूळ निर्मितीवर परिणाम करतात. कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, नगर इ. जिल्ह्यांमध्ये गूळ निर्मिती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. महाराष्ट्रात ६०० पेक्षा जास्त गुऱ्हाळ घरे दौंड तालुक्यात असल्याचे पाहणीत आढळले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २७ टक्के उसाचा वापर आणि उर्वरित महाराष्ट्रात ११ टक्के उसाचा वापर गूळ निर्मितीसाठी होतो. १९६०-६१ मध्ये माणशी १६ किलो गूळ आणि ४.५ किलो साखर वर्षाकाठी वापरली जाई. तेच प्रमाण सध्या माणशी ५ किलो गूळ आणि १८-२० किलो साखर प्रति वर्ष असे झाले आहे. गुळासाठी नवीन वाणाची गरज गुळाची प्रत आणि रंग हे मुख्यत्वे करून उसाच्या जातीवर अवलंबून असतात. प्रत्येक ऊस वाणामधील रसाच्या गुणधर्मात फरक आढळून येतो. त्याचा गुळाच्या प्रतीवर परिणाम होतो. सध्या गूळ निर्मितीसाठी उसाचा को ९२००५ हा वाण कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने वापरला जातो. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर राज्याच्या बहुतांश भागात या वाणाची वाढ होत नाही. तसेच पानांवरील रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गूळ निर्मितीसाठी को ७७५, को ७२१९, कोसी ६७१, को ७५२७, फुले २६५, को ८६०३२ या वाणांचा वापर केला जातो. को ९२००५ हा वाण कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जास्त पावसाच्या हलक्या निचऱ्यांच्या तांबड्या जमिनीत चांगला वाढतो. मात्र उर्वरित महाराष्ट्रात खोल काळ्या जमिनीत योग्य प्रकारे वाढत नाही. जास्त पावसाच्या भागातही अलीकडे या वाणावर तांबेरा, तपकिरी ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव अधिक आढळून येतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गूळ निर्मितीसाठी शेतकऱ्यांना नवीन वाणाची आवश्यकता होती. म्हणून सुरू हंगामात लागवडीसाठी आणि गूळ निर्मितीसाठी फुले ०९०५७ हे नवीन वाण ११ वर्षाच्या संशोधनानंतर विकसित केले आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत नुकतीच त्याची शिफारस करण्यात आली. या वाणाला देशपातळीवर कोएम १२०८५ या नावाने शिफारस केली आहे. नवीन वाणाचा विकास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथे हा नवीन वाण विकसित केला आहे. तो सुरू हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात येत आहे. हा वाण तयार करताना सन २००७-०८ मध्ये सर्व प्रथम फुले ०९०५७ (कोएम १२०८५) या वाणाची पैदास पॉलीक्रॉस पद्धतीने को.९४०१२ (कोसी ६७१ चा सोमानलोन) या मादी वाणावर को.७७५, को.९४००८, को.८६०११, आय.एस.एच. ७९, को.टी.८२०१, को.व्ही.९२१०२, को.८६२४९ आणि को.६२१९८ या नर वाणांचा संकर करून तयार केलेली आहे.

  • त्यानंतर २००८-०९ ते २०१८-१९ या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रयोग घेण्यात आले.
  • सन २०१५-१६ ते २०१७-१८ मध्ये राज्य पातळीवर ३ ठिकाणी, २०१५-१६ आणि २०१७-१८ मध्ये देशपातळीवर २२ ठिकाणी आणि २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये २१ शेतकऱ्यांकडे ५ जिल्ह्यांत ऊस लागवडीचे आणि गूळ तयार करण्याचे तुलनात्मक प्रयोग घेण्यात आले. त्यातील ऊस उत्पादन, साखरेचे प्रमाण आणि गुळाचे उत्पादन व गुणवत्ता याचा अभ्यास करण्यात आला.
  • अति पावसाच्या प्रदेशात व पाणी उपलब्ध असलेल्या अवर्षणप्रवण भागात काळ्या व लाल मातीत याचे प्रयोग घेण्यात आले. त्यामध्ये हा वाण प्रचलित को ९२००५ या वाणांपेक्षा ऊस व गुळाच्या उत्पादनात सरस आढळून आला.
  • या वाणापासून विशेष दर्जाचा गूळ तयार होतो. या गुळामध्ये सुक्रोजचे प्रमाण ८४ टक्क्यापेक्षा अधिक व ग्लुकोजचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी तसेच गुळाचा ओलावा ६ टक्क्यापेक्षा कमी आढळून आला. ओलावा कमी असल्याने गूळ कडक आणि साठवणीत अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांच्या पसंतीस हा उतरू शकतो.
  • अ) फुले ०९०५७ या वाणाचे गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर येथील तीन वर्षाचे उत्पादन ः बहुस्थानीय चाचण्यात १२ व्या महिन्यात फुले ०९०५७ वाणाचा गुळाचा उतारा १३.५६ टक्के तर को ९२००५ मध्ये गुळाचा उतारा १२.५३ टक्के मिळाला. गुळासाठी फुले ०९०५७ या नवीन उसाचे वाणापासून गुळाचे उत्पादन आणि उतारा को ९२००५ या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रचलित वाणापेक्षा अनुक्रमे १६.०६ आणि ८.१९ टक्के पेक्षा अधिक मिळाल्याचे तक्ता क्र. २ वरून दिसून येते. गुळामध्ये ओलाव्याचे प्रमाण अत्यल्प ६ पेक्षा कमी (५.५३ टक्के) असल्याने साठवण क्षमता चांगली आहे. याचा आकर्षक सोनेरी रंगसुद्धा ग्राहकाच्या पसंतीस उतरेल. कोल्हापूर येथील तीन वर्षाचे सरासरी उत्पादन (२०१५-१६ ते २०१७-१८)

    गुळाचे गुणधर्म फुले ०९०५७ नवीन वाण को.९२००५ प्रचलित वाण को.९२००५ पेक्षा %वाढ
    उसाचे उत्पादन टन/हे १३०.४० १२१.२२ ८.००
    गुळाचे उत्पादन मे.टन/हे १७.६१ १५.१८ १६.०६
    गुळाचा उतारा % १३.५६ १२.५३ ८.१९
    ग्लुकोज व फ्रुक्टोजचे प्रमाण % ९.३० ८.८१ ५.५६
    साखर (सुक्रोज) % ८४.७३ ८५.६२ वजा १.०५
    पी.एच ५.३५ ५.३३ ०.३१
    गुळाच्या रंगाची तीव्रता (ओडी) ०.०६२ ०.०५७ ८.७२
    गुळातील ओलावा % ५.७३ ५.८६ वजा २.२२
    गुळाची प्रतवारी % विशेष दर्जा विशेष दर्जा  

    ब. गुळाचे मानांकन व ग्रेड कृषी उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर गूळ प्रतवारी सल्लागार समितीने गुळाचे दर्जा व मानांकन ठरविलेले आहे. तक्ता क्र. ३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे फुले ०९०५७ या नवीन ऊस वाणापासून तयार केलेल्या गुळाला विशेष दर्जा मिळालेला आहे. यात सुक्रोजचे प्रमाण ८४ टक्क्यापेक्षा अधिक व ग्लुकोजचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी असून, गुळाचा ओलावा ६ टक्क्यापेक्षा कमी आढळून आला. ओलावा कमी असल्याने गूळ कडक आणि साठवणीत अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांच्या पसंतीस हा वाण उतरणार आहे. ड. देशपातळीवरील बहुस्थानीय प्रयोगाचे तुलनात्मक उत्पादन सन २०१५-१६ आणि २०१७-१८ या दोन वर्षात देशपातळीवर अकोला, कोल्हापूर, मंडया, नवसारी, अनकापल्ली, प्रवरानगर, पुगलूर, संकेश्वर, शिरूगमनी आणि तिरुवल्ला या १२ ठिकाणी प्राथिमक आणि १० ठिकाणी अंतिम चाचणी प्रयोग घेण्यात आले. ड. शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रात्यक्षिकांचे उत्पादन

  • सन २०१७-१८ मधील कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतावर १४ प्रात्यक्षिके घेतली. त्यात फुले ०९०५७ या वाणाचे हेक्टरी १८८.१५ टन आणि को ९२००५ उसाचे १६४.५० टन उत्पादन मिळाले. या दोन्ही वाणाची गुळाच्या उत्पादनासाठी तुलना केली असता, फुले ०९०५७ पासून २३.३१ टन आणि को ९२००५ पासून गुळाचे १९.६८ टन उत्पादन मिळाले.
  • सन २०१८-१९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर नगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात ७ शेतकऱ्यांच्या शेतावर फुले ०९०५७ या वाणापासून हेक्टरी १५७.३८ टन उसाचे आणि २२.०१ टन गुळाचे उत्पादन मिळाले. को ९२००५ या वाणापासून हेक्टरी ५६.४३ टन उसाचे आणि ७.१४ टन गुळाचे उत्पादन मिळाले. यावरून कोल्हापूर जिल्ह्याबाहेर को ९२००५ या वाणाची वाढ होत नाही, त्याचे उसाचे आणि गुळाचे उत्पादन घटत असल्याचे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्रासाठी फुले ०९०५७ गुळासाठी फायदेशीर वाण ठरणार आहे.
  • फुले ०९०५७ या ऊस वाणाची ठळक वैशिष्ट्ये ः

  • फुले ०९०५७ ही मध्यम पक्वता असणारा वाण सुरू लागवडीसाठी आणि गूळ तयार करण्यासाठी शिफारस केला आहे.
  • या वाणाच्या गुळाचे उत्पादन हेक्टरी १७.६१ टन मिळाले असून, ते प्रचलित को ९२००५ या वाणापेक्षा १६.६ टक्के अधिक आहे.
  • नवीन वाणाचा गुळाचा उतारा १३.५६ टक्के असून तो को ९२००५ पेक्षा ८.१९ टक्के अधिक आहे.
  • फुले ०९०५७ वाणापासून विशेष दर्जा (स्पेशल ग्रेड) गूळ तयार होतो.
  • या नवीन वाणाचे ऊस उत्पादन बहुस्थानीय चाचण्यात १५६.२३ टन प्रति हेक्टर मिळाले असून ते को ९२००५ पेक्षा २४.५४ टक्के अधिक आहे. त्याचप्रमाणे फुले ०९०५७ वाणाचे साखरेचे उत्पादन सुरू हंगामात घेण्यात आलेल्या बहुस्थानीय चाचण्यात २३.०३ टन मिळाले असून, ते को ९२००५ पेक्षा २३.८७ टक्के अधिक आहे.
  • या वाणाचा ऊस आणि कांडी सरळ वाढत असून पाने सरळ आणि पिवळसर रंगाची आहेत. डोळे लहान आकाराचे असून डोळ्याच्या पुढे खाच आहे.
  • या नवीन वाणाच्या वाढ्यावर अजिबात कूस नाही.
  • या उसाची उंची अखिल भारतीय पातळीवर १२ संशोधन केंद्रात २९५ सेंमी.आढळली. या उसाच्या कांड्याचा व्यास ३.१९ सेंमी.पेक्षा अधिक आणि फायबरचे प्रमाण १३.७९ टक्के अखिल भारतीय पातळीवर आढळले.
  • उसाची जाडी व वजन को ९२००५ पेक्षा अधिक आहे. एका उसाचे सरासरी वजन २.३२० किलो मिळाले असून प्रचलित को ९२००५ पेक्षा ३९.१४ टक्के अधिक मिळाले.
  • पाचट सहज निघते, त्यामुळे ऊस तोडणी करणे सुलभ होते.
  • या वाणास तुरा उशिरा व कमी प्रमाणात येतो.
  • खोल व काळ्या जमिनीतही लोळत नाही. सरळ वाढणारा ऊस असल्याने यांत्रिक पद्धतीने याची काढणी करणे शक्य आहे.
  • पाण्याचा ताण काही प्रमाणात सहन करतो.
  • रोग व किडींचा अभ्यास

  • फुले ०९०५७ हा वाण चाबूक काणी रोगास प्रतिकारक तर मर रोगास मध्यम प्रतिकारक आहे. नैसर्गिक परिस्थितीत हा वाण तांबेरा, तांबूस ठिपके, पोक्काबोईंग या रोगास प्रतिकारक आढळलेला आहे. त्याचप्रमाणे कांडे कीड, शेंडे कीड आणि खवले कीड यांना कमी प्रमाणात बळी पडतो.
  • कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती, राधानगरी या अति पावसाच्या प्रदेशात गेल्या वर्षी (ऑगस्ट २०१८) बऱ्याच वाणावर तांबडे ठिपके असलेला रोग आढळला. मात्र, फुले ०९०५७ या वाणावर कोणत्याही प्रकारचा रोग व कीड आढळली नाही.
  • बियाण्याची उपलब्धता या संशोधन केंद्रात २ हेक्टर क्षेत्रावर बियाणे प्लॉट घेतला असून, बेण्याची विक्री नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. संपर्क ः ०२१६९-२६५३३८, २६५३३५ (ऊस विशेषज्ञ व पैदासकार, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com