जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
टेक्नोवन
गोचिड निर्मूलनासाठी पर्यावरणपुरक पद्धती
जनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी ग्रामीण पातळीवर सहज उपलब्ध होईल, अशा औषधी वनस्पतीचा वापर राष्ट्रीय नावीन्यता फौंडेशनच्या संशोधकांनी केला आहे. त्याच्या चाचण्या हरियाना येथील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेमध्ये घेण्यात आल्या.
जनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी ग्रामीण पातळीवर सहज उपलब्ध होईल, अशा औषधी वनस्पतीचा वापर राष्ट्रीय नावीन्यता फौंडेशनच्या संशोधकांनी केला आहे. त्याच्या चाचण्या हरियाना येथील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेमध्ये घेण्यात आल्या.
दुधाळ प्राण्यांमध्ये रक्त शोषणाऱ्या परजिवीमध्ये गोचिड ही सर्वांत त्रासदायक ठरतात. त्यांच्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गोचिडांच्या चाव्यामुळे जनावर सतत अस्वस्थ राहून त्यांच्या आहारावर आणि चयापचयावरही परिणाम होतो. एक गोचीड आपली जीवनसाखळी पूर्ण करण्यासाठी ३० थेंबापेक्षा अधिक रक्त शोषते. गोचिडांच्या अधिक संख्येनुसार जनावरांतील रक्ताचे प्रमाण कमी होते. एकूण जनावरांची वाढ खुंटते आणि शरीराचे वजन कमी होते. गोचिडांच्या निर्मूलनासाठी सध्या विविध पद्धतीचा अवलंब केला जातो.
जनावरांच्या अंगावरील अळी, पिल्लावस्था आणि प्रौढ गोचिडांच्या नियंत्रणासाठी कोळीनाशकाचा वापर सर्वसामान्यपणे केला जातो. या वापरामध्ये अनेक अडचणी आणि धोके आहेत. मात्र, या परजिवीचा प्रादुर्भाव सातत्याने होत राहतो. अशा स्थितीमध्ये पारंपरिक गोचिड नाशकांना गोचिडांमध्ये प्रतिरोधकता तयार झाली आहे. पारंपरिक गोचिड नाशकांच्या तुलनेमध्ये अधिक कार्यक्षम उपाययोजनेचा शोध आवश्यक बनला आहे. सुधारित उपाययोजना ही स्वस्त आणि अधिक शाश्वत असावी, या उद्देशाने संशोधकांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी कोळीनाशकाचे गुणधर्म असलेल्या पारंपरिक औषधी वनस्पतींवर लक्ष केंद्रित केले. ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असलेल्या व कीडनाशक, वाढरोधक आणि कीडींना दूर ठेवणाऱ्या गुणधर्म असलेल्या वनस्पती निवडण्यात आल्या. तयार होणारे औषध हे ग्रामीण पातळीवर अगदी घरगुती पद्धतीने तयार करणे शक्य व्हावे, हाही एक महत्त्वाचा उद्देश ठेवण्यात आला.
राष्ट्रीय नावीन्यता फौंडेशन (NIF) च्या गुजरात येथील शाखेने पारंपरिक ज्ञानावर आधारित कडुनिंब आणि मिरीची पाने यापासून गोचिडनाशक तयार केले. त्याच्या देशपातळीवर विविध ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेची मदत घेण्यात आली. २०१९-२० मध्ये करनाल (हरियाना) येथील संस्थेने करनाल, जिंद आणि भिवानी या तीन जिल्ह्यांमधील ४७ शेतकऱ्यांच्या सुमारे २०३ जनावरांवर या औषधांच्या चाचण्या घेतल्या.
औषध बनवण्याची पद्धती ः
ग्रामीण भागामध्ये आढळणारे कडुनिंब (शा. नाव -Azadirachta indica) आणि मिरीचा एक प्रकार (Monk Pepper, शा. नाव - Vitex negundo) यांच्या पानांचा वापर केला जातो. सुमारे २.५ किलो निमपाला ४ लिटर कोमट पाण्यामध्ये, तर मिरीचा पाला २ लिटर कोमट पाण्यामध्ये वेगवेगळा रात्रभर किंवा १२ तासांसाठी भिजत ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी त्याचा अर्क तयार करून गाळून वेगवेगळा साठवला जातो. यातील ३०० मि.लि. निमद्रावण आणि १०० मि.लि. मिरीद्रावण एकत्र मिसळले जाते. ते स्टॉक सोल्यूशन ३ः१ प्रमाणात तयार करून ठेवावे. हे ४०० मि.लि. द्रावण ३६०० मि.लि. साध्या पाण्यामध्ये वापरण्यापूर्वी मिसळले जाते.
औषधांचा वापर आणि चाचण्या ः
औषध तयार केल्यानंतर त्याच्या चाचण्या हरियाना येथील ८ गावांमध्ये घेण्यात आल्या. पहिल्यांदा तीन दिवस सकाळ आणि संध्याकाळी गोचिड असलेल्या जनावरांच्या शरीरावर चोळून लावण्यात आले. प्रक्रिया केलेल्या जनावरांची निरीक्षण सात दिवसानंतर, चौदा दिवसानंतर, २१ दिवसांनंतर आणि २८ दिवसांनंतर करण्यात आले. यात त्यांच्या शरीरावरील विशेषतः कास, गळ्याखालील लोंबती त्वचा - पोळे, कान आणि अन्य भागांतील गोचिडांची संख्या मोजून त्याच्या नोंदी ठेवण्यात आल्या. त्यासाठी आवश्यक तिथे पशुवैद्यक, संशोधक आणि शेतकऱ्यांची मदत घेण्यात आली.
पारंपरिक औषधांचा परिणाम ः
- जनावरांवर प्रक्रिया केल्यापासून गोचिडांच्या संख्येमध्ये लक्ष घट होत गेली.
- पहिल्या ४८ तासांमध्ये गोचिडींचे प्रमाण ३४.५७±३.३५ [सरासरी ± प्रमाणित त्रुटी] इतक्याने कमी झाले.
- ५६ तासानंतर ते २४.६३±२.३४ [सरासरी± प्रमाणित त्रुटी] इतक्या संख्येने कमी झाले. अशा प्रकारे २८ दिवसांपर्यंत निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये प्रादुर्भावाचा दर ३.८४±०.२९ [सरासरी± प्रमाणित त्रुटी] इतका राहिला.
- तयार केलेल्या औषधांची कार्यक्षमता २८ दिवसांमध्ये गोचिड प्रादुर्भावित जनावरांवर ९२.९७% दिसून आली.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक त्रासदायक असलेल्या गोचिडाच्या प्रजातींचे (शा. नाव - Hyalomma Anatolicum) प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले. प्रयोगाच्या काळामध्ये गोचिडे पुन्हा येणेही रोखले गेल्याचे दिसून आले.
- प्रक्रियेनंतर येणाऱ्या नैसर्गिक प्रादुर्भावही पुढे ४५ दिवसांपर्यंत झाला नाही. ही बाब प्रयोगाच्या सर्व क्षेत्रावर स्पष्टपणे दिसून आली.
- एनआयएफ च्या एकत्रित औषधांचा वापर शेतकरी ४० ते ४५ दिवसातून एकदा करू शकतात.
किफायतशीरपणा ः
पारंपारिक कोळीनाशकांच्या साह्याने प्रक्रिया करण्यासाठी रसायनाची खरेदी, पशुवैद्यकाची फी यांचा प्रति वर्ष प्रति जनावर खर्च साधारणपणे १४४० रुपये होतो. ही उपाययोजना सरासरी २५ ते ३० दिवसांनी करावी लागते. तुलनेमध्ये नव्या औषधांद्वारे प्रक्रियेचा खर्च प्रति जनावर २० ते ३० रुपये असा होतो. प्रक्रिया ४५ दिवसातून एकदा करावी लागते. त्यामुळे वर्षामध्ये या प्रक्रियेसाठी १६० ते २४० रुपये इतका खर्च होईल. खर्चामध्ये बचत होत असल्याचे प्रयोग करण्यात आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांने मान्य केले.
प्रयोगाचा विस्तार ः
हरियानामध्ये ग्रामीण भागामध्ये कडुनिंब झाडांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असली तरी मिरीची झाडे फारशी नाहीत. त्यामुळे ग्रामीण पातळीवर औषध तयार करण्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ लागल्या. गावातील वयस्करांच्या मतानुसार ४० ते ५० वर्षापूर्वी मिरीची ही झाडे मुबलक प्रमाणात होती. ग्रामीण पातळीवर ही झाडे वाढवण्यासाठी प्रकल्पातील संशोधकांनी यमुनानगर (हरियाना) येथील वनविभागाच्या औषधी वनस्पती बागेतून २००० रोपांची खरेदी केली. ती ३० गावातील ६०० शेतकऱ्यांना वितरित केली. त्याच प्रमाणे करनाल येथील संस्थेच्या प्रक्षेत्रामध्ये, पॉलिक्लिनिक, कृषी विज्ञान केंद्रे आणि हमेती, जिंद भागामध्ये मिरीच्या रोपांची लागवड केली आहे. यामुळे स्थानिक पातळीवरच कडुनिंब आणि मिरीच्या झाडांच्या पाल्यापासून तयार केलेल्या औषधाने जनावरांचे परजिवीपासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे.
निष्कर्ष ः
ग्रामीण पातळीवर सहजतेने वापरता येईल, असे तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये राष्ट्रीय नावीन्यता फौंडेशनच्या संशोधकांना यश आले. हे तंत्रज्ञान सोपे, स्वस्त असूनही अन्य रसायनाच्या तुलनेमध्ये अधिक किफायतशीर असल्याचे आढळले. त्याची कार्यक्षमता ९२.९७ टक्के इतकी आहे. पशुआरोग्यासाठी अन्य अॅलोपॅथिक प्रक्रियेपेक्षा याचा फायदा अधिक दिसून आल्याने परिसरातील पशुधन अधिकारी, पशुवैद्यक यांनीही वेगाने वापर सुरू केला आहे.
(स्रोत ः आयसीएआर - नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, करनाल, हरियाना.)
- 1 of 23
- ››