विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्र

पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड करताना अधिक मजूर आणि कष्ट लागतात. त्यामुळे लागवडीचा कालावधीही वाढतो. या दोन्ही समस्यांवर मात करण्यासाठी कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीतील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी ऊस लागवड यंत्राची निर्मिती केली आहे.
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्र
विद्यार्थ्यांनी तयार केले ऊस लागवड यंत्र

महाराष्ट्रामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यातही सर्वाधिक लागवड ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. सामान्यतः सऱ्यामध्ये पाणी सोडून उसाचे कांडे पायाने दाबण्याची पद्धत प्रचलित आहे. या पद्धतीत पाण्याचा अपव्ययही अधिक होतो. त्याच प्रमाणे दिवसेंदिवस मजुरांच्या टंचाईही या कामासाठी भासत असल्याने उसाच्या लागवडीचा कालावधी वाढत जातो. तसेच मजुरीही अधिक जाते. परिणामी, उत्पादनखर्चात वाढ होते. कमी वेळेमध्ये व कमी कष्टामध्ये ऊस लागवड करण्यासाठी कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीमधील बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक महाविद्यालयातील प्रसाद पाठक, काशिनाथ दुबळे, रोहन लांडगे व वैभव जगताप या विद्यार्थ्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांना प्राचार्य नागेश ठोंबरे, विभाग प्रमुख उदय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. असे झाले यंत्र तयार चार चाके असणाऱ्या गाड्यावर एक माणूस बसण्याची सोय केली असून, दुसऱ्या माणसाच्या साह्याने ही गाडी ढकलली जाते. गाडीच्या पुढील बाजूला चरी खोदण्यासाठी छोटा फाळ बसवला आहे. त्यांच्या मागोमाग वरून खालीपर्यंत पोकळ असा पाइप बसवला आहे. त्याच्या शेजारी उसाचे कांडे साठवण्यासाठी बादली बसवली आहे. पाइपच्या मागे एका व्यक्ती बसण्यासाठी सीट तयार केली आहे. त्यावर बसून एक व्यक्ती त्याच्या पुढील पाइपमध्ये हाताने ऊस कांडे टाकेल. गाडा पुढे जाताना आपोआप माती ढकलली जाण्यासाठी दोन तिरक्या प्लेट खाली बसविल्या आहेत. दुसऱ्या प्रकारामध्ये या चारचाकी यंत्राला चालविण्यासाठी चेन स्प्रॉकेट आणि पॅडेलची सोय केली. सायकलप्रमाणे पॅडल मारून ते चालवता येते. मात्र भुसभुशीत मातीमध्ये पॅडलद्वारे चालवण्यासाठी अधिक श्रम पडत असल्याचे लक्षात आले. माणसांचे चालवण्याचे श्रम कमी करण्यासाठी छोट्या इंजिनद्वारे या यंत्राला ऊर्जा देता येईल. त्यावर अद्याप प्रयोग सुरू असल्याचे विभाग प्रमुख उदय चव्हाण यांनी सांगितले. या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या व मजुराच्या कष्ट आणि वेळेमध्ये बचत होईल. सध्या याच्या चाचण्या प्रत्यक्ष शेतामध्ये घेतल्या जात असून, येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकचे प्राचार्य नागेश ठोंबरे यांनी दिली आहे. फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे व दत्तात्रेय फडतरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

अशी होते मजूर आणि वेळेत बचत पारंपरिक लागवड पद्धत - एक एकर लागवडीसाठी ८ ते १० मजुरांना संपूर्ण दिवस (सुमारे ८ तास) लागतो. ऊस लागवड यंत्राद्वारे - एक एकर लागवडीसाठी दोन मजूर पुरेसे असून, ते तीन तासांत काम पूर्ण करतात. तृतीय क्रमांकाचे बक्षीस बारामती येथील एका खासगी कंपनीने ‘स्किल इंडिया डे’ निमित्त आयोजित केलेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये आलेल्या १०० प्रकल्पांतून या ऊस लागवड यंत्राच्या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. संपर्क ः प्रसाद पाठक (विद्यार्थी), ७९७२९८३१८५ उदय चव्हाण (विभाग प्रमुख) , ९९६०३२२६०७ नागेश ठोंबरे (प्राचार्य), ९९६०००३११३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com