agricultural stories in Marathi, technowon, refilling of borewell, wells in region with new technique | Agrowon

शाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धती

श्रीनिवास देशपांडे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार चांगले भविष्य असणार नाही, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. कोणीही सुज्ञ जाणू शकेल. गरज आहे ती योग्य उपाययोजना राबविण्याची! आपल्या शेताची रचना, भूप्रस्तराची रचना, नाल्याची उपलब्धता यानुसार योग्य त्या उपाययोजना राबविल्यास फायदा होऊ शकतो.

पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार चांगले भविष्य असणार नाही, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. कोणीही सुज्ञ जाणू शकेल. गरज आहे ती योग्य उपाययोजना राबविण्याची! आपल्या शेताची रचना, भूप्रस्तराची रचना, नाल्याची उपलब्धता यानुसार योग्य त्या उपाययोजना राबविल्यास फायदा होऊ शकतो.

आपल्या देशात सुमारे ६० टक्के शेती सिंचन हे भूजलावर आधारित आहे. एकूण वीजेपैकी ३५ टक्के वीज पाण्याच्या पंपिंगसाठी वापरली जाते. एक दिवसात १००० फूट खोल विंधन विहीर खोदण्याची क्षमता असलेल्या अद्ययावत उच्च दाबाची विंधणयंत्रे उपलब्ध आहेत. इतक्या खोल बोअरमधील पाणी खेचण्यासाठी उच्च क्षमतेचे सबमर्सिबल पंप उपलब्ध आहेत. अति खोल विंधनविहिरी आणि सबमर्सिबल पंपासाठी अनुदान असल्याचे ऐकिवात नाही. यासाठी लाखो रुपये स्वतःच खर्च केले जातात. एक दोन वर्षात या विंधनविहिरीचे पाणी कमी झाले किंवा संपले की दुसरी आणखी खोल विंधनविहीर घेऊन सिंचनाची गरज भागवण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रक्रियेमध्ये भूजल उपशाच्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे नैसर्गिकरीत्या पुनर्भरण होत नाही. भूजल पातळी खोल खोल जात आहे. भूजलाच्या उपशावरील नियंत्रणासाठी काही राज्यांमध्ये विंधनविहिरीच्या खोलीवर मर्यादा घालणारे कायदेही झाले. या कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात होत आहे.

जो शेतकरी विंधनविहिरी आणि सबमर्सिबल पंपावर एवढा खर्च करतो, तो पुनर्भरणाच्या उपायांवर नक्कीच खर्च करेल, यात शंका नाही. शेतात पडणारा पाऊस व्यवस्थित संकलित करून, त्याचे पुनर्भरण आपल्या विहिरी आणि विंधनविहिरींत केल्यास ते स्रोत शाश्वत होऊ शकतात. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी अधिक प्रयत्न झाले पाहिजेत. तीन वर्षांपूर्वी अॅग्रोवनमध्ये सायफन पद्धतीने विंधनविहिरींचे पुनर्भरण या मी लिहिलेल्या लेखानंतर अनेक शेतकऱ्यांनी संपर्क केले. योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन घेत स्वतःच्या शेतीत पुनर्भरण केले.

महाराष्ट्राच्या भूप्रस्तराची रचना

आपल्या राज्याचा ८२% भूप्रस्तर कठीण खडकाचा आहे. (नकाशात हिरव्या रंगात). परिणामी पावसाच्या पाण्याचे भूप्रस्तरातील होणारे नैसर्गिक पुनर्भरण हे खडकातील फटी, भेगा आणि खडकाची सच्छिद्रता यावर अवलंबून आहे.

 • आपल्या राज्यातील भूप्रस्तराची रचना दर्शविणारी छायाचित्रे असून, त्यात सर्वात वरील स्तर मातीचा आहे. त्यानंतरचा स्तर मुरुमांचा, भेगाळ खडकाचा आहे. खालील स्तर कठीण खडकाचा आहे. अशा खडकाळ, कठीण खडकाच्या भूप्रस्तरात पावसाचे पाणी जिरण्याची क्षमता अत्यंत कमी असते. या खडकाची सच्छिद्रता फक्त २ टक्के इतकी अल्प आहे. ही क्षमता वाढवण्यासाठी खडकातील फटी व भेगा रुंद करणे, नवीन निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी भूप्रस्तरात स्फोट करणे हा एक पर्याय आहे.
 • कठीण खडकाच्या भूप्रस्तराची सच्छिद्रता कृत्रिमरीत्या वाढविण्यासाठी भूप्रस्तरात साडेचार इंची व्यासाची विंधन छिद्रे शेतातील विहिरीजवळ घेतली जातात. त्यात विशिष्ट दारूगोळ्याचा वापर करून नियंत्रित स्फोट करण्याचे यशस्वी प्रयोग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केले आहेत. कठीण खडकातील स्रोताजवळच्या फटी, भेगा सिमेंटच्या पातळ द्रवाने बंद करून स्रोत शाश्वतही केले आहेत. या पद्धतीतून सुमारे ९०० गावे टँकरमुक्त झाली, तर ११०० गावांमधील टॅंकरच्या फेऱ्या कमी केल्या होत्या. हे प्रयोग गाव पातळीवर पिण्याच्या एखाद दुसऱ्या स्रोतावर करणे शक्य झाले आहे.
 • प्रत्यक्षात त्याच गावात शेतकऱ्यांच्या शेकडो विंधनविहिरी पाणी उपसत असतात. त्यांच्यापर्यंत हे प्रयोग आणि ज्ञान पोचवले गेले पाहिजे. आज गावपातळीवर विहिरीच्या खोदकामात कठीण खडक लागल्यावर सुरुंग लावून फोडण्याची पद्धत वापरली जाते. त्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा स्तरावर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे झाल्यास अनेकांना फायदा होईल, असे वाटते.

जल पुनर्भरणाच्या अपारंपरिक पद्धती ः

 1. जॅकेट वेल ब्लास्टिंग
 2. स्ट्रीम ब्लास्टिंग - नाला तळ ब्लास्टिंग
 3. बोरवेल ब्लास्टिंग
 4. फ्रॅक्चर सिल सिमेंटेशन
 5. रिचार्ज शाफ्ट

१) जॅकेट वेल ब्लास्टिंग ः
आपल्या विहिरीभोवती विहिरीच्या खोलीपेक्षा १ मीटर कमी खोलीची विंधन छिद्र खोदले जातात. या प्रत्येक विंधन छिद्रात २.७५ किलो फार्माब्लास्ट प्रकारच्या दारूगोळ्याच्या १ किंवा २ पिशव्या सोडून सर्व दारूगोळा डी कॉर्ड पद्धतीच्या विशिष्ठ वायरने जोडला जातो. या सर्व दारूगोळ्यावर विंधन छिद्रात वाळू आणि माती दाबून बसवली जाते. दारूगोळा पेटविल्यावर जमिनीखाली विहिरीच्या तळाशी असलेल्या भूप्रस्तरात स्फोट होतात. त्या खडकाळ भूप्रस्तरातील फटी व भेगा रुंदावतात किंवा नवीन निर्माण होतात. तसेच त्या भूप्रस्तराची सच्छिद्रता वाढते. पुढील पावसाळ्यात भूजलाचा साठा वाढून विहिरीस पाणी वाढते. उन्हाळ्यातदेखील पाणी कमी पडत नाही.

 • भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने या प्रयोगांद्वारे अनेक ग्रामीण पाणी पुरवठा नळ योजनांच्या विहिरीचे पाणी वाढवले आहे. ही गावे टँकर मुक्त झाली आहेत.
 • शेतकऱ्यांनी विहिरीजवळील विंधन छिद्रात दारूगोळ्याचा स्फोट करण्यासाठी तहसीलदारांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे.
 • प्रत्यक्ष दारूगोळ्याचा स्फोट सक्षम तांत्रिक अनुभवी सल्लागारांच्या उपस्थितीत करावा.
 • प्रयोग झाल्यानंतर, विधनविहिरींचे केसिंग पाइप फुटले असतील आणि मोठे खड्डे पडले असतील तर तो बुजवून घ्यावा. त्यामध्ये लहान मुले पडून धोका होणार नाही, याची पूर्ण खात्री करावी.
 • पावसाळ्यानंतर नंतर हे खड्डे रुंदावू शकतात. त्यामुळे पावसाळ्यानंतर वारंवार या खड्ड्यांची पाहणी करून सुरक्षितता तपासावी.
 •  दारूगोळा पुरवठा करणारे व उडविणारे कंत्राटदारांकडे त्याविषयीचे योग्य ते परवाने असल्याची खात्री करून घ्यावी.
 • या प्रयोगाने आजूबाजूच्या विहिरींच्या पाणी क्षमतेवर फरक पडत नसल्याचा अनुभव आहे. परिणामी आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा आक्षेप राहणार नाहीत. उलट हा प्रयोग यशस्वी झाल्यास ते देखील अनुकरण करू शकतात. एकमेकांना विश्वासात घेऊन हे प्रयोग केल्यास यशस्वी होतील.

२) स्ट्रीम ब्लास्टिंग (नाला तळ विस्फोट तंत्र)
यासाठी आपल्या शेतातील विहिरीजवळ आणि आपल्या शेताच्या हद्दीत नाला असणे आवश्यक आहे. नाला नसल्यास हा प्रयोग करणे शक्य नसते, ही मर्यादा आहे. या प्रयोगात नाल्यांमध्ये आकृतीत दर्शविल्याप्रमाणे विहिरींच्या खोलीपेक्षा एक मीटर कमी खोलीच्या विंधन छिद्र खोदावीत. जॅकेट वेल ब्लास्टिंग तंत्राप्रमाणे दारू गोळ्याचा स्फोट घडवून नाल्यांचे पावसात वाहणारे पाणी नाल्याखालील भूप्रस्तरातून आपल्या विहिरीकडे वळविणे शक्य असते. आपल्या विहिरीच्या आसपास असलेल्या शेजारी शेतकऱ्यांनाही या प्रयोगासाठी प्रवृत्त केल्यास अधिक पाणी जिरू शकेल. नाल्याचे पावसात वाहणारे पाणी जिरवून सर्वांचा फायदा होऊ शकतो. दारूगोळा स्फोटासंबंधी सर्व सुरक्षेचे उपाय पाळणे अनिवार्य आहे.

३) बोअर ब्लास्टिंग

 • काही गावे अतिशय खडकाळ, मुरमाड भूप्रस्तरावर वसलेली असतात. परिणामी गावावर, शेतावर पडणारा पाऊस वाहून जाण्याचे प्रमाण जास्त असते. जमिनीत पाणी कमी अथवा न मुरल्यामुळे भूजल साठा फारसा वाढत नाही. अशा ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या विहिरींना फायदा होईल अशा माळरान, गायरानामध्ये ३० फूट खोलीची साडे चार इंची व्यासाची विंधन छिद्रे खोदावीत. त्यात वर उल्लेखलेल्या प्रमाणे दारू गोळ्याचा स्फोट घडवून आणावा. परिणामी त्या भागातील भूप्रस्तरात कृत्रिमरीत्या भेगा, फटी पडतात. सच्छिद्रता वाढते. नजीकच्या भागातील विहिरींच्या, विंधनविहिरीच्या भूजल साठ्यात वाढ होत असल्याचा अनुभव आहे. हा प्रकार सामूहिकरीत्या राबवल्यास अधिक शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो.
 • याचे उदाहरण म्हणजे हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांच्या पुढाकाराने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने राबवलेला यशस्वी प्रकल्प. ३० फूट खोलीची साडेचार इंची व्यासाची १०० विंधन छिद्रे खोदण्यात आली. त्या अंतर्गत वर उल्लेखलेल्याप्रमाणे दारूगोळ्याचा स्फोट घडवून आणला. परिणामी एका टेकडी पलीकडे पडणारे पावसाचे पाणीही भूप्रस्तरातून हिवरे बाजार गावाकडे वळविण्यात यश आले. येथील विहिरी, विंधणविहिरीचा भूजल साठा वाढलेला आढळून आला.)
 • दारूगोळा स्फोटासंबंधी सर्व सुरक्षा उपाय वर उल्लेख केलेल्या प्रयोगांप्रमाणे अनिवार्य आहेत.

४) फ्रॅक्चर सील सिमेंटेशन ः
या प्रकारात आपल्या शेतात विहिरीच्या जवळ नाला असणे आवश्यक आहे. या नाल्यामधून पावसाचे वाहणारे पाणी भूप्रस्तरांमध्ये जिरवून त्याचा प्रवाह आपल्या विहिरीकडे वळविला जातो. त्यासाठी नाल्याच्या प्रवाहात विहिरीच्या जवळ दोन ते तीन लाईनमध्ये आकृतीत दाखवल्यानुसार विहिरीच्या खोलीपेक्षा एक मीटर जास्त खोलीची विंधन छिद्रे घेतली जातात. या विंधन छिद्रामध्ये सिमेंटचा पातळ द्रव दोन ते तीन किलो प्रति वर्गसेंमी दाबाने सोडला जातो. परिणामी नाल्यातील खडकांमधील फटी व भेगा बंद होतात. नाल्या खालून वाहणाऱ्या भूजलाचा प्रवाह अडतो. तो विहिरीकडे वळतो. परिणामी विहिरीचा भूजल साठा वाढतो. अगदी उन्हाळ्यापर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.
फ्रॅक्चर सील सिमेंटेशन प्रक्रियेत विंधण छिद्रांमध्ये सिमेंटचा पातळ द्रव किमान दोन ते तीन किलो प्रति वर्गसेंमी दाबाने सोडण्यासाठी त्या क्षमतेचा ग्रॉउंटिंग पंप आणि एका मेकॅनिकल पॅकरची आवश्यकता असते. विंधन छिद्रांच्या खोदाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेसरच्या हवेच्या दाबावरच चालणारे ग्रॉउंटिंग पंप उपलब्ध आहेत.

५) रिचार्ज शाफ्ट ः
आपल्या शेतातील पावसाचे पाणी ज्या बांधाच्या काठाने नाल्यात जाऊन मिळते, त्या भागात आपल्याच शेतात विहिरीजवळ, विंधनविहिरीजवळ एक १०० फूट खोलीची विंधनविहीर घेऊन, त्यावर पावसाचे पाणी स्वच्छ करण्यासाठी आवश्यक फिल्टर व्यवस्था उभारावी. भूप्रस्तरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याचा हा सर्वात सुलभ उपाय आहे.

संपर्क ः
श्रीनिवास देशपांडे, ९४२०१७५६८४
ई-मेल ः 56svdeshpande@gmail.com

(सेवानिवृत्त सहसंचालक (अभियांत्रिकी), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, पुणे)

पुनर्भरणाचा झाला फायदा
मी माझ्या शेतात तब्बल ४०० फूट बोअरवेल घेतले होते. २४ तासांमधून केवळ १५ ते २० मिनिटे पंप चालायचा. ३ वर्षांपूर्वी ॲग्रोवनमध्ये वाचलेल्या लेखानंतर देशपांडे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी १९९४ मध्ये मुरुड (जि. लातूर) येथील जनता विद्या मंदिर प्रशालेमध्ये राबविलेल्या सायफनला भेट दिली. प्रशालेतील तंत्र निर्देशक कमलाकर माळी व मुरुड यांच्या मदतीने सायफनची जुळणी केली. माझ्या शेतातून गेलेला नाला व त्यालगत असलेल्या माझ्या विहिरीपर्यंत चर खोदून पाणी विहिरीत घेतले.

विहिरीपासून दक्षिणेस सुमारे ६० फूट अंतरावर शेतात ४०० फूट खोलीचे बोअरवेल आहे. मी विहिरीतून बोअरवेलपर्यंत दुसरी पाइपलाइन टाकून विहिरीतील पाणी फूटव्हॉल्व्हद्वारे बोअरवेलमध्ये सोडले. बोअरवेलचे पुनर्भरण झाले की आपोआप फूटव्हॉल्व्ह बोअरवेलमध्ये पाणी सोडणे बंद करतो. तसेच विहिरींवरील मोटार बंद केल्यास मेन पाइपलाइनमधील पाणी बोअरवेल पुनर्भरणास मदत करते. तब्बल दोन वर्ष बोअरवेलने भरपूर पाणी घेतले. परंतु यावर्षी बोअरवेलने खूपच कमी पाणी घेतले. बोअरवेल पुनर्भरण केल्यापासून मागील वर्षाच्या उन्हाळ्यातही बोअरवेल कधीही बंद पडले नाही. अर्थात पाण्याचा वापर काटकसरीने केला जातो. आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, ८ ते ९ जनावरांना पुरेल इतका हिरवा चारा उत्पादनासाठी बोअरवेलचे पाणी उपयुक्त ठरते.

- बबन गणपती बनसोडे, ९७६४९८२१८६
वडगाव (शि.) पो. निपाणी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
अचूक सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणास्वयंचलित सूक्ष्म सिंचन यंत्रणेद्वारे (ऑटोमेशन)...
इंधनबचतीसाठी पर्यावरणपूरक सौर चूलसौरऊर्जेच्या साह्याने रोजच्या जेवणातील सर्व...
तयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे...सध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार...
ऊस शेतीसाठी आवश्यक यंत्रेऊस उत्पादनात केवळ मजुरीवर ३५ ते ४० टक्के खर्च...
जलशुद्धीकरणासाठी सौर शुद्धजल संयंत्रदुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य...
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षशून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात...
ऊर्जेशिवाय शीतकरणाचे तंत्रकोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय शीतकरणाची एक...
जास्त अन्न शिजविण्यासाठी शेफलर सौरचूल...शेफलर सौर चूल पेटी सौरचूल आणि पॅराबोलिक...
...ही आहेत आंतरमशागतीसाठी अवजारेशेती मशागतीमध्ये आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर अशी...
बटाटा प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रेतळलेल्या पदार्थामध्ये बटाट्याचे चिप्स किंवा...
मेथी वाळवण्याचे तंत्रभारतामध्ये मेथी (शा. नाव - ट्रिगोनेला फीनम -...
फ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रेतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
सौर ऊर्जा उपकरणाचे उपयोग, फायदेभविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार...
फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेकोणत्याही अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये येणाऱ्या...
नत्रयुक्त खतांच्या वापराशिवाय उत्पादन...कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणाऱ्या...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांचा वापरपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या तुटवड्यामुळे व जास्त...
किफायतशीर बैलचलित अवजारेबैलचलित बहूपीक टोकण यंत्रामध्ये पिकानुसार...
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रेसोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...