जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपाययोजना

जमिनीची सुपीकता जपण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करावी.
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करावी.

जमिनीचे आरोग्य म्हणजेच मातीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म. हे गुणधर्म चांगले असल्यास वनस्पतींचे पोषण  आणि दीर्घकालीन अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इ. घटक मोजले जातात. जमिनीचा सामू ६.५ ते ८ पर्यंत असावा. पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता महत्वाची आहे.

महाराष्ट्रातल्या जमिनी दक्खनच्या काळ्या कातळापासून (बेसाल्ट) बनलेल्या आहेत. या खडकावर पाऊस, ऊन, हवा, सूक्ष्मजीव, उतार, वनस्पतींच्या मुळ्या यांच्या परिणामामुळे झीज होऊन माती तयार झाली. हीच माती वनस्पतींसाठी अन्नद्रव्यांचा स्रोत व आधार ठरते. कमी पाऊस आणि उष्ण कोरड्या हवामानामुळे बेसाल्ट खडकापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जमिनी हलक्या ते खोल काळ्या रंगाच्या झाल्या आहेत. या उलट याच खडकावर जास्त पाऊस पडल्यामुळे लॅटरायझेषणची प्रक्रिया सुरू होऊन त्यात आयर्न (लोह) व ॲल्युमिनियम ऑक्साइड शिल्लक राहिले. यामुळे कोकणातील जमिनींचा रंग लाल दिसून येतो.

जमिनींचे खोलीनुसार प्रकार

  • हलकी जमीन ः (२५ सेंमीपेक्षा कमी खोली) ः प्रमाण ३७.७ टक्के.
  • मध्यम खोल जमीन ः (२५-५० सेंमी खोली) ः प्रमाण ३०.९ टक्के.
  • खोल काळी जमीन ः (५० सेमी पेक्षा जास्त खोली) ः प्रमाण २६.३ टक्के.  
  • कोकणातील लाल तांबड्या जमिनीचे प्रमाण ५.६ टक्के आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजलेल्या लाल मातीचे थर (रेड बोल) आढळून येतात, परंतु त्यांचे गुणधर्म कोकणातील लाल मातीसारखे नसतात. ह्या रेड बोल मातीचा लाल रंग फार वर्षांपूर्वी लाव्हा रसामुळे माती विटांप्रमाणे भट्टीत भाजल्यामुळे तयार होतो. ही माती निकस असून, त्यात चुनखडीचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. म्हणून ही घाटावरची लाल माती शेडनेटमध्ये वापरण्यापूर्वी चुनखडीचे प्रमाण तपासूनच (मुक्त चुनखडी ५ % पेक्षा कमी असल्यावरच) वापरावी.  

    जमिनीची सुपीकता जमिनीतील उपलब्ध असलेल्या आवश्यक त्या सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकाला पुरवण्याच्या क्षमतेला जमिनीची सुपीकता म्हणतात. माती परीक्षणाद्वारे जमिनीची सुपीकता ओळखली जाते. एकंदरीतच राज्याचा सुपीकता स्तर नत्राच्या बाबतीत कमी ते मध्यम, स्फुरदाचे प्रमाण कमी ते अत्यंत कमी आणि पालाशचे प्रमाण भरपूर ते अत्यंत भरपूर असे आहे. महाराष्ट्रातील सुपीकता निर्देशांकात १९८० ते २००५ या कालावधीत सातत्याने घट होताना दिसून येते. यामुळेच जमिनीमध्ये १ किलो अन्नद्रव्य (नत्र + स्फुरद + पालाश) टाकले असता फक्त ६ किलो अन्नधान्य उत्पादन प्रति हेक्टरी मिळते. हेच उत्पादन याच जमिनींतून २५ वर्षांपूर्वी १६ किलो प्रती हेक्टरी मिळत होते. म्हणजेच जमिनीची सुपीकता सुमारे ६२ टक्क्याने कमी झाली आहे.   जमिनीचे आरोग्य म्हणजेच मातीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले असल्यास वनस्पतींचे पोषण दीर्घकालीन वनस्पतींना अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इ. घटक मोजले जातात. जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे ६.५ ते ८.० पर्यंत असावा. क्षारता ०.१० ते ०.५० डेसीसायमन/मीटर असावी. चुनखडीचे प्रमाण १० टक्केपेक्षा कमी असावे. महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त जस्ताची कमतरता ४२.०५ टक्के दिसून येते. त्या खालोखाल लोह (९.०४) या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. तसेच बोरॉनचीसुद्धा कमतरता जास्त विम्लधर्मीय चुनखडीयुक्त व कोकणातील तांबड्या जमिनीत ३२ टक्क्यांपर्यंत आढळून येते.

    कृषी हवामान विभाग व जमीन घडण

  •   महाराष्ट्र राज्यात कृषी हवामानानुसार ९ विभाग.
  •   पहिला विभाग ः जास्त पावसाचा व जांभ्या जमिनीचा प्रदेश आहे.
  •  विभाग २  ः जास्त पावसाचा परंतु जांभ्या जमिनीविरहित प्रदेश. हे दोन्हीही विभाग कोकण विभागातील आहेत.
  •  विभाग ३ ः हा घाटमाथ्याच्या प्रदेशात येतो.
  •  विभाग ४ व ५ ः हा संक्रमण विभाग असून, पश्चिम घाटातील पर्जन्यछायेतील जिल्ह्यांमध्ये मोडतो.
  •  विभाग ६ ः हा खरीप व रब्बी पिकांचा अवर्षणग्रस्त प्रदेश असून, पावसाचे प्रमाण कमी व अनिश्चित आहे.
  •  विभाग ७  ः हा खरीप पिकांचा निश्चित पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे.
  •     विभाग ८  ः अधिक पावसाळी मराठवाडा विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश आहे.
  •  विभाग ९ ः हा संमिश्र खडकापासून बनलेला, जमिनीचा जास्त पावसाळी प्रदेश हा नागपूर उत्तर पूर्व भाग, भंडारा, चंद्रपूर मध्य व पूर्व हा विभाग मोडतो.
  • सुपीकता निर्देशांक कमी होण्याची कारणे

  •  जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे.
  •  जमिनीतील सामू मध्यम ते जास्त विम्लतेकडे वाढत चालला आहे.
  •  सखोल पीक पद्धतींचा वापर.
  •  असमतोल अन्नद्रव्यांचा वापर.
  •  अमर्याद सिंचनाचा वापर.
  •  रासायनिक खाते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा.
  •  जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म आणि कमी होत चाललेली सूक्ष्म जीवाणूंची संख्या.
  •  वाढत चाललेल्या अपधावाच्या प्रमाणामुळे १ इंच थर (सुपीक थर) अन्नद्रव्यांसह वाहून जातो.
  • जमिनीच्या शाश्वत आरोग्य व्यवस्थापनासाठी

  •  सेंद्रिय खताच्या उपलब्धेसाठी शेणखतासाठी खड्डा पद्धत अथवा नाडेप पद्धतीचा अवलंब करावा.
  •  जैविक खतांचा वापर बीजप्रक्रिया किंवा शेणखतात मिसळून अधिक प्रमाणात करावा. (उदा. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळवणारे जिवाणू, ॲझोस्पिरीलम, ॲसेटोबॅक्टर इ.)
  •  पिकांची फेरपालट करावी. त्यात कडधान्य पिकांचा समावेश केल्यास पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थाची उपलब्धता होते. विविध सेंद्रिय खतांचा शिफारशीनुसार वापर करावा.
  •  माती परीक्षणानुसार खतांचा समतोल वापर अपेक्षित उत्पादन समीकरणाद्वारे करावा. जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.
  •   माती परीक्षण करून कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून करावा.
  •  ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांद्वारे अन्नद्रव्ये पीक वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत.
  •  पाण्याचा कार्यक्षण वापर करावा. त्यासाठी बागायत क्षेत्रामध्ये ठिबक, तुषार, मायक्रोस्प्रिंकलर पद्धतीचा वापर वाढवावा.
  •  मृद व जलसंधारणाची उपाययोजना लोकसहभागातून कोरडवाहू भागात कराव्यात. शासकीय योजनांचा फायदा घेऊन पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न करावेत.
  •  शेततळी तयार करून संरक्षित पाण्याची सोय करावी.
  •  बागायत क्षेत्रात दोन ते तीन वर्षातून एकदा तरी हिरवळीची पिके (उदा. ताग, धैंचा) घेऊन गाडावीत.
  •  फुले येण्यापूर्वी विविध तणे उपटून जागेवरच जमिनीत गाडावीत.
  •  क्षारपड जमिनीचे क्षेत्र सुधारण्यासाठी एकात्मिक पद्धतीने पाणलोट क्षेत्रात जिप्सम शेणखतातून जमिनीत मिसळावे. जादा पाण्याचे हलक्या जमिनीचे क्षेत्र ठिबक सिंचनाखालीआणावे. शक्य तिथे कोरडवाहू फळबाग लागवड करावी.
  •  पाण्याची विभागणी योग्य प्रकारे केल्यास जमिनी खराब होण्याचे प्रमाण रोखता येईल. उत्पादनात वाढ होईल.
  •  शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करून त्यानुसार जमीन सुधारणा व पीक पद्धतीचे नियोजन करावे.
  •  शेतातील उरलेले पीक अवशेष न जाळता त्यांचा आच्छादन म्हणून उपयोग करावा किंवा बारीक तुकडे करून जमिनीत मिसळावे, म्हणजे जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढून सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढेल.
  • - शुभम दुरगुडे, ९४२०००७७३२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com