नत्राच्या वापराबाबत अचूक सूचना देणारे साधन विकसित

कोणत्याही निविष्ठांची विशेषतः नत्रयुक्त खतांची मात्रा अचूकतेने ठरवण्यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मिन्नेसोटा विद्यापीठातील संशोधकांनी एक साधन विकसित केले आहे. त्यामुळे नत्र घटीचा आराखडा असलेले बजेट बॅलन्स शीट तयार केले जाते. त्यातून आर्थिक, पर्यावरणीय मूल्य, वापरातून मिळणारा फायदा, फायद्याचे नेमके प्रमाण या साऱ्या बाबी स्पष्ट होतात.
नत्राच्या वापराबाबत अचूक सूचना देणारे साधन विकसित
नत्राच्या वापराबाबत अचूक सूचना देणारे साधन विकसित

कोणत्याही पिकाच्या व्यवस्थापनामध्ये वापरल्या जाणाऱ्या निविष्ठा अत्यंत काळजीपूर्वक व योग्य प्रमाणात वापरणे गरजेचे असते. सेंद्रिय खते, रासायनिक खते, सेंद्रिय, जैविक किंवा रासायनिक कीडनाशके व संजीवके या बाबी अचूक वापराव्या लागतात. अतिरिक्त वापरामुळे खर्चात अनावश्यक वाढ होते, तसेच ते पर्यावरणासाठीही हानिकारक ठरू शकते. कोणत्याही निविष्ठांची विशेषतः नत्रयुक्त खतांची मात्रा अचूकतेने ठरवण्यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मिन्नेसोटा विद्यापीठातील संशोधकांनी एक साधन विकसित केले आहे. त्यामुळे नत्र घटीचा आराखडा असलेले बजेट बॅलन्स शीट तयार केले जाते. त्यातून आर्थिक, पर्यावरणीय मूल्य, वापरातून मिळणारा फायदा, फायद्याचे नेमके प्रमाण या साऱ्या बाबी स्पष्ट होतात. अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये कृषी क्षेत्रातून होणारे हरितगृह वायूचे उत्सर्जन आणि नायट्रोजनमुळे होणारे पाण्याचे प्रदूषण या पर्यावरणीय प्राधान्याने पाहिले जाते. वातावरणसंदर्भात ठरवलेली ध्येय गाठण्याकरिता व त्याच वेळी उत्पादकता वाढीसाठी शेतकरी आणि उत्पादकांना मदत केली जाते. सोबत कार्बन क्रेडिटकडेही लक्ष दिले जाते. या ध्येय प्राप्तीकरिता मिन्नेसोटा विद्यापीठातील अन्न, कृषी आणि नैसर्गिक स्रोत शास्त्र महाविद्यालयातील सहायक प्रा. झेनोंग जीन व सहकाऱ्यांनी नवे साधन तयार केले आहे. त्याविषयी माहिती देताना ते म्हणाले, की आपल्यासमोर सातत्याने या बजेटमधून पुढे आलेले आकडे असल्यास प्रत्येक खरेदी व वापराचा निर्णय हा काळजीपूर्वक घेता येतो. यामुळे नत्राच्या अचूक वापरातून केवळ आर्थिक बचतच साध्य होते असे नाही, तर पर्यावरणातील प्रदूषणाचे प्रमाणही लक्षणीय कमी होऊ शकते. पूर्वीच्या शिफारशी किंवा साधने ही अमेरिकेतील मका प्रक्षेत्रातील प्रत्येक शेतीक्षेत्रासाठी अचूक अंदाज देऊ शकत नव्हती. त्याच प्रमाणे प्रत्येक त्याची गणकयंत्रणा, साठवण खर्च यांचा विचार केल्यास ते अत्यंत महागडेही ठरत होते. आयओपी सायन्स (आणि इन्व्हायर्न्मेंटल रिसर्च लेटर्स) मध्ये प्रकाशित केलेल्या लेखामध्ये या संशोधनाविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, संशोधकांनी यंत्राद्वारे स्वयंशिक्षणाच्या माध्यमातून एक प्रारूपांची साखळी बसवली आहे. त्यामुळे प्रत्येक पीक प्रारूपाचे अचूकपणे व वेगवान नक्कल करता येते. यामुळे लक्षावधी विविध प्रकारच्या शेतीक्षेत्राचे आभासी प्रारूप तयार करता येते. त्यातून पुढील दोन मूलभूत शाश्‍वत प्रश्‍नांचा पाठपुरावा केला जातो. १) नत्राचे उपशमन करण्याचे हॉटस्पॉट कोठे आहेत? २) वेगवेगळ्या व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास किती प्रमाणात उपशमन शक्य होईल? अधिक माहिती देताना संशोधन सहाय्यक तायजोन किम यांनी सांगितले, की आम्ही कृषी परिसंस्थेच्या शाश्‍वततेच्या दृष्टीने चार आभासी निकष तयार केले आहेत. त्यात उत्पादन, नायट्रस ऑक्साइड उत्सर्जन, नायट्रोजन लिचिंग आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बातील बदल यांचा समावेश आहे. या चारही निकषांचे आर्थिक, सामाजिक फायदे लक्षात घेऊन, त्या आधारे नत्र उपशमन शक्य असलेल्या जागा किंवा अयोग्य असलेल्या जागा ओळखण्यात येतात. सामाजिक फायद्यांमध्ये हरितगृह वायूंच्या उपशमनामुळे वाचलेला खर्च, पाणी व हवेचा वाढलेला किंवा स्थिर राहिलेला दर्जा मोजण्यात येतो. प्रो. टिमोथी स्मिथ यांनी सांगितले, की या प्रारूपामुळे पीक उत्पादनाच्या विविध टप्प्यांवर शाश्‍वततेचे निकष सातत्याने लावता येतात. तसेच अन्नप्रक्रिया उद्योगांनाही त्यांच्या उत्पादनाच्या किंवा वितरणाच्या साखळीदरम्यान होणारे उत्सर्जन समजू शकते. शाश्‍वततेचे ध्येय निश्‍चित करून त्यानुसार उपशमनाचे वेगवेगळे पर्याय अवलंबता येतात. अमेरिकेतील मध्य पश्‍चिमेतील मका उत्पादक पट्ट्यामध्ये घेतलेल्या चाचण्यांतील निष्कर्ष 

  •  अभ्यास प्रक्षेत्रातील नायट्रोजन खतांच्या वापरामध्ये १० टक्क्यांनी बचत झाली. त्यामुळे ९.८ टक्के नायट्रस ऑक्साइड कमी उत्सर्जित झाला, तर नायट्रोजन निचऱ्याचे प्रमाण ९.६ टक्क्यांनी कमी झाले. या
  • टप्प्यात ४.९ टक्के अधिक सेंद्रिय कार्बन वापरला गेला. उत्पादनामध्ये अत्यल्प (०.६ टक्का इतकी) घट झाली.
  •  यावरून एकूण वार्षिक सामाजिक फायदे मोजण्यात आले. ते सुमारे ३९५ दशलक्ष डॉलर होते. (त्यातील अनिश्‍चितता ११४ दशलक्ष ते अंदाजे १.३ अब्ज इतकी होती.) हरितगृह वायू उत्सर्जन आणि पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याने ३३४ दशलक्ष डॉलर इतकी बचत झाली. खतवापरातील बचत १०० दशलक्ष डॉलर होती. उत्पादनातील घट ही सुमारे ४० दशलक्ष डॉलर इतक्या किमतीची होती.
  •  ५० टक्क्यांपेक्षा अधिक सामाजिक फायदे हे सुमारे २० टक्के अभ्यास प्रक्षेत्रातूनच झाले. म्हणजेच नायट्रोजन उपशमनाचे हॉटस्पॉट किंवा काम करण्याचे नेमके ठिकाण आपल्याला समजले. म्हणजेच या ठिकाणी नत्राचे प्रमाण मूलतः जास्त आहे. तिथे नत्रयुक्त खतांचा वापर कमी केला तरी उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. मात्र काही ठिकाणी नत्राच्या प्रदूषणाचे प्रमाण कमी केले तरी त्याची किंमत ही सेंद्रिय कर्ब कमी होण्यातून चुकवावी लागते. हे टाळण्यासाठी आच्छादन पिकांसारखे अन्य उपाय राबविण्याचे सूचना दिल्या जातात. अशा प्रकारे उत्पादनात घट न होता पर्यावरणाला फारसे हानिकारक ठरणार नाही, अशा पद्धतीने नत्र खतांचे व्यवस्थापन करता येते, असे जीन यांनी सांगितले.
  • भविष्यात सध्याच्या अभ्यासाचे क्षेत्र वाढवून अधिक आधुनिक आणि अचूक कार्बन मर्यादा प्रारूप तयार करण्याचे नियोजन संशोधक करत आहेत. त्यात विविध प्रक्रिया आधारित प्रारूप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रिमोट सेन्सिंग तंत्राचा वापर केला जाईल. सध्याच्या विकसित केलेल्या प्रारूप संशोधनासाठी मिन्नेसोटा विद्यापीठाच्या अॅग्रीट कार्यक्रम, राष्ट्रीय शास्त्र फाउंडेशन आणि अमेरिकी ऊर्जा विभागाच्या ARPA-E प्रकल्पाकडून अर्थसाह्य मिळाले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com